Pages

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

मंथन


मंथन
🌸सायीला विरजण लावून ठेवले होते पण घुसळायला वेळच मिळत नव्हता. शेवटी एकदाचा मुहूर्त मिळाला नि दही घुसळायला घेतले. हळूहळू लोणी जमा होत होते.

रवीने मंथन करताना विचार आला का मनाचेही असेच असते ना दह्यासारखे. रोज वेगवेगळ्या विचारांची साय जमा होत रहाते. एकावर एक विचार , आठवणी जमा होत रहातात. त्यांचा गुंता व्हायच्या आधी एकदा निवांतपणे मनाचेही मंथन करावे.

मन घुसळायला घेतल्यावर चांगल्या विचारांचे लोणी एकत्र येऊ लागते. ते नीट बाजूला काढावे. वाईट कटू आठवणींचे ओशट आंबूस ताक नकोच, ते खुशाल ओतून द्यावे.

काही आठवणी पक्क्या असतात. त्या अगदी बुडाशी घट्ट चिकटून बसतात. त्याना अलगद बोटांनी निपटून काढायचे. ते खास आठवणींचे लोणी मग काळाच्या विस्तवावर कढवत ठेवायचे. काही बिन महत्वाच्या आठवणींची वाफ होते ती दवडू द्यायची. वास्तवाच्या विस्तवावर ज्यांचा निभाव लागत नाही त्याची बेरी होते. अशा आठवणी सोबत घ्यायच्याच नाहीत. त्यांची सोबत तेवढ्यापुरतीच. या सर्वातून तावून सुलाखून निघालेल्या निघालेल्या खासम् खास आठवणींचे कणीदार रवाळ तूप होते. ते मात्र मनाच्या खोल कप्प्यात जपून ठेवायचे. त्याचा घमघमाटच पुरेसा असतो आयुष्य खमंग करायला.

मग हेच अमूल्य आठवणींचे टिकाऊ तूप आपले जीवन स्निग्ध करते. जेव्हा गरज पडेल तेव्हा वंगणाचेही काम करते
एकूणच आयुष्य कसे चवदार करते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा