मार्जिन स्पेस
ए तू ना माझी मार्जीन स्पेस आहेस.बरीच वर्षे ज्या शोधात होते व ज्या स्पेस चा नेमका अर्थ काय हे मला सापडले ते म्हणजे तू आहेस.गोंधळून जाऊ नकोस ,मला खूप मनातले सांगायचे आहे.जेंव्हापासून समज येऊ लागली तेंव्हापासून कुठेतरी असे वाटत होते कोणीतरी असे भेटावे की कोणत्याही बऱ्या वाईट क्षणाला डोळे झाकले की तेच समोर दिसावे.नेमके ते म्हणजे तू आहेस.अरे वेड्या प्रेम ब्रिम तुझ्यावर झाले असे समजू नकोस प्रेम करून मी या नात्याला बदनाम करू इच्छित नाही,प्रेम म्हटले की तिथे दुःख ही येतेच त्यामुळे मला तुला बदनाम ही करायचे नाही व दुःखी ही करायचे नाही.आता तू समजशील मग मी काय तुझा मित्र असेल..पण नाही रे मैत्रीचे ही नाते नकोय मला तिथे ही अपेक्षांचे ओझे येतेच कधी ना कधी..
बरं मग तू आता आपल्या नात्याला भाऊ बहिणीचे नाते असे म्हणशील.पण छे रे आजच्या युगात बहीण-भाऊ या पवित्र नात्या कडे ही जगाची नीट दृष्टी नाही त्यांना कुठे समजते आपण बहीण भाऊ आहोत ते.असो..आता तुला वाटत असेल माझ्या मनात तरी नेमके काय आहे?
खूप दिवस मनात साठून ठेवलेले आज मुक्तपणे बाहेर काढणारच आहे.
तुझ्याशी बोलायला,गप्पा मारायला मला खूप आवडते.तुझ्याशी गप्पा मारताना मला वेळेचे ही बंधन राहत नाही.आणखी सांगते ते म्हणजे तुझ्याबरोबर फिरायचे या कल्पनेने च मी खूप सुखावून जाते.पण..?तुझ्याबरोबर मुक्तपणे फिरून मी माझ्या मर्यादेचे उल्लंघन कधीच करणार नाही.तू एक पुरुष व मी एक स्त्री यातील दरी कायम आपल्यात राहणार आहे.पण असू दे,ती दरी. तिचा मी नाही विचार करत, दरीचे ही दोन्ही किनारे सांधणाऱ्या धुक्यांची अभासी स्वप्ने बघायला आवडते मला. त्यातही एक वेगळी मजा असते.तुझ्यात रमले की मी माझ्यात कुठे नसतेच मनातील भावनांची शब्दरूपी सरिता कधी बनते व ती तुझ्यापर्यंत कशी वाहत येते हे माझे मलाच समजत नाही.तुझ्या समजुतीच्या सागरात माझ्या भावना मिसळायला आवडते मला.का कुणास ठाऊक मूकपणे तुझ्याकडे व्यक्त होते मी.मला नाहीत रे आवडत कसली ही बंधनं अन कसली नाती विश्वासच नाही राहिला माझा कोणत्याच नात्यावर.त्यामुळे तर मी तुला कोणत्याही नात्यात नाही अडकविणार. तू माझ्यासाठी फक्त एक मार्जिन स्पेस बनून रहावे असे मला वाटते. शाळेत असताना प्रत्येक वेळी माझ्या बाई आठवणीने सांगायच्या की मार्जिन स्पेस सोडून लिहा.त्यावेळी त्या हे का सांगतात याचा कांहीच अर्थ समजत नव्हता. पण खरं सांगू का,मार्जिन स्पेस मध्ये आपण बऱ्याच वेळा अत्यंत महत्वाच्या गोष्टी त्या-त्या संदर्भात लिहून ठेवू शकतो,मार्जिन स्पेस मुळे लिखाणाला एक साचेबंद पणा येतो,लेखनाचे सुलेखन दिसू लागते.नकळत विसरलेल्या गोष्टींच्या तिथे नोंदी करू शकतो.हां पण मार्जिन मध्ये आपण खूप कांही लिखाण ही मुळीच करायचे नसते.ती खास गोष्टीसाठी खास राखून ठेवलेला स्पेस असतो व त्या मार्जिन मुळेच आपले लिखाण सुंदर दिसून त्या लेखनास अर्थ प्राप्त होत असतो.
तुला एक सांगू का?अगदी त्या मार्जिन स्पेस सारखेच आपले आयुष्य ही आहे.आयुष्यात ही आपले मन कायम मार्जिन स्पेस शोधत असते.पण बऱ्याच वेळा ती स्पेस शोधताना कळत नकळत किंवा समाजाच्या अथवा समोरच्याच्या भीती पोटी कोणती लेबल लागली जातील हे आपले आपल्यालाच समजू शकत नाही.कोणतेही लेबल मुक्त नाते म्हणजे मार्जिन स्पेस..सुख ,दुःख,व्यक्त करण्याची स्पेस म्हणजे मार्जिन स्पेस,अगदी फुलटाईम टाईमपास म्हणजे मार्जिन स्पेस,जिथे तो किंवा ती याचा विचार केला जात नाही ती स्पेस म्हणजे मार्जिन स्पेस,टॉप सिक्रेट म्हणजे मार्जिन स्पेस.आयुष्याची पोकळी ज्याने भरून आयुष्य सुंदर दिसणार आहे ती स्पेस म्हणजे मार्जिन स्पेस आयुष्यात अशी स्पेस प्रत्येकाने जरूर निर्माण करावी जिथे मुक्त स्वच्छंद असेल...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा