Pages

सोमवार, १ एप्रिल, २०१९

माहेर



वहिनी अगदी पारंपारिक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली निमूट सप्तपदी पूर्ण करून दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली , सामावली...

पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही.
सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असायचं.

                           त्यात कुणाला कधी खटकलं नाही, कारण एरवी तिचं वागणं अगदी सालस आणि समजूतदार होतं..

तिचं माहेरही होतच तसं तालेवार; त्यानी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली ती केवळ माणसं बघूनच.
त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी आगाऊपणा झाला नाही की अवमान झाला नाही.

वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची

त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा...हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं.

    ती माहेराहून आली की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे..

     अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे. त्यांचा भलामोठा वाडा, त्यांची लांबचलांब पसरलेली बाग, फुलांचा ढीग, बागेशी येणारे मोर, वाट चुकून आलेली हरणं सगळंच स्वप्नवत वाटावं असं !
म्हणजे ही स्केटींग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी  मुलगी दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी ?
याचं आश्चर्य वाटतं.   ???

मधे तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचंच कारण तो परिसर, ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती..

मी दहावीत नापास झालो तेव्हा आईचं काही न ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती.
म्हणाली,"आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडावून सोडतील..."

चित्रपटात कसं पाहुणे आले की ती घरची बाई नोकराला सांगते- "इन्हें इनका कमरा दिखाओ.." किंवा
जवळचा कोणी असेल तर "आओ, मैं तुम्हे तुम्हारा कमरा दिखाती हूँ" असं म्हणून दृश्यातून एक्झीट घेते..

पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं..

वहिनीचं माहेरही तसंच चौसोपी होतं !
त्यात वहिनी माहेरची मोठी लेक ! त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती..
मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली,मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती. माझी "दहावी नापास होणं" एका अर्थी "सेलिब्रेट" केलं जात होतं..

म्हणजे एकूण काय अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं..
मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली. वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही, पण तरी आमच्या परीने त्याने आसमान को हाथ छू लिये...

पण एक जाणवायला लागलं वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं. कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा आग्रह राहिला नव्हता.

           मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून आलिशान बंगला बांधला गेला. दोन्ही भावांची आॅफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती...

वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते. मलाही बोलावलं होतं पण जायला जमलं नाही.

पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली...

शेवटी न राहवून मी वहिनीला विचारलंच,
"म्हंटलं, हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस?"

ती खिन्नपणे म्हणाली,"काय बोलू?"

"काय झालं?" मी विचारलं.

ती म्हणाली,"तसं पाहिलं तर काहीच झालं नाही..
सगळं रीतीला धरून झालं
पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतोय."

क्षणभर गप्प राहून
ती म्हणाली,"आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो  आपण आता त्या घराला परके झालो हे आमच्या लक्षातच येत नाही...आणि माहेरचे लेक परकी झाली हे गृहीतच धरून चलतात...
खूप यातनामय आहे हे!"

"वहिनी, नीट सांग."
मी काकुळतीला येते म्हणालो..

तशी ती म्हणाली,
"काही नाही रेsssss
आधी वाडा होता त्यात माझी स्वत:ची खोली होती.. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे."

"मग आता?"
मी नं राहवून विचारलं.

"आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला पण त्यात मला कुठेच जागा नाही....

म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्ष लंडनला जायचाय तरी त्याची रूम आहे; ...आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे, दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स ..

पण ताईची जागा या घरात अबाधित आहे असं कोणालाच वाटलं नाही..
मी सहज विचारून गेले 'माझी रूम?'

तर शंतनू म्हणाला,'गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच.'

जागा होती पण सामाऊन घेणं जे म्हणतात ते
त्यांच्या लक्षातही आलं नाही...

मग मी मनापासून या घराकडे वळले या घरची होऊन गेले..

पण ही रीत मी मोडेन आपण जेव्हा बंगला बांधू.
मी छकुलीचं लग्न झालं तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन...

गेस्टरूम मधे पाहुणे उतरवायचे...
आपल्या लेकीबाळी नाही.
त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी...
त्या आपल्याच असतात."

.....वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो...

- चंद्रशेखर गोखले...👏💐
(Memory sharing)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा