Pages

रविवार, ७ एप्रिल, २०१९

कांदे आणि बटाटे.


कांदे आणि बटाटे.
परवाचीच गोष्ट. सहजच फेरफटका मारायला बाहेर पडलो आणि लक्षात आलं, आज रविवार ! गावातल्या आठवडी बाजाराचा दिवस! गावात अगदी अलिकडेच आठवडी बाजार भरायला सुरूवात झाली होती. तेव्हा हा आठवडी बाजार आहे तरी कसा ते पाहावं या विचारात असतानाच पावले त्या दिशेने केव्हा वळली ते कळलेच नाही.
बाजाराच्या जवळ येऊन ठेपलो असेन नसेन तेवढ्यात जोरदार हाळी ऐकू आली, ' ऐ कहांध्येss बट्टाट्टीssय्ये ' आणि मला एकदम लहानपणात शिरल्यासारखे वाटले.
आमच्या लहानपणी घराजवळच्या पाणंदीतून डोक्यावर पाटी घेऊन जाणारा एक फिरस्ता अशाच खणखणीत आवाजात आरोळ्या ठोकून कांदेबटाटे विकत असे. उन्हातान्हातून फिरावे लागत असूनही तो स्वभावाने मोठा गमत्या असे.
गुरुजी आम्हांला शाळेत शिकवत असताना वर्गातल्या ढढ्ढम पोरांना 'डोक्यात कांदेबटाटे भरलेत काय रे तुझ्या?' असं विचारीत असत.ते कांदेबटाटे आपणच भरतो असं तो फिरस्ता सर्वांना मोठ्या ऐटीत सांगे आणि आम्हांला त्यावेळी ते खरंही वाटे. त्याच्याकडून कोणी कांदेबटाटे विकत घेताना आम्ही कधीच कुणाला पाहिले नव्हते. त्यामुळेच पुढचे कित्येक दिवस आमचा तो समज तसाच टिकून राहिला होता.
खरं तर रांगत्या वयातच कोणाच्या तरी पाठुंगळीला आपण कांदेबटाटे म्हणून बसलेले असतो, आईच्या हातून काऊचिऊचा घास घेताना दूधभातात, दहीभातात उकडलेला बटाटा कुस्करून खाल्लेला असतो तेव्हापासूनच बटाटा हा जीवनसाथी आपल्या आयुष्यात 'जेवण'साथी बनून गेलेला असतो. निदान माझ्या बाबतीत तरी तसं म्हणणं खरं आहे.
लहानपणी शाळेत भर वर्गात गुरूजींनी 'अकलेचा कांदा' असा उल्लेख केल्याच्या रागातूनही असेल कदाचित, पुष्कळांना कांदा अजिबात आवडत नाही. तुमचं ठाऊक नाही, पण मला कांदा न आवडण्याचं हे कारण मात्र नक्कीच नाही. उग्र वासाची पेयेसुध्दा मी हातभर अंतरावर ठेवतो, तिथे उग्र वासाच्या कांद्यापासून चार हात दूर न राहिलो तरच नवल !
बटाट्याचं मात्र तसं नाही. शुध्द पाण्याला चव, वास, आकार इत्यादि गुणधर्म नसतात. बटाटाही तसाच आहे अगदी !
वाटाणा, मूग, चवळी, मटार, हरभरा अशा कोणत्याही उसळीत तो शिजवा, त्या उसळीचा स्वाद दुणावलाच म्हणून समजा.
तीच गोष्ट विविध भाज्यांची ! कोबी, फुलकोबी, वांगी, फरसबी किंवा पडवळ दोडकी यासारखी अन्य कोणतीही भाजी घ्या, केवळ या बटाट्यामुळेच त्या स्वादिष्ट लागतात हे कोणीही मान्य करील.
बरं, हा बटाटा कशातही वर्ज्य नाही. शेवबटाटापुरी, बटाटेवडे, बटाटाभजी, बटाट्याचे तळलेले काप, बटाटेभात यांसारख्या शाकाहारी पदार्थांपासून ते खेकडारस्सा, मसाला कोलंबी, हिरव्या वाटपाची कोलंबी, एकशिपी रस्सा ! किती म्हणून पदार्थ सांगू!
बटाटा हे फळ आहे की मूळ, खोड आहे की कंद याच्याशी काहीच कर्तव्य नाही आपल्याला! त्याचं बाह्यरूपही म्हणजे त्याचा वेडावाकडा आकार, रंग हे काही फारसं आकर्षक नाही हेही मान्य आहे मला, पण म्हणून काही तेवढ्या कारणासाठी त्याला नावे ठेवली जाणं अनुचित ठरेल.
उपवासापासून ते सहवासापर्यंत नित्यनूतन प्रकारे उपयुक्त असलेला बटाटा हा एकमेव खाद्यपदार्थ आहे.
तुमच्या मनातली शंका आलीय माझ्या लक्षात.
उपवासाचं ठीक, पण सहवासात कसा काय उपयोगी ठरतो बटाटा हेच घ्यायचंय ना जाणून तुम्हांला?
ठीक आहे, सांगतोच तर आता !
आपण नेहमी कुणाच्या सहवासात असावं असं तुम्हांला वाटतं ?
अर्थातच प्रिय व्यक्तींच्याच !
बरोबर?
या प्रिय व्यक्ती म्हणजे नक्की कोण ?
अर्थातच आपले मित्र !
बरोबर?
हे मित्र आपल्याला निवांतपणे भेटण्याची वेळ कोणती ?
अर्थातच सुटीच्या दिवशी उशीरा संध्याकाळी!
बरोबर ?
मित्रांसोबत गप्पा मारायला 'बसलात' , की तुम्हांला अधूनमधून तोंडात टाकायला काय लागतं?
बटाट्याच्या अगदी पातळ चकत्या!
अर्थात वेफर्स!
बरोबर?
मग आता लक्षात आला ना बटाटा नि सहवासाचा किती निकटचा संबंध आहे ते?
मग कधी बोलावताय मला तुमच्या सहवासात?
कोणत्या सुट्टीच्या दिवशी, उशीरा संध्याकाळी?
उग्र वासाची पेये हातभर अंतरावर ठेवून गप्पा हाणता हाणता वेफर्स खायला 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मी कोण आहे?

  मी कोण आहे ? #motivationmarathi #selfawareness #selfgrowth #innerpeace #mindsetshift #deepthoughts #knowyourself #personalitydevelopment ...

आणखी पहा