Pages

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

पेहराव



 व्यक्तिमत्व विकास,पेहराव आणि अंतर्मन ....
(लेखिका: सुषमा सांगळे-वनवे यांच्या पुस्तकातील हा एक उतारा) (हा उतारा जसाच्या तसा शेअर करण्यात यावा अनेक वृत्तपत्रातूनही याचे प्रकाशन झाले आहे..)
आपले फर्स्ट इम्प्रेशन पाडणारा महत्वाचा कोणता घटक असेल तर अर्थातच तो म्हणजे आपला पेहराव.
पेहराव म्हणजेच आपण जे कपडे घालतो ते.
हाच पेहराव आपले व्यक्तिमत्व घडवतो. कसे ते या लेखातून पाहुयात..
      लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच कपड्याची आवड असते.लहानपणी साहजिकच कपड्याबद्दल कांही समजत नसते फक्त आमक्याला असा ड्रेस आहे मला पण तसाच घे ना एवढाच हट्ट आपण आई बाबांकडे करत असतो.हळूहळू मोठे झाल्यावर टी. व्ही.सिरीयल मधील कपडे पाहून मित्र मैत्रीणींचे कपडे पाहून आपण खरेदी करू लागतो.हीच सवय मोठे झाल्यावर हि कायम राहते.यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचे कपडे शोभून दिसतात हे पाहिलेच जात नाही.मग ते कपडे कितीही महागडे घेतले तरी त्याचा उपयोग होत नाही.
         आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग कशा प्रकारचे कपडे घ्यावेत? ते हि सांगते जर आपण रंगाने गोरे असू तर डार्क रंगाचे कपडे नक्कीच खुलून दिसतात व रंग सावळा असेल तर फिकट रंगाची कोणतीही शेड उठावदार दिसते सहसा कपडे फ्रेश कलरचे निवडावेत उदा.स्काय ब्लू कलर,फिकट गुलाबी असे कलर कोणत्याही व्यक्तीला छानच दिसतात.लायनिंगचे कपडे शक्यतो उंच व्यक्तींनी घालू नयेत.त्यामुळे त्या अधिक उंच दिसतात तर असे कपडे कमी उंचीच्या व्यक्तींना शोभून दिसतात.तसेच साड्या खरेदी करतानाही साडी वर मोठ्या फुलांची डिझाइन असेल तर त्याने पोक्तपणाचा लूक येतो.त्याऐवजी प्लेन साडीत नाजूक वाटते प्लेन साड्या कोणत्याही वयोगटातील महिलांना उठून दिसतात.बारीक महिलांनी शक्यतो फुलणाऱ्या स्टार्च च्या साड्या निवडाव्यात त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व सुंदर दिसते.
      थोडक्यात सांगायचे तर प्रत्येक व्यक्ती हि वेगळी असते त्यामुळे त्याला जे छान दिसते ते मला हि छान दिसेल..या भ्रमात राहू नये .स्वतःला जे छान दिसतात असेच कपडे परिधान करावेत.
         आपले अंतर्मन व पेहराव यांचा खूप जवळचा संबंध आहे.आपल्या अंतर्मनाला सारखे वाटत असते कोणीतरी छान म्हणावे जर आपण आपल्या रंगाला शोभतील असे कपडे घातले तर नक्कीच आपण छान दिसू लागतो साहजिकच कळत नकळत आपल्याला आपली मैत्रीण अथवा घरचे तू आज छान दिसतेस असा रिमार्क मारतात.व आपले मन प्रसन्न होते ज्यावेळी आपले मन प्रसन्न आनंदी असते त्यावेळी आपली कार्यक्षमता व उत्साह वाढलेला असतो ज्यावेळेस आपला उत्साह वाढतो तेंव्हा आपल्याकडून उत्तम प्रकारचे कार्य घडते.म्हणूनच बऱ्याच वेळा मोठमोठ्या कंपनीत कपड्यांकडे विशेष लक्ष दिले जाते.
       बऱ्याच वेळा आपण एखाद्या व्यक्तीला काय तो बावळटच वाटतो किंवा किती अपटुडेट असते ती असेही एखाद्याला कळत नकळत लेबल लावतो म्हणजेच आपला पेहराव आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देत असतो.
      मी आता थोडेसे 30-40 वयाच्या महिलांबाबत बोलते या वयातील महिलांना सहसा उत्साह आहे असे जाणवत नाही कारण याचे हेच असते. बऱ्याच वेळा त्या सहज बोलून जातात,"जाऊ दे आता काय राहिले आहे ?,झाले ना सर्व". नेमक्या याच गोष्टीमुळे त्या स्वतः कडे लक्ष देत नाहीत व चॉईस नीट करत नाहीत परिणामी त्यांच्यातील उत्साह अधिक अधिक कमी होत जातो व त्याचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर होतो. मनाला एक मर्गळ आल्यासारखे उगीच वाटू लागते.या उलट आपल्याला शोभेल असा पेहराव त्याला साजेशी वेशभूषा ,केशभूषा केल्यास नक्कीच मनात एक उत्साह भरतो व साहजिकच घरातले हि म्हणून जातात तू एवढे काम करूनही थकत कशी नाहीस,परिणामी आपल्या कुटुंबातील वातावरण आनंदी व प्रसन्न राहण्यास मदत होते.
        लग्न प्रसंगी,सणावाराला नवनवीन कपडे का घालण्यात येतात ?कारण त्यामुळे आपले मन प्रफुल्लित व उत्साहवर्धक होते.त्यामुळे आपल्या मनाची स्थिती चांगली राहते.साहजिकच घरातील वातावरण प्रसन्न होते.मुलगी बघायला जाताना किंवा मुलगी दाखवतानाही हि त्यांच्या पेहरावाकडे विशेष लक्ष दिले जाते.तसेच महत्वाचे म्हणजे नोकरीच्या मुलाखती वेळी सुद्धा आपण पेहरावाचा बारीक विचार करतो.अशापध्द्तीने जीवनातील अत्यंत महत्वाच्या प्रसंगी पेहरावाकडे लक्ष दिलेच जाते.अगदी अंत्ययात्रेसमयी सुद्धा पेहराव पाहिलाच जातो त्यावेळी सुद्धा प्रेताला कफन म्हणून पांढऱ्या कपड्याची निवड केली जाते..
     थोडक्यात सांगायचे तर जीवनाच्या अत्यंत महत्वाच्या प्रसंगापासून ते मृत्यू नंतर हि हा पेहराव आपली साथ सोडत नाही मग अशा महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालेल का?
    मग द्याल ना लक्ष पेहरावाकडे...
लेखिका -सुषमा सांगळे-वनवे
उच्चश्रेणी मुख्याध्यापिका,साहित्यिका सिंधुदुर्ग,देवगड
मो.नं.9420312651

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा