Pages

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

पिकलेलं प्रेम


पिकलेलं प्रेम

कधीही सगळ्यांसमोर आजीचा हात हातात न घेतलेले आजोबा ,

 आजीच्या हातदुखीचं आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे ४ वाजल्या पासून वाटतात,

आणि आजी उठल्या-उठल्या  "यांना" चहा लागतो असं म्हणत दुखरया हातानेच चहा टाकते...

आबांनी जेवणात लोणचं मागितलं की डॉक्टर आजी B.P च्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबांच्या आवडीचं गोडलिंबाचंच लोणचं घालते...

एरव्ही दोनच पोळ्या खाणारे आबा "भाजी चांगली झाली आहे"
हे न सांगता
"आणि एक पोळी वाढ गं"
म्हणून पसंतीची पोचपावती देतात, अन फुगलेली पोळी वाढताना आजी  हळूच लाजते...

बाहेरून येताना पालकाच्या जुडीखाली एक मोगऱ्याची माळ लपलेली असते,
अन " केस कुठे उरलेत आता"
असं म्हणत त्या विरळ झालेल्या अंबाड्याचं वजन, आजी पांढरी माळ 'गुलाबी' होत मळून, वाढवत असते...

आजीने पहिल्यांदा दिलेल्या क्यासेट मधली गाणी आजोबा आजही चोरून ऐकतात,
अन आजोबांनी आजीला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालूतुन डोकावताना दिसतं...

आजही आजोबांचे मित्र आले की  आजी आत जाते आणि न सांगता भजीची बशी सगळ्यांसमोर येते...

भाजी आणायला जेंव्हा आजी-आजोबा बागेजवळच्या मंडईत जातात,
 येताना कधी कधी मातीचे छापे धोतरावर  घेऊन येतात...

भांडण झालं दोघांच्यात की घरी  दुधीची भाजी बनते,
पण आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरांब्याची बरणी आणायला पळवते...

कधीतरी आजोबा मुद्दामून मला मधुबालाच्या सौंदर्याच्या कथा सांगतात अन तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात, मग आजीपण खट्याळ हसते आणि कपाटातून राजेश खन्नाच्या फोटो वरची धूळ पुसते...

दिवाळीला ओवाळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकंच कौतुक असतं आणि त्या डोळ्यांकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत  आबा पण ताठ बसतात...

आजी आजारी पडली की मात्र आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबांकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजते...

आजारपण मात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही,
मग ती झोपली की आजोबा हळूच तिचे पाय चेपतात अन आजीच्या बंद डोळ्यातून अश्रू घरंगळत उशीला भेटतात...

पिकलेल्या लोणच्याला आता बरणीपासून दुरावा सहन होत नाही
अन बरणीला पण लोणच्याशिवाय आता करमत नाही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा