Pages

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

रत्नचरित्र..!



रत्नचरित्र..!

वसुंधरेच्या गर्भकुडीतील कार्बन जेव्हा ‘हिरा म्हणून ओळखला जातो, तिथं भल्याभल्यांच्या झोपा उडतात. या रत्नमाणकांनी इतिहास घडविला. लोभ, द्वेष, मद, मत्सर अशा अनेक तमोगुणांना थारा देत देत आजवर अनेक अनमोल रत्नमाणकांनी मानवी इतिहासात नाव कमावले आहे. या रत्नांना देखील नशीब असतं, चरित्र असतं. बाजीराव आणि अन्य हिंदुस्तानी राजे-महाराजे आणि नबाब ह्यांच्याकडून ब्रिटिशांनी वेळोवेळी ज्या रकमा आणि जडजवाहीर युद्धाच्या मार्गाने मिळविले त्यांचे पुढे काय झाले ह्याबद्दल आपल्याकडे स्पष्ट अशी काहीच माहिती उपलब्ध नाही. ती संपत्ती ब्रिटिशांनी 'लुटली' एवढेच आपण म्हणू शकतो. आता बुक्स.गूगल सारख्या स्थळांमुळे १८ व्या-१९ व्या शतकातले छापील साहित्य आपल्याला नव्याने उपलब्ध झाले आहे आणि बाजीरावच्या संपत्तीचे काय झाले ह्याचे पुष्कळसे समाधानकारक उत्तर मिळू शकते.

सहसा मराठी माणसाच्या घरात हिरे किंवा मौल्यवान रत्ने दिसत नाहीत. मराठी कुटुंबांचा सगळा भर सोन्याच्या दागिन्यावर. तोडे- पाटल्या- बिलवर- वाकी- ठुशी- तन्मणी- बाजूबंद- चपला हार- पोहेहार- बोरमाळ...मोत्यांचा वापर मात्र बऱ्याच ठिकाणी दिसतो. याचं कारण कदाचित असं असावं की सोनं मोडल्यावर जी किंमत मिळते ती रत्नांना मिळत नाही. गेल्या दीड-दोनशे वर्षांतली मराठी माणसाची आर्थिक स्थिती बघता हिऱ्यापेक्षा सोनं विमा म्हणून वापरलं जात होतं. याचा अर्थ असा नाही की मराठय़ांकडे जड-जवाहीर नव्हते, पण लढाया आणि दुष्काळ यांना कायम तोंड देता देता संग्रहाला वेळ मिळाला नाही हे खरेच. नेतृत्वाची फार मोठी किंमत महाराष्ट्राला चुकवायला लागली. पेशवाई संपल्यावरचा आढावा घेतला तर पेशव्यांपेक्षा त्यांचे सरदार जास्त श्रीमंत होते. तरीसद्धा पेशवाईत रत्नांचा बऱ्यापैकी संग्रह असावा.थोरले माधवराव पेशवे जेव्हा गेले तेव्हा सती रमाबाईंनी जो धर्मादाय केला त्यात हातातल्या कंगन्या (जास्त रुंद नसलेल्या बांगडय़ा) बाळशास्त्रींच्या पत्नीस दिल्या. त्यात पंचेचाळीस हिरे आणि चौऱ्याण्णव हिरकण्या होत्या.त्यांनी एक हिऱ्याची अंगठी पटवर्धनांना दिली ज्यात आतमध्ये गणपतीची मूर्ती होती. माधवरावांची स्मरणी मोत्यांची होती ज्याची किंमत त्यावेळेस पाच हजारांच्या वर होती. ह्या सगळ्या वस्तू वैयक्तिक वापरातील असल्यामुळे खजिन्याची कल्पना त्यावरून येणार नाही.यासाठी १८५८ साली नानासाहेबांचा खजिना ब्रिटिशांनी कानपूरच्या विहिरीतून पाणी उपसून काढला त्याची जंत्री बघा.

" विहिरीच्या तळाशी लाकडी ओंडके अडकवून त्याखाली अनेक सोन्याच्या लाद्या दाबून ठेवल्या होत्या. त्या लाद्या काढल्यावर चांदीची अंबारी नजरेस पडली. अंबारीच्या खाली दारूगोळ्याच्या पेटय़ा होत्या. या पेटय़ांमध्ये सोन्याची नाणी भरून ठेवली होती. त्या दिवशी अंदाजे दोन लाख पौंडाची संपत्ती बाहेर काढण्यात लष्कराला यश मिळाले.’’

सन १८५८ मध्ये नानासाहेब नेपाळी नरेशाच्या आश्रयाला गेले. नानासाहेब नेपाळजवळ देवंदारीला गेले तेव्हा केदारनाथ नावाच्या अधिकाऱ्याने त्यांचे स्वागत केले. नानांनी पाचू, हिरे, माणिक, मोती यांनी जडवलेला नवलखा हार काढून जंगबहाद्दूराला दिला. जंगबहाद्दूरांनी फारच कमी किंमत सांगितल्यावर काशीबाईंनी वाटाघाटी केल्या आणि नियमित करभरणा मिळतील अशी काही गावे मागून घेतली. त्यानंतर जंगबहाद्दूरांनी नानांच्या नेपाळात असण्याकडे दुर्लक्ष करण्याचे मान्य केले. याच पद्धतीने नानांकडे असलेला तीन इंच लांबीचा पाचू पण जंगबहाद्दूरांकडे गेला. आजच्या तारखेस नवलखा हार दरभंग्याच्या महाराजांकडे आहे.

 हिऱ्याची कणी, कणी म्हणजे हिऱ्याचा कणभर भाग.वजन मापाची दशमान पद्धती येण्याआधी सोनं, चांदी किंवा हिरे काय एका वेगळ्याच मापात मोजली जायची.काळतोंडी लाल गुंज म्हणजे रतन गुंज किंवा रक्त गुंज वजन करायला वापरताना त्याचा अपभ्रंश होऊन रती हा भाववाचक शब्द तयार झाला. एका जुन्या ग्रंथात एक रती म्हणजे २० क्षुमा म्हणजे आळशीच्या २० दाण्यांचे वजन असे दिले आहे. प्रत्येक जुन्या ग्रंथात वेगवेगळ्या बियांचे माप गृहीत धरण्याची पद्धत दिसते. वजन मोजण्यासाठी पांढरी मोहोरी- तांदूळ- उडीद- मंजालीया सगळ्या बियांचा उल्लेख कौटिलीय अर्थशास्त्रात आहे.इंग्रजी पद्धतीत कॅरेट हे मापसुद्धा कॅरेट ह्या बीवरून घेतले आहे. त्यापेक्षा लहान वजन म्हणजे ग्रेन. ३१७ ग्रेन म्हणजे एक कॅरेट. आताचा कॅरेट आता योग्य प्रमाण मानले जाते. कॅरेट म्हणजे २०० मिली ग्रॅम. हिरे सगळे आता या पद्धतीने मोजले जातात. वजन झाले की भावाचा प्रश्न आला. चारचौघात भाव सांगायचा म्हणजे नुकसान होण्याची शक्यता म्हणून भारतात जव्हेऱ्यांची खास अशी भाषा होती. या भाषेप्रमाणे एक- कणी, दोन- मेली, तीन- एकवई, चार- ऐरण, पाच- मूळ, सहा-बेड, सात- समार, आठ- थाल, नौ- बन, दहा- अंगळया पद्धतीने शंभर म्हणजे घर आणि हजार म्हणजे बडाघर. यातले बरेचसे शब्द मारवाडी भाषेतून आले आहेत.

वजनाने बघायचं झालं तर कलीनन हा हिरा सगळ्यात वजनदार. कच्च्या रूपात म्हणजे पैलू पाडण्यापूर्वी त्याचे वजन ३१०६ कॅरेट होते. पैलू पाडल्यावर त्याला ब्रिटिश राजदंडात स्थान मिळाले. कलीननपेक्षा मोठा हिरा सापडल्याच्या बातम्या वाचायला मिळतातच. २००७ च्या गार्डियनमध्ये आलेल्या बातमीनुसार कलीननच्या दुप्पट वजनाचा हिरा दक्षिण आफ्रिकेत सापडला आहे. वजन हा एकच निकष असेल तर सगळ्यात मोठा हिरा अवकाशात आहे. त्याचं नाव BPM 37093.त्याचं लाडकं नाव आहे ल्युसी. १९६० साली वैज्ञानिकांनी एक विचारप्रणाली मांडली होती की, अवकाशातील श्वेत बटू ताऱ्यांचा गाभा हिऱ्यासारख्या कार्बनच्या हिऱ्यासारखा स्फटिकाचा बनला असतो. या अवकाशातल्या हिऱ्याचे वजन आहे 10 billion trillion trillion carats म्हणजे एकावरती चौतीस शून्य कॅरेट.या हिऱ्याला ल्युसी नाव मिळाले. ल्युसी पृथ्वीपासून पन्नास प्रकाशर्वष दूर आहे.

पैलू पाडून हिऱ्याला जो आकार येतो त्याला मराठीत हिऱ्याचा घाट म्हणतात. आपल्याकडील घाटाच्या पद्धती फार मर्यादित होत्या. वजन जास्त असले तरी प्रकाशाच्या लीला त्यात दिसायच्या नाहीत. नैसर्गिक हिऱ्याचा आकार बहुतांश अष्टपैलूंचा मिळतो. त्या आकारात फारशी ढवळाढवळ न करता, त्याचे वजन कमी न होऊ देता जेवढी आवश्यक तेवढीच काटछाट करणे हा पैलूकारीचा उद्देश असायचा. भारतीय पद्धतीत जे घाट पाडले जायचे त्यात परब, पलचा, बिलंदी आणि मुखलसी हे मुख्य प्रकार होते. त्यानंतर विलायती घाट आले. त्यात रोजकट, टेबल कट, स्टेप टेबल कट आणि काबोचान कट. कालांतराने त्याची मराठी नावे पण आली. गुलाब घाटी, टेबल घाटी, मदार घाटी वगैरे.या सगळ्या घाटांत क्रांती आणली ब्रिलियंट कटने. ब्रिलियंट कट आल्यानंतर युरोपात हिऱ्यांची मागणी अधिकाधिक वाढत गेली आणि मोत्यांची मागणी घटत गेली. ब्रिलियंट कट नेमका काय होता हे समजण्यासाठी एक क्षण डोळे मिटा आणि ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार म्हणा आणि लाईक अ डायमंड इन द स्काय म्हटल्यावर तो लुकलुकणारा तारा डोळ्यासमोर येतो ते म्हणजे ब्रिलियंट कट.ब्रिलियंट कटचा एक तोटा असा होता की, मूळ कच्च्या हिऱ्याचं वजन जवळजवळ ४०-५० पन्नास टक्के कमी व्हायचं. तरीसुद्धा ज्याला हिऱ्याचा प्ले ऑफ फायर (आपण त्याला प्रकाशलीला म्हणू या) म्हणतात तो इतका मोठय़ा प्रमाणात वाढतो की हिऱ्याची किंमत दसपटीने रातोरात वाढते. कदाचित याच कारणामुळे गोवळकोंडय़ातील जे हिरे भारतातून बाहेर गेले त्यांना बऱ्याच वेळा पुन:पुन्हा नवीन पैलू पाडण्यात आले. हिऱ्याचा माथा ज्याला टेबल (माथा) म्हणतात आणि मधला भाग ज्याला गर्डल (कंगोरा) म्हणतात निमुळता होणारा पॅव्हेलियन (पेंदी) आणि टोकाचा भाग क्युलेट (कोंदण) याचे कोन जेव्हा व्यवस्थित जुळतात तेव्हा हिऱ्याच्या आतून प्रकाश बाहेर फेकला जाण्याचा अनुभव येतो. फायर ऑफ द जेम किंवा प्रकाशलीला म्हणतात ती हीच. त्याखेरीज गर्डलच्या वरचा भाग आणि पॅव्हेलियनची लांबी यांचे गुणोत्तर जमले की हिरा लखलखायला लागतो. एकूण अठ्ठावन्न पैलूंची किमया हिऱ्याचे व्यक्तिमत्त्व पार बदलून टाकते.हा झाला ब्रिलियंटचा क्लासिक प्रकार.

पण सध्याचा जमाना प्रिन्सेस कटचा आहे.पोलर स्टार नावाचा एक हिरा त्याच्या बांधणीसाठी फार प्रसिद्ध आहे. त्याचा घाट इतका प्रमाणबद्ध आहे की क्युलेटच्या टोकावर तो उभा राहू शकतो. ऑब्ललाँग कुशन टाईपचा या हिऱ्याला वरून बघितले एक अष्टकोनी तारा नजरेस येतो म्हणून या हिऱ्याचं नाव पोलर स्टार. एका रशियन राजपुत्राचा हिरा बराच काळ एका सावकाराकडे गहाण पडला होता. नंतर डच-शेल कंपनीच्या मालकाकडे जाऊन १९८० साली ख्रिस्तीजच्या एका लिलावात ऐंशी लाख स्वीस फ्रँकला विकला गेला. हिराकधी कुठल्या किंमतीला जाईल याचे काही सांगता येत नाही.

हिऱ्याची असली जातकुळी शुद्ध पाण्याच्या रंगाची.बऱ्याच जुन्या संस्कृत ग्रंथांत पण असा उल्लेख आहे. पण त्याच पुस्तकांमध्ये दुधासारखा- मधासारखा असा पण उल्लेख आहे. खाणीत सापडणाऱ्या हिऱ्यांपैकी जवळजवळ ९८ टक्के हिरे नायट्रोजनच्या सोबतच जन्माला येतात. जर नायट्रोजनचे अणू सम अंकात असतील तर हिऱ्याच्या नैसर्गिक रंगात काही फरक पडत नाही पण विषम अंकात जर नायट्रोजनचे अणू असतील तर मात्र फिकट पिवळा रंग हिऱ्यात दिसतो. हे प्रमाण जास्तच असले तर रंग ब्राऊन होत जातो आणि हिऱ्याचे सौंदर्य नाहीसे होते. टॅवर्निअरच्या पुस्तकात मधाच्या रंगाचे हिरे असा उल्लेख आहे ते हिरे असेच असावेत.

हिऱ्याची सत्त्वपरीक्षा म्हणजे क्लॅरिटी. त्याचा निखळपणा. त्याच्या बाह्यांगावर असलेले चरे- डाग. अंतरंगावर असलेले काळे ठिपके, पिसाऱ्यासारखे पांढरे डाग. हिरण्यमयी सूर्याला डाग टळत नाहीत तर पृथ्वीच्या पोटातून बाहेर पडणाऱ्या हिऱ्यांना डाग कसे टाळता येतील. पण कलंकाला सामोरे जाणे हे प्रत्येक नैसर्गिक हिऱ्याच्या नशिबात असते. स्फटिकीय अंतरंगात अडकलेला एखादा कचऱ्याचा कण, आत पडलेल्या रेषा या सगळ्यांना हिऱ्याचा कलंक म्हणतात.हिऱ्याची डय़ू डिलिजन्स टेस्ट म्हणजे क्लॅरिटीवरून ठरणारी एक मानांकनाची पद्धत. त्यात पहिल्या क्रमांकावर आहे फ्लॉलेस म्हणजे शुद्ध, कुठलाही डाग नसलेला हिरा. कोहिनूर किंवा कलीननसारखे काहीच हिरे या कसोटीवर उतरतात. त्यानंतरच्या ग्रेड आहेत व्हीव्हीएस-1 आणि व्हीव्हीएस-2. व्हेरी व्हेरी स्मॉल इनक्लुजन्स आणि स्मॉल इनक्लुजन्स. अशी पायरी उतरता उतरता शेवटची पायरी आहे इन्क्लुडेड. या पायरीवर हिऱ्याचा कोणीही वाली नसतो.

अनमोल रत्नांना स्वत:चा असा खास इतिहास असतो. त्यांना अनेक विचित्र सवयी असतात. अचानक नाहीसे होणे- प्रेमात पाडणे- प्रेमभंग करणे- लग्न घडवून आणणे- तहाच्या मुख्य अटीत जाऊन बसणे- राजरोषाचे धनी होणे.रत्नांना आणि दागिन्यांना एक अंगभूत सवय असते नाहीसे किंवा गहाळ होण्याची. ब्राऊन प्रिन्सशी लग्न करण्याची फॅशन युरोपात १८५८ नंतर आली आणि भारतीय राजेरजवाडय़ातून रत्ने आणि दागिन्यांना गहाळ होण्याची सवयच लागली. तोर्पयंत गोऱ्या मडमांचे हितरक्षण करण्यासाठी मॅरिड वुमन्स प्रॉपर्टी अॅक्ट (१८७४) पण आला होता. त्यामुळे देशी राजांच्या गोऱ्या बायकांनी चोरी केली तरी त्याला चोरी म्हणणे शक्य नव्हते.अशीच एक कथा आहे पतियाळाच्या शिरपेचाची. पतियाळाच्या महाराजांच्या राज्यारोहण समारंभात खास शिरपेच अचानक खजिन्यातून नाहीसा झाला. दोन वर्षांनी तो सापडला लंडनच्या एका पेढीवर. तपास केल्यावर कळले की, महाराजांच्या गोऱ्या विलायती मड्डमेचे ते प्रताप होते.

पतियाळा संस्थानाचा खजिना म्हणजे कुबेराचे भांडारच.१८५७ च्या उठावात जे सहभागी झाले नाहीत त्यांचे खजिने भरभरून वाहत होते. शिखांनी या लढय़ात भाग घेतला नव्हता. त्यामुळे पतियाळाचा खजिना अबाधित राहिला होता.पतियाळाच्या नेकलेसची तर एक आणखी एक कथा आहे. जक्वेस कार्टियेने १९२८ साली बनवलेल्या या हारात मुख्य नग होता एक हिरा दोनशे चौतीस कॅरेटचा. त्या हिऱ्याचे नाव होते डी बीअर्स डायमंड. प्लॅटिनमच्या गोफात गुंफलेल्या या हारात दोन मोठी ब्रह्मदेशी माणकं आणि लहान-मोठे हजार कॅरेट वजनाचे जवळजवळ २९०० छोटे-मोठे हिरे होते. हा हार पण अचानक नाहीसा झाला. १९४८ साली लंडनच्या एका जुन्या दागिन्यांच्या व्यापाराकडे सापडला. तोपर्यंत या हारातले मोठे हिरे गायब झाले होते.

भारतात गोवळकोंडय़ाच्या खाणीनंतर आणखी एकच खाण सध्या चालू आहे ती म्हणजे मध्य प्रदेशातली पन्नाची खाण.शिवबहादूर सिंग मध्य प्रदेशातल्या रेवा संस्थानाचे जहागीरदार. त्यांच्या जहागिरीचे नाव आहे चुरहाट. १९४९ साली हे गृहस्थ नेहरूंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. त्याच साली पन्ना डायमंड सिंडिकेट या कंपनीने त्यांना लीज वाढवून देण्याची विनंती केली.त्यावेळी रेवा विंध्य प्रदेशात होतं. नंतर मध्य प्रदेशात विलीन झालं. या गृहस्थांनी पाठीमागच्या तारखेपासून सही करण्यासाठी लाच मागितली. रक्कम होती पंचवीस हजार रु पये. या सज्जनांना ही रक्कम म्हणजे हाताचा मळ होता. पण आसक्ती मोहाच्या फुलासारखी असते. नगीनदास मेहता या पन्ना डायमंड सिंडिकेटच्या मालकाने लाच देण्यासाठी होकार दिला. दिल्लीच्या कँस्टीटय़ुशन हाऊसमध्ये लाच दिली गेली आणि शिवबहादूर सिंग अँटिकरप्शन ब्युरोच्या ट्रॅपमध्ये अडकले. सुरु वातीला स्पेशल कोर्टाने त्यांना मुक्त केलं. सरकार अपिलात गेलं. निकाल सरकारच्या बाजूने लागला. शिवनारायण सिंग यांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं. या अपिलात त्यांना लावलेल्या कलमांविषयी त्यांनी नकार दिला नव्हता. त्यांचा आग्रह असा होता की, विशेष न्यायालयाला ही केस चालवण्याचा अधिकार नव्हता. त्यामुळे शिक्षा रद्द व्हावी. सुप्रीम कोर्टाने त्यांची शिक्षा कायम केली. तीन वर्षांची शिक्षा भोगताना तुरुंगातच त्यांना मृत्यू आला.

ही कथा आहे अर्जुन सिंगांच्या तीर्थरूपांची.एका विमानात एका माणसाचे लक्ष शेजारच्या सीटवर बसलेल्या एका सुंदर स्त्रीकडे गेले. त्या सुंदर स्त्रीच्या हातातल्या अंगठीत तिच्या इतकाच सुंदर हिरा होता. त्या हिऱ्याच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध झालेल्या त्या माणसाने त्या स्त्रीला हिऱ्याविषयी विचारले. त्या स्त्रीने उत्तर दिले, ‘‘या हिऱ्याचे नाव क्लॉपमन डायमंड आहे. पण या हिऱ्याला ला होप हिऱ्यासारखाच शाप आहे आणि तो हिरा वापरणाऱ्याला भोगावा लागतो.’न राहवून त्या माणसाने विचारले, ‘‘काय आहे हो शाप?’’‘‘मिस्टर क्लॉपमन.’’ त्या स्त्रीने शांतपणे उत्तर दिले.हा थोडासा ब्लॅक ह्युमर वगळला तर हिरे आणि शाप नेहमी सोबत असतात अशी सामान्य माणसांची समजूत असते.हिऱ्याला शाप असतो; हिरा ढेकणाच्या संगतीत भंग पावतो; हिरा वापरणाऱ्याचा पुरुषार्थ वाढवतो; पण नक्की सांगावे असा काही पुरावा नाही, नक्की नाकारावे असाही काही पुरावा नाही.गोवळकोंडय़ाचा प्रांत निजामाकडे असल्याने निजामाच्या खजिन्यात हिऱ्यांची कमी नव्हती. निजाम मीर उस्मान अली नाईलाजाने भारतात आला. त्यापूर्वी त्याने सगळी मौल्यवान रत्ने मुंबईच्या हाँगकाँग बँकेत हलवली होती. १९७९ साली निजामाने हा खजिना लिलावात काढायचे ठरवले. भारत सरकारच्या काही दक्ष अधिकाऱ्यांनी आणि करण सिंगांनी हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली. भारतीय संस्कृतीचा वारसा देशाबाहेर जाऊ न देण्यासाठीची ही धडपड १९९५ साली फळास आली. १९७९ साली दीडशे कोटी किंमत असलेला हा संग्रह आजच्या तारखेस अडीच हजार कोटी रुपयाचा आहे. १७३ वेगवेगळ्या प्रकारचे नग असलेल्या संग्रहात १८४ कॅरेटचा जेकब डायमंड हिऱ्यांची पेंडंट असलेला- १५० मोठे आणि २३० छोटे मोती असलेला सात पदरी हार आहे. एकूण ४१५ कॅरेटचे २२ पाचू आहेत. २७० हिरे असलेली ब्रेसलेटस् आहेत.पण या सगळ्याचा मालक मीर उस्मान अली निजाम मात्र कंजूस होता. पाहुण्याला एक कप चहा आणि दोन बिस्किटे देणारा आणि पाहुण्यांनी न खाल्लेली बिस्किटे खाणारा निजाम भिकाऱ्यासारखाच राहिला. एकटेपणाची शिक्षा भोगत राहिला.

कोहिनूर... आपल्या राष्ट्रीय मनाचा सल आहे. साहेबाच्या राज्यात त्याला जाऊन दीडएकशे र्वष झाली. आजही हिरा म्हटला की कोहिनूर म्हणजे ‘आपला कोहिनूर हेच आठवतं. अधूनमधून एखादी लाट येते, कोहिनूर परत आणू या म्हणून, पण आता तो परत येणे नाही. हुमायूनने म्हटल्याप्रमाणे कोहिनूरसारखा हिरा मागून मिळत नाही- विकत घेता येत नाही. तो मिळतो केवळ दैवानेच!कोहिनूरचे जन्मस्थान गोवळकोंडा हे निर्विवाद सत्य आहे, पण कोहिनूर मोगलांकडे कसा आला या बाबतीतदोन वेगवेगळे विचार इतिहासकार समोर ठेवतात.काही जणांच्या मते हा हिरा आधी माळव्याच्या राजाकडे होता. राजा विक्रमजीत सिंहाने बाबराला पेशकश म्हणून दिला, तर काहीजणांच्या मते कोहिनूर मिर जुमलाच्या हस्ते मोगलांकडे गेला. मीर जुमला म्हणजे गोवळकोंडय़ाच्या हिऱ्यांच्या खाणींचा सर्वेसर्वा अधिकारी. कुत्ब शाहीच्या राजघराण्यातील एका स्त्रीशी त्याचे असलेले सबंध संपुष्टात यावे म्हणून त्याला राजधानीपासून दूर करण्यासाठी त्याची नेमणूक गोवळकोंडय़ाच्या खाणींवर करण्यात आली होती.कोहिनूर हे नाव मिळण्यापूर्वी बाबराचा हिरा म्हणून हा हिरा प्रसिद्ध होता. बाबरनाम्यात आणि नंतर अकबरनाम्यात त्याचा उल्लेख आहे.जडणघडणेच्या बाबतीतही दोन मतप्रवाह आहेत. काहींच्या मते कोहिनूर हा एकच हिरा होता, तर काहींच्या मते ग्रेट मोगल नावाच्या हिऱ्याचा कोहिनूर हा एक तुकडा आहे. नादिरशहाने दिल्ली लुटली १७३८ साली. त्याचा मनसुबा फक्त लूटमार हाच होता. मयूर सिंहासनासकट सगळा खजिना त्याने जाताना पशिर्याला नेला. पण ज्या हिऱ्याची कीर्ती ऐकून तो भारतात आला होता तो मात्र त्याला मिळेना. नादिरशहा बाबराचा हिरा मिळावा म्हणून उतावीळ झाला होता. जर गद्दारी झाली नसती तर कोहिनूर भारताबाहेर गेला नसता, पण एका दासीने कागाळी केली आणि बाबराचा हिरा मोहम्मदशहाच्या पागोटय़ात आहे ही बातमी नादिरशहाला कळली. कावेबाज नादिरशहाने मोहम्मदशहाला जेवणाचे निमंत्रण पाठवले. शाही भोजनानंतर मैत्रीचा हात पुढे केला. मोहम्मद शहा हा दुबळा मोगल होता. मैत्रीचा हात नाकारणे त्याच्या हिताचे नव्हते. मैत्रीच्या प्रस्तावाचे शिक्कामोर्तब म्हणून पागोट्यांची देवाणघेवाण करण्याचा प्रेमळ हट्ट नादिरशहाने धरला. मोहम्मदशहाचा नाइलाज होता.पागोटय़ांची देवाणघेवाण झाली आणि कोहिनूर नादिरशहाकडे गेला.नादिरशहाने पहिल्यांदा हा हिरा न्याहाळला तेव्हा त्याच्या तोंडून उद्गार बाहेर पडले- कोह इ नूर. (प्रकाशाचा पर्वत) बाबराच्या हिऱ्याचे नामकरण झाले ते असे. नादिरशहाने ज्या पद्धतीने राज्य मिळवले त्याच पद्धतीने त्याचा अंत झाला. १८४७ साली झोपेत असताना त्याचा खून झाला. हस्तेपरहस्ते हा हिरा अखेर साहेबाच्या ताब्यात आला. ब्रिटिशांशी दोन युद्ध हरल्यानंतर डलहौसी आणि शिखांमध्ये जो तह झाला त्याची मुख्य अट होती, कोहिनूर ब्रिटिशांना मिळावा. तह झाला आणि कोहिनूर कंपनी सरकारकडे आला.३ जुलै १८५० या दिवशी राणी आणि प्रिन्स अल्बर्ट आतुरतेने कोहिनूरची वाट बघत होते. दुलीप सिंहाच्या हस्ते नजराणा राणीसमोर पेश झाला. पण राणी आणि दरबाऱ्यांना कोहिनूरचे तेज मनाला आले नाही. शेवटी कोहिनूरला पुन्हा एकदा पैलू पाडण्यासाठी जॅरार्ड दरबारी जव्हेऱ्याच्या हवाली करण्यात आला. ३८ दिवसांत, आठ हजार पौंडांच्या खर्चात काम पूर्ण झाले. कोहिनूरचे नवीन रूप आणखी तेजस्वी झाले होते. वजनात मात्र भारी घट झाली होती. मूळचा १८६ कॅरेटचा कोहिनूर आतावजनाला १०८ कॅरेट भरत होता. त्यानंतर राणीच्या तायऱ्यामध्ये दोन हजार इतर हिऱ्यांच्या सोबतीत कोहिनूर ब्रिटिश राजमुकुटात गेला. राज्यारोहणाच्या समारंभात राणीच्या मुकुटात होता.

आग्रा... हा एकच असा हिरा आहे की ज्याला आतापर्यंतच्या इतिहासात मानवी रक्ताचा डाग लागलेला नाही. १५२६ साली ग्वाल्हेरच्या राजाच्या परिवाराने कृतज्ञतेपोटी हा हिरा हुमायनाला दिला,युद्धात हरलेल्या राजाच्या बायका मुलांना सुरक्षित घरी पाठवले म्हणून.तैमूर आणि चंगीजखानाच्या वंशावळीशी नाते सांगणाऱ्या बाबराने किंवा हुमायुनाने ही दयाबुद्धी दाखवावी हे नवलच. पण असे झाले खरे आणि आग्रा मोगलांच्या शिरपेचात कायम राहिला. औरंगजेबाने मोगलांची राजधानी दिल्लीला हलवेपर्यंत आग्र्यालाच होती म्हणून हा हिरा आग्रा म्हणून ओळखला जातो.इतर मोठे हिरे आणि आग्र्यात एक महत्त्वाचा फरक म्हणजे या हिऱ्याचे उगमस्थान गोळकोंडा नसावे. हा हिरा संबळपूरच्या खाणीतून आलेला असावा असे जाणकारांचे मत आहे. त्यानंतर हा हिरा अकबराच्या शिरपेचात होता. हुमायुन ते औरंगझेब हा नग मोगलांकडेच होता.एडवीन स्ट्रीटरनी हा हिरा हर्टझकडून १५००० पौंडाला विकत घेतला. एडवीन स्ट्रीटरना लॉर्ड डोनेगन यांनी एक सुरस आणि चमत्कारीक कथा सांगितली आणि कदाचित त्यामुळेच हा हिरा घ्यायची बुद्धी स्ट्रीटरला झाली असावी. डोनेगलच्या म्हणण्यानुसार आग्रा १८५७ उठावात काही शिपायांच्या ताब्यात आला. हिरा तर हातात, पण आता तो घरापर्यंत कसा न्यावा याची खलबतं सैनिकांमध्ये सुरू झाली. ही चर्चा करता करता एका शिपायाचे लक्ष घोडय़ाकडे गेले आणि त्याला शक्कल सुचली. हिरा घोडय़ाच्या पोटातून बाहेर काढण्याची. घोडय़ाच्या खाण्याचा एक लाडू बनवून त्यात हिरा भरण्यात आला. एकाच घासात हिरा घोडय़ाच्या पोटात गेला. छावणीत पोहोचल्यावर मात्र घोडय़ाचा बळी देण्यात आला आणि हिरा बाहेर काढण्यात आला. सरतेशेवटी १९९० साली हा हिरा ख्रिस्तीजनी लिलावात काढला तेव्हा अपेक्षित किंमत दीड लाख पौंडाची होती. सिबा नावाच्या कंपनीने चार लाख पौंडामध्ये विकत घेतला.

ऑर्लोफ...रशियन राजदंडात जाऊन बसण्याचा मान मिळालेला या हिऱ्याचा प्रवास फार रक्तरंजीत आहे. ज्या रशियन सरदाराच्या नावाने हा हिरा ओळखला जातो त्याचे नाव ग्रेगोरी ऑर्लोव. (बऱ्याच ठिकाणी याचा उच्चार ऑर्लोफ) असाही होतो. काही इतिहासतज्ज्ञांच्या मते हा हिरा दक्षिण भारतातल्या एका देवळातल्या मूर्तीचा डोळा आहे. एका फ्रेंच सैनिकाने देवळाच्या पुजाऱ्यांचा विश्वास संपादन करून गाभाऱ्यापर्यंत प्रवेश मिळवला. देवाच्या दोन्ही डोळ्यांच्या जागी दोन हिरे होते. ज्या दिवशी रात्री चोरी झाली तेव्हा बाहेर धो धो पाऊस पडत होता. विजा कडाडत होत्या. अशा रात्री एक हिरा त्याने मूर्तीतून काढला, पण दुसरा हिरा काढण्याच्या आधीच तो भीतीने गळफटला आणि एक हिरा घेऊनच तो बाहेर पळाला. काहींच्या मते हा हिरा आधी मोगलांच्या खजिन्यातला हिरा होता.या दरम्यान रशियात एक वेगळेच नाटक रंगात आले होते.रशियन साम्राज्ञी कॅथेरीन आणि ग्रेगोरी ऑर्लोवचे. कॅथरीन सत्तेवर आली ती तिच्या नवऱ्याचा म्हणजे पीटरचा वध झाल्यामुळे. पीटर खरं म्हणजे नावालाच सम्राट होता. शरीराने आणि मनानेबुळा असल्याने कॅथरीन आणि पीटरचे लैंगिक आयुष्य सुरुवातीपासूनच संपुष्टात आले होते. शरीरसुखाच्या शोधात तिची गाठ पडली ग्रेगोरी ऑर्लोवशी. ऑर्लोव तोफखान्यावरचा अधिकारी होता. धाडसी आणि लढवय्या असलेल्या ऑर्लोववर कॅथरीनची नजर पडली. कॅथरीनने अनेक पदव्या आणि बक्षिसं देऊन स्वत:ला त्याच्या स्वाधीन केले. ऑर्लोव आणि त्याच्या भावांनी मिळून पीटरचा वध केला आणि कॅथरीन सरसियन सिंहासनावर विराजमान झाली. जवळजवळ तेरा र्वष त्यांचे प्रेमप्रकरण अबाधित चालू राहिले. या दरम्यान कॅथरीनची अनेक प्रेमप्रकरणं झाली. पण ऑर्लोवची जागा घेऊ शकेल असं कुणीच नव्हतं. पण ऑर्लोवचं दुर्दैव असं की त्याचं एक वेगळंच प्रेमप्रकरण तेव्हा चालू होतं. त्याची खबर लागल्यावर कॅथरीनने ऑर्लोवला तातडीने दूर केलं आणि पोटेमकीन नावाच्या दुसऱ्या प्रियकरासोबत शय्यासोबत सुरू केली. शेवटचा प्रयत्न म्हणून ऑर्लोवने हा हिरा विकत घेऊन कॅथरीनला भेट दिला. कॅथरीननी भेट स्वीकारून तो राजदंडात बसवला. हिऱ्याला ऑर्लोव हे नावही मिळालं. ऑर्लोवला बक्षिसी पण मिळाली पण कॅथरीनच्या हृदयात आणि शयनगृहात मात्र पुन:प्रवेश मिळाला नाही.हताश-निराश ऑर्लोव रशिया सोडून निघून गेला. तो पुन्हा प्रवेश करता झाला त्याच्या मृत्यूपूर्वी काही वर्षेच. काही काळाने वेड लागले आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.

अर्कोट...तिसरा जॉर्ज आणि सोबत आलेल्या राणी शॉर्लोटला १७७७ साली अर्कोटच्या नबाबाने जे हिरे भेट म्हणून दिले त्यापैकी दोन हिऱ्यांची जोडी अर्कोटडायमंड्स म्हणून प्रसिद्ध आहे. एका हिऱ्याचे वजन ३८, तर दुसऱ्याचे ३४ कॅरेट. ब्रिटिशांनी युद्धात केलेल्या मदतीचे स्मरण म्हणून हे हिरे शॉर्लोटला नजराण्यात देण्यात आले. मायदेशी परत गेल्यावर शुद्ध पाणी असलेली ही जोडी शॉर्लोटच्या खाजगी संग्रहात वर्ग करण्यात आली. १८१८ साली आपल्या मृत्युपत्रात शॉर्लोटने तिची संपत्ती मुला-मुलींमध्ये एकसारखी विभागली होती. पण जे इतर मृत्युपत्रांचं होतं तेच या मृत्युपत्राचं झालं.त्यातल्या सगळ्या अटी धाब्यावर बसवून १८२० साली चौथ्या जॉर्जने हे हिरे स्वत:च्या खिशात टाकले. त्याच्या मृत्यूनंतर हे हिरे लंडनच्या सुप्रसिद्ध जव्हेऱ्यांच्या पेढीने विकत घेतले. १८३७ साली ही जोडी लिलावात काढण्यात आली तेव्हा मारक्वीस ऑफ वेस्टमिंस्टरनी ११००० पौंडात खरेदी केली. त्याच्या मृत्यूनंतर हॅरॉल्ड विन्स्टननी १११००० पौंडात त्याची खरेदी केली.नव्याने पैलू पाडल्यावर या हिऱ्यांचे वजन ३० आणि १८ कॅरेट झाले. त्याचसोबत असाही एक बदल झाला तो असा की या जोडीची ताटातूटही झाली. मोठय़ा वजनाच्या अर्कोटला अर्कोट-१ हे नाव मिळाले तर धाकटय़ाला अर्कोट-२.मोठा अर्कोट एका सुंदर हारात गुंफला गेला. हा हार सोथेबीजच्या लिलावात १९९३ साली सौदी अरेबियाच्या एका शेखने नऊ लाख पौंडात विकत घेतला. अर्कोट-२ कुठे आहे हे अज्ञात आहे.

होप...सतराव्या शतकात भारतात आलेल्या ज्यॉ टेवर्निअरचे भारतीय हिऱ्यांच्या इतिहासात फार मोठे योगदान आहे. मोगलकालीन सर्व महत्त्वाच्या हिऱ्यांचे कॅटलॉग त्याने बनवले. टेवर्निअरने एकूण सहा वाऱ्या केल्या, त्यापैकी एका फेरीत त्याला मीर जुमलाने निळ्या रंगाचा हिरा दिला. बहुतेक लाच घेऊन दिलेला हा हिरा टेवर्निअरने चौदाव्या लुईला विकला. मुळात ११२ कॅरेटचा हा हिरा सध्या स्मिथ्सोनीयन म्युझियममध्ये आहे. वजन पंचेचाळीस कॅरेट. उरलेले तुकडे कुठे गेले हे मोठेच गूढ आहे.एक तुकडा रशियन झारच्या खजिन्यात होता. तिसरा मात्र अधूनमधून हाच असावा अशा बातम्या येतात. पण गर्द निळ्या रंगाच्या या हिऱ्याला होप नाव मिळाले ते होप नावाच्या कुटुंबाकडे तो होता म्हणून. नाव जरी होप असले तरी होप जगातला सगळ्यात दुर्दैवी हिरा- शापित हिरा- म्हणूनच ओळखला जातो. ज्या धन्याकडे तो गेला त्याचं वाटोळं करूनच तिथून त्याने रजा घेतली. आपल्या मराठी भाषेत सांगयचं तर होप हिरा म्हणजे अक्काबाईचा फेरा.ज्या टेवर्निअरने हा हिरा फ्रान्समध्ये नेला त्याला जंगली कुत्र्यांनी फाडून खाल्ले. सोळाव्या लुईला गिलोटीनखाली मान द्यावी लागली. फ्रेंच राज्यक्रांतीत ज्या सुरक्षित ठिकाणी तो ठेवला गेला होता तिथून तो चोरीला गेला. असे म्हणतात की डय़ुक ऑफ ब्रुन्सवीकला लाच म्हणून तो हिरा मिळाला. काहीजणांच्या मते तो लंडनला एका जव्हेऱ्याकडे होता. त्याच्या मुलाने आपली व्यसनाची उधारी चुकविण्यासाठी तो चोरून विकला आणि नंतर गुन्ह्याच्या पश्चात्तापाने आत्महत्या केली.ब्रिटीश राजघराण्यात तो आला तर त्यांना कर्ज चुकविण्यासाठी तो होप कुटुंबाला विकावा लागला. एन्री फिलीप होपने तो घेतला त्याचे कधीच लग्न झाले नाही. आणि त्याच्या पुतण्यांच्या भांडणात तो ज्याच्याकडे गेला तो वयाच्या ५४ व्या वर्षी अकाली मरण पावला. त्यानंतर तो सलीम हबीबच्या मार्फत टर्कीच्या सम्राटाकडे गेला, पण राजकीय उठावात तो पदच्युत झाला आणि होप नव्याने नव्या घराच्या शोधात जेक्वेस कार्टिअरकडे आला. त्याने मात्र या हिऱ्याच्या दुर्दैवी फेऱ्याची कहाणी तिखटमीठ लावून एव्हलीन वॉल्शला सांगितली आणि तिने तो विकत घेतला. सोबत दुर्दैवी घटनांची मालिका पण विकत घेतली असं म्हणायला हरकत नाही. महत्त्वाची गोष्ट अशी की, खरेदी करणारे सगळेच ग्राहक या हिऱ्याकडे ओढून घेतल्यासारखे यायचे. प्रश्न इतकाच आहे की या विज्ञानयुगात अशा कथांवर विश्वास ठेवावा की नाही.

सॅन्सी....होप आणि सॅन्सी या दोन हिऱ्यांच्या इतिहासाच मागोवा घेतला तर युरोपच्या इतिहासाची उजळणी केल्यासारखे आहे. साधारण पंधराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतचा सॅन्सीचा प्रवास बऱ्याचशा ऐतिहासिक दस्ताऐवजात आहे, पण सॅन्सी म्हणजे निकोलस डी हार्ले सॅन्सीकडे नक्की कसा आणि कधी आला याबद्दल फार धुसर माहिती मिळते. याचे प्रमुख कारण म्हणजे ज्या डी सॅन्सीकडे हा हिरा होता तो इतिहासात ‘रोमारोमात खोटारडेपणा भरलेला बदमाश या नावाने प्रसिद्ध होता. खुद्द सॅन्सी कधीहा हिरा मला एका अज्ञात हिरे व्यापाऱ्यानी दिला तर कधी मला इस्तंबूलमध्ये असताना भेट म्हणून मिळाला अशी माहिती द्यायचा.सॅन्सीकडे दोन महत्त्वाचे हिरे होते. एक म्हणजे सॅन्सी आणि दुसरा ब्यू सॅन्सी. यापैकी सॅन्सीचे वजन ५५ कॅरेट होते, तर ब्यू सॅन्सीचे ३६ कॅरेट. या दोन हिऱ्याच्या जोरावर तिसऱ्या आणि चौथ्या हेन्रीसाठी त्यानी वारंवार पैसे उचलून लढाया चालू ठेवल्या. या लढाया जोपर्यंत चालू होत्या तोपर्यंत डी सॅन्सीचे दरबारी महत्त्व वाढतच गेले. अर्थातच सॅन्सी या सगळ्या व्यवहारात भरपूर पैसे कमावत होताच.१५९० साली अशाच एका कामासाठी डी सॅन्सीने आपल्या नोकराच्या हस्ते सॅन्सी हिरा गहाण ठेवण्यासाठी पाठवला. ज्युरा पर्वतराजीत ह्या नोकरावर डाकुंनी हला केला. मरणप्राय अवस्थेतल्या नोकराचा निरोप सॅन्सीकडे येईपर्यंत फार उशीर झाला होता. पण सेन्सीला भरवसा होता की त्याच्या हस्तकाने मरण्यापूर्वी हिरा नक्क्कीच कुठेतरी सुरक्षित ठेवला असणार .असे म्हणतात की त्या नोकराचे प्रेत फाडून सेन्सीने तपासणी केली, पण त्याच्या पोटात हिरा सापडला नाही. शेवटचा प्रयत्न म्हणून रक्ताने बरबटलेले हात त्याने प्रेताच्या घशात कोंबले आणि घशात हिरा सापडला. अनेक उतारचढाव बघितल्यानंतर राणी मारियाच्या मुकुटात ब्यू सॅन्सी गेला, तर हेन्रीच्या हॅट पिनमध्ये ‘मिरर ऑफ पोर्तुगाल या दुसऱ्या हिऱ्यासोबत जडवण्यात आला. यानंतर सॅन्सी अशा एका कार्डिनलच्या ताब्यात गेला ज्या कार्डिनलचे प्रेम देवापेक्षा त्याच्या संपत्तीवर होते. ह्या कार्डिनलचे नाव होते मॅझेरीन.मॅझेरीनविषयी सांगायचे झाले तर कदाचित एक वेगळी कादंबरी लिहावी लागेल, पण सॅन्सी मॅझेरीनकडे गेल्यावर त्याचे नाव मॅझेरीन-१ असे झाले. मॅझेरीनच्या अंतापर्यंत सॅन्सी त्याच्याच ताब्यात राहिला. तो मरण पावल्यानंतर त्याने त्याचे अठरा हिरे (ज्यांना मॅझेरीन डायमंड्स म्हणून इतिहासात ओळखतात.) फ्रेंच सरकारला बहाल केले. आता सॅन्सी सरकारी खजिन्यात जमा झाला.सॅन्सीच्या नशिबात स्थैर्य नसावे, कारण त्यानंतरच्या फ्रेंच राज्यक्रांतीत सगळा खजिना क्रांतिकारकांच्या ताब्यात गेला. हा खजिना ज्या इमारतीत ठेवला गेला ती इमारत एका रात्री लुटली गेली आणि सॅन्सी तिथून गहाळ झाला. त्या रात्री होप आणि रीजंट हे हिरेपण नाहिसे झाले. काही काळाने होप ब्रिटनमध्ये अवतीर्ण झाला, तर सॅन्सी रशियात डेमीडॉफ नावाच्या एका उमरावाच्या खजिन्यात.सन १८६५ मध्ये डेमीडॉफच्या सुनेने जेरार्ड या सुप्रसिद्ध जव्हेऱ्याच्या हस्ते सॅन्सी जमशेटजी जीजीभॉयना वीस हजार पौंडात विकला. (म्हणजे आताचे पंधरा लाख डॉलर.) जमशेटजी जीजीभॉयनी हा हिरा नंतर कपूरथळ्याच्या महाराजांना विकला असे म्हणतात, पण तशी नोंद कुठेच मिळत नाही. सध्या लुव्रच्या म्युझियममध्ये फ्रेंच राज्यक्रांतीत गहाळ झालेले दोन्ही हिरे रिजंट आणि सॅन्सी पुन्हा एकत्र आले आहेत.

नासक... हा महाराष्ट्राच्या वैभवाचा खास वारसा.
२० जुलै १८३७ ह्या दिवशी लंडनमध्ये अनेक मौल्यवान रत्ने लिलावात विकली गेली. त्यामध्ये 'नासक' नावाचा एक हिरा आणि एकेकाळी अर्काटच्या नबाबाच्या तिजोरीत असलेले काही दागदागिने ह्यांचाहि समावेश होता. 'नासक' हिरा 'डेक्कन प्राईझ मनी'चे विश्वस्त ड्यूक ऑफ वेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या आज्ञेवरून विक्रीस आला होता. तो विकत घेतला मार्क्विस ऑफ वेस्टमिन्स्टर ह्यांनी. त्यांनी तो आपल्या समारंभांमध्ये वापराच्या तलवारीच्या मुठीमध्ये बसवला. ती तलवार कमरेला लटकावूनच ते नुकत्याच राज्याभिषेक झालेल्या विक्टोरिया राणीच्या वाढदिवस दरबाराला २४ मे १८३८ ह्या दिवशी उपस्थित राहिले होते. ब्रिटिश साम्राज्याच्या दूरदूरच्या कानाकोपऱ्यात अगदी ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड पर्यंतच्या वृत्तपत्रांनी ह्या हिरा खरेदीची दखल घेतली.'नासक' ह्या नावानं आजहि ओळखल्या जाणाऱ्या हिऱ्याचं हे नाव आपल्या नाशिक ह्या गावावरून पडलेलं आहे. ह्या नावामागे मराठेशाहीच्या अस्ताच्या दिवसांतले आणि कोणास फारसे माहीत नसलेले मनोरंजक तपशील दडलेले आहेत.

ह्या हिऱ्याला हे नाव का पडलं ह्याची प्रचलित कथा अशी आहे की हा हिरा कोणे एके काळी त्र्यंबकेश्वराच्या देवळाच्या संपत्तीचा भाग होता. दुसऱ्या बाजीरावानं तो तेथून आपल्या ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विजेत्या इंग्रजांनी तो मिळवला. हिऱ्याचे मूल्य वाढविण्यासाठी कोणीतरी बनवलेली अशी ही कपोलकल्पित कथा दिसते. कसे ते पाहू.

खडकीच्या लढाईत पराभव झाल्यानंतर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी १७ नोव्हेंबर १८१७ ह्या दिवशी पुणं सोडलं आणि पेशवे पुढं आणि इंग्रज मागं अशी शर्यत सुरू झाली. पेशवे पुण्याहून प्रथम नाशिक-खानदेशाकडं गेले. तेथून चांद्याकडं आणि अखेरीस उत्तरेकडं पेशवे सरकत असतांना अखेर सर जॉन माल्कम -महाबळेश्वरातील माल्कम पेठवाला- ह्यानं त्यांना गाठलं आणि अखेर पेशव्यांनी सत्ता सोडून बिठूरास पेंशन घेऊन राहण्याचं मान्य केलं. पेशव्यांची खाजगी मालमत्ता इंग्रजांनी लढाईतली लूट म्हणून ताब्यात घेतली.इंग्रजांच्या वतीनं कमिशनर म्हणून पुण्यातून माउंटस्ट्युअर्ट एल्फिन्स्टन सूत्रं हलवीत होता. त्याला कोठून तरी बातमी लागली की उत्तरेकडं सरकतांना पेशव्यांनी नाशिकला एका विश्वासू व्यक्तीच्या घरात काही जडजवाहिर लपवून ठेवलं आहे. बातमी कळताक्षणी त्यानं आपल्या हाताखालच्या कॅ. ब्रिग्जला हे जडजवाहिर शोधून ताब्यात घेण्याची कामगिरी सोपविली. कॅ. ब्रिग्ज लगोलग नाशिकास रवाना झाला आणि त्या व्यक्तीच्या घराचा शोध घेऊन त्यानं घराची खणती केली. अपेक्षित घबाड त्याच्या हाती लागलं. हे घडलं २ मे १८१८ च्या रात्री. ह्या घटनाक्रमाला आधार आहे तो म्हणजे 'डेक्कन प्राईझ मनी' बाबतचा तत्कालीन इंग्रजी वृत्तपत्रांमधून वेळोवेळी आलेला मजकूर...१८१८ साली नाशिकच्या रामचंद्र ताम्हणकरांच्या घरावर जो छापा घातला गेला त्याच छाप्यात बहुतेक नासक ब्रिटिशांच्या ताब्यात गेला असावा. ऐतिहासिक कागदपत्रांनुसार त्या दिवशी जी जप्ती ब्रिग्जनी केली त्याचा तपशील असा होता- शेषशायी विष्णूच्या मूर्तीसकट एकूण ४३ किलो सोने. १३० किलो चांदी आणि सोन्याच्या मोहरा, अमूल्य रत्ने असलेल्या अनेक पेटय़ा. त्यानंतर काही दिवसांतच बाजीरावाची शरणागती झाली आणि नासक वॉरन हेस्टिंग्जच्या हस्ते तिसऱ्या जॉर्जच्या दरबारात पोहोचला. ब्रिटिशांच्या जव्हेऱ्यानी नासकला पुन्हा एकदा पैलू पाडले. ८९ कॅरेटचा नासक ८० कॅरेटचा झाला. जुलाई १९३७ मध्ये सुप्रसिद्ध विलीस रूममध्ये अर्कोट हिऱ्यांसोबत नासक पुन्हा एकदा विक्रीला आला. नव्या मालकाचे नाव होते. मार्क्वीस ऑफ वेस्टमिन्स्टर. यानंतर नासकचे मालक बदलत गेले .१९४० साली हॅरी विन्स्टननी हा हिरा घेऊन पुन्हा त्याला पैलू पाडले. नासकचे वजन घटून ४३ कॅरेट झाले. पुन्हा एकदा बाजारात आणि यावेळी मालक होता एडवर्ड हँड. किंमत होती साडेसात लाख डॉलर्स. नासकचे मालकही बदलत गेले. त्यानंतर बुलगारी- सौदी राजा खलीदिबन अब्दुल अझीझ. आज नासकचा मालक आहे रॉबर्ट मोवाड...

डेक्कन प्राईझ मनी' म्हणजे काय ?

तत्कालीन रिवाजानुसार परपक्षाचा पराभव झाल्यावर त्या पक्षाची जी काही दौलत विजेत्यांच्या हातात पडेल तिचे सैनिकांमध्ये वाटप करून सैनिकांना खूष ठेवण्याची पद्धत युरोपात रूढ होती. अशा लुटीमध्ये सर्वोच्च राजसत्तेपासून मोहिमेत भाग घेतलेले सर्व अधिकारी आणि सामान्य सैनिकांपर्यंत प्रत्येकाचा दर्जानुसार वाटा असे. हे वाटप कसे करायचे ह्याचेही नियम ठरलेले होते. तदनुसार किरकोळ मूल्याच्या वस्तू जागीच विकून सर्वसामान्य सैनिकांमध्ये ती रक्कम वाटत असत. अधिक मौल्यवान वस्तू, विशेषेकरून जडजवाहिर आणि हिऱ्यांसारख्या वस्तु, इंग्लंडला पाठवून तिथं त्या सरकारजमा होत आणि कालांतरानं योग्य किमतीला त्या विकून त्या रकमेचंहि वाटप होत असे. पेशवाईच्या अस्तानंतर अशा प्रकारे नागपूरकर भोसले, होळकर आणि पेशवे ह्यांच्याकडून इंग्रजांनी बरीच लूट ताब्यात घेतली. त्यांपैकी मौल्यवान अशा वस्तु आणि जडजवाहिर इंग्लंडमध्ये पाठवलं. हाच 'डेक्कन प्राईझ मनी. ह्या रकमेचं व्यवस्थित वाटप व्हावं म्हणून ती ड्यूक ऑफवेलिंग्टन आणि कर्नल अर्बथनॉट ह्यांच्या ताब्यात विश्वस्त म्हणून देण्यात आली. विश्वस्तांचं ऑफिस ८ रीजंट स्ट्रीट इथं होतं. विश्वस्तांनी आपलं काम कसं केलं ह्याचे अनेक तपशील इंग्लंडमधील तत्कालीन वृत्तपत्रांमधून वाचायला मिळतात. ड्यूक ऑफ वेलिंग्टनकडं हे काम सोपवलं जाण्याचं कारण म्हणजे त्या काळात त्यांच्या नावाचा फार मोठा दबदबा होता. नेपोलियनवर नुकताच विजय मिळवून त्यांनी आपलं इतिहासातलं स्थान पक्कं केलं होतंच. ह्याशिवाय दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात त्यांचा महाराष्ट्राशी चांगलाच परिचय झालेला होता.

थोडक्यात म्हणजे मराठ्यांच्याबरोबरच्या अखेरच्या लढाईत इंग्रजांच्या हातात एक खूप मोठी रक्कम आली आणि तिचं वाटप करण्यासाठी तिच्यातला महत्त्वाचा भाग इंग्लंडमध्ये पोहोचला. लुटीतल्या बऱ्याच गोष्टी जागीच विकून रकमेचं वाटप केलं होतं. निवडक निवडक वस्तु ज्या इंग्लंडला गेल्या त्यांमध्ये 'नासक' हिराही होत. १६ मार्च १८२१ च्या एका वृत्तपत्रात असं नाव दिलेला एक मोठा हिरा इंग्लंडात येऊन पोहोचल्याचा उल्लेख मिळतो. ह्या उल्लेखावरून असं वाटतं की हिरा नाशिकला मिळाला म्हणूनच त्याला 'Nassuck' हे नाव मिळालं. इथं हे लक्षात घ्यायला हवं की तेव्हांच्या सर्व इंग्रजी लिखाणात नाशिकचा उल्लेख Nassuck असाच केलेला आढळतो. ह्या सर्व खजिन्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यासाठी विश्वस्तांना बरीच वर्षं मेहनत घ्यावी लागली. पुढची पंधराएक वर्षं तरी हे काम चालू असल्याचं दिसतं.

एव्हढा वेळ लागायचं कारण असं की प्रत्यक्ष लूट घेतांना जागेवर असलेले आणि जागी नसलेले तरी ज्यांचं लुटीमध्ये योगदान होतं अशा दोन्ही गटांना वाटा घेण्याचा अधिकार होता पण कोणाचा किती वाटा ह्याबद्दल बरेच मतभेद होते. एकूण मोहिमेचा प्रमुख जनरल हिस्लॉप आणि त्याचा राजकीय वरिष्ठ कलकत्तेकर गवर्नर-जनरल मार्क्विस ऑफ हेस्टिंग्ज ह्या दोघांमध्ये बरेच मतभेद होते. हिस्लॉपची तक्रार होती की आपल्या मागणीकडं पाहण्याचा ड्यूक ऑफ वेलिंग्टनचा दृष्टिकोण उपेक्षेचा आणि तुच्छतेचा आहे. नाशिकच्या खणतीच्या दिवसातला तिथं उपस्थित असलेला अधिकारी कर्नल मॅकडॉवेलची तक्रार होती की पुण्याहून आलेल्या ब्रिग्जनं त्याला अंधारात ठेऊनच आपला कार्यभाग साधला आणि त्याला न्याय्य हिश्श्यापासून वंचित ठेवलं. अशा एक ना दोन अनेक वादांमुळं हे प्रकरण पुढं पंधराएक वर्षं खदखदत होतं. वृत्तपत्रांमधून आणि पार्लमेंटात अनेकदा त्यावर प्रश्न विचारले गेले.

अखेरीस १८३६-३७ साली प्रकरण अखेरीस मार्गी लागलं आणि 'नासक' हिरा विकायला बाहेर आला.अशी अनेक वादांच्या भोवऱ्यात सापडलेली रक्कमहि तशीच जबरदस्त असली पाहिजे. एका ठिकाणी उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ती ७२ लाख रुपये इतकी होती. त्यावेळेस सोन्याचा भाव १८-१९ रुपये तोळा होता असं धरलं तर आजच्या किमतीनं ह्या लुटीची किंमत ६-७ अब्जाच्या घरात जाते. हे जरा ढोबळच अनुमान आहे पण रक्कम खूपच मोठी होती एवढं कळायला पुरेसं आहे.आणखी एका वादाचा इथं उल्लेख करायला हवा. सिंहगड किल्ला २ मार्च १८१८ ह्या दिवशी पाडाव झाला आणि मराठ्यांनी किल्ला खाली केला. त्यावेळी ठरलेल्या अटींनुसार किल्ल्यातील लोकांना केवळ आपापले वैयक्तिक सामान बाहेर काढण्याची अनुमति देण्यात आली होती. नारो गोविंद औटी नावाचा बाजीरावाचा विश्वासू किल्ल्यात होता आणि तो बाहेर पडताना त्याच्याजवळ सोन्याच्या नाण्यांनी भरलेले चार पेटारे होते. ह्या नारो गोविंदाचा सर्व इंग्रजी लिखाणामध्ये केलेला उल्लेख Narroba Govind Outia असा आहे. नारो गोविंदच्या दाव्यानुसार ती सुमारे ३६ लाखाची मालमत्ता त्याची खाजगीतली होती. इंग्रजांना शंका होती की मालमत्ता बाजीरावाची असली पाहिजे आणि तसं असलं तर तिच्यावर विजेते म्हणून त्यांचा अधिकार होता. ती त्या जागी जप्त केली गेली पण नारो गोविंद आणि इंग्रजांच्यातील हा वाद बरेच वर्षं चालू रहिला. मध्यंतरी केव्हातरी नारो गोविंदाचा मृत्यु झाला पण त्याच्या वतीनं दोघा मारवाडी व्यक्तींनी दावा पुढं चालू ठेवला. हा दावा त्यांनी रोख पैसे देऊन बहुधा नारो गोविंदाच्या पुढच्या पिढ्यांपासून विकत घेतला असला पाहिजे. आश्चर्याची गोष्ट अशी की मुंबईच्या सुप्रीम कोर्टात निर्णय नारो गोविंदाच्या बाजूनं लागला. त्या निर्णयाविरुद्ध कंपनी सरकारनं लंडनला प्रिव्ही कौन्सिलमध्ये अपील दाखल केलं. ह्या अपीलाचा निर्णय लागेपर्यंत डेक्कन प्राईझ मनीचं वाटप केलं जाऊ नये अशी पार्लमेंटात मागणी आली आणि त्यानुसार वाटप थांबवून ठेवण्यात आलं. प्रिव्ही कौन्सिलचा हा निर्णय कंपनीच्या अपीलाच्या बाजूनं लागला पण हे होता होता १८३० साल उजाडलं. हा निर्णय वाचायला उपलब्ध आहे.'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा