मी अनुभवलेला धर्म....( सर्वांनी वाचा)....
मी गेल्या वर्षी
गडकोट मोहिमेसाठी गेलो होतो. जाताना धर्माच्या घोषणा देत, जयजयकार करत गेलो होतो. मनात
आपल्याच धर्माचा उन्माद टचटचून भरला होता. बरोबर मित्र होतेच.
पुण्याजवळ रात्री
मुक्काम होता. आम्ही उघड्यावरच झोपलो होतो. काही मित्रांना थंडी सोसवत नव्हती. ते एका
इमारतीच्या आडोश्याला झोपण्यासाठी गेले, पण त्या इमारतीतल्या सुशिक्षित व स्वधर्मीय
लोकांनी त्यांना हाकलून लावले.
दुसऱ्या दिवशी परत
आमची पायपीट सूरू झाली. दुसरा मुक्काम सिंहगड व रायगडाच्या मध्ये असणाऱ्या एका जंगलात
पडला. आदिवासी पाड्यात आम्ही थांबलो होतो.
एका आदिवासी बांधवाने
चक्क आम्हाला झोपडीत जागा दिली. झोपडी छोटीशीच, पण त्याचे मन आभाळसारखे वाटले. त्याच्या
त्या झोपडीसमोर कालचा बंगला खूपच खुजा वाटत होता. चालूनचालून थकलो होतो.सकाळपासून चालत
होतो. तहान खूप लागली होती, जवळ पाणी नव्हते. त्या बांधवाकडे पाणी मागितले, पण पाणी
थोडे अन् आम्ही २५ जण ! शेवटी त्या सदगृहस्थाने आमच्यासाठी रात्रीचे पाणी आणून दिले.
पाणी दरीतून आणावे लागत होते, त्यात मटका छोटाच पण तरीही तो माणूस हेलपाटे मारत होता.
अखेर मी त्या भल्या
गृहस्थास म्हटले, "मामा राहू द्या, नका त्रास घेऊ." यावर तो आदिवासी म्हणाला,
"बाळा माझ्या दारात तू परत कशाला येशील? माझा तेवढाच धर्म."
तो जे बोलला ते अविश्वसनीय होते. त्याच्या त्या वाक्याने माझ्या
डोक्यातला धर्माचा माज, उन्माद झटक्यात उतरला. रात्रभर झोप लागली नाही. मन स्वत:ला
प्रश्न विचारत होते, अस्वस्थ होतो. हा आदिवासी म्हणतो तो धर्म कोणता? आम्ही ज्याच्या
घोषणा देतोय तो कोणता ? काल बंगल्याच्या आडोश्याला झोपल्यावर तेथून निर्दयीपणे हाकलून
देणाऱ्याचा धर्म कोणता?
मन प्रश्नांनी भरून
गेले होते. नक्की खरा धर्म कोणता ? आम्ही ज्याचा जयजयकार करत होतो तो की आदिवासी म्हणतो
तो?
जशी रात्र उतरत
होती, तसा मनातला धर्माचा माज उतरत होता. मन शांत होत होते. त्या दिवशी खरा धर्म गवसला
होता. हातातली
पोळी कुत्र्याने पळवल्यावर त्या कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन पळणारे संत नामदेव
अन् तो आदिवासी, दोघे सारखेेच वाटत होते•कुत्र्यात देव शोधणारे नामदेव अन् माणसात धर्म शोधणारा तो आदिवासी
सारखेच भासत होते. ठार अडाणी असणारा आदिवासी धर्म जगत होता. आम्ही केवळ घोषणा देत होतो.
आमचे मस्तक दुसऱ्या धर्माविषयी तिरस्काराने भरले होते. मस्तकातला धार्मिक उन्माद दुसऱ्या
धर्माच्या माणसाला माणूस मानायला तयार नसून ते शत्रू वाटत होते, पण *त्या माणसाने डोळ्यावरील
झापडं काढली.
त्याने धर्म शिकवला.
धर्म अनुभवला. एका आदिवासी माणसाला जे कळते ते आम्हाला कळत नाही. स्वत:लाच स्वत:ची
लाज वाटली. तो माणूस आजही तसाच डोळ्यासमोर दिसतो. दगडू कचरे त्याचे नाव.
तिथून निघताना त्याच्या
पायाला स्पर्श केला. खूप
काहीतरी गवसल्याचा आनंद मनात दाटला होता.
हिंदू , मुस्लिम
, शिख , ख्रिश्चन ही केवळ लेबलं आहेत.....
माणसाला माणसाचे शत्रू
बनवणारा,परस्पराचा जीवावर उठणारा कोणताही धर्म धर्म असू शकतो काय?....
*लक्ष्यात ठेवा
सर्वांनी क "जात - पात , धर्म - पंथ , गोञ हे सर्व विसरून माणसात रहा माणुसकीला
जपा....
.............................एक सामान्य माणूस
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा