भूतकाळात जगणाऱ्याला भविष्य नसत © डॉ.कृष्णा सपाटे
भूतकाळात जगणाऱ्याला भविष्य नसत
बऱ्याचदा आपण आपल्या भूतकाळाला इतकं घट्ट चिकटून बसलेलो असतो
की कोणताही समाधानकारक प्रसंग घडला नाही की आपण जुन्या खपल्या काढत बसतो.
माझ्याबरोबर असं झालं,
माझ्यावर अन्याय झाला,
मला जे हवं ते कधीच मिळालं नाही,
माझ्या वाट्याला कमीपणाच आला,
सगळे घाव मलाच झेलावे लागले,
माझ्या जागी दुसरं कोणी असत तर त्याला हे जमलंच नसत ....असं बरंच
काही.
हे सगळं डोक्यात घोळत असताना एक अन्याय आपण स्वतःवर करत असतो,
तो म्हणजे आपण स्वतःचा वर्तमानकाळ हिरावून घेत असतो आणि भविष्यकाळाची वाट लावत असतो.
"कोळसा कितीही उगाळाला तरी काळाच" तसंच आपला भूतकाळ कितीही उगाळला तरी त्यात
बदल थोडाही बदल होणार नसतो.
बऱ्याच जणांचं आयुष्य शेवटाला पोहचत, त्यातून वेगवेगळे ताणतणाव
निर्माण होऊन सुखी जीवन जगायचं राहून जात आणि दोष मात्र दुसऱ्याच्या माथी मारून आपण
नामानिराळे राहतो. यावर साधा उपाय आपणाला कधीच सुचत नाही की या जगात कोणीच परफेक्ट
नसत, प्रत्येकाकडून चुका होतातच.
त्यावेळी सगळं आपल्याला वाटेल तसंच घडायला हवं असा अट्टाहास काय
कामाचा? व्हायचं ते होऊन जात यातून आपल्या हाती फक्त निराशा पडते, जवळच्या माणसांना
आयुष्यभरासाठी आपण मुकतो, वर्तमानातील जीवनाबरोबर भविष्य कलुषित होऊन बसत. भूतकाळातील
चांगल्या आठवणीे काढून त्यातून प्रेरणा घेऊन सुंदर जग प्रत्येकाने का बनवू नये?
माझ्याकडं काहीच चांगलं नाही म्हणून आपण आयुष्यभर टिपे गाळत असतो,
पण कधी मनातून तर्कबुद्धीने विचार केला तर सगळं काही आपल्यातच आहे याची जाणीव होते.
उत्तुंग अशी व्यक्तिमत्वे अभ्यासली की कळत कधी काळी त्यांच्याकड काहीच नव्हतं. माणसाला
लाभलेलं अनमोल धडधाकट शरीर ही त्याला मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. प्रत्येक अवयवाची
किंमत काढायची म्हटली तरी आपण कोट्यधीश आहोत याची जाणीव नक्कीच आपल्याला होईल.
ज्यांना रहायला घर नाही, घालायला चांगले कपडे नाहीत आणि खायला
2 वेळच जेवण नाही अशा लोकांशी कधी आपली तुलना करून बघा म्हणजे मग कळेल आपल्या दुःखांची
मूळ खूपच छोटी आहेत. म्हणून आपण त्यांच्यासारखं व्हावं असं माझं मुळीच मत नाही तर आपण
आपल्यापेक्षा प्रत्येक क्षेत्रात जे कोणी श्रेष्ठ लोक आहेत त्यांचा आदर्श नक्कीच घ्यायला
हवा, आपण त्यांच्यासारखा बनण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा.
बऱ्याच जणांना सगळं आयत मिळत त्यांना त्या गोष्टीची किंमत नसते,
पण मग आपण आपलं वेगळंपण कधी सिद्ध करणार? स्वतःची वेगळी ओळख कधी निर्माण करणारं? असे
प्रश्न ज्या दिवशी तुमच्या मनात येईल त्यावेळी तुमच्या आयुष्यात सुवर्ण सकाळ उगवल्याशिवाय
राहणार नाही, फक्त इच्छा हवी संकटाशी दोन हात करण्याची, नियतीच्या डोळयात डोळे घालून
बघण्याची. त्यावेळी रडका भूतकाळ मावळलेला असेल आणि लखाखता वर्तमानकाळ उदयास आलेला असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा