“बूँद से गयी, वह हौद से नहीं आती !”
आपल्यापैकी अनेकांचा असा ग्रह असतो की, जो वयानं मोठा त्याचंच
म्हणणं योग्य. ‘मी तुझ्यापेक्षा चार पावसाळे अधिक पाहिलेत.’ किंवा ‘केस पांढरे झालेत
ते उगीच नाही’ असे “अनुभवांचे बोल” तरुण मंडळींना नेहमी ऐकवले जातात. पण, खरं सांगायचं तर, हे अर्धसत्य
आहे. ‘आयुष्य अधिक जगणं म्हणजे आयुष्याचा अनुभव अधिक असतो आणि म्हणून प्रत्येक गोष्टीत
आपलं मत प्रमाण मानलं गेलं पाहिजे’ असा दावा कुणी करू नये आणि तसा हट्टसुद्धा कुणी करू नये. कशी
गंमत असते पहा – फार हट्ट करणा-या, रुसून-फुरंगटून बसणा-या माणसांना आपण “अरे, तू काय
लहान आहेस का? “ असं म्हणतो ना. मग आपणच प्रौढत्वाची रेषा ओलांडून गेल्यावर असंच कसं
काय वागायला लागतो, याचा विचार वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर उभी असलेली मंडळी करणार आहेत
की नाही?
भारतात पूर्वीच्या काळी आश्रमव्यवस्था अस्तित्वात होती. एक उत्तम
सामाजिक संतुलनाचं ते उदाहरण होतं. आपणच ते संतुलन बिघडवून टाकलं. ब्रह्मचर्याश्रम,
गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम या चार आश्रमांमध्ये व्यक्तीचं आयुष्य
विभागलेलं होतं. ‘संन्यासाश्रम’ हा चतुर्थ आश्रम प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा जो अविभाज्य
भाग होता, त्याचं खरं स्वरूप आणि त्याची आवश्यकता आपण पुन्हा एकदा जाणून घेण्याची आवश्यकता
आहे. मायेचे, मोहाचे, महत्वाकांक्षांचे सगळे पाश तोडून टाकून, उर्वरित आयुष्य अत्यंत
शांत आणि संयमाने व्यतीत करावे, असं या आश्रमाचं स्वरूप. मुलं, नातवंडं, पतवंडं ही
सगळी नाती त्यागून, आयुष्यभर कमावलेल्या स्थावर-जंगम संपत्तीवर समाधानाने उदक सोडून
आपण उर्वरित काळ स्वतःशी संवाद करण्यात आणि ईश्वरचिंतनात घालवावा, ही या आश्रमाची अपेक्षा.
आहार, विहार, वास्तव्य या सगळ्या बाबतीत अत्यंत साधेपणा स्वीकारला जात असे. अभक्ष्य
भक्षण, मद्य, मदिरा, मदिराक्षी, राजवस्त्रे, दागदागिने, सत्ता, अधिकार या सगळ्या गोष्टी
त्याज्य असत.
व्यक्तीच्या आयुष्यातले हे सर्व आश्रम वयानुसार निश्चित केलेले
होते. त्या शारिरीक वयाच्या आधीच पुढच्या आश्रमात प्रवेश करणे समाजसंमत नव्हते. मात्र,
वयानुसार ब्रह्मचर्य आश्रमातून गृहस्थाश्रम स्वीकारायलाच हवा, असे बंधन घालता येत नसे.
गृहस्थाश्रम स्वीकारणे हा ज्या त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा भाग होता. परंतु, गृहस्थाश्रमाचा
त्याग कधी करणे योग्य ठरेल, याविषयीची मार्गदर्शक तत्वे निश्चित झालेली होती. सांसारिक
जबाबदा-या, मुलाबाळांची आयुष्यं मार्गी लावणं, त्यांच्या संसाराची घडी नीट बसवणं, नातवंडांचं
सुख अनुभवणं आणि संपूर्ण समाधानानं निवृत्त होणं हा मार्ग पत्करायचा की, गृहस्थाश्रमात
प्रवेश न करता आजन्म ब्रह्मचर्याचं आचरण करावं, हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य व्यक्तींना
होतं. अनेक व्यक्ती आजन्म ब्रह्मचारी राहतही असत. पण, गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर
त्यातील अपेक्षित जबाबदा-या पूर्ण केल्यानंतर त्या आश्रमात राहता येत नसे. व्यक्ती
आपणहून या सगळ्या जंजाळातून आपली सोडवणूक करून घेत असत.
‘स्वेच्छेने निवृत्त होणे’ ही वृत्तीच आता लोप पावत चालली आहे,
असे वारंवार माझ्या निदर्शनास येते. लोक अधिकारच सोडायला तयार होत नाहीत. माझं घर,
माझा संसार, माझा मुलगा, माझी मुलगी यातून माणसांना बाहेरच पडायचं नसतं. ‘हे सगळं माझं
आहे आणि माझंच राहणार’ हा हट्ट सोडतच नाहीत. वाद, तक्रारी, कुरबुरी सुरु होतात, त्या
इथेच. नव्या पिढीच्या हातात सगळी सूत्रं द्यावीत आणि त्यांना त्यांची जबाबदारी व्यवस्थित
समजावून सांगून आनंदानं बाहेर पडावं, हे आता घडतच नाही. शरीराची गात्रे थकत चालली तरीसुद्धा
माणसे त्यांचा घरादारावरचा अधिकार सोडायला तयार होत नाहीत. असं का घडत असावं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा