Pages

गुरुवार, १४ मार्च, २०१९

खरा भाऊ

खरा भाऊ

" अरे अभि पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय.अप्पांना कधी आणू तुझ्याकडे?की तू घेऊन जाशील त्यांना?"
"अरे दादा एक प्राँब्लेम झालाय.रचनाच्या भावाने आमचं काश्मीर टूरचं बुकींग केलंय.तेही पुढच्या आठवड्याचंच आहे.त्यामुळे साँरी मी अप्पांना नेऊ शकत नाही"
अभिजीतने असं म्हंटल्यावर संतापाची एक तिडीक सतिशच्या डोक्यातून गेली.
"अरे पण तुला विचारुनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना.त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत.आणि तू मला आता सांगतोय जमणार नाही म्हणून!तेही मी विचारल्यावर.आता मला सांग मी अप्पांना कुठ ठेवायच?"
"दादा तुला माहीतेय रचनाचा स्वभाव कसा आहे तो! तिने एकदा ठरवलं की ब्रम्हदेवसुध्दा तिच्या प्लँनमध्ये दखल देऊ शकत नाही.तेव्हा प्लिज माझ्या घरात भांडणं लावू नकोस. राहीला आता अप्पांचा प्रश्न तर तू रेणूला विचार.ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खुप मोठं आहे."
"अरे पण....." तेवढ्यात फोन कट झाला.
सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहीलं.अभिजीतचं हे नेहमीचंच होतं.लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही.खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका.पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही.दोन वर्षांपुर्वी आई कँन्सरने वारली.पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही.मागील वर्षी अप्पांना हार्ट अटँक आला.पण एखाद्या परक्या माणसासारखं हाँस्पिटलमध्ये अप्पांना भेटायला येण्याव्यतिरीक्त त्याने काही केलं नाही.
 अभिने अप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता.रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती.आई असतांना ती आईशी गोड गोड बोलून भारीभारी साड्या,गिफ्ट्स उकळायची.परिस्थिती उत्तम असतांनाही नवऱ्याला बिझीनेसला पाहीजेत असं सांगून तिने आईवडिलांकडून दहाबारा लाख नक्कीच घेतले होते.पण परत देण्याचं तर कधीही नाव काढलं नाही.संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही.पण त्याच्या बायकोला,भारतीला हे दिसत होतं.तिची कुरबुर चालू असायची.सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा.आई गेली तसा रेणूचा भाऊ,वडिल,वहीनीतला इंटरेस्ट संपला.

     त्याने साशंक मनानेच रेणूला फोन लावला.
"अगं रेणू आम्ही युरोप टूरला जातोय पंधरा दिवसांसाठी.अप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे?"
"अरे दादा माझी नणंद येतेय बाळंतपणासाठी माझ्याकडे.मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की अप्पांकडे?"
"अगं पण तुझं घर चांगलंद मोठं आहे.अप्पा कुठेही सामावून जातील"
"नको बाबा,त्यांना परत अटँक आला तर मी कुठे शोधत बसू डाँक्टर! त्या पेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरावीस दिवसांकरीता एखाद्या व्रुध्दाश्रमात ठेवून दे.सगळेच प्रश्न मिटतील"
"रेणू अगं आपण तिघं भाऊबहिण असतांना त्यांना व्रुध्दाश्रमात ठेवणं बरं दिसेल का...?"
"मग तू बघ बाबा काय करायचं ते.आय अँम हेल्पलेस" तिनेही फोन कट केला.
 घरी आल्यावर त्याला भारतीने अप्पांची काय सोय लागली ते विचारलं.सतीशने तिला सकाळी भावाबहिणीशी झालेला संवाद सांगितला.अपेक्षेप्रमाणे ती भडकली.
"आपण काय ठेका घेतलाय का अप्पांना सांभाळायचा?या दोघांची काहीच जबाबदारी नाही का?"
तिचंही म्हणणं योग्यच होतं.मोठा मुलगा या नात्याने सतीशने आईवडिलांची जबाबदारी स्वतःहून स्विकारली होती.अगोदर आईच्या नंतर अप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं.कोणीतरी एक घरी लागायचं.यावेळी अभिजीतने अप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचं बुकींग केलं होतं.हनिमून नंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते.सहलीचे सगळे पैसेही भरुन  झाले होते.आणि आज अचानक अभिने नकार दिला होता.ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला.सतीशने तिला समजावयाचा प्रयत्न केला पण तिने त्याला निक्षून सागितलं.'मला काही सांगू नका.काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचं'
अप्पांना नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले."अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय.राहीन मी एकटा.जा तुम्ही सगळे"
" असं कसं म्हणता अप्पा?तुम्हाला एक अटँक येऊन गेलाय.तुमचा बी.पी.आणि शुगर नेहमी कमी जास्त होतं असतात.कसं सोडायचं तुम्हाला एकटं?"
सतीश खरं बोलत होता त्यामुळे अप्पा चुप बसले.

    टूरला निघायला फक्त तीन दिवस उरले होते.पण मार्ग निघत नव्हता.सतीशचं टेन्शन वाढलं होतं.त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहीले.शेवटी स्वतःची टूर कँन्सल करुन भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला.भारती संतापणार होती शिवाय दोन लाखाचं नुकसानही होणार होतं.पण त्याला इलाज नव्हता.शेवटी त्याने निर्णय पक्का केला.भारतीला फोन करुन कल्पना दिली.ती तर रडायलाच लागली.पण त्याने समजावण्याच्या फंद्यात न पडता फोन कट केला.मग ड्रायव्हरला फोन करुन तयार यहायला सांगितलं आणि तो आँफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला.गाडी ट्रँव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली.
"खुप टेन्शनमध्ये दिसताय साहेब" त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं.सतीशने सर्व घटना त्याला सांगितली.ती ऐकल्यावर तो म्हणाला
" अहो मग टूर कशाला कँन्सल करताय साहेब?मी माझ्या घरी घेऊन जातो अप्पांना"
"नको नको कशाला तुझ्या फँमिलीला त्रास.अप्पांचं फार बघावं लागतं.त्यांच्या औषधाच्या,खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात"
"अहो त्यात काय एवढं! आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना?त्यांचीही बायपास झालीये हे तुम्हालाही माहीत आहे.शिवाय माझे वडिल अप्पांना चांगलं ओळखतात.दोघांची चांगली दोस्ती होईल बघा.ते काही नाही मी अप्पांना घेऊन जाणार"
एका ड्रायव्हरच्या घरी अप्पांना ठेवावं हे सतीशला रुचेना.पण त्याचा आग्रह पाहून त्याने अप्पांनाच विचारायचंं ठरवलं.
"ठीक आहे.चल गाडी फिरव.आपण अप्पांनाच विचारु.ते तयार झाले तर माझी काही हरकत नाही."
मोहन खुष झाला.घरी येऊन त्याने अप्पांना विचारलं.अप्पांचाही चेहरा खुलला.ते म्हणाले" मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे" मोहनने लगेच घरी फोन लावला.बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला."सगळे तयार आहेत.आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे"

    टूरच्या दिवशी मोहन अप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला.नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं.निरोप घेतांना सतीशला त्याने आश्वासन दिलं 'काळजी करु नका साहेब.अप्पा अगदी सुखरुप रहातील'
 टूरमध्ये असतांनाही सतीश अप्पांना फोन करुन विचारत होता.त्यांचं एकच उत्तर असायचं ' काळजी करु नको.मी मजेत आहे '

    सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमाननतळावर गेला.सतीशने अप्पांची चौकशी केली.
" अगदी मजेत आहेत अप्पा.खुप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी" मोहन सांगत होता "रोज सकाळी उठून माँर्निंग वाँकला जायचे.मग दिवसभर पत्ते आणि बुध्दीबळ खेळायचे.मग संध्याकाळी एखाद्या मंदिरात किर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरीकांसोबत चौकात बसून
गप्पा मारायचे.तीन दिवसांपुर्वी अप्पांना थोडा ताप आला होता.शुगरही थोडी वाढली होती.मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो.आता एकदम ओके आहेत"
" आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी"
"एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारामुळे त्यांचा पाहूणचार राहून गेलाय"
" अरे आता कशाला हवा तो पाहूणचार?इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे?"
"असं काय करता साहेब!आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहूणचाराशिवाय कसं सोडायचं?आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका.मी काहीही फारसं केलं नाही.अप्पाच व्यवस्थित राहिले"
"बरं बुवा नाही म्हणत" सतीशने माघार घेतली.
 दूसऱ्या दिवशी संध्याकाळी अप्पा घरी आले.ते आनंदी दिसत होते.त्यांच्या हातात एक पिशवी होती.त्यात पँट,शर्टचं कापड,टाँवेल,टोपी होतं.ते पाहून सतीश मोहनला म्हणाला.
"अरे याची काय गरज होती मोहन?"
"नाही कशी साहेब?अप्पांना काय तसं पाठवायचं होतं?"
तेवढ्यात भारतीने त्याला आत बोलावलं.म्हणाली
"अहो त्याचे उपकार ठेवू नका.पाच दहा हजार देऊन टाका त्याला" सतीशलाही ते पटलं.मोहनकडे जाऊन त्याने दहा हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या.मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहीलं मग त्या नोटा सतीशच्याच खिशात कोंबत  म्हणाला
" हे काय साहेब?अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का? आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला तर अप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं"
सतीशला गहिवरुन आलं त्याने मोहनला मिठी मारली.

तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला.टूर कँन्सल केला की अप्पांना व्रुध्दाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते.सतीश एकच वाक्य बोलला ' मला माझा खरा भाऊ भेटला.त्याने अप्पांना व्यवस्थित साभाळलं 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा