Pages

रविवार, ३ मार्च, २०१९

हेअर स्टाईल


हेअर स्टाईल 


सुट्टीचा दिवस होता..सोफ्यावर बसून छानसं कुठचंसं मॅगझीन वाचत होतो..इतक्यात सौंचं आगमन झालं...माझ्यासमोर येऊन उभी राहत विचारलं, " कशी दिसत्ये ? "...मी तिला वर पासून खालपर्यंत बघितलं..मला तसा काही फरक जाणवला नाही..पण तसं बोलायची सोय नसते..कारण बायको ज्याअर्थी असं विचारते, त्याअर्थी ती नक्की काहीतरी करामत करून आलेली असते..हां आता ती करामत कुठली आहे ते ओळखण्यासाठी मात्र, ईश्वरी देणगीच लागते..मी आपलं उगीच काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं, "वा..मस्तच दिसत्येस..फेशियल करून आल्येस का ?" ..." नाही रे...हेअर-कट करून आल्ये..बघ.."..म्हणत मागे वळली..आता मला अगदी खरं सांगायचं तर त्यातलं (घंटा) काही कळत नाही..मी आपलं उगीच 'वा..मस्तच "म्हणायचं काम मात्र इमानदारीत करतो.. मला वाटलं मी 'वा ' म्हंटलं म्हणजे संपला विषय..पण नाही...बायकोचा लगेच पुढला प्रश्न, " हा 'कट' मला चांगला दिसतो का रे ?..हा ना V कट आहे..." आता ही V कट म्हणजे काय भानगड असते बुवा ? (अर्थात मनात म्हटलं ).."हो हो ..एकदम मस्तच दिसतो हा कट तुला."- मी. "मला वाटतं, मला तो मागच्या वेळेस केला होता ना,तसा U कट च चांगला दिसतो..आज उगीच हा V कट केला.." -बायको..नियती माझ्या विरुद्ध हा कुठला 'कट' रचत होती हेच मला कळेना..आता तो 'कट' V होता कि U  होता हे मला कसं कळणार ?माझी उभी हयात, सलून मध्ये जाऊन फक्त " मिडीयम काप" सांगण्यात गेली...मला ते V किंवा U समजावं अशी अपेक्षा तरी का करावी म्हणतो मी..पण 'नवरा' हा एक असा प्राणी असतो, ज्याला पूर्ण प्रामाणिक राहून चालतच नाही..त्याला काहीही ढिम्म कळलं नाही तरी सगळं काही कळल्याचा आव आणावाच लागतो.."आज फार छान दिसत्येस हा " असं २-४ दिवशी म्हणावंच लागतं..तरच संसार सुखाचा होतो..असो.. पुढे अजून काही दिवसांनी मी केस कापून आलो..बायकोची फिरकी घ्यावी म्हणून तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो..तिच्याच स्टाईल मध्ये तिला विचारलं "कसा दिसतोय ?"....आता बायको सुद्धा थोडं खोटं बोलली तर नाही का चालणार ? पण नाही..आमची बायको भयंकरच प्रामाणिक..माझ्या तोंडावर हसत मला म्हणते, "एक नंबरचा चम्या दिसतोयस ".. एक अक्षरही न बोलता मी अंघोळीला निघून गेलो..आतमध्ये सुद्धा बायको बाहेर हसत असल्याचा आवाज येतच होता..
 
व.पु.काळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा