Pages

रविवार, ७ एप्रिल, २०१९



पु.ल. देशपांड्यांच्या एका कथाकथनात त्यांनी एक गंमतीदार प्रसंग सांगितला आहे. “ भर दुपारची वेळ. मंडळी उन्हात ताटकळत बसली होती. पण पिंडाला कावळा काही शिवेना. म्हातारीची तशी काही अतृप्त इच्छा वगैरे काही म्हणावी तर तशीही नव्हती. कारण, मुलाबाळांची काळजी आहे म्हणावं तर, त्यांचा मुलगाच चांगली ३०-३५ वर्षं नोकरी करून दणदणीत पेन्शन घेऊन आणखी २०-२५ वर्षं जगण्याइतका टुणटुणीत.. सगळी आश्वासनं देऊन झाली पण कावळा काही शिवेना. शेवटी कुणीतरी म्हणालं, ‘एक मोठ्ठी लोणच्याची बरणी आणि चार कपबशा मिळाल्याशिवाय देणार नाही हो तुमचा शालू बोहारणीला.’ लगेच कावळा शिवला.” या प्रसंगातला विनोदाचा भाग सोडा, पण भावना लक्षात घ्या.

एखाद्याला जीव जसा लावता आला पाहिजे, तसाच एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव सहजतेने सोडवून देखील घेता आला पाहिजे. पण, अनेकांना तेच जमत नाही. वेळेवर रिटायरमेंट घेणं कधीही योग्य असतं. पण, काही लोकांना कायमच एक्सटेन्शन हवं असतं. “अतिपरिचयात् अवज्ञा असं जुन्याजाणत्या मंडळींनीच सांगून ठेवलं आहे.

धृतराष्ट्र आणि गांधारीनं जर वेळेवर संन्यास स्विकारला असता तर, कदाचित पुढचं महाभारत टळू शकलं असतं. पण, ‘हस्तिनापूर नरेश या पदावर आवश्यकतेहून अधिक काळ राहणं सगळ्यांनाच महागात पडलं.

माझ्या बाबांचे एक मित्र आहेत. त्यांना दोन मुलगे. दोघेही परदेशात असतात. यांना एके दिवशी अचानक हार्ट अॅटॅक आला. हॉस्पिटलमध्ये नेलं. दोन्ही मुलांना मी फोन केले. दोघांनीही ‘बिलाची रक्कम सांग, लगेच पाठवतो असं सांगितलं, पण दोघेही आले नाहीत. वडील मरणाच्या  दारात असूनही त्यांचं न येणं, यामागे तसंच काहीतरी मोठं कारण होतं. लहानपणापासून गृहपाठ न करणं, परीक्षेत पहिल्या पाचात न येणं, स्कॉलरशिप न मिळवणं, बोर्डातला नंबर थोडक्यात हुकणं या कारणांसाठी चार-चार दिवस उपाशी ठेवणं, पट्ट्याने मारणं, चटके देणं, भर पावसात रात्रभर घराबाहेर उभं करून ठेवणं अशा शिक्षा भोगलेल्या या दोघांनी त्यांची वेळ आली की आस्मान दाखवलं. त्या दोघांनाही अयोग्य म्हणणं जरासं अन्यायकारक होणार नाही का?

भगवद्गीता संस्कृत भाषेत होती, सर्वसामान्य माणसांना ती समजणं कठीण होतं. म्हणूनच, ज्ञानदेवांनी मराठीतून ज्ञानेश्वरी सांगितली. त्यातला कर्मयोग वाचायला हवा. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला कर्मयोगसुद्धा सहज उपलब्ध आहे. तो वाचला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील.

माझ्या एका मित्राची आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली. पायाचं हाड मोडलं. प्लास्टर घालावं लागलं. माझ्या मित्राला फोन आला. तेव्हा मी त्याच्या समोरच बसलो होतो.त्यानं हॉस्पिटलचा बँकेचा अकाऊंट नंबर घेतला आणि पन्नास हजार रुपये ट्रान्स्फर करून टाकले. एक मिनिटभर शांत होता. नंतर जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात त्यानं त्याचं काम सुरु केलं. मला आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं. तो म्हणाला, “ मी काहीही चुकलो तरी माझी आई ‘अशा दळभद्री मुलाला जन्म देण्यापेक्षा मी निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं असं चारचौघांत म्हणायची. ‘माझी संपत्ती मी धर्मादाय दान करीन पण या मुलाला एक छदाम देणार नाही, असं म्हणायची. आता तिच्या या दुर्दैवी आशिर्वादाची मला गरज नाही.” मी त्याच्या या उत्तरावर निरुत्तर झालो. त्याला मी या त्याच्या मतावर काहीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही.

शेवटी काय, स्वतःच्या हातानंच जाणूनबुजून, माहिती असतानाही, बाभळीचं झाड लावलं तर त्याला हापूस आंबा येणार कुठून? हा विचार ज्यानं त्यानं करावा, इतकंच.. अधिक काय लिहावे?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा