Pages

शनिवार, २० एप्रिल, २०१९

"फादर डे"


स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..  शब्दशः खरे आहे.. पण मग...बाबा विना काय...?नाही सुचत ना काही.. शब्द अपुरे पडतात त्या धीरगंभीर व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना...पूर्वी समाजाने "बाप "स्वीकारला तो एक शांत,गंभीर, मुलांना काही धाक दाखवायचा झाल्यास उपयोगी,घरातील कर्ता म्हणून घाबरून राहायचे मुलांनी त्यांच्या अंगाखांद्यावर न खेळता आदबीने मान खाली घालून उभे राहायचे असेच होते... मग हा सगळा प्रकार सवयीचा बनून गेला आणि आई, आज्जी, आणि स्वतः बापाने ही अंतर राखून ठेवायला सुरवात केली मनात कितीही मायेचा झरा असला तरीही.. आईच्या डोळ्यातील अश्रू माया आणि बापाच्या डोळ्यातील पाणी कमजोरपणा असे समीकरणच ठरवून दिले गेले... मग लेक सासरी जाताना ही बापाने डोळ्याच्या कड्यापर्यंतच फक्त  पाण्याला वाट करून द्यायची.. धीरगंभीर स्वभावाला आणि समाजाला रुचेल असे वर्तन करायचे... काळ बदलला "बाप" बदलला.. भावना त्याच व्यक्त होण्याचे स्वरूप बदलले... आज तोच बाप अहो ऐवजी अरे बाबा ऐकायला आतुर झाला.. गोड़ गोड़ तोतरे बोल तो मुलांसोबत बोलू लागला...नोकरीवरून दमून भागून आला तरी लेकराला जवळ घेऊ लागला त्यांचे गोड़ कौतुक करू लागला.... आई आणि बाबा कोण आवडते असा प्रश्न बरेच जण गम्मत म्हणून मुलांना विचारतात...खरे तर ते अत्यंत चुकीचे आहे..पण तरी आजकाल मुले एक मिनिट उशीर न करता सांगतात की "बाबा "पण म्हणून त्या वेळी माऊलीच्या चेहऱ्यावर राग किंव्हा असूया न दिसता गोड़ स्मित हास्य आणि अभिमानच दिसून येतो... कारण तिला त्यावेळी आठवत असतो तिचा  "बाप" तिला जपता जपता स्वतःला विसरलेला बाप..ती कधी पडलेली नसते बापाच्या गळ्यात लाडिक पणे....पण त्याच्या नजरेतील जिव्हाळा,वटवृक्षा प्रमाणे मिळालेला आधार.. तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी त्याचा चाललेला आटापिटा... लेकीच्या नावाला बट्टा लागू नये, समाज तिला बहिष्कृत करू नये.. म्हणून त्याने केलेले जीवाचे रान... आणि तिच्या लग्नात चोरून लपून रडणारा तो तिचा लाडका बाबा...  स्वाभिमानी बाप तिच्या सासरी आयाळ नसलेल्या सिंहा सारखा दिसतो..हे सारे तिला आठवत असते...अभिमान वाटतो मग लेकरांचा आणि त्या बापाचा ही...आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे आजचा बाप व्यक्त होतो.. अश्रूंना वाट करून देतो.. धाक दाखवायचा झाल्यास आईचा दाखवतो 😜 आजही त्याची मुलांसाठी,शिक्षणासाठी त्यांच्या सुखासाठी चाललेली धडपड वेगळी नाही...मुलगा मुलगी समान...कर्तव्यात प्रेमात कसूर नाही...काही मुले खरच नशीबवान असतात ज्यांना आई वडिलांचे प्रेम, आधार मिळत असतो...वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेली पोरकी मुले पाहिली की पोटात गोळा येतो..जिम्मेदारी च्या ओझ्याखाली मग ती कशी ओढली जातात बालपण हरवून बसतात हे मी पाहिले आहे.. आपण मुले मोठी झालो की शिंग  फुटल्यासारखी वागत राहतो.. आज काल काही  मुले सरळ बापावर विनोद करतात.. एकमेकांना बापाच्या नावाने बोलवतात अत्यंत किळसवाणे वाटते हे ऐकताना...ना कुठे आदर ना जिव्हाळा.... त्यांना विचारा  बापाची किंमत ज्यांना हे सुख मिळाले नाही...दिवसभर पोटासाठी बाहेर राहणार बाप लक्षात येत नसेल कदाचित...त्याचे असणे नसेल लक्षात येत कधी पण नसणे पहाड कोसल्यासारखे असते...बाप कसाही असू देत लुळा, पांगळा घरात पडून असला तरी त्याचे असणे खूप महत्वाचे असते... मी पण त्या नशीबवान मुलींमधलीच एक आहे की मला अश्या प्रेमळ,बाबाचा  आधार आहे ..माझी मुलगी ही नशीबवान आहे की तिला तिचा गोड फादर आहे पण नवरा स्वतःकडे पाहतो हतबल पणे...आधार साठी त्याला त्याचे बाबा दिसत नाहीत तेंव्हा त्याची नजर जाते उंच आकाशाकडे सुन्न होऊन मग पाहत राहते क्षणभर...पण मग तो उठतो नवीन विचार घेऊन त्याच्या चिमुकलीच्या भवितव्याचा... असा हा "बाप" पहाडाच्या छातीचा असतो... "फादर डे"ही  पाश्चत्य संस्कृती असली तरी वडिलांन वर लिहायला..त्यांचे कौतुक शब्दात व्यक्त करायला एक निमित्त मिळाले हेच खूप आहे...पण हे कौतुक फक्त शब्दातून व्यक्त न होता कृतीतून ही त्यांना समाधान देवो.. आपला बाप असल्याचा अभिमान त्याच्या डोळ्यातही दिसू देत...असा खरं तर  संकल्पच करायला हवा प्रत्येकाने.. अश्या "डे "ची खरे तर त्या साठी गरज नाही पण व्यक्त होण्याचा दिवस कधी तरी यावा, कारण त्या  प्रेमाला,आधाराला अंत नाही हेच खरे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा