Pages

सोमवार, १ एप्रिल, २०१९

" किचन मधला गॅलिलिओ "


तुम्हाला सांगतो समस्त नवरे मंडळींच्या कुंडलीत सर्वच्या सर्व बारा घरात ठाण मांडून बसलेला एक नंबरचा उधळपट्टी करणारा ग्रह म्हणजे....बायको.

आता परवाची गोष्ट... घरात पावभाजी केलेली...झकास झाली होती हो....होणारच, कारण सोबत खाण्याचा कांदा-लिंबू मी कापून दिला होता.. असो ...

तर जेवण झालं...बघतो तर काय ही एवढी भरमसाठ पाव भाजी उरलेली...इनमीन आम्ही घरात अडीच माणसं... या दोन फुल बायका आणि मी अर्धा एकमेव पुरुष.. आता अडीच माणसांना किती भाजी लागणार...या बाईने एक आख्खं गावं जेवलं एवढी भाजी केलेली.. या बाईच्या हाताला जरा सुद्धा  काटकसर नाहीच....एवढी भाजी केली होती जणू त्या पावभाजीने मला अभ्यंगस्नान घालणार आहे...का माझं फेशल करायचं होतं कुणास ठाऊक??....

पोरीला म्हंटल चुपचाप उद्या डब्यात न्यायची...म्हाळशीला म्हंटल तू ही उद्या हीच खा...अजिबात नाटक नकोय..

तरीही बरीच उरली..

बरं आता एवढ्या भाजीचं करायचं काय हा प्रश्नच....या बाबतीत माझं डोकं जरा जास्तच चालतं बरं का...तसा या बाबतीत मी खूप हुशार ...जरा विचार केला आणि डोक्यात ट्यूब पेटली.. म्हंटल या भाजीची एक गंमत करूयात....

मला सुट्टी होती, कामाला लागलो...ही भाजी मिक्सर मधून जरा बारीक पातळ करून घेतली.. अगदी रवाळ अशी..

मग एक परातीत थोडं मक्याचं पिठ, थोडं अंदाजाने मैदा आणि कणिकेचे पिठ घेतलं... त्यात या भाजीचं मिक्सर मधून काढलेले द्रावण ओतलं, त्याला जरा मीठ,मिरची, मसाला लावून जरा ग्लॅमर आणलं आणि मस्त कणिक मळल्यासारखं मळून घेतलं...

थोडं तेल लावून ते पाच दहा मिनिटं एकजीव होऊ दिलं... मग त्याला गोल पोळ्यासारख्या लाटून त्याचे शंकरपाळे किंवा त्या नाचोज सारखे तुकडे केले...मग गॅसवर कढईत तेल तापवून छान खमंग तळुन घेतले..

चांगले डबा भर तयार झाले....पोरीला नाहीतरी संध्याकाळी काहीतरी चटक मटक खायला लागतंच....ती क्लासवरून आली आणि तिला खायला दिलं पण काय आहे हे सांगितलच नाही...कुरकुरीत, चटकदार, एकदम टेस्टी खाऊन पोरगी खुश झाली..

असलं भन्नाट झालं म्ह्णून सांगू की विचारू नका.. अगदी व्यसन लागल्यासारखं एक खाल्लं की आपोआप दुसरं खायची इच्छा व्हायची...

संध्याकाळी उशिरा माझे मित्र खंड्या आणि बडी गप्पा मारायला आले....त्यांना तर एवढं भारी लागलं की विचारू नका.. या क्रिस्पी चटपटीत चवी बरोबर खंड्या-बडी बरोबरच्या गप्पा चांगल्याच रंगल्या...रात्रीचे बारा कधी वाजले कळलंच नाही...

बारा वाचले तसा या म्हाळसाचा दिवस बदलला अन मेंदूचा काटा सटकला...आली ओरडतं.. 'काय वेळ काळ आहे का नाही?' ..बिचारे खंड्या आणि बडी घाबरून पळत आपापल्या घरी गेले....असो.

करून पहा भन्नाट लागतातं...पोरांना मात्र सांगायचं नाही बरं का...कार्टीला अजून माहीत नाही...जाता येता चरतेय मजेत....

कुलकर्ण्यांचा " किचन मधला गॅलिलिओ " प्रशांत

तळटीप - हा सगळा पावभाजी क्रिस्पी बनवायचा घाट म्हाळसाबाईचा, मी आपला आपल्या नावावर खपवला इतकंच....(कोणाला सांगू नका)...हे असं बायकोचं क्रेडिट ढापायला मला खूप आवडतं...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा