नावात काय आहे ?
लक्ष्मीपूजनाची वेळ आली
. सर्व उत्सुकतेने वाट पाहत होते की नवीन नवरीचे काय नाव ठेवण्यात येते. खरं तर नुकतीच
पंचविशी गाठलेल्या कुमारी निशा गोरेचे लग्न श्रीयुत रवि काळेबरोबर होणे हे काही ' लव्ह मेरेज ' वगैरे
नव्हते . नावात आणि आडनावात कितीही विरोधाभास असला तरी हे लग्न दोघांच्याही घरच्यांच्या
संमतीने व पसंदीने ठरलेले , ' अरेंज्ड मेरेज ' होते . ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत चालले
होते व आता शेवटचा अंक रंगला होता.
सौ.कां. कुमारी निशा गोरे म्हणजे शिक्षणात खूप हुशार अशी आपल्या
आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेक होती . लहानशा खेड्यातली राहणारी सुंदर , देखणी ,
आणि नाजूक सौ .कां . कुमारी निशा गोरे , पुणे शहरात एका मल्टीनेशनल कंपनीत कामाला होती
. आई वडील खेड्यातले असले तरी त्यांनी सौ.कां .कुमारी निशा गोरेची प्रत्येक हौस पुरविली
होती , या मुळे सौ . कां . निशा गोरे थोडी जास्तच लाडावलेली होती . गांव खेड्यातून
आली असली तरी पुण्याचं हवामान तिला बरंच मानवलेल होतं , आणि शहरातल्या रंगात रंगायलाहि
तिला फारसा वेळ लागला नाही . - तर अशा या सौ
. कां . निशा गोरेची लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे श्रीयुत रवि काळेशी
जेमतेमच भेट झाली होती . सकाळी बघण्याचा कार्यक्रम झाला व संध्याकाळी साखरपुडा उरकला
गेला , आणि मुलगा लगेच परदेशात जाणार म्हणून दहा दिवसातच लग्नाचा बेत ठरला . साखरपुड्याच्या
दिवशी सतत तिला कोणी न कोणी घेरूनंच होतं म्हणून तिला श्रीयुत रवि काळेशी धड बोलताहि आलं नव्हतं . त्या
दिवशी तिला श्रीयुत रवि काळेला बरंच काहीं विचारायचं होतं . तिच्या बऱ्याच अटी तिला
श्रीयुत रवि काळेला सांगायच्या होत्या . म्हणजे जसं स्वयंपाक करणार नाहीं , धुणं धुणार नाहीं , केर
वारा , जागा पुसणे , व कोणतेही घर काम करणार नाहीं . सासूसासऱ्यांची सेवा करणं जमणार
नाहीं . वगैरे वगैरे . या शिवाय तिला एक दुसऱ्यांच्या आवडी निवडी , आणि एक दुसऱ्यांच्या
स्वभावाबद्धल पण सविस्तर बोलायचं होतं . पण हे शक्य न झाल्याने ती थोडी फार नव्हे तर
जास्तचं अस्वस्थ होती आणि तिच्या मनात सारखी
एक हुरहूर होती . बरं , लग्नसोहळा गावांत करण्याचे ठरले असल्यामुळे , तयारी करण्यासाठी
,लगेच पंधरा दिवसाची रजा काढून तिला आई वडिलांसोबतच गावाला जावेच लागले . या सगळ्या बाबतीत विरस झाल्यामुळे,एकूण
काय सौ . कां . निशा गोरेच्या चेहऱ्यावर , लग्नमंडपात एकाच वेळी अनेक भाव तरंगत होते
.
आई वडिलांच्या लाडात वाढली असली तरी सौ कां निशा गोरे ही फार
स्वाभिमानी मुलगी होती . वयाच्या इक्विसाव्या वर्षीच नोकरी करून आत्मनिर्भर झाली व
आत्मविश्वास आणि स्वाभिमान जास्तच वाढला . पण इतकं असूनही अद्याप तरी ती आईवडिलांच्या धाकात होती .म्हणून पटकन लग्नालाही
तयार झाली . पण असं असलं तरी तिचं आपलं स्वतंत्र जग होतं , स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं
, स्वतंत्र अस्तित्व तर होतचं . आणि विशेष म्हणजे ती आपल्या मतांवर ठाम असायची
. - मैत्रिणीशी कधी चर्चा होत असता मैत्रिणींना
तिचे विचार कळायचे . एकदा शाळेत असताना ,
' स्त्री मुक्तीसाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा ' या विषयावर स्पर्धेत निशा
गोरेनी भाग काय घेतला , व तिला बक्षीस काय मिळाले , तिचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोनच
बदलला .पुढे महाविद्यालयात देखील ती स्त्री मुक्तीचा झेंडा फडकावू लागली . स्त्रियांवर
अत्याचार हा आता तिचा आवडताविषय होत चालला होता . पुढे ती स्त्री चळवळीच्या क्षेत्रात
कार्यरत अनेक संगठनांबरोबर जुळली . - कु . निशा गोरेचे विचार मैत्रिणींमध्ये वेगवेगळ्या
चर्चेचे विषय असायचे . मग वाद हि व्हायचे .
' तुझ्या इतक्या प्रयत्नानंतर देखील
खऱ्या अर्थाने स्त्रियां अद्याप हि स्वतंत्र व विकसित नाही , मग तुझा काय उपयोग ?
'असे म्हणून तिच्या मैत्रिणी तिला सारख्या चिथवत असे . मग कु.निशा गोरे अगोदर चिडायची
, मग भडकायची , पण शेवट मात्र सर्वाना समजविण्याने आणि गोडी गुलाबीने व्हायचा . मग
चर्चा परत आणखीनच रंगायची , सर्व विषयांना वेगवेगळे फाटे फुटायचे, व कु. निशा गोरे
आपले विचार ठामपणे मांडायची . ' स्त्रियांना पुरुषांच्या कचाट्यातून स्वत:च मोकळं व्हावं
लागेल . स्वत:चे स्वातंत्र्य बळकवावे लागेल
. हे स्वातंत्र्य किती टक्के आणि कितपत हवे
आहे , जेणे करून प्रत्येक स्त्रीला समाजात सन्मानाने जगता येईल याचा सारासार विचार
प्रत्येक स्त्री ने खुद्द आपल्या पुरता करावा
. ' ती सर्वाना सतत सांगायची- एकदा एका मैत्रिणी
बरोबर कु. निशा गोरेचा असाचखूप वाद झाला . त्या मैत्रिणीनी तिला चिडून विचारले ,
" काय ग निशा , सारख्या सारख्या स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी काय करत असते
तू ? प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते . तुझा आपला एकच पाढा . कंटाळा आला आहे तुझ्या
एकाचएक गोष्टीचा . अग मला सांग , लग्नानंतर तू कुठं स्वतंत्र राहणार आहे ? तुझं अस्तित्वच
बदलून टाकेल तो पुरुषांचा समाज , ती पुरुषांची
सत्ता आणि पुरुषी अहंकार . अग तुझ तर नाव सुद्धा बदलून टाकतील ते सर्व . ओळख
हि बदलून टाकतील . तुझी स्वत:ची अशी वेगळी ओळखंच राहणार नाही . मग तेव्हा काय करणार
आहेस तू ? "- बस झालं . त्या दिवशी पहिल्यांदाच कु. निशी गोरेला रात्रभर झोप लागली
नव्हती . त्या रात्री पहिल्यांदाच तिच्या मनात लग्नाचाही विचार आला . पुरुषाचे महत्व
जास्त कां स्त्रीचे महत्व जास्त ? असलं द्वंद रात्र भर सुरु होतं . मनातलॆ विचार मंथन काही
केल्या थांबेच ना . अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते , आणि उत्तर तिला सापडत नव्हते
. लग्न झाल्यावर मुलीच सासरी कां जातात ? ईश्वराने स्त्रियांनाच मात्रत्वाच्या यातना
कां दिल्या ? स्त्रीनेच चूल आणि मुल कां सांभाळावे ? पुरुषांच्या वाट्यात हे सगळे का
नसावे ? समाज पुरुष सत्तात्मकचं का आहे ? सर्व महत्वपूर्ण निर्णय पुरुषचं कां घेतात
? मुलांना बापाचे नावंच का दिले जाते ? लग्न म्हणजे स्त्रीचं अस्तित्व व स्वातंत्र्य
संपणं असतं का? लग्न म्हणजे स्त्रीची ओळख कायमची पुसली जाणं असतं कां ? माझ्याहि बरोबर
हे सर्व असचं घडणार आहे कां ? जर पुरुषाची ओळख समाजात तीच राहते , तर मग लग्न झाल्याने स्त्रीची ओळख का
बदलली जाते ? तिचं तर नाव सुद्धा बदलतात . नाही नाही हा स्त्रीचा अपमान आहे . असं चालणार
नाही . मी असं होऊ देणार नाही . कु. निशा गोरे चवताळली , ' लग्नानंतर मी माझं नाव बदलू
देणार नाही .' कु .निशा गोरेनी सूर्योदयाच्या अगोदर जणू शपथचं घेतली , ' वेळ
आलीतर नवऱ्याला त्याचे नाव बदलायला भाग पाडेन .' हा निर्धार झाल्यावरच कु. निशा गोरेला पहाटे का होईना स्वस्थ झोप आली .
श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी होती . चांदीच्या ताटात असलेल्या
तांदुळात , त्यानं ठरविल्या प्रमाणे त्याचे आवडते नाव तो अंगठीने कोरणार होता . तेवढ्यात
सौ . कां . निशा गोरे ( भावी काळे ) त्याला
म्हणाली , " थांब . "- श्रीयुत रवि काळेनं एक क्षण सौ . कां . निशा गोरेकडे बघितलं . - " माझं नाव बदलायचं नाही
. "- श्रीयुत रवि काळे गोंधळला . - " चांगलं गोरे आहे . काळे करण्याची गरज
नाही . " सौ . कां . निशा गोरेने लग्न
मंडपात जणू एकादा बॉम्बच फोडला .- श्रीयुत रवि काळे चपापला . त्यानं आपला हात मागे
घेतला आणि आपल्या आईकडे बघितलं . - " काय म्हणते सुनबाई तू ? अगं, लग्नानंतर तर
प्रत्येक मुलीला आपलं नाव बदलावचं लागतं . " सासूबाईना वाटलं हत्ती गेला अनं शेपूट
राहिली . - " मला माझी ओळख बदलता येणार नाही . मला लोकांनी निशा गोरे म्हणूनचं ओळखायला हवं . " सौ . कां
. निशा गोरेला एका पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी
घेतलेली आपली शपथ आठविली . - " म्हणजे ? " आता श्रीयुत रवि काळे थोडा
गोंधळला .- " म्हणजे , माझं नाव बदलायचं
नाही . " न घाबरता सौ . कां . निशा गोरे
म्हणाली . - " आणि आडनावं ? " सासूबाईला आता राग आला होता . - " तेहि
बदलायचं नाही . " तितक्याच ठामपणे शांत गंभीर स्वरात सौ . कां . निशा गोरे म्हणाली
.- " हे कसं शक्य आहे ? " आता श्रीयुत रवि काळेच्या आईनी सौ.कां .निशा गोरेच्या
आईकडे बघितलं . - " अगं पोरी तू हे काय म्हणते ? " आता सौ . कां . निशा गोरेचे
वडील पुढे आले . - " बरोबर आहे बाबा
. मी माझं नाव आणि आडनाव बदलणार नाही . लग्न नावाचे नावाशी नाहीं , आणि आडनावाचे आडनावाशीहि
नाहीं . लग्न एका मुलाचे एका मुलीशी होत आहे . " सौ . निशा गोरेने वडिलांनाहि तेच उत्तर ठामपणे दिलं
. - " हा काय नवीन प्रकार आहे ? " आता गुरुजी मध्ये पडले , " अगं पोरी
लग्न म्हणजे दोन घराण्यांचे संबंध जुळतात . कुटुंबाचे कुटुंबाशीच नाती जुळतात
."- " ते सर्व जुनं . " सौ . कां . निशा गोरेहि माघार घ्यायला तयार
नव्हती , " असं असेल तर मग मुलालाच नाव बदलायला सांगा . "- " आता अति
होतंय बरं . " सौ . कां . निशा गोरेची आईआपल्या मुलीला रागे भरली . - " अगं
आई , आता जग बदललं . काळहि बदलला . संसार दोघांना करायचा आहे . मग एकाचेच नाव का बरे
बदलायचं ? दोघांच्याही नावाने आमची ओळख व्हायलाहवी. मुलीनेच आपली ओळख कायमची का पुसून
टाकायची?तिनंच आपलं अस्तित्व का संपवून टाकायचं ? काही असो , मी वाहून जाणाऱ्यांपैकी
नाही आणि प्रत्येक गोष्टीला होकार देणारी सुद्धा नाही .
श्रीयुत रवि काळे हे सर्व चुपचाप ऐकत होता . आता तोहि मध्ये पडला
, " माझं नाव आणि आडनाव तुला बदलायचं आहे ? मग घे ही अंगठी आणि तुझ्या आवडीप्रमाणे
ठेव माझे नाव . अगदी सहज सरळ भाषेत श्रीयुत
रवि काळे म्हणाला आणि त्याने सौ . कां . निशा गोरेच्या हातात अंगठी दिली . - आता दचकण्याची
वेळ सौ . कां . निशा गोरेची होती .- " बरं मला सांग ओळख म्हणजे नक्की काय ? " श्रीयुत रवि काळेने
सौ . कां . निशा गोरेला विचारले . - आता पाहुण्यांनाहि
या प्रकरणात मौज वाटू लागलीहोती . प्रकरणाचा छडा काय लागतो याची सर्वाना उत्स्कुता
होती . - निशा गोरे अजूनही हातात अंगठी घेऊन
होती . श्रीयुत रवि काळेकडून तिला ही अपेक्षा नव्हतीच. तिचा अंदाज होता की श्रीयुत
रवि काळे तिचा विरोध करेल. मग वाद होतील . आणि ती पुन्हा एकदा सर्वांना पटवून देईल
की स्त्रियांचे स्वातंत्र्य किती गरजेचे आहे. पण हे असं काही झालचं नाही , उलट श्रीयुत
रवि काळे तिला शांतपणे प्रश्न विचारात होता , आणि या नव्या उद्भवलेल्या परिस्थिती मुळे
ती गांगरली . - "अगं सांग ना ओळख म्हणजे काय ? " श्रीयुत रवि काळेने तिला
पुन्हा विचारले . सर्व मंडळी या दोघांकडे आश्चर्याने बघत होती . सर्वांना निकालाची उत्सुकताही होतीच . - सौ .
कां . निशी गोरेला असं वाटलं की तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या मोहिमेला आणि लढा देण्याच्या वृत्तीला पूर्ण समाजचं जणू आव्हान
देत आहे . पण सर्वांच्या समोर दोनदा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता तिला देणे भाग होते . नाही तर स्त्रियांच्या लढ्यात तिनं माघार
घेतली असं तिच्या मनाने सतत तिला दोष दिला असता . - " ओळख म्हणजे , जशी मी ' निशा
गोरे ' च्या नावाने ओळखली जाते . " तिनं प्रश्नांचे उत्तर दिले . -नवीन नवरी बोलली
म्हणून सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले . - " ते झालं तुझ्यासाठी
संबोधन . याला एक प्रकारची आपण खूण म्हणू शकतो . पण या जगात निशा नावाच्या अनेक मुली
असतील आणि निशा गोरे नावाच्याहि काही मुली सापडतील . मग तुझी ओळख नक्की काय ?
"श्रीयुत रवि काळेने तिला विचारले ," तुझं नाव , तुझा चेहरा , तुझं शिक्षण
, तुझी नोकरी , तुझी आवडनिवड , तुझा स्वभाव , तुझा व्यवहार , नक्की कशाने आम्ही तुला
ओळखावं , अशी तुझी अपेक्षा आहे ?- आता सौ .कां .निशा गोरे चपापली .तिनं श्रीयुत रवि
काळेकडे बघितलं, तो शांत होता . तिच्या मनात विचार आला , ' श्रीयुत रवि काळे जाम भारी आहे . दिसतो तेव्हढा बावळट नक्कीच नाही
.' पणआता काय करायचं ? माघार कशी घ्यायची ? हे प्रकरणवाढत चाललंय . तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या
चळवळीचा असा अंत होणार का ? ' नाही नाही , हे होता कामा नये .' मनातल्या एका कोपऱ्यातून
आवाज आली , ' तर्क करता येत नाही म्हणून लगेच हार मानण्याचे काहीच कारण नाही ' . -
" आश्चर्य वाटतंय ? " श्रीयुत रवि
काळे तिला म्हणाला आणि तिची तन्द्रा भंग झाली .- " अगं , नाव म्हणजेच नुसती ओळख
नसते . हे म्हणजे आधारकार्डसारखे आहे . आता येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व लोक आधारकार्डनेच
ओळखले जाणार आहे . यालाच तुझ्या म्हणण्याप्रमाणे ओळख म्हणता येईल कां ?"-सौ . कां . निशा गोरे हळूहळू निरुत्तर होत
चालली होती . काय बोलावे आणि काय करावे हे तिला समजत नव्हतं . - " अगं , ओळख म्हणजे
माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्व . यात सर्व आलं , नाव, चेहरा , गुण , योग्यता , संस्कार
, आवडनिवड , वागणूक , वगैरे वगैरे .हेच सर्व गुण माणसाची खरी ओळख .कोणताही अन्याय होणार
आहे या कल्पनेने व भीतीपोटी त्या गोष्टीचा
विरोध करणे याला कोणाच्याही मुक्तीसाठी चळवळ म्हणता येत नाही . स्त्री आणि पुरुष ईश्वराची
अमुल्य देणगी आहे . एक दुसऱ्याचे पूरक आहे . एक दुसऱ्याचे वैरी नाही . खरं तर कोणीही कोणावर अन्याय करता कामा नये . उत्तम
आणि योग्य व्यवस्थेच्या द्रष्टीने समाजानेच विवाहसंस्था बनविली . नंतर आयुष्य सुरळीत
जावं , आणि येणाऱ्या घरात निष्ठा वाढावी म्हणून मुलीचं नाव बदलण्याची परंपरा पडली . पण नाव बदलणं हा कोणताही मुद्दा होऊच शकत नाही .यात फक्त सोयीचाच
विचार झाला असावा आणि नंतर हि प्रथा झाली असावी . "- श्रीयुत रवि काळे जणू न थांबता
प्रबोधनच करत होता . आणि सौ .कां .निशा गोरेला
आश्चर्याचे धक्के देत होता . "- " तुम्ही दोघं का स्पर्धेत भाग घ्यायला बसला आहात
कां ? " आता गुरुजी भडकले , " अहो लवकर करा , लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त निघून
जाईल . "- सौ . कां . निशा गोरेनी चुपचाप श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी ठेवली
.- श्रीयुत रवि काळेनी अंगठीने ताटातल्या तांदुळात नाव कोरले - ' निशा ' - आता मात्र निशा गोरेला आश्चर्याचा धक्का बसला
.- सर्वांनी टाळ्या वाजविल्या . दोघांनी सर्वांनापेढे वाटले . मग ' उखाणा घ्या उखाणा
घ्या ' असं एक स्वरात सर्व म्हणाले . श्रीयुत रवि काळेनी उखाणा घेतला . -- आम्हीं दोघे
, आमचा विश्वास , आमचीच आशा सर्वे ऐका आज पासून आमचे आडनाव ' रविनिशा '- हा उखाणा घेतल्यानंतर
श्रीयुत रवि काळेनी सौ . कां . निशा ' गोरेकाळे ' च्या तोंडात पेढा भरविला .- सर्व
मंडळी टाळ्या वाजवीत होते . -- श्रीयुत रवि काळेचे आईवडील मात्र आपल्या मुलाच्या ,आडनाव
बदलण्याच्या या अनपेक्षित निर्णयाला आश्चर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत होते
.
( पुरूषप्रधान मानसिकतेला स्त्रीप्रधान मानसिकता हे उत्तर होऊ
शकत नाही. परस्पर सामंजस्यानेच हा प्रश्न सुटू शकतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा