🌹नवरा आणि बायको मराठवाड्यात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी
करतात आणि त्यांचं छोटं मूल शाळेसाठी आजीकडे राहातं.
आठवड्याची गाठभेट होत असते. नवऱ्याची परत बदली झाल्यावर काही
दिवसांनी बायको मुलाला घेऊन दोन दिवस येते सुटीसाठी. रविवारी घरमालकांकडे जेवताना मालकीणबाई
म्हणतात, " या आता इकडं! कुठवर साहेब एकटे राहातील?" ही बिचारी गप्प बसते.
दुपारी ती एकच खोली स्वच्छ करते. थोडीशी असणारी तांब्या पेले भांडी चकाचक घासून ठेवते,
दोरीवर पडलेले कपडे धुवून घड्या घालून ठेवते. गहू पाहाते डब्यात आणि साफ करून दळून
आणून ठेवते. नवरा तिला सांगत राहातो की बाई, थोडा आराम कर. पण ही सगळी कामं उरकून मग
ती नोकरीच्या गावी परतते.
सोमवारपासून तोच तो दिनक्रम सुरू होतो आणि गुरूवारी नवऱ्याचं
पत्र येतं. " दीड दिवस तू आलीस आणि या खोलीचं घर झालं. काल सकाळी तुला स्टँडवर
सोडून मी परस्पर ऑफिसला गेलो आणि संध्याकाळी परतलो तर खोलीचा कायापालटच झालेला दिसला.
खोलीभर फिरलेला तुझा हात मला सर्वत्र दिसू लागलाय. तू होतीस तेव्हा तुझ्या असण्याने
खोली भरून गेली होती आणि आज तू इथे नाहीस तर तुझ्या आठवणीनी खोली तितकीच भरून गेली
आहे. रात्री स्वयंपाक करायला बसलो. कपाटातून पिठाचा डबा काढला आणि उघडून पाहते तर-
माझ्या अंगावर सरसरून शहारा आला. डब्यात मावावे म्हणून तू पीठ दाबून बसवले होते. तसे
दाबताना तुझ्या हाताचा ठसा त्या पिठावर स्पष्ट उमटला होता अगदी रेषा न् रेषांसह.
मी त्या ठशाकडे पाहातच राहिलो. तो केवळ पिठावरचा ठसा नव्हता.
माझ्या एकटेपणावरचा तुझ्या अस्तित्वाचा उमटलेला ठसा होता तो. पीठ काढून तो मोडण्याचं
धैर्य मला झालं नाही."
यापेक्षा वेगळं असं काही valentine असेल???
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा