Pages

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

माझ्या आईची पिढी



माझ्या आईची पिढी

माझ्या आईची पिढी... साधारण पन्नास ते साठ पासष्ठच्या दशकातली !!
माझी मावशी, आत्या, मामी, काकू, सासूबाई .. सगळ्या याच पिढीतल्या बायका.. !
आता आजीपण हौसेने मिरवणाऱ्या, नातवंडात रमणाऱ्या ...!!

बहुदा ह्यातल्या खूप जणींचं लग्न अगदी दाखवायचा कार्यक्रम होऊन वगैरे झालेलं .. मुलगा नीट शिकलेला असावा आणि घर खातंपितं असावं एवढ्याच माफक अपेक्षा ठेऊन झालेलं लग्न ! लग्नानंतर नवऱ्याला सहसा 'अहो ' म्हणण्याचा , एकत्र कुटुंबात फारशी प्रायव्हसी वगैरे न मिळण्याचा तो काळ .. प्रायव्हसी मिळावी असं त्यांनाही वाटलं असेलच कि!! पण समोर येणाऱ्या गोष्टींना सहज स्वीकारत पुढे गेलेली हि पिढी ! इच्छा आणि कर्तव्य ह्यात कर्तव्याला जास्त महत्व दिलं त्यांनी .. आणि इच्छा माराव्या लागल्या म्हणून त्याचा फारसा बाऊ सुद्धा केला नाही. कुणाचे फारसे घटस्फोटही झाले नाहीत म्हणून माझी पिढी खूप भाग्यवान !!

आईवडिलांच्या मायेला फारसं कुणाला मुकावं लागलं नाही.
माझ्या पिढीला आई बाबांमध्ये समजूतदारपणा कसा असावा , दोघांनी मिळून घर कसं चालवावं, थोडक्या उपलब्धतेत आनंदी कसं राहावं हे अगदी जवळून बघता आलं.

ह्या पिढीतल्या खूपशा गृहिणी होत्या. ज्या नोकरी करत त्यांना जरा आर्थिक स्वातंत्र्य होतं पण तेही माफकच !!
कोणत्याच बाबतीत त्यावेळी फार स्वातंत्र्य नसतानाही त्या समाधानी होत्या. माझ्या पिढीचं मात्र तुलनेने त्यांच्याही आधी सुखवस्तू आयुष्य लाभूनही समाधान हरवल्यासारखं झालंय. आज छोटे मोठे निर्णय माझी पिढी चुटकीसरशी घेते पण आपल्या घरातल्या आई, सासूबाई त्यांना काही विचारलं कि पटकन म्हणतात
"ह्यांना विचारून सांगते" किंवा "सुनेला / लेकीला विचारून सांगते"
ह्यातलं कुणीच तिला नाही म्हणणार नसतं तरीही छोट्या गोष्टींचे निर्णयही ती घरातल्याना सांगितल्याशिवाय घेत नाही. असं नाही कि ती मनाने कमकुवत असते पण तिच्या मनाला हि सवयच झालेली असते. आज अजूनही काही घरी ह्या पिढीची ऐशी नव्वदीतील सासू किंवा आई असते. तिला दोन पिढ्यांमधला दुवा व्हावं लागतं. सून, लेकाचं पटत असतं आणि त्याचवेळी सासू किंवा आईला समजून घ्यावं लागतं. माझी एक काकू गमतीने म्हणाली होती
"आम्ही आधी सासूला हो हो केलं आणि आता सुनांना करतोय.
आम्हालाही काही मन आहे हेच विसरायला होतं आताशा "!

ह्या पिढीने सामाजिक बदल पचवले आणि आनंदाने स्वीकारलेही!! सेकण्ड इंनिंग सुरु झाल्यावर हसतखेळत मजा करत आणि संसार करताना राहून गेलेय इच्छा पूर्ण करत जगायचं ठरवणारी पिढी भजनी मंडळाच्या ट्रीप काढून अगदी धम्माल करताना दिसते. नवीन स्मार्टफोन शिकून फेसबुक , व्हाट्सएप वर अगदी सक्रिय दिसते.
नातवंडांचे लाड करत, त्यांच्याबरोबर त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करते, अभ्यास घेते. अजूनही कोणत्याही बंधूंचे लाडू चांगले मिळत असले तरी घरी लोणी कढवून साजूक तुपात केलेले लाडू आवर्जून लेकासुनांकडे पोचते करते. भरपूर प्रमाणात करायला जमलं नाही तरी नैवेद्यापुरत्या पुरणपोळ्या घरीच करते.
संक्रांतीला लांब राहणाऱ्या भाचे कंपनीसाठी तिळगुळा बरोबर आठवणीने
हळद-कुंकवाची पुडी ठेवते. घरात कामाला ठेवलेल्या कामवालीपेक्षा जास्त हीच कामं करत असते .
सोमवारी डाळतांदूळाची खिचडी करायची नाही , लोणी काढावयाचे नाही
ह्या आणि अशा अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत तरी सासूबाई किंवा आईने सांगितलंय आणि काही तोटा तर नाही ना त्यात असं म्हणत त्या गोष्टी पाळत असते.

अशी हि माझ्या आईची पिढी !!
खूप समाधानी आणि आयुष्याचा आनंद घेणारी !!
*ह्या पिढीला माझा मानाचा सलाम !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा