मी माझ्या लेकीला विचारलं,
‘चल, भेळ खायची?’
लेकीच्या ड्रॉइंग क्लासमध्ये अलीकडेच एक कार्यक्र म होता. घरापासून
फार लांब नाहीये तिचा क्लास. जाताना आम्ही गाडी घेऊन गेलो; पण तिला आणायला गेले तेव्हा
माझ्याकडे गाडी नव्हती.
सहज लक्षात आलं, बरेच दिवसात भेळ खाल्ली नाही. बाहेर पडल्यावर
लेकीला विचारलं,
‘भेळ खायची का?’
ती आश्चर्यानं माझ्याकडे बघतच राहिली.
‘आई, तू बरी आहेस ना?’
...तिच्या चेहऱ्यावरून आनंद नुसता झरझरत जाताना दिसला... साधी
भेळ ती काय, किती छोटीशी गोष्ट; पण आनंद किती !
गाडी नव्हती, म्हणून दोघीही चालत निघालो. लेक मला बिलगली, म्हणाली
‘‘छोटू नाहीये आज, त्यामुळे तू अख्खी मला एकटीला मिळाली आहेस, आय अॅम सो हॅपी’’
...ती अक्षरश: विहरत होती. दोन मिनिटात आम्ही नेहमीच्या भेळवाल्यापाशी
पोहोचलो; पण तो नव्हता. मग लेकच म्हणाली, ‘‘आई, आपल्या घरापाशी आहे, तिथे खाऊ.’’
चल, चालत जायचं का? - मी सहज विचारलं, तर आनंदाने शिगोशीग भरलेला
मोठ्ठा होकार आला. जिथे दमल्यासारखं वाटेल, तिथून रिक्षा करायची, असं ठरलं.
पूर्ण रस्ता बाजारपेठेतून जाणारा. पहिल्याच दुकानापाशी ‘विंडो
शॉपिंग’ची आयडिया सुचली. आणि कॉलेजातल्या मैत्रिणींनी ताळतंत्र सोडून
निर्भर भटकंतीला निघावं तसा दंगा करीत या दुकानासमोर थांब, त्याच दुकानात लावलेले डेÑसेस
बघ, आवडत्या रंगांच्या शेड्सवरून उगीच वाद घाल, आजूबाजूला दिसणाºया गर्दीतल्या अनोळखी माणसांकडे बघून
एकमेकींच्या कानात खुसखुस बोल.. अशी धम्माल करत आम्ही रमतगमत निघालो.
माझ्या लेकीला आजूबाजूचं भानच नव्हतं. ती तिच्या आनंदात होती
आणि मस्त मजा करत होती. काही क्षणात हे असले झुळझुळ झरे कुठून आले आमच्यात कोण जाणे,
पण फार धमाल येत होती.
अर्ध्याहून जास्त अंतर चालल्यावर दुकानं संपली आणि आपण किती चाललोय
हे लक्षात आलं. पुन्हा लेकीनं आश्चर्यानं विचारलं, ‘आई, आपण एवढं लांब चालत आलो? वाटलंच
नाही. मजा येतेय, नको रिक्षा करायला. चल, आपण चालतच जाऊ.’
मला हा आश्चर्याचा धक्काच होता!
एरवी गाडीशिवाय घराबाहेर पडायला कुरकुरणारी माझी लेक, आज तिला
पायीच चालायचं होतं.
.. परत चालायला सुरुवात केली. एव्हाना दुकानं संपली होती. त्यामुळे
विंडो शॉपिंगची धमाल संपली आणि गप्पा सुरू झाल्या. मी फक्त ऐकत होते, लेकच बोलत होती.
नुसता धबधबाच उसळला होता... तिच्या मैत्रिणी, शाळा, स्कूलबस असे बरेच विषय होते. कधी
निमित्ताने खोदून, खणूनही मला न कळलेल्या, तिच्या मनातून काढता न आलेल्या कितीतरी गोष्टी
मला अलगद मिळत/कळत होत्या.
हीच का माझी लेक..?
- आठवीत गेल्यापासून का कोण जाणे, जरा तुटकशीच वागायला लागलेली?
ही इतकी गप्प, इतकी ‘सिक्रेटिव्ह’ का होत चाललीय म्हणून आईच्या पोटात उगीच धास्तीचा खड्डा पाडणारी?
तिच्या पोटात शिरायची, तिच्या बदलत्या फुलपंखी आयुष्यात ‘असण्या’ची किती धडपड केली होती मी गेले काही
दिवस..!
नकोशा दुराव्याची ती नकोशी शंका अशी अचानकच फिटली आणि माझ्या
मनावरचं ओझंच उतरलं.
बोलता बोलता घराजवळचं भेळीचं दुकान आलं, आम्ही आत जाऊन बसलो.
ऑर्डर केली. मूड छान होता त्यामुळे असेल कदाचित पण भेळ आणि पाणीपुरी फारच टेस्टी होती,
मग परत ऑर्डर केली.
आम्ही दोघी अखंड हसत होतो.
गप्पांना अंत नव्हता.
निघताना लक्षात आलं, आपण सेल्फी नाही काढला !
पण लेकीला त्याच्यात इंटरेस्ट नव्हता, कारण ती आज खूप वेगळा आणि
बहुदा तिला हवा असणारा आनंद घेत होती.
नाहीतर सतत वेगवेगळ्या पोझमध्ये सेल्फी काढणारी माझी लेक म्हणाली,
‘जाऊ दे आई, चल’.
- हा मला सुखद धक्काच होता !
पुन्हा हसत, खिदळत चालायला सुरुवात झाली. घरी पोहचलो तेव्हा एवढं
चालून आलो होतो, तरी दमलो नव्हतो. हाशहुश झालं नव्हतं.
उलट आमचे आनंदाने ओसंडणारे चेहरे बघून घरातल्यांच्या भुवया वर
गेल्या.
‘नक्की केलंत काय?’ या त्यांच्या प्रश्नाचं
उत्तर आम्ही गुलदस्त्यातच ठेवलं. माझ्या लेकीच्या मोठ्या आनंदाची किंमत एवढी छोटीशी
होती, हे समजायला १३ वर्षं का लागली असतील? आनंदानं हलकं झालेलं मन मग कितीतरी वेळ
चुटपुटत राहिलं.
... मुलांच्या अपेक्षा केवढ्या लहान असतात ! पण, रोजच्या धावपळीत
आपल्याच लक्षात येत नाही.
आजवर कितीदातरी वाचलं होतं, ‘पालकांनी मुलांना ‘क्वालिटी टाइम’ द्यावा.’
‘क्वालिटी’ म्हणजे काय, ते आज कळलं, एवढंच!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा