महोत्सव - जलधार
‘कोमलतेत प्रचंड सामर्थ्य असतं. कोमलता म्हणजे
दुर्बलता नव्हे. नजर पोचणार नाही इतक्या उंचीवरून पाण्याचे प्रचंड प्रपात कोसळतात.
तरीसुद्धा पाणी अभंग राहातं. त्याचा स्फटिकासारखा प्रवाह होऊन तो पुन्हा जगाला आनंदच
देतो. पाण्याऐवजी एखादा दगड जर कुणी वरून सोडला तर त्याचं काय होईल सांगतेस का?’
मी ह्या विचारानेच अवाक् झाले होते. उंचावरून खाली येणारे झरे, त्यांचं
धबधब्यात झालेलं रूपांतर, हे सगळं प्रवास करताना मी अनेकदा पाहिलं होतं. त्यावेळेला
हे विचारही मनात आले नाहीत. बाबांनी मला प्रश्न विचारला, पण उत्तराची वाट न बघता ते
म्हणाले, ‘कोमलतेत ताकद असते ती ही अशी. पावसाचं पाणी तर आकाशातून पडतं. माती वाहून
जाते, नद्यांना पूर येतात, भलेभले खडक झिजतात. पाणी वाहातच राहातं. फुलंही पाण्यासारखीच
कोमल असतात. एक दगड भिरकावला तर दहा-बारा फुलं खाली पडतात.ज्या दगडामुळे फुलं वेचायला
मिळाली तो दगड कुणी घरी आणत नाही. आपण फुलंच आणतो. ती कोमेजतात. पण एवढ्याशा आयुष्यात
तुम्हाला सुगंधच देतात. फुलांचं आयुष्यच अल्प. पाण्यामध्ये सामर्थ्य कुठून येतं, ह्याचा
विचार केलास तर तुला कळेल की त्यामागे सातत्य असतं. प्रवाहात एखादा खडक आला तर पाणी
त्याच्याशी झुंज देत बसत नाही, थांबत नाही, स्वत:ची वाट शोधून बाजूने निघून जातं. ह्या
वाहण्यात सातत्य असल्यामुळेच खडक हळूहळू लहान होत जातो आणि प्रवाह रुंदावत जातो. सातत्य
म्हणजे काळ. काळाचं सामर्थ्य मोजता येणार नाही. अशा जबरदस्त शक्तीची साथ एवढ्याशा दिसणाऱ्या
जलधारेच्या पाठीशी असते. तुझ्या संसारात तुझा जोडीदार कसा असेल, त्याची तुला साथ मिळेल
की नाही, दोघांच्या संवेदना एकरूप होतील की भिन्न असतील ते सांगता येणं अशक्य आहे.
लग्नाची आमंत्रणपत्रिका म्हणजे संपूर्ण संसाराचं चित्र नव्हे. मंगलपत्रिकेतले शब्द
वर्षावनुर्षं तसेच राहातात. त्यांचा दगड होतो म्हणालीस तरी चालेल. संसारातले शब्द रोज
बदलत जातात. कोणतेही शब्द ऐकावे लागले तरी त्या स्त्रीजवळ त्या शब्दांचं रूपांतर गीतात
करायचं सामर्थ्य असेल, तर तिला मी जलधारच म्हणेन. साथीदाराला सुधारण्याच्या खटाटोपात
पडू नकोस. त्याच्या दृष्टिकोनातून त्याचं वागणं योग्यच असतं. तिथे डोकं आपटत बसण्यापेक्षा
त्याला वळसा देऊन पुढे जाणं चांगलं. जलधार हो, वाहात राहा.’ तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हा विचार आत्मसात झाला.
-व. पु. काळे
किती सुंदर विचार...... सतत वाहात राहा... कितीही अडीअडचणी आल्या
तरी बिथरुन न जाता, न थांबता सतत वाहात राहायचं त्या निर्मळ जळासारखं.. वाहाणं हा पाण्याचा
धर्म... तोच आपण आपल्या आयुष्यात आणणं कठीण जरी असलं तरी असाध्य नक्कीच नाही. आलेल्या
आनंदाच्या क्षणाचा जसे आपण उत्स्फूर्तपणे आस्वाद
घेतो तसेच प्रत्येक दुःखाच्या क्षणी न डगमगता त्याला तेवढ्याच उत्स्फूर्तपणे सामोरे
जाणे.... हा पाण्याचा धर्म आपण आपणांत आणू या... 😃👍👍
-रेखा वैद्य
एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट
करते. तेव्हा त्यांच फक्त नवल वाटतं. पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा
क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात. पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं
पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल’ खणल्याशिवाय कळत नाही. वर्ष संपलं की
आपण नवीन Calender आणतो. काही वाणसामानाबरोबर फुकट येतात. कधीकधी Calender साठी आपण
अनावश्यक वस्तुही घेतो. प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं, कधी जाहीरपणे लावता
न येणारं किंवा लावता येणारं, भारी Calender ही आपण पळवलेलं असतं. कितीही आकर्षक आकर्षक
म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ? नाविण्याइतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु
नसेल. भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकाम टेकड्यांना Calender वर कुठलही चित्र
चालतं. व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत, तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.
प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र, वेगळा विचार, वेगळी प्रगती, वेगळं शिखर. तो पट जेव्हा
जेव्हा उलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की, प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन
श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे. बुद्धी, मन आणि शरीराच
दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे.
~ टीम वपु विचार
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा