Pages

बुधवार, १० एप्रिल, २०१९

अशी असावी आशा !!


अशी असावी आशा !!

       एकदा सहज मला कुणीतरी विचारलं, माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या ? त्यावर मी त्याला एका शब्दात, एकच उत्तर दिलं, 'आशा'. यावर विचारणारा स्वतःच विचारात पडला. त्याला आशा होती, की मी त्याच्या प्रश्नावर, अन्न, वस्त्र, निवारा वैगेरेसारख्या पुस्तकी पठडीतल्या गरजांचे उच्चारण करीन, किंवा फार-फार तर या त्रिकुटापुढं 'शिक्षण' नावाचं एखादं शेपूट जोडीन. मात्र अफसोस! त्याचा पूर्णपणे भ्रमनिरास झाला आणि मला त्याने परत विचारलं, की असं नेमकं कसं ? त्यावर मग मी त्याला माझ्या जन्माची एक गोष्ट सांगितली.

       खूप खूप लक्ष वर्षांपूर्वी, जेव्हा माझा जन्म अगदी मानवी उत्क्रांतीच्याही खूप अगोदर, एक रानटी माकड वजा माणूस म्हणून झाला होता. की जेव्हा मी पूर्णपणे रानटी आयुष्य जगत होतो. तेंव्हा एक दिवस अचानक मला खूप भूक लागली होती. भुकेने अतिशय व्याकूळ होऊन मी त्या रानात, अन्नाचा शोध घेत होतो. मात्र दुर्भाग्यवश, मी पूर्णपणे असफल होत चाललो होतो. मात्र तरीही मी भटकंती सोडली नव्हती. चालून चालून अगदीच मरणासन्न अवस्था झाली होती. दिवसाची रात्र आणि रात्रीची पहाट, पुन्हा दिवस, पुन्हा रात्र हे दिनचक्र नेमान चालूच होतं आणि त्यालाच आदर्श मानून मी न थकता चालतच होतो. एक वेळ अशी आली, की प्रचंड भूकेने अंगात त्राण उरला नाही. त्यामुळे मी अचानक झोकांडी खात खाली कोसळलो आणि एका उतारावरून खाली घरंगळत जाऊन एका मोठ्या धुडावर आदळून थांबलो. कसाबसा मी उठून बसलो आणि अतिभूकेने मी त्या काळ्याकुट्ट धुडाला कचाकच तोडू लागलो; आणि काय आश्चर्य ! ते काळेकुट्ट धूड मला रुचकर लागू लागले. तसा मी देहभान विसरून त्यावर तुटून पडलो. पोटातली अग्नि शमल्यावर, मी जेव्हा तृप्तीचा ढेकर देत मान वर केली, तेंव्हा मला लगेच आढळून आले, की तिथं सर्वकाही काळेकुट्टच आहे. मला समजायला उशीर लागला नाही, की ती वणवा लागून गेल्यानंतरची रानवस्था होती आणि ते धूड, धूड नसून आगीत खरपूस भाजलेला बैल होता, जो मी फस्त केला होता.

       या भटकंतीमुळे मला आता फळ आणि कंदमुळे झांबलत बसण्याची आवश्यकता नव्हती आणि हाच आनंद घेऊन मी पाण्यासाठी नव्याने भटकंती सुरू केली....
 हे जेंव्हा मी त्याला सांगितले, तेंव्हा त्याने मला पुन्हा प्रश्न केला, मग पुढे पाणी मिळाले की नाही ? आता मात्र मला त्याच्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी खरंच पाण्याची आवश्यकता होती. म्हणून मी त्याला वीस रुपये देऊन एक बिसलरी आणायला पाठवले.

       आता मात्र आपण मूळ विषयाकडे येऊया. मी आधीच सांगितल्याप्रमाणे 'आशा' माणसाची मूलभूत गरज आहे आणि हे विधान अगदीच खरं आहे. मी मान्य करतो, की अन्न-वस्त्र-निवारा, या मूलभूत मानवी गरजा होऊ शकतात. मात्र याआधी मानवाला आशेची गरज असते. जर मानवी मनात आशाच नसेल तर तो वरीलपैकी कोणतीही गरज पूर्ण करू शकत नाही. जर मी भुकेला असतांना असफल झाल्यावर आशा सोडून बसलो असतो, तर मी संपलो असतो, अथवा कंदमुळे आणि फळच कुरतडत बसलो असतो. जर मी पाण्याची आस सोडून भटकंती थांबवली असती, तर मी त्याला बिसलरी आणायला कधीच पाठवू शकलो नसतो.

       शेवटी मुद्दा काय आहे ! तर आशा ही कोणत्याही कृतीची जननी आहे. माणूस आपला प्रत्येक श्वास कुठल्या-ना-कुठल्या आशेनेच घेत असतो. त्यामुळे अशा संपली की माणूस संपला. आशा ही माणसासाठी इंधन म्हणून काम करते. प्रत्येकवेळी जगण्याला एक नवं बळ देते. आयुष्याला छानसा वेग देण्याचं काम करते. त्यामुळे आशावादी असन म्हणजेच यशस्वी असणं किंवा यशाच्या वाटेवर असणं होय !

       मात्र आजकाल निराशावादी सूर चोहीकडेच ऐकायला मिळतात. अभावातून निराशा वाढीस लागणे बरोबर नाही. वास्तवात अभावातूनच आशा जन्म घेते आणि यशापर्यंत जाण्याचा मार्ग तयार करते. म्हणून सर्वांनी आशावादी राहणं, हीच यशाची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा