कृतज्ञतेची शक्ती
एका श्रीमंत म्हाताऱ्याला वाटत माझा सांभाळ करणारी मुलं आज माझ्याकडे
असती तर...
एका गरीबाला वाटत या म्हताऱ्या सारखा मी श्रीमंत झालो तर...
एका जाड्या स्त्रीला वाटत की आपण समोरच्या मुलींसारखं झिरो फिगर
असतो तर...
झिरो फिगर असणाऱ्या मुलीला वाटत त्या स्त्रीच्या गळ्यात असणाऱ्या
हिऱ्याचा हार माझ्या गळ्यात असता तर...
केस नसणाऱ्या टक्कल पडलेल्या माणसाला वाटत मला छान केस असते तर...
त्या स्त्री सारखी बायको मला बायको म्हणून मिळाली असती तर...
असे किती तरी जर तर आपण रोज आपण अनुभवत असतो आणि स्वतःला नाराज
करून घेत असतो,दिवसाच्या शेवटी फक्त आपल्याला पाहिजे ते न मिळाल्याची नाराजी छळत असते.सुखी
जीवनात ही अशी असमाधानाची बेट उगवत राहिली की मग आहे हेही गोड लागत नाही, सतत लक्ष
जे आपल्याकडे नाही अशा गोष्टीवर केंद्रित होत. मग हळूहळू मनःशांती भंग होत जाते.
जर आपण एखाद्याला विचारलं की मनःशांती मिळविण्यासाठी तुम्ही काय
कराल तर बऱ्याच जणांचं उत्तर असेल परदेशी दौऱ्यावर जाईल किंवा मला हवी ती गोष्ट करील.परंतु
खर तर कोणत्याही तात्पुरत्या उपायाने कोणालाच मनःशांती मिळू शकत नाही.नवी गाडी घेतली,बंगला
घेतला किंवा परदेशी टूरला जाऊन आलात तर खरंच आपण आनंदी असतो का? अशा गोष्टीने खरंच
मनःशांती मिळते का? तर उत्तर असेल तात्पुरती. कारण ही सर्व क्षणिक सुख आहेत,जोपर्यंत
उपभोगतो तोपर्यंत समाधानी एकदा संपली की परत "येरे माझ्या मागल्या".
खरी मनःशांती मिळविण्याचा सर्वात सोप्पा मार्ग आहे आहे त्याबद्दल
कृतज्ञता बाळगणं.जे काही तोडक मोडक तुमच्या जवळ असेल त्याबद्दल समाधानी असलं की मग
दुःख दूर असतात.आहे ह्या क्षणाला मी श्वास घेतोय,दोन्ही डोळ्यांनी हे जग बघू शकतोय,
पोटभर अन्न पोटात जातंय यासारखं आणखी कोणतं वेगळं सुखं मला श्रीमंत होण्याने, किंवा
सर्व गुण संपन्न असण्याने मिळणार आहे? त्यामुळे जे आपल्याकडे आहे त्याबद्दल कृतज्ञता
बाळगली तर कोणीही आपली मनःशांती भंग करू शकत नाही.जास्तीत जास्त गोष्टी मिळवल्याने
कधीच मनःशांती लाभत नसते उलट जास्तीच्या मागण्या वाढतात हे मात्र नक्की.
जी साधन ,माणस, मित्र व संपदा आपल्या जवळ आहे त्याबद्दल निःसंकोचपणे
कृतज्ञता ठेवली तर आपण आपल्या अपेक्षा व इच्छाना मुरड घालतो ज्यामुळे अनावश्यक हव्यास
गळून पडतो, जो कुठे तरी मागणी पुरवठा या गोष्टीला कारणीभूत असतो.लोक ज्या गोष्टी त्यांच्याकडे
नाहीत त्याबद्दल सतत तक्रार करत राहतात, या तक्रारी मरेपर्यंत संपत नाहीत,तक्रारी जशा
वाढत जातात तशा बऱ्याच गोष्टी मनाला पटत नाहीत मग तक्रारींच हे चक्र उत्तरोत्तर मोठमोठ
होत जातं,ज्यात आपली मनःशांती नाहीशी होऊन जाते,जगण्याचा उद्देश हरवून बसतो.
सुखी आनंदी जीवनासाठी जे आपल्याकडे आहे त्यासाठी आभार मानून,वर्तमानात
कृतज्ञतेने जगणं हेच मनःशांती टिकवण्याचा सर्वात सोप्पा उपाय आहे,जो भल्याभल्याना मरून
ही कळलेला नसतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा