नाती अशीही...
गुंजन सोसायटीत पाचव्या मजल्यावर नवे कुटूंब आल्याची बातमी ज्येष्ठ
नागरिक संघात पसरली आणि "हो का!" "कोणे कोणास ठाऊक" वगैरे संवाद
रंगायला लागले..आधीच्या भाडेकरूंचे यथेच्छ गुणगान(?) करून झाले..पण नविन कोण आलय याचा
मात्र उलगडा झाला नव्हता. दोन चार दिवसात एक मध्यम वयाची बाई-कम्-मुलगी, तीची दोन मुले,
दोन म्हाता-या आणि दोन म्हातारे..असा कुटूंबविस्तार आहे असे कळले..पण नक्की नाव गाव
कशाचा मागमूस न लागल्याने त्या उत्सुक संघात 'पराभवाचे बादल' घिरट्या घालू लागले..इतर
वेळी सगळ्या बातम्या आधी फुटतात तिथे काहीच माहिती नव्हती.
पुढे तीन चार दिवसांनी ती मुलगी आणि तिची पिल्ले ही दिसेनाशी
झाली.
ते दोन म्हातारे आजोबा एकमेकांची चेष्टा मस्करी करत जाता येता
सोसायटीने पाहिले होते. त्या टापटीप आज्ज्या पण दुडकत दुडकत जाताना दिसल्या होत्याच..
"बहिणी वाटत नाहीत, नाई का हो देवस्थळी ?" पालव बाई
म्हणाल्या.
"जावा जावा असतील..." चौधरींचा अंदाज.
"छे! ते दोघं बाप्ये भाऊ नाही हो वाटत" वगैरे निरीक्षण
समोर आली.
शेवटी आपल्या बद्दलचे कुतूहल वाढतय हे त्या चौकडीच्या एव्हाना
लक्षात आलं होतंच..
संध्याकाळी त्या दोन 'टापटीप बाया ' हळूहळू चालत सिनीयर लोकांच्या
बाकाजवळ आल्या..
" नमस्ते, मी हेमा पटवर्धन! "
"आणि मी रंजना देशमुख!" दोघींनी एकदम आपापली ओळख करून
दिली..म्हणजे जावा नाहीत..मग बहिणी असतील? पण साम्यही नाही अशी तर्कसंगती सभासदांची
मनात मांडायला सुरवात झाली..ते ओळखून दोघी मनापासून हसल्या..." तुम्ही विचार करताय
की आम्ही एकमेकींच्या कोण? हो ना? आम्ही विहीणी आहोत.."
सगळे एकदम गार..तमाम तर्क ,अंदाज यांना गुंगारा देऊन भलतच उत्तर
आले..
"आम्ही बसू का इथे तुमच्याबरोबर? " हेमा ताई म्हणाल्यावर
ओशाळून "अरे हो की.." "या ना बसा ना.." असे स्वागत झाले.
रंजना ताईंनी आता सूत्र आपल्या हातात घेतली.. " माझ्या एकुलत्या
एक मुलीने यांच्या एकुलत्या एक मुलाशी लग्न केल बारा वर्षांपूर्वी.. दोघेही भरपूर शिकलेली...जसे
पंखात बळ आले तशी परगावी भुर्र्कन उडून गेली. पहिली काही वर्षे छान कौतुकात गेली...पण
आमच्या नोक-या संपल्यावर विचित्रच एकाकीपण आले.." आलेला हुंदका गिळायचा त्यांनी
केविलवाणा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला..त्यांना थोपटत..
हेमा ताई म्हणाल्या " मुले गुणी आहेत हो..बोलवत असतात पण
इथले सोडून जावे हे ही नाही जमत..
एकदा यांच्याकडे आम्हाला जेवायला बोलावले होते..निघताना माझा
पायच मुरगळला..हलताच येईना..त्यांच्या आग्रहाखातर आम्ही तिथेच रात्री रहायचे ठरवलं..
"
त्या दोघींना जसे घडले तसे आठवू लागले..आज आजारी का होईना कोणीतरी
रहाणार आहे याचा पटवर्धन दांपत्याला फारच आनंद झाला..दुसरी बेडरूम उघडली, नव्या चादरी-उशा
काढल्या.. आपल्या बेडरूममधे सुद्धा नविनच बेडशीट घातली..'कोणीतरी आहे'चा आनंद होता..घरात
जाग होती.
"एकाचे तीन दिवस राहिलो तिथे.." निघताना दोघी रडलो..त्या
रडण्यामुळे आमचा इथवर प्रवास झाला. "आम्ही इथलेच गावात वाड्यात रहातो..म्हणजे
आमचाच आहे वाडा... आणि यांचा फ्लॅट आहे पण तिस-या मजल्यावर... वाड्याची जागा तशी जुनीच...त्यातून
वाढलेली वर्दळ..."
"आणि आमच्या घराचे जीने..ह्या दोन अडचणीमुळे आम्ही एका घरात
राहू शकत नव्हतो म्हणून गावाबाहेर ऐसपैस जागा घेऊन एकत्रच रहावे असे आमच्या मनात आले"
"एकत्र राहिलो तर चार घास जास्त जातात, वेगवेगळे पदार्थ
केले जातात, रात्री बेचैनीत जात नाहीत, असे लक्षात आले आणि आम्ही चौघांनी एकत्र च राहू
असा विचार केला. नक्की कोणाच्या मनात आधी आले माहिती नाही..पण चौघांच्या मनात होतच.
आता वयाच्या या टप्प्यावर कोणते मतभेद आणि कोणती मानापमानाची
नाटके? शिवाय आम्ही एकत्र असलो तर मुले ही निर्धास्त असा व्यावहारिक विचार करून मुलांना
विश्वासात घेऊन ह्या निर्णयावर आलो..मुले तर खुशच झाली..सोबत मिळाली..
आता या ऐसपैस घरात आम्ही चौघे राहू, एकमेकांना सांभाळून."
हे ऐकून सगळ्या आज्यांच्या डोळ्यात पाणी आले..
"याला म्हणतात खरा सोयरा..जो सोय जाणतो तो.." शेवडे
आजी बोलून गेल्या.. आणि टाळ्यांच्या गजरात दोन नव्या मैत्रिणींचे ग्रुप मध्ये स्वागत
झाले!!💞
- सौ. अनघा किल्लेदार.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा