ओंजळ ती केवढी;
भासते छोटी;
मात्र असते खूप मोठी.
आपली सुख-दुःखं तिच्यात मावतात.
आपल्या आकांक्षा तिच्यात सामावतात.
मनाच्या तळाशी दडलेले भावनांचे कल्लोळ ओंजळीत पेलता येतात.
ओंजळीत मायेचं चांदणं ठेवता येतं.
ओंजळीत आकाश उतरू शकतं आणि सप्तसागरांचं पाणीही बसू शकतं.
ओंजळीत म्हणे ब्रह्मांडालाही जागा असते.
जाग आल्यावर प्रथम करदर्शन करण्याचा संस्कार आपल्याकडे आहे.
बोटांच्या अग्रांवर लक्ष्मी आहे; मध्यभागी सरस्वती आहे आणि मुळाशी
गोंविद आहे.
करदर्शनानं आपण त्यांचं स्मरण करतो.
मगच उद्योगाला लागतो.
दारी अतिथी आला, तर त्याला विन्मुख पाठवीत नाहीत. त्याला पसाभर
पीठ-धान्य दिलं जातं.
आरतीनंतर निरांजनाच्या ज्योतीतून परमेश्वराचा वत्सल आशीर्वादही
आपण ओंजळीतूनच घेतो.
सूर्याला अर्घ्य अर्पण करतो, तेही ओंजळीतूनच....
साडेतीन हात लांबीच्या माणसाच्या देहाला ओंजळीत मावेल, तेवढंच
अन्न पुरेसं असतं.
त्यापेक्षा अधिक खाण्यानं अजीर्ण होतं.
उषःपानही ओंजळीनंच करायचं असतं.
तेवढं पाणी माणसाची तृष्णा शमवतं.
माणसाच्या अनेक कृतींशी आणि भावनांशी ओंजळीचं असं घट्ट नातं असतं.
ओंजळ हे दातृत्वाचं रूप आहे.
समर्पणाच्या भावनेचंही ते द्योतक आहे.
स्वीकारायला ओंजळ लागते, तशीच द्यायलाही ती लागते. ओंजळ कधीच
रिती होत नाही.
ती पुनःपुन्हा भरत जाते.
ओंजळ सांगते, आधी द्या, मग घ्या.
ओंजळभर रंग द्या, ओंजळभर गंध द्या,
झिरझिरत्या सुखाची आभाळभर फुलं घ्या...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा