Pages

शनिवार, २० एप्रिल, २०१९

आंधळी कोशिंबीर –




आंधळी कोशिंबीर –
      
मे महिन्यातली टळटळीत दुपार! ऊन मी म्हणत असलेलं! पाखरंही वळचणीला चिडीचूप - मिळालीय तेवढी सावली धरून ठेवणारी! रस्त्याच्या कडेला उभी असलेली झाडं - स्तब्ध ! पानही हलत नाहीये त्यांचं ! पण त्यामध्ये फुलारलेला तो गुलमोहर ! एखादा वणवा पेटल्यासारखा !  अगदीच नाईलाजाने बाहेर पडलेली चार दोन माणसं ! तेवढीच काय ती हालचाल !!
     
आणि या सगळ्यांशी काहीही संबंध नसल्यागत त्या चौसोपी वाड्यातल्या अंगणात  "आंधळी कोशिंबिरी" चा खेळ रंगलेला ! "राणी" च्या सगळ्या मैत्रिणींचा मेळा जमलेला ! सगळ्या चिमण्या दुपारचं जेवण-खाण आटोपून सुट्टीतल्या खेळात रमलेल्या !
      
"राणी" वर राज्य ! तिच्या डोळ्यांवर घट्ट पट्टी ! आवाजाचा कानोसा घेत, छुमछुमणाऱ्या पैंजणांच्या नादाचा अंदाज घेत, कुणीतरी सांगितलेल्या वाटेचा मागोवा घेत, डावीकडे-उजवीकडे-पुढे-मागे  हातांनी चाचपडत, गडी पकडण्याचा आनंद शोधणारी राणी ! गोबऱ्या गालाची, अपऱ्या नाकाची , गोरी-गोमटी ! उन्हं उतरणीला लागेपर्यंत धावणारी , रुसणारी , दमणारी आणि गुलाबी झालेले गाल फुगवून आजीकडे 'आईसफ्रूट'च्या गोळ्याचा हट्ट करणारी ! निरागस !!
    
ऋतुचक्र पळतच राहिलं! अंगणातल्या, परकर पोलक्यातल्या राणीला खराखुरा 'राजा' मिळाला....! माप ओलांडून राणी 'स्वतःच्या' घरात आली ! मोठया शहरात, मोठ्या बंगल्यात, मोठ्या आनंदात ! भिरभिरत्या नजरेने विस्तारलेले जग पाहण्याची नवी स्वप्नं डोळ्यात घेऊन आली!!
      
पण ..... आजही ती खेळतेच आहे खेळ  आंधळी कोशिंबीरी"चा ! फक्त आज डोळ्यांवर पट्टी बांधलीय ती नशिबानं, समाजानं, रूढी-परंपरांनी !! आणि मैत्रिणींची जागा घेतलीय जवळच्या (?) नातेवाईकांनी , सग्या-सोयऱ्यांनी, कर्तव्यांनी, जबाबदाऱ्यांनी....!  कुणाला धरणार आणि कुणाला सोडणार ??  कानावर आवाज पडतायत तेवढ्याच अंदाजानी पावलं टाकतीय ! पावलं वळतायत तिकडे वळतीय ! चार पावलं पुढे-दोन मागे !!  अशानं तिच्यावरचं राज्य कसं जाणार... ??
     
अरे .... कुणीतरी सांगा तिला ....

"बस्स झाला हा खेळ.... आता तरी ती पट्टी काढून टाक म्हणावं.....! स्वच्छ, मोकळ्या नजरेनी जगाकडे बघ ! विसरून जा तो बाहेर पेटलेला वैशाख वणवा !! नाचू देत तुझी पावलं तुझ्या अंगणात मुक्तपणे !! हो म्हणावे "राणी"... खरीखुरी ... स्वतःच्या मनाची ...आणि स्वतः रेखलेल्या वाटेवरची... उघड्या डोळ्यांनी जग पाहणारी.... !!!!”

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा