Pages

गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

“अति ई” म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!


 “अति ई म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!

गेल्या पाच-सहा वर्षांत ‘काॅपी-पेस्ट ही अभ्यासाची एक नवी पद्धत रूढ झाली आहे. शाळेपासूनच मुलांना विविध विषयांवरचे प्रोजेक्ट्स दिले जातात. विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष ज्ञान वाढावं, त्यांनी पाठ्यपुस्तकाबाहेर पडून माहिती मिळवावी, ती व्यवस्थित मांडणं, सादर करणं याकरिता खटपट करावी, त्यातून त्यांचं अवांतर वाचन वाढेल, नव्या गोष्टी समजतील, त्यांचं लेखनही सुधारेल आणि अर्थातच, यातून त्यांना आनंद मिळेल.. असा एक चांगला आणि शुद्ध हेतू समोर ठेवून प्रकल्पाधिष्ठीत शिक्षण सुरू झालं. पण, याची दुसरी बाजू गंभीरपणे विचारातच घेतली गेली नाही. म्हणूनच, या प्रकारामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच पदरी पडायला लागलंय.

अनेक घरांमधून या प्रकल्पांकरिता इंटरनेट वापरलं जायला लागलंय. शाळेतून प्रोजेक्ट चा टाॅपिक मिळाला की, इंटरनेटवरून माहिती डाऊनलोड करायची, ती आपल्या मेंदूला काहीही ताण न देता सरळ लिहून काढायची, तो प्रोजेक्ट आणखी आकर्षक व्हावा म्हणून इंटरनेटवरूनच फोटो किंवा चित्रं डाऊनलोड करायची आणि प्रिंट्स काढून चिकटवायची. जास्तीत जास्त एका तासाभरात आठ-दहा पानांचा प्रोजेक्ट तयार ! यात पालकांचीच ‘शिक्षकांनी उरावर बसवलेली ही नसती ब्याद उरकण्याचीच केविलवाणी धडपड मला दिसते. आता एखादी गोष्ट कशीही करून उरकायचीच असेल तर मग काय? - हपापा चा माल गपापा !

दहावीत गेलेल्या एका मुलाला त्याचं शुद्धलेखन चुकतंय म्हणून शिक्षकांनी संस्कृतमधली काही सुभाषितं प्रत्येकी दहावेळा लिहून आणायला सांगितली. तर, ती सुभाषितं त्याची आईच सकाळपासून लिहीत बसलीय ! त्या मुलाच्या इतिहास-भूगोलाच्या वह्यासुद्धा आईनंच पूर्ण करून दिल्या. धन्य ती माऊली...!

आपल्याला प्रत्येक गोष्ट इन्स्टंट मिळवण्याची सवय अंगवळणीच पडली आहे. मागच्या वर्षी कोजागिरीच्या निमित्तानं काही मित्रमंडळींना घरी बोलावलं होतं. बायकोनं स्वयंपाक घरीच केला होता आणि दूधही आटवलं होतं. घरी आलेल्या तिच्या मैत्रिणींनी तिला वेड्यातच काढलं. त्यांच्या मते, एवढा उपद्व्याप करत बसण्यापेक्षा जेवण आणि दूध सरळ बाहेरूनच मागवायला हवं होतं. तिच्या एका मैत्रिणीने तर कैरीच्या डाळीची सुद्धा बाहेर आॅर्डर दिली होती आणि पन्ह्याचा अर्क आणून त्यात पाणी मिसळून ‘रेडीमेड पन्हं दिलं होतं. जर पालकच इन्स्टंट गोष्टींच्या मागे लागलेले असतील तर मुलंही तशीच तयार होतील. त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?

पण यामुळंच, एकूणच पहायला गेलं तर आळशीपणा वाढून खऱ्या विकासाला खीळ बसतेय की काय, असं वाटायला लागलं आहे. एकीकडे विनाकष्ट, विनासायास, बसल्याजागी सगळं अगदी सहज मिळावं ही वृत्ती विद्यार्थीदशेपासून आपणच आपल्या मुला-मुलींमध्ये विकसित करायची आणि दुसरीकडे ‘सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे कष्टांना तरणोपाय नाही हे पालुपद आपणच आळवायचं, हे आता नित्याचंच झालं आहे. त्यामुळेच पालकांचीच ‘शिक्षण आणि त्यातून अपेक्षित असणारा विकास या विषयीची कल्पना पुरेशी स्पष्ट नाहीय, असं जाणवतं. पण एक मात्र नक्की आहे की, असं दोन्ही डगरींवर एकाच वेळी चालणारं पालकत्व १००% महागात पडतंच.

अगदी हौसेनं मुलांना महागड्या, पाॅश, ब्रॅन्डेड शाळा-काॅलेजांमध्ये घालायचं, पण घरातून मात्र मुलांना इंटरनेट वापरून रेडीमेड अभ्यास उरकण्याला प्रोत्साहन द्यायचं, असा पालकांचा कल दिसतो. शिक्षण पूर्वीसारखं राहीलेलं नाही, बराच बदल झाला आहे, पुढंही होईल. पण माझ्या दृष्टीनं खरा बदल झाला तो पालकवर्गात. ३०-४० वर्षांपूर्वीच्या पालकवर्गात उच्चशिक्षित पालकांचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. आता मात्र बहुतांश पालक शैक्षणिकदृष्ट्या स्वत: पदवीधर आहेत. आई आणि वडील हे दोघेही उच्चशिक्षित असण्याचंही प्रमाण आता बरंच वाढलंय. पण मग तरीही कुठंतरी पाणी मुरतंच आहे.

नुकताच मी पालकांचा व्हाॅट्सॲप ग्रुप पाहिला. वर्गशिक्षक शाळेतला गृहपाठ पालकांना व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठवतात. ही झाली सोय ! पण, या आई पालक फारच हुशार.. त्यांनी सर्व पालकांचा आणखी एक ग्रुप तयार केला, ज्यात वर्गशिक्षक नाहीत. या आया गृहपाठातले प्रश्न वाटून घेतात आणि त्याची उत्तरं स्वत: तयार करून ग्रुपवर शेअर करतात. बाकीच्या आया ती उत्तरं आपापल्या मुलांकडून झकासपैकी काॅपी करून घेतात. सगळ्या आया उच्चशिक्षित आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत, कुणाकुणाचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. पण, कळत-नकळत, जाणते-अजाणतेपणी यापैकी काहीही म्हणा, मुलांचं काॅपी-पेस्टींग चं शिक्षण मात्र घरातून जोरदारपणे सुरू आहे. टेक्नाॅलाॅजीचा असा उपयोग करून आपण आपल्या मुलांचं नुकसानच करतोय, हे या आयांच्या लक्षात येत नाहीय का?

इतकंच काय पण शाळेत जाणाऱ्या मुलांचेही व्हाॅट्सॲप ग्रुप्स आहेत.त्यावरूनही अशी आणि या व्यतिरिक्तही बरीचशी देवघेव चालते. मुलं अख्खं जर्नल सुद्धा स्मार्टफोन्समुळे काॅपी करून शेअर करायला लागली आहेत. आता यात काय गैर आहे? असं अनेकांना वाटेल. पण, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, या फोन्सच्या वापराचे भरपूर दुष्परिणाम आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये जाणवायला लागले आहेत. स्मार्टफोन्सचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये लिखाणाचा कंटाळा आणि आळस वाढायला लागला आहे. इतकंच काय, केवळ तर्जनीचाच अधिक वापर करत राहण्याच्या सवयीमुळे त्यांचं हस्ताक्षर बिघडायला लागलं आहे. आकृत्या काढण्यातला सफाईदारपणा कमी होत चालला आहे. पुष्कळशा मुलांना साधी-साधी सोपी वाक्यंसुद्धा नीट लिहीणं जमत नाहीय. हात थरथरायला लागतो, बोटं आखडतात, एका सरळ रेषेत लिहीणंच जमत नाही. तर्जनी अधिक कठीण झाली की, पेन किंवा पेन्सिल पकडण्यातच अडचणी यायला लागतात. साहजिकच, लेखन म्हणजे कंटाळवाणं, नीरस, रूक्ष, बिनकामी खर्डेघाशी इ. वाटायला लागतं. म्हणूनच, स्क्रिन्स सर्फिंगवर जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या लेखनात, हस्ताक्षरात समस्या असण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.

स्क्रिन्सच्या अतिवापराचा आणखी एक परिणाम म्हणजे एकाग्रतेच्या समस्या बळावणे. एकाग्रतेच्या प्रचंड समस्या असलेली मुलं-मुली तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिसरात विपुल संख्येने दिसतील. “स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, आयपॅड, लॅपटाॅप आणि टीव्ही यांचा वाढता वापर हा एक समान धागा यापैकी बहुतांश मुलांमध्ये दिसेल. स्क्रिन्सवर वेळ घालवताना डोळ्यांवरही विलक्षण ताण येतो. त्यातही स्क्रिन जितकी ब्राईट असेल तितका हा ताण वाढतोच. फटाफट स्क्रीन्स सरकवत राहण्याची सवय बोटांना जडली तरी स्कीनवर केवळ सेकंदभरासाठी लक्ष केंद्रीत करणं डोळ्यांना झेपलं तरी पाहिजे ना. पण, डोळ्यांवर प्रचंड ताण येत असतानाही मुलं अख्खी रात्र-रात्र सुद्धा या स्क्रीन्सच्या सहवासात घालवतात. मग, ताळतंत्र बिघडणं आणि अस्वस्थता येणं स्वाभाविकच आहे.  प्रचंड वेगाने सतत सर्फिंग करत राहिल्यामुळे वेळेचं भान तर राहत नाहीच, शिवाय मानसिक क्षमतांमधली चंचलता वाढते ती वेगळीच.

चा अतिवापर मुलांच्या वाचन-लेखन कौशल्यातला मोठा अडसर ठरतोय. उत्तम शब्दरचना करता येणं, यमक साधता येणं, भाषांमधला व्याकरणाचा पाया पक्का असणं, एखाद्या गोष्टीचा सारांश उत्तमरित्या मांडता येणं, एखाद्या कल्पनेचा विस्तार चांगला करता येणं, एखाद्या कवितेचं किंवा कलाकृतीचं रसग्रहण करता येणं, एका शब्दाकरिता अनेक शब्द योजणं किंवा अनेक शब्दांकरिता एक शब्द योजणं अशा अनेक क्षमतांमधली घसरण सुरू झाली आहे. लालित्य उतरणीला लागलंय. भाषिक कल्पनाशक्तीच्या विकासात अडथळे यायला लागलेत. हा निसर्गानं आपल्याला फुकटात बहाल केलेल्या सुंदर क्षमतांचा अपमानच आहे.

आता आपल्यालाच आपल्या क्षमतांची किंमत नसेल आणि आपलं नुकसान आपल्यालाच कळत नसेल तर, चक्रीवादळात भिरभिरणाऱ्या पानासारखी आपली गत होईल. त्यापेक्षा वेळीच सावध होऊन अतिरेक टाळलेला बरा.. नाही का?

©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा