"खाऊ"
आत्ताच टीवीवर एका सुपची जाहिरात बघितली. एकदम छान आणि प्रेमळ
मम्मी अप्रन बांधुन मुलांना सुप देत होती आणि मुलांना म्हणत होती की "मै हूँ ना
आपकी मास्टर शेफ"!!! आणि मग सूप पिउन खुश झालेली मुले मम्मीला म्हणतात "मम्मी
तुम तो वर्ल्ड की बेस्ट शेफ हो। i love you मम्मी।.
खुप छान वाटले. पण मनात विचार आला की आपली मम्मी म्हणजे आई काही
अशी अगदी नीटनेटकी आणि साडीला एकही साधी चुणी पडली नाहीये, अशी स्वयंपाकघरात कधीच दिसली
नव्हती. ती तर बिचारी सतत कष्ट करत असल्यामुळे दमलेली दिसायची आणि मग आठवला तो खाद्यप्रवास!!.........
मला आठवतं! मी लहानपणी भूक लागली हे सांगताना आधीच सांगायचे
"आई! काहीतरी नवीन खायला दे. ते शिरा पोहे नको बरे!! आणि हो! आज जेवणात नवीन काही
भाजी कर बघू! आधी कधी खाल्ली नसेल अशी!" आई बिचारी 'हो' म्हणायची.
मला आठवतं एक ते खमंग आणि ताज्या भाजणीचे थालीपीठ खाऊ घालता यावे
म्हणून आई दूर कुठल्या गिरणीवर दळण घेऊन जायची. का तर तिथे भाजणी चांगली दळुन मिळते.
भाजणी दळताना त्या खमंग वासात चेहऱ्यावरची रेषही बदलु न देता
काम करणारा तो गिरणवाला म्हणजे खरा कर्मयोगी.
त्या छान भरपुर कोथिंबीर आणि कांदा घातलेल्या थालीपीठावर नुकता
काढलेल्या लोण्याचा गोळा. बास...! केवळ स्वर्गसुख!!
मे महिन्याच्या आधी आईची लगबग असायची ती उन्हाळ्यातले साठवणीचे
पदार्थ बनवायची. मग त्यात पापड, चिकोड्या, कोकमाचे सरबत असे बरेच काही असे. स्वच्छ
घासुन-पुसुन ठेवलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये अतिशय सुंदर रंगाचे कोकम-साखर-मीठ घालुन
उन्हात ठेवले जात. मग हळुहळु त्यांचा रंग खुलत जाई.
हे सर्व का तर, उन्हाळ्यात सर्व भाज्या मिळत नाहीत म्हणून ही
तोंडी लावन्यांची बेगमी.
रोज रात्री अंगतपंगत जेवण होई. कधी वालाची डाळ, कढी आणि फोडणीची
मिरची तर कधी भाकरी आणि माठाची भाजी. प्रत्येक भाजी खाल्लीच पाहीजे असा वडीलांचा आग्रह
असे.
आत्ता सारखे नूडल्स, सुप्स असे कुठे जास्त खायला मिळायचे तेव्हा?
पण रोज नव्या पदार्थाचा हट्ट. मग कधी मैद्याची भजी, कोळाचे पोहे, कोथिम्बिरीच्या वड्या
तर कधी चुरमुऱ्यांचा चिवडा असे काही ना काही चहाबरोबर खायला मिळे.
आई खुप सारे मसाले, चटण्या घरी करायची. खलबत्ता धूऊन-पुसून त्यात
ते मसाले चटण्या वाटायची.
ती आईच्या हातची लसणीची तिखट आणि भरपूर तेल घातलेली चटणी आणि
गोल शुभ्र भाकरी अजुनही आठवली की भूक खवळते.
आता आईचे वय झाले. आधीसारखे खुप कष्ट तिला जमत नाहीत. पण तरी
घरी येताना आमच्यासाठी कसकसली पीठे,लाडू,वड्या आणणे चालूच असते तिचे.
त्यादिवशी तिने माझ्या मुलासाठी ताजे मेतकुट आणले. गरम गरम मऊ
भात त्यावर लोणकढीे तूप आणि मेतकूट. किती जेवलो याचा अंदाजच आला नाही.
अचानक आठवले आपली खाद्य यात्रा एव्ह्ढी समृद्ध करणाऱ्या आईला
आपण कधीच म्हणालो नाही,
"मम्मी तुम तो वर्ल्ड
कि बेस्ट मम्मी हो ! I love you मम्मी !!".

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा