Pages

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

बाबाचे पैसे


बाबाचे पैसे

व्योम आता पाच वर्षाचा होईल 4-5 महिन्यात, त्याला वेळीच वस्तूंची पैशाची किंमत कळायला हवी असे अलीकडे वाटू लागलंय मला. आणि त्याचा परिणाम म्हणून तो जेव्हा काही फेकतो, मोडतो, तोडतो, पडतो.. बेजबाबदार पणे ढिल्ला वागतो, तेव्हा तेव्हा मी त्याला त्या त्या वस्तू विषयी, 'त्याला किती पैसे पडतात माहितीये का?.... बाबाला किती काम करावे लागते पैसे कमावण्यासाठी!.. हे जे तुटलं ना अत्ता त्या पैशात तू गेमिंग झोन मधे किती गेम खेळू शकला असतास माहितीये का.. अशा आशयाचे डायलॉग चिपकवत असतो.

(माझा मलाच राग येतो नंतर खरं तर प्रत्येक वेळी. त्याला एवढे बोललो म्हणून प्रासंगिक... जेमतेम साडे चार वर्षाच्या मुलाकडून मी किती अपेक्षा ठेवतो असा वैचारिक.... आणि पैसे कामावण्याकरता खूप कष्ट करावे लागतात असा भीतीयुक्त विचार त्याच्या मनात रुजवत मी कदाचित खूप मोठी चूक करतोय, असा अंतर्मुख करून लाज वाटायला लावणारा मूलभूत विचार मनात येतो नेहेमी)
तरी पालथ्या घड्यावर पाणी या न्यायाने त्याच्या वागण्यात काहीही फरक पडत नाही, आणि माझ्या तेच आणि तसेच चुकीचे बोलण्यातही. असो

तर.. परवा असेच त्याच्या खेळण्यांपैकी काहीतरी एक त्याने पाडले आणि ते तुटले. मी पुन्हा माझी कॅसेट चालू केली. तो माझ्याकडे बघत होता, ऋचा त्याच्या मागे बसलेली. त्याला कळणार नाही अशा प्रकारे तीने मला सांगितले की ते खेळणे त्याला गेल्या आठवड्यात एका मित्राच्या बिर्थडे चे गिफ्ट म्हणून मिळाले... हे कळल्यावर माझा जोम आपोआपच ओसरला आणि विषय संपवायचा म्हणून मी आवरते घेतले.
माझे सगळे बोलून झाल्यावर तो म्हणाला, डोंट वरी बाबा.. हे तुटले तर श्रे च्या बाबाचे पैसे वाया जातील, तुझे नाही अरे.

मी पुन्हा एकदा निरुत्तर.

सुबोध पुरोहित

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा