Pages

मंगळवार, ५ मार्च, २०१९

कृष्ण

द्रौपदी कृष्णाकडे गेली.. तेव्हा त्याच्या सगळ्या गवळणी, बायका, राधा,मीरा
सगळे मिळून प्रेमाचा वार्तालाप करत होते.. द्रौपदीला वाटलं.. आता कसं जायचं आपण??
पण ती आलेली कृष्णानं बघितलं.. आणि सहज स्वागत केलं.." ये सखी"
त्याबरोबर बाकीच्या सगळ्याजणी जायला निघाल्या..
द्रौपदीला ते कसंतरीच वाटलं... ती रूक्मिणीला म्हणाली.."अगं थांब गं.." तशी ती म्हणाली.."नको गं.. मला स्वामींची बरीच कामं करायचीयत.."
ती राधेला म्हणाली, " तू तरी थांब.."
ती म्हणाली.." मी थांबले काय आणि नाही काय??.. दोन्हीही माझ्यासाठी समानच आहे."
आणि सर्व निघून गेल्या...
कृष्णानं छद्मी हसत विचारलं..
" हं बोल.. आज तुझी काय शंका आहे??"
तशी ती म्हणाली..." हे जे घडलं.. तीच माझी शंका आहे.."
कृष्णानं विचारलं..." यात शंका घेण्याचं काय आहे??.. तुला आणि मला बोलायला वेळ मिळावा... म्हणूनच त्या गेल्या ना??"

त्यावर द्रौपदी म्हणाली,
" हीच माझी खरी शंका आहे माधवा... की मी असं काय केलयं.. की ह्या सगळ्यांपेक्षाही तुला मी जवळची वाटते...ह्या सगळ्यांनी जसं तुझ्यावर आयुष्य ओवाळून टाकलं.. तसं मी काहीच केलं नाही..
उलट ह्या सगळ्यांना तू त्यांच्या आयुष्यातला एक अखंड हिस्सा म्हणून हवा होतास.त्यांनी त्यासाठी शक्ती, भक्ती, प्रेम, हक्क, लग्न असे सगळे मार्ग अवलंबले..तरी तसा तू त्यांना कधीच मिळाला नाहीस.. तू पूर्णतः कुणाचाच झाला नाहीस..
आणि त्या उलट मी मात्र माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगत होते.. तरी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मला गरज होती तिथे तिथे तू धावून आलास??... असं मी काय केलयं तुझ्यासाठी??"
त्यावर कृष्ण म्हणाला,
" ऐक... एखादया व्यक्तीचं स्वीकारणं.. म्हणजे त्याचं परिपूर्णत्व स्वीकारण्यासारखं असतं... कदाचित तू मला स्विकारलं नाहीस.. पण मी तुला स्विकारलयं... हा फरक आहे बाकीच्यांच्यात आणि तुझ्यात...

अगं त्या सगळं त्यांचं स्वत्वच माझ्यात विसरून गेल्या आहेत.. त्यामुळे त्यांचा आनंद फक्त मीच झालोय.. जे मला प्रिय ते त्यांना प्रिय...

पण मी तुला स्वीकारलयं... ते तुझ्या या स्वाभिमानी
  #स्वत्वासाठी
ते आहे म्हणून तुझं तेज टिकून आहे..... तुला माहितीय स्वतःला की तू काय करतीयस... आणि त्यावर तू ठाम आहेस... तुला फक्त हवा असतो; एक सल्लागार, एक मार्गदर्शक, आणि एक खंदा पाठिंबा.. आणि तेच करतो मी...
त्यामुळे निःशंक हो पांचाली.."

त्यावर ती म्हणाली...
"अच्छा.. मग ह्यांनीही असंच स्वत्व टिकवून ठेवलं तर त्यातल्या कुणाचा तरी तू एकीचाच होशील ना??... मग बाकीच्यांवर अन्याय नाही का??"
ह्यावर कृष्ण गडगडाटी हसत म्हणाला,
" हे तुझं प्रश्न विचारणंच खूप आवडतं... आणि जेव्हा असे प्रश्न पडतात.. तेव्हाच ते व्यक्तित्व अधोरेखित करतात...
आता ऐक...
खरं तर त्यातल्या कुणीच हे असं करणार नाहीत.. कारण तो त्यांचा स्वभाव नाही...
आणि असं आहे... की मी म्हणजे नेमका कोण आहे??
तर मी तुमचंच प्रतिबिंब आहे... तुम्ही ज्या नजरेने बघता त्यातच मी मिसळून जातो.....
त्यांनी माझ्याकडे फक्त प्रेम या भावनेनं बघितलं.. म्हणून मी तसाच बनून गेलो...
पण तू मात्र प्रत्येकवेळी मला वेगवेगळ्या नजरेनं बघत आलीस... म्हणून मी तुला तसाच मिळत राहिलो...

हाच फरक आहे.. तुझ्यात आणि बाकीच्यांच्यात...
म्हणूनच म्हणलं.. मी ....
की "मी" तुझा स्वीकार केलाय....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा