भारतीयसॊरवर्ष_कालदर्शिका..!
1957 मध्ये भारत सरकारने तीन बदल केले.
एक चलन, दोन – वजन-मापे
अन् तीन – कालमापन
१) चलन
रुपये, आणे, पैसे, पै असे चलन प्रचलित होते. त्यात 12 पै 1 पैसा
, 4 पैसे 1 आणा , 16 आणे 1 रुपया असा हिशोब असे. त्याऐवजी 100 पैसे 1 रुपया असा सुटसुटीतपणा
आणला.
२) वजन-मापे :
शेर, मण, रत्तल, गुंज, मासा, तोळा, औंस, पौंड, अशी वजने प्रचलित
होती. तर लांबी मोजण्यासाठी इंच, फूट,यार्ड, फर्लांग, मैल इत्यादी तर क्षेत्र मापन
एकर, गुंठा, बिघा या मापात मोजायचे. त्याऐवजी वजनासाठी ग्रॅम-किलोग्रॅम, लांबीसाठी
मीटर, क्षेत्रासाठी हेक्टर, आकारमानासाठी लिटर अशी मेट्रिक – दशमान पद्धत वापरणे कायद्याने
बंधनकारक केले.
हे दोन्ही बदल लोकांमध्ये रुजवण्यासाठी भारत सरकारने बराच प्रचार
– प्रसार केला. त्यामानाने तिसर्या बदलाकडे कमी लक्ष पुरवले. तो बदल तितकासा रुळला
नाही.
३) कालमापन
1952 साली डॉ. मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॅलेंडर समायोजन
समिती’ची स्थापना झाली. त्यांनी भारतात तसेच जगात प्रचलित असणार्या
कालमापन पद्धतींचा अभ्यास करून एक कॅलेंडर सुचवले. त्याला “भारतीय सौर कालदर्शिका”म्हणतात. हे कॅलेंडर 1 एप्रिल 1957 पासून
लागू झाल्याचे भारत सरकारने जाहीर केले. या कॅलेंडरमध्ये सूर्य – चंद्र यांची नक्षत्रसापेक्ष
स्थाने, ऋतूमान आणि भौगोलिक स्थिती यांचा समन्वय साधलेला आहे.
“भारतीय सौर” कालगणनेनुसार एका वर्षात 12 महिने असून
त्यात 365 दिवस असतात. वर्षाची सुरुवात -‘1 चैत्र’उत्तरायणातल्या विषुवदिनापासून होते.
या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. महिन्यांची
नावे मराठी महिन्यांप्रमाणे चैत्र, वैशाख, जेष्ठ अशी आहेत. फक्त मार्गशिर्ष महिन्याचे
नाव अग्रहायण असे वेगळे आहे. पहिल्या चैत्र महिन्यात 30 दिवस तर दुसर्या - वैशाख
– महिन्यापासून सहाव्या – भाद्रपद – महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात 31 दिवस येतात.
यावेळी दक्षिणायणातला विषुवदिन असतो. म्हणजे पुन्हा पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांचा दिवस
आणि 12 तासांची रात्र असते. पुढचे सहा महिने अश्विन ते फाल्गुन प्रत्येकी 30 दिवसांचे
असतात.
आज प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे #22मार्च या
दिवशी भारतीय सौर #1चैत्र येतो.२३ जूनला सूर्य कर्क वृत्तावर दिसत असताना तीन महिने
पूर्ण होऊन भारतीय सौर 1 आषाढ येतो. दक्षिणायणातील विषुवदिनाला 23 सप्टेंबरला सहा महिने
पूर्ण होऊन भारतीय सौर 1 अश्विन येतो. तर 22 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ
महिने पूर्ण होऊन भारतीय सौर 1 पौष येतो.
सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष
गती मंदावते म्हणून त्या काळातले वैशाख ते भाद्रपद हे महिने 31 दिवसांचे. सूर्य विषुववृत्ताच्या
दक्षिणेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती अधिक असते म्हणून त्या काळातले
अश्विन ते फाल्गुन हे महिने 30 दिवसांचे. वर्षात एकूण दिवस 365. तारीख बदलणार मध्यरात्री
12 वाजल्यानंतर.
या कालगणनेचे ‘साल’ कोणते घ्यावे याचा विचार करताना साधारणपणे मार्च मध्ये सुरू
होणारे – शालिवाहन शक म्हणजेच भारतीय सौर वर्षाचे साल निश्चित करण्यात आले. सध्या इ.
स. 2013 म्हणजेच भारतीय सौर 1935.
भारतीय सौर कालगणनेप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट म्हणजेच
24 श्रावण या दिवशी येतो तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी म्हणजेच 6 माघ या दिवशी येतो.22
मार्च 1957 हा भारतीय सौर कालगणना अंमलात आणल्याचा पहिला दिवस भा. सौ. 1 चैत्र
1879.
आपण भारतीयांनी ही कालगणना अभिमानाने वापरली पाहिजे.रोजच्या वर्तमानपत्रात
ही कालगणना दिलेली असते. आकाशवाणीचे केंद्र सुरू होताना भारतीय सौर दिनांक सांगितला
जातो. शासकीय पत्रके, परिपत्रके यामध्येसुद्धा ही कालगणना नोंदलेली असते. भारतीय रिझर्व
बँक, भारतीय स्टेट बँक यांच्या कॅलेंडरमध्ये या तारखा छापलेल्या असतात. भारतीय सौर
दिनांक असलेला धनादेश विधिमान्य असल्याचे अध्यादेश भारतीय रिझर्व बँकेने पूर्वीपासूनच
काढले. महाराष्ट्र शासनाने इ. स. 1983 मध्ये आदेश काढून शाळा, महाविद्यालये, स्थानिक
स्वराज्य संस्था यांनी आपल्या सर्वसाधारण नोंदवहीत 1 एप्रिल 1957 नंतर जन्मलेल्या सर्वांचे
जन्मदिनांक भारतीय सौर कालमापनाप्रमाणे नोंदलेले असावेत असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत.
आज महाराष्ट्रात औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली नगरपालिकांनी भारतीय सौर दिनांकाच्या
आदेशाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.
प्रत्येक भारतीय नागरिकाने “भारतीय सौर” कॅलेंडर रोजच्या व्यवहारात वापरले पाहीजे.जपान,
चीन, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये स्वत:ची कॅलेडरे आहेत आणि ती ते देश मन:पूर्वक
वापरतात.भारतीय शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकपणे चोख ठरेल अशी भारतीय सौर कालगणना आपल्यासमोर
ठेवली. भारतीय शासनाने तिचा अंगिकार केला. आता आपण सर्व भारतीयांनी ती आपल्या दैनंदिन
व्यवहारात आणून आपली विज्ञाननिष्ठा आणि आपला देशाभिमान दाखवून द्यायला हवा.
( खुद्द शिवाजी महाराजांनी पंचांगात सुधारणा करण्यासाठी आणि योग्य कालगणना करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केलेले
होते. त्यांनी देखिल सुधारित कालगणना सूर्य सिद्धांतानुसार केलेली आढळते. त्या तज्ञांनी
ह्या निमित्ताने ‘करण कौस्तुभ’ ग्रंथ रचला. ह्यावरून छत्रपती शिवरायांनीसुद्धा कालगणनेसाठी
सूर्यसिद्धांताचा पुरस्कार केला हे स्पष्ट आहे. संदर्भ: वेध महामानवाचा – श्रीनिवास
सामंत)
सूर्यसिद्धान्तावरून बनवल्या जात असलेल्या
काही भारतीय कालदर्शिका -
सूर्यसिद्धान्तीय आदित्य पंचांग
ऋषिकेश पंचांग
गणेश आप्पा पंचांग
राजेश्वरशास्त्री यांचे धारवाड पंचांग
पारनेरकर महाराज पुरस्कृत पारनेर पंचांगवंटी कुप्पल पंचांग
काशी विश्वविद्यालय प्रकाशित पंडित मदनमोहन मालवीय पुरस्कृत विश्वपंचांग
दक्षिणेकडील शृंगेरी शंकराचार्यांच्या शारदा पीठावरून प्रसिद्ध
होणारे पंचांग
महाराष्ट्रातील एकमेव धर्मशास्त्रसंमत सूर्यसिद्धान्ताधारित देशपांडे
पंचांग
उत्तरादि मठाचे सूर्यसिद्धान्त पंचांग
हालाडी पंचांग.
#हिंदूचंद्रवर्ष_कालदर्शिका
भारतीय लोक पूर्वीपासून काल गणना करताना दिवस-महिने-वर्ष हे चंद्राच्या
अवस्थे प्रमाणे म्हणजे कले प्रमाणे मोजत आलो आहोत. ह्यालाच चांद्र-वर्ष असे म्हणतात.
साध्या माणसालाही रात्री आकाशात चंद्राकडे पाहून तिथी कळते. दिवसागणिक चंद्राच्या स्थिती
आणि कलेत फरक पडतो. (एक सांगायची गोष्ट म्हणजे चंद्र जसा पृथ्वी भोवती फिरतो तसाच स्वत:भोवतीही
फिरतो, पण पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याची एक बाजू कायमची पृथ्वी कडे रोखलेली
असते ह्यालाच gravitational lock असे म्हणतात
–अर्थात ह्याचा आत्ता आपल्या कालगणनेशी संबंध नाही)त्यामुळे तिथी कळणे सहज सोप्पे होते.
हे आता आता पर्यंत फार महत्वाचे होते ते अशा करता की, आज आपल्याकडे
कालदर्शिका, अगदी सहज आणि विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत पण पूर्वी हे नव्हते. त्यामुळे
चंद्राच्या कला पाहून काल निश्चिती करणे निरक्षर आणि गरीब माणसालाही अत्यंत सोपे होते.
तर हा चंद्र पृथ्वी भोवती आपली फेरी साधारण २७.३२३ दिवसात पूर्ण करतो, पण चंद्र स्वयंप्रकाशित नाही आपण चंद्राचा सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला भाग फक्त बघू
शकतो आणि तो रोज थोडा थोडा बदलत असतो (कला) त्या हिशेबाने पहिले तर २९.५५ दिवस चंद्राला
आपल्या कलांचे आवर्तन पूर्ण करायला लागतात. हाच चंद्र महिना. आता असे का होते
?
ते जरा समजावून घेऊ.
पृथ्वी आणि सूर्य ह्यांच्या केंद्राला जोडणारी एक काल्पनिक रेषा
काढली आणि त्याच रेषेवर चंद्राचाही केंद्र आहे असे गृहीत धरले (हि अमावास्या किंवा
पौर्णिमा असेल) तर त्याच ठिकाणी परत म्हणजे तिन्ही गोलाकांचे केंद्र बिंदू एकाच रेषेत
यायला २७.३२३ दिवसांच्या पेक्षा जास्त कालावधी लागेळ. जरी चंद्र आपली पृथ्वी भोवतीची
प्रदक्षिणा २७.३२३ दिवसात पूर्ण करत असला तरीही. ह्याचे कारण आपली पृथ्वी सूर्या भोवती
फिरत थोडी पुढे गेलेली असते. त्यामुळे सुरुवातीला असणारी पृथ्वी-सूर्य केंद्र जोडणारी
रेषा आपला कोन थोडा बदलून पुढे गेलेली असते. हे जास्त अंतर कापायला चंद्राला थोडा अधिक
कालावधी लागतो आणि घोळ असा की हे अंतर प्रत्येक महिन्याला थोडे थोडे वेगळे येते, कारण
पृथ्वी सूर्याभोवती गोल नाही तर लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते. त्यामुळे सूर्यापासून
लांब लंब वर्तुळाच्या जास्त वक्र ठिकाणी असताना तिचा वेग जास्त असतो, तर सूर्यापासून
जवळ लंब वर्तुळाच्या कमी वक्र कक्षेत असताना तो कमी होते. म्हणून हा जो २९.५ दिवसांचा
कालावधी सांगितला आहे तो सरासरी आहे. काही महिने ह्या पेक्षा जास्त कालावधीचे तर काही
महिने कमी कालावधीचे असतात.
तर चंद्र आपल्या सर्व कलांचा (!) हिशेब जमेला धरून ३५४ दिवसात
आपले १२ महिने पूर्ण करतो . हेच ते चंद्र वर्ष पण पृथ्वीला आपली सूर्याभोवतीची नियोजित
फेरी पूर्ण करायला अजून ११ दिवस जास्त लागतात. (जास्त अचुक सांगायचे तर ११.२५ दिवस)
तुम्ही म्हणाल अख्ख्या वर्षात ११.२५ दिवस मागे पुढे काय विशेष ? पण नाही ह्याचे फार
मोठे परिणाम होऊ शकतात. दर वर्षी ११.२५ दिवस मागे पडत काही वर्षांनी श्रावण महिना उन्हाळ्यात
आणि मग हिवाळ्यात जाईल, कारण पृथ्वीवरचे ऋतू सूर्याच्या आणि पृथ्वीच्या परस्पर स्थितीमुळे
घडतात, चंद्राच्या नाही. म्हणून मग आपण अधिक मासाची निर्मिती करून हे त्रांगडे निस्तरून
घेतले आहे. त्यामुळे आपले महिने आणि त्यांच्याशी निगडीत ऋतू आणि पर्यायाने येणारे सण
स्थिर राहतात. मुसलमानी काल गणनेत ही सोय नसल्याने त्यांचा रमजानचा महिना( म्हणजे सगळेच
महिने खरतर) सरकत सरकत हिवाळा ते कडक उन्हाळा असा प्रवास करतो.ऐन उन्हाळ्यात रोजे ठेवताना
त्यांना किती त्रास होत असेल त्याची कल्पना करा म्हणजे हे compensation कसे आणि किती
महत्वाचे हे समजेल….!
#इंग्रजीसॊरवर्ष_कालदर्शिका
सध्या सौर वर्षावर आधारलेल्या दोन कालदर्शिका प्रचलित आहेत.
१. ज्युलिअन कालदर्शिका आणि
२.ग्रेगरींयन कालदर्शिका
ह्या दोन्ही प्रकारच्या काल दर्शिका पाश्चात्य- ख्रिश्चन लोकांनी
वापरत आणल्या. ग्रेगरींयन कालदर्शिका इंग्रजांनी १७५२ साली स्वीकारली त्या आधी ते जुलिअन
कालादार्शिका वापरत होते . का? त्यांनी असे का केले? काय फरक आहे ह्या दोन प्रकारच्या
कालदर्शिकांमध्ये? आता ह्यातला फरक काय आहे तो समजावून घेऊ .
पृथ्वी स्वत:भोवतीची प्रदक्षिणा २४ तासात पूर्ण करते. हा एक दिवस
हे आपण जाणतो पण तिने एक प्रदक्षिणा पूर्ण केली हे आपण कसे ओळखणार ? सूर्याच्या स्थानावरून.
म्हणजे उदा. सूर्य अगदी माथ्यावर असताना दिवस सुरु केला तर परत जेव्हा तो बरोबर माथ्यावर
येईल तेव्हा एक दिवस पूर्ण होईल. बरोबर? नाही…चूक, कारण जेव्हा असे होईल तेव्हा पृथ्वी ने स्वत: भोवती एक प्रदक्षिणा
पूर्ण करून ती (३६० अंशाच्या ) थोडी पुढे गेली असते कारण स्वत: भोवती फिरताना ती सूर्याभोवती
ही फिरत असते. त्यामुळे सूर्य बरोबर परत माथ्यावर यायला तिला थोडा अजून वेळ लागतो.
समजा १ मार्च ला दुपारी १२.०० वाजता आपण दिवस मोजायला चालू केले
तर बरोबर ३६५.२५ दिवसांनी २८ फेब्रुवारीला
पृथ्वी त्याच ठिकाणी परत येईल. पण आपण वरचा ०.२५ दिवस न मोजता वर्ष ३६५ दिवसांनी
पूर्ण झाले असे मानतो आणि हा जो पाव दिवसाचा जास्तीचा वेळ आहे तो आपण दर चार वर्षांनी
फेब्रुवारीत एक दिवस जास्त वाढवून compensate करतो. त्याला लीप वर्ष म्हणतात. ही अगदी
सर्वसाधारण माहिती आहे.
एखादे वर्ष लीप वर्ष आहे हे कसे ठरवायचे?
अगदी सोप्पे आहे. त्या वर्षाच्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जायला
हवा उदा २०१६, २०१२ वगैरे हे सगळ आपल्याला महिती असते, पण खरी गम्मत आता पुढे आहे.
आपण आता वर म्हटले की पृथ्वी ३६५.२५ दिवसात एक फेरी पूर्ण करते, पण ते खरे नाही खरा
कालावधी आहे ३६५.२४२१८१.दिवस म्हणजे ०.२५ ला अगदी थोडा कमी कालावधी.
आता ह्याचा फरक लगेच जाणवत नाही पण जुलिअन कालदर्शिका सुरु झाल्यानंतर
जवळपास १५०० वर्षांनी ह्याचा फरक जाणवू लागला होता. ख्रिश्चनान्चा इस्टर हा मोठा सण असतो . त्यादिवशी
वसंत ऋतू चालू होतो म्हणजे आकाशात सूर्य विषुववृत्त ओलांडून उत्तरेकडे सरकू लागतो.
जुलिअन कालदर्शिकेप्रमाणे ५ एप्रिलला हे होते, पण प्रत्यक्षात असे दिसले की सूर्याने
विषुवृत्त आधीच ओलांडले आहे, ते पण २३ मार्च ला म्हणजे तब्बल ११ दिवस आधी. ह्याला धार्मिक
महत्व त्या काळी असल्याने हा घोळ कसा होतो ह्याच्यावर खूप विचार केला गेला आणि खगोलशास्त्रज्ञांना
हे जाणवले की गेल्या साधारण १५०० वर्षात आपले वर्ष मोजणे थोडे थोडे पुढे पुढे सरकत
गेल्याने हे घडले आहे. म्हणून त्यांनी अफलातून युक्ती शोधली.
दर चार वर्षांनी लीप वर्ष येते आणि १०० ला ४ ने पूर्ण भाग जातो,
म्हणून प्रत्येक १००वे वर्ष हे पूर्वी लीप वर्ष असायचे. पण आता नवीन नियमानुसार कोणतेही
१०० वे वर्ष जर ४०० ने पूर्ण भाग जाणारी संख्या असेल तर आणि तरच ते लीप वर्ष असेल नाहीतर
नाही, म्हणून १७००,१८००,१९०० ही लीप वर्षे नव्हती पण २००० हे लीप वर्ष होते २१०० लीप
वर्ष असणार नाही. आता हा घोळ इथून पुढे निस्तरला गेला पण आधी जो ११ दिवसांची चूक आली
होती त्याचे काय? म्हणून मग ख्रिश्चनांचा धर्म गुरु पोप ग्रेगरी ह्याने ४ ऑक्टोबर १५८२
ला ही चूक दुरुस्त करून घेतली आणि एक फर्मान काढून सांगितले की उद्या म्हणजे ५ ऑक्टोबरला
५ ऑक्टोबर न म्हणता १५ ऑक्टोबर म्हणण्यात यावे हो!.
आता जे देश पोपचे ऐकत म्हणजे स्पेन, पोर्तुगाल वगैरे त्यांनी
ऐकले पण इंग्रज आधीच पोप पासून काडीमोड घेऊन लांब झाले होते (आठवा, आठव्या हेन्रीचे
प्रताप) त्यांचे चर्च ऑफ इंग्लंड आणि आर्च बिशप ऑफ कॅनटरबरी काही ऐकायाल तयार नव्हते.
पण अखेरीस त्यांना ह्याचे महत्व कळले आणि त्यांनी १७५२ च्या सप्टेंबर मध्ये ही सुधारणा
केली आणि ग्रेगोरियन कालदार्शिका स्वीकारली.
ज्यामुळे जुलिअन आणि ग्रेगरियन कालदर्शिकेत हा ११ दिवसांचा फरक
आढळून येतो त्याचे शास्त्रीय कारण आपण आता पर्यंत समजावून घेतले. आता अख्ख्या होल वर्ल्ड
ने जरी ही ग्रेगरियन कालदर्शिका स्वीकारली असली तरी जुनी जुलिअन कालदर्शिकच ग्राह्य
मानणारे लोकही आहेत. आडमुठे लोक सगळ्याच समाजातून असतात. जेरुसलेम, पोलंड, रशिया, सर्बिया
मोन्तेनेग्रो इथली Orthodox church अजूनही जुनी जुलिअन कालदर्शिककाच वापरतात. त्यामुळे
सगळे जग जेव्हा तारीख २२ मार्च २०१७ सांगत असते तेव्हा ह्यांची तारीख ९ मार्च २०१७
असते, (१७५२ पासून आजपर्यंत ११ दिवसांचा फरक आता १३ दिवसांचा झालाय… आहे कि नाही ह्यांच्या कर्मठपणाची कमाल!)
आपण आज इंग्रजी कॅलेंडर अंगिकारले आहे आणि ते फक्त आपणच नाही
तर बहुतेक सगळ्या जगाने अंगीकारलेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा