Pages

शुक्रवार, ५ एप्रिल, २०१९

कुळाचार



#कुळाचार

एका वाड्यातली गोष्ट.चार पिढ्या आधीची हं.
नऊवारी सासू आणि नऊवारी सून असलेल्या काळातली.
घरात पैपाव्हणे,द्विपदचतुष्पद सहितं असं म्हणताना खरोखर ते असायचे घरात त्या काळातली. घरात कुळधर्म कुळाचार अगदी जसंन् तसं पाळणारं घर ते,आणि पापभिरू सासवा सुना !

एका कुळाचाराच्या दिवशी सूनबाई देवाचे नैवेद्य वाढत होत्या केळीच्या पानावर.तेवढ्यात सासूबाईंची हाक आली आणि पाठोपाठ सूचना!'
सूनबाई,मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो.आणि मगच नैवेद्य ठेव देवापुढे'
#नऊवारीतील सूनबाई त्या काळातल्याच होत्या.
खालमानेने फक्त मान हलवून हो म्हणणार्या.दरवर्षी हीच सूचना!

पुढे सूनबाई सासूबाई झाल्या.त्यांच्या सूनबाई घरी आल्या. कुळधर्म कुळाचार तेच होते.सासूबाईंनी छान तयार केलं होतं सूनबाईंना!त्याही सूचना द्यायच्या.'नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी मांजरीची पोरं टोपलीखाली झाक हो!'

पुढे या सूनबाईंना #सहावारी सून आली.नोकरी करणारी.पण कुलाचार तेच होते.आणि सूचनापण तीच.सूनबाईसुद्धा ऐकायच्या.मांजरीची पोरं टोपलीखाली झाकायच्या नैवेद्य देवापुढे ठेवण्याआधी.

आता तो वाडा पडला.तिथे मोठा टॉवर झाला.मंडळी ब्लॉकमधे रहायला गेली.घरातले द्विपद होते पण चतुष्पद नाहीसे झाले. आता काय करायचं!प्रश्न पडला!तोवर पाचवारी सूनबाई सासूबाई झाल्या होत्या आणि त्यांची #पंजाबी ड्रेस सूनबाईपण आली होती.कुळाचाराच्या दिवशी त्या हळूच म्हणाल्या,
"माझ्या सासूबाई सांगत असत,मांजरीची पोरं टोपलीखाली झाकून मग नैवेद्य दाखवायचा.आता गं ?
मांजरच नाही तर पोरं कुठली आणायची झाकायला.काहीतरी बाई पूर्वजांच्या पद्धती एकेक!'
पंजाबी ड्रेसवाली सूनबाई हुशार!
ती म्हणाली ,"आहो सासूबाई,काळजी कशाला करता?
आहे ना आपली ट्रेडिशन मग करूया की आपण.
तुळशीबाग कशाला आहे मग!"
सूनबाई तुळशीबागेत जाऊन चिनीमातीची मांजरं आणि छानशी डेकोरेटेड टोपली घेऊन आल्या.आणि टोपलीखाली चिनी मातीची मांजरं झाकून  ट्रेडिशनली नैवेद्य दाखवायला लागल्या!😀
 संपली गोष्ट!

आता आपण विचार करूया.वाड्यात रहाणारी मांजर,दारातली कुत्री ही घरातले सदस्य होते तेव्हा.मांजरीची पोरं नैवेद्याच्या ताटात लडबडायला येणार हे नक्की. म्हणून आधी ती टोपलीखाली झाकायची आणि मग पान देवापुढे ठेवायचं!
आता हेतू लक्षात घेतलाच नाही नुसती मान डोलवली!
मग पुढे त्यातला हेतू लोप पावून त्याची रूढी झाली!
अशा पडतात रूढी!
पूर्वजांचे हेतू नीट समजून न घेता आचरले की!
म्हणून आपण जी परंपरा जपतो तिचा हेतू,अर्थ लक्षात घेऊन भावपूर्णतेने ,अर्थपूर्णतेने आचरली की काही झुगारावं लागणार नाही इतकी छान आहे आपली संस्कृती!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा