वेळ ?
वेळ आली, वेळ झाली, वेळ गेला असं आपण म्हणतो. पण कधी विचार केलाय
हा वेळ किंवा ज्याला आपण काळ म्हणतो, म्हणजे नेमकं काय ? घड्याळ थांबतं पण वेळ थांबत
नाही. कधी वेळेला नियंत्रणात आणता आलं तर काय धमाल येईल नाही का ?
पण वेळ म्हणजे नक्की काय संकल्पना आहे?
वेळ हि अद्भुत संकल्पना आहे. आपण त्रिमितीय अस्तित्व (3D
existence) किंवा अवकाश (space) लांबी, रुंदी आणि उंची ह्या परिमाणांचा वापर करून मोजतो.
पण वेळ म्हणजे अस्तित्वाची हालचाल किंवा अस्तित्वातले बदल मोजण्याची मिती. याला आपण
चौथी मिती पण म्हणू शकतो (Fourth dimension). लांबी असल्याशिवाय रुंदी असू शकत नाही.
लांबी आणि रुंदी असल्याशिवाय उंची असू शकत नाही. आणि लांबी-रुंदी-उंची असल्याशिवाय
वेळ असू शकत नाही. आता हे काय भलतंच ?
पण थोडा विचार करा.
तुमच्या समोर एक वस्तू आहे. तिचं अस्तित्व आहे. कारण त्याला काहीतरी
लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. आता पुढे कल्पना करा, ती वस्तू १० मिनिटांपासून
तुमच्या समोर आहे. १० मिनिटांपासून आहे, म्हणजे तिचं अस्तित्व आहे, बरोबर? आता कल्पना
करा, ती वस्तू १ मिनिटांपासून तिथे आहे. तरीपण तिचं अस्तित्व आहे. पण समजा ती वस्तू
शून्य (०) मिनिटांपासून तिथे आहे. म्हणजे तिचं अस्तित्व शून्य आहे. याचा अर्थ तिचं
अस्तित्वच नाही. वेळ आहे म्हणून तिचं अस्तित्व आहे. आता समजा, ती वस्तू ज्या जागेवर
आहे, तिथून ५ इंच पुढे जाते. म्हणजे काहीतरी हालचाल होते. ती हालचाल जरी काही तरी एका
सेकंदात झाली असेल, पण तरी काही वेळ लागला तेव्हा आपल्याला सांगता येतं की हालचाल झाली.
जर ती हालचाल शून्य सेकंदात झाली तर, हालचाल झाली असे सांगता येईल काय ?
आईनस्टाईनच्या सिद्धांतानुसार वेळ आणि अवकाश या दोन्ही गोष्टी
परस्परसलंग्न आहेत. वेळ आहे म्हणून सर्व आहे, आणि सर्व आहे (तीनही मिती आहेत) आणि त्यांची
हालचाल आहे म्हणून वेळ आहे.
जर काहीच नाही, तर वेळ असेल का ? विश्वनिर्मितिच्या आधी वेळ ही
संकल्पना होती का ? वरील तर्क विचारात घेतल्यास विश्व निर्माण व्हायच्या आधी वेळच नव्हती
असा निष्कर्ष निघतो. विश्वनिर्मिति च्या वेळेस उर्जा, वेळ आणि अवकाश तयार झाले असं
मानतात. पण विश्वनिर्मिती ही एक घटना आहे. आणि घटना घडली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा
वेळ ही संकल्पना आलीच..!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा