Pages

शनिवार, २० एप्रिल, २०१९

आंधळी कोशिंबीर –




आंधळी कोशिंबीर –
      
मे महिन्यातली टळटळीत दुपार! ऊन मी म्हणत असलेलं! पाखरंही वळचणीला चिडीचूप - मिळालीय तेवढी सावली धरून ठेवणारी! रस्त्याच्या कडेला उभी असलेली झाडं - स्तब्ध ! पानही हलत नाहीये त्यांचं ! पण त्यामध्ये फुलारलेला तो गुलमोहर ! एखादा वणवा पेटल्यासारखा !  अगदीच नाईलाजाने बाहेर पडलेली चार दोन माणसं ! तेवढीच काय ती हालचाल !!
     
आणि या सगळ्यांशी काहीही संबंध नसल्यागत त्या चौसोपी वाड्यातल्या अंगणात  "आंधळी कोशिंबिरी" चा खेळ रंगलेला ! "राणी" च्या सगळ्या मैत्रिणींचा मेळा जमलेला ! सगळ्या चिमण्या दुपारचं जेवण-खाण आटोपून सुट्टीतल्या खेळात रमलेल्या !
      
"राणी" वर राज्य ! तिच्या डोळ्यांवर घट्ट पट्टी ! आवाजाचा कानोसा घेत, छुमछुमणाऱ्या पैंजणांच्या नादाचा अंदाज घेत, कुणीतरी सांगितलेल्या वाटेचा मागोवा घेत, डावीकडे-उजवीकडे-पुढे-मागे  हातांनी चाचपडत, गडी पकडण्याचा आनंद शोधणारी राणी ! गोबऱ्या गालाची, अपऱ्या नाकाची , गोरी-गोमटी ! उन्हं उतरणीला लागेपर्यंत धावणारी , रुसणारी , दमणारी आणि गुलाबी झालेले गाल फुगवून आजीकडे 'आईसफ्रूट'च्या गोळ्याचा हट्ट करणारी ! निरागस !!
    
ऋतुचक्र पळतच राहिलं! अंगणातल्या, परकर पोलक्यातल्या राणीला खराखुरा 'राजा' मिळाला....! माप ओलांडून राणी 'स्वतःच्या' घरात आली ! मोठया शहरात, मोठ्या बंगल्यात, मोठ्या आनंदात ! भिरभिरत्या नजरेने विस्तारलेले जग पाहण्याची नवी स्वप्नं डोळ्यात घेऊन आली!!
      
पण ..... आजही ती खेळतेच आहे खेळ  आंधळी कोशिंबीरी"चा ! फक्त आज डोळ्यांवर पट्टी बांधलीय ती नशिबानं, समाजानं, रूढी-परंपरांनी !! आणि मैत्रिणींची जागा घेतलीय जवळच्या (?) नातेवाईकांनी , सग्या-सोयऱ्यांनी, कर्तव्यांनी, जबाबदाऱ्यांनी....!  कुणाला धरणार आणि कुणाला सोडणार ??  कानावर आवाज पडतायत तेवढ्याच अंदाजानी पावलं टाकतीय ! पावलं वळतायत तिकडे वळतीय ! चार पावलं पुढे-दोन मागे !!  अशानं तिच्यावरचं राज्य कसं जाणार... ??
     
अरे .... कुणीतरी सांगा तिला ....

"बस्स झाला हा खेळ.... आता तरी ती पट्टी काढून टाक म्हणावं.....! स्वच्छ, मोकळ्या नजरेनी जगाकडे बघ ! विसरून जा तो बाहेर पेटलेला वैशाख वणवा !! नाचू देत तुझी पावलं तुझ्या अंगणात मुक्तपणे !! हो म्हणावे "राणी"... खरीखुरी ... स्वतःच्या मनाची ...आणि स्वतः रेखलेल्या वाटेवरची... उघड्या डोळ्यांनी जग पाहणारी.... !!!!”

सवत –


सवत –

अगदी मंदिराच्या जवळ घर आहे तिचं. तिच्या नवऱ्याचं प्रसादाचं दुकान आहे. उत्तम चालतं. कारण पंढरपूरला भक्तांची गर्दी कायमच. आषाढी कार्तिकी एकादशीला तर जेवायला ही फुरसत नसते त्याला. ती तशी भाविक, मंदिर इतकं जवळ आहे म्हणतांना रोजच दर्शनाला जाणारी. तिच्या माहेरी पण होतं लहानसं मंदिर विठ्ठलाचं..त्यामुळे तो ओळखीचा होताच तिच्या. जरासा आपलासा. तिला बापाचं फार फार वेड. तो म्हणजे सर्वस्व तिचं..

आता या विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवलं की बाप भेटल्या सारखं वाटतं तिला. तिचा बाप ही असाच, घरची लक्ष्मी असून दुसरीकडे रमलेला. तिचं अवघं बालपण, आईचं सतत रडणं, नशिबाला दोष देण्यात , करवादण्यात गेलं. सगळा राग, हताशा मग हिच्यावर निघे. पण तिच्या बापात काही बदल झाला नाहीच तो असेपर्यंत. अन तिच्या बापावरच्या प्रेमात ही फरक पडला नाही  कधी. पण मग आईची नजर अशीच दगडी होत गेली. रुसून दूर बसलेल्या रुक्मिणी सारखी. तेंव्हा मात्र हलली ती मनातून. काहीतरी उमजल्यासारखी.

आता ती रुक्मिणीचही दर्शन घेते रोज. तिला वाटतं आईच आहे की आपली ही..अन मग विठ्ठला विषयी तिला एकाच वेळी बापाचं प्रेम अन रुक्मिणीशी असं वागला म्हणून सूक्ष्म राग दाटून येतो..

अगदी रोज..

"फादर डे"


स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..  शब्दशः खरे आहे.. पण मग...बाबा विना काय...?नाही सुचत ना काही.. शब्द अपुरे पडतात त्या धीरगंभीर व्यक्तिमत्वाचे वर्णन करताना...पूर्वी समाजाने "बाप "स्वीकारला तो एक शांत,गंभीर, मुलांना काही धाक दाखवायचा झाल्यास उपयोगी,घरातील कर्ता म्हणून घाबरून राहायचे मुलांनी त्यांच्या अंगाखांद्यावर न खेळता आदबीने मान खाली घालून उभे राहायचे असेच होते... मग हा सगळा प्रकार सवयीचा बनून गेला आणि आई, आज्जी, आणि स्वतः बापाने ही अंतर राखून ठेवायला सुरवात केली मनात कितीही मायेचा झरा असला तरीही.. आईच्या डोळ्यातील अश्रू माया आणि बापाच्या डोळ्यातील पाणी कमजोरपणा असे समीकरणच ठरवून दिले गेले... मग लेक सासरी जाताना ही बापाने डोळ्याच्या कड्यापर्यंतच फक्त  पाण्याला वाट करून द्यायची.. धीरगंभीर स्वभावाला आणि समाजाला रुचेल असे वर्तन करायचे... काळ बदलला "बाप" बदलला.. भावना त्याच व्यक्त होण्याचे स्वरूप बदलले... आज तोच बाप अहो ऐवजी अरे बाबा ऐकायला आतुर झाला.. गोड़ गोड़ तोतरे बोल तो मुलांसोबत बोलू लागला...नोकरीवरून दमून भागून आला तरी लेकराला जवळ घेऊ लागला त्यांचे गोड़ कौतुक करू लागला.... आई आणि बाबा कोण आवडते असा प्रश्न बरेच जण गम्मत म्हणून मुलांना विचारतात...खरे तर ते अत्यंत चुकीचे आहे..पण तरी आजकाल मुले एक मिनिट उशीर न करता सांगतात की "बाबा "पण म्हणून त्या वेळी माऊलीच्या चेहऱ्यावर राग किंव्हा असूया न दिसता गोड़ स्मित हास्य आणि अभिमानच दिसून येतो... कारण तिला त्यावेळी आठवत असतो तिचा  "बाप" तिला जपता जपता स्वतःला विसरलेला बाप..ती कधी पडलेली नसते बापाच्या गळ्यात लाडिक पणे....पण त्याच्या नजरेतील जिव्हाळा,वटवृक्षा प्रमाणे मिळालेला आधार.. तिच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी त्याचा चाललेला आटापिटा... लेकीच्या नावाला बट्टा लागू नये, समाज तिला बहिष्कृत करू नये.. म्हणून त्याने केलेले जीवाचे रान... आणि तिच्या लग्नात चोरून लपून रडणारा तो तिचा लाडका बाबा...  स्वाभिमानी बाप तिच्या सासरी आयाळ नसलेल्या सिंहा सारखा दिसतो..हे सारे तिला आठवत असते...अभिमान वाटतो मग लेकरांचा आणि त्या बापाचा ही...आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे आजचा बाप व्यक्त होतो.. अश्रूंना वाट करून देतो.. धाक दाखवायचा झाल्यास आईचा दाखवतो 😜 आजही त्याची मुलांसाठी,शिक्षणासाठी त्यांच्या सुखासाठी चाललेली धडपड वेगळी नाही...मुलगा मुलगी समान...कर्तव्यात प्रेमात कसूर नाही...काही मुले खरच नशीबवान असतात ज्यांना आई वडिलांचे प्रेम, आधार मिळत असतो...वडिलांच्या प्रेमासाठी आसुसलेली पोरकी मुले पाहिली की पोटात गोळा येतो..जिम्मेदारी च्या ओझ्याखाली मग ती कशी ओढली जातात बालपण हरवून बसतात हे मी पाहिले आहे.. आपण मुले मोठी झालो की शिंग  फुटल्यासारखी वागत राहतो.. आज काल काही  मुले सरळ बापावर विनोद करतात.. एकमेकांना बापाच्या नावाने बोलवतात अत्यंत किळसवाणे वाटते हे ऐकताना...ना कुठे आदर ना जिव्हाळा.... त्यांना विचारा  बापाची किंमत ज्यांना हे सुख मिळाले नाही...दिवसभर पोटासाठी बाहेर राहणार बाप लक्षात येत नसेल कदाचित...त्याचे असणे नसेल लक्षात येत कधी पण नसणे पहाड कोसल्यासारखे असते...बाप कसाही असू देत लुळा, पांगळा घरात पडून असला तरी त्याचे असणे खूप महत्वाचे असते... मी पण त्या नशीबवान मुलींमधलीच एक आहे की मला अश्या प्रेमळ,बाबाचा  आधार आहे ..माझी मुलगी ही नशीबवान आहे की तिला तिचा गोड फादर आहे पण नवरा स्वतःकडे पाहतो हतबल पणे...आधार साठी त्याला त्याचे बाबा दिसत नाहीत तेंव्हा त्याची नजर जाते उंच आकाशाकडे सुन्न होऊन मग पाहत राहते क्षणभर...पण मग तो उठतो नवीन विचार घेऊन त्याच्या चिमुकलीच्या भवितव्याचा... असा हा "बाप" पहाडाच्या छातीचा असतो... "फादर डे"ही  पाश्चत्य संस्कृती असली तरी वडिलांन वर लिहायला..त्यांचे कौतुक शब्दात व्यक्त करायला एक निमित्त मिळाले हेच खूप आहे...पण हे कौतुक फक्त शब्दातून व्यक्त न होता कृतीतून ही त्यांना समाधान देवो.. आपला बाप असल्याचा अभिमान त्याच्या डोळ्यातही दिसू देत...असा खरं तर  संकल्पच करायला हवा प्रत्येकाने.. अश्या "डे "ची खरे तर त्या साठी गरज नाही पण व्यक्त होण्याचा दिवस कधी तरी यावा, कारण त्या  प्रेमाला,आधाराला अंत नाही हेच खरे....

आधीची पिढी




येत्या काही वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी सत्य आहे, कारण जगरहाटी कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोक थोडे वेगळेच आहेत.
सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे..
स्नान केल्याशिवाय, तुळशी ला पाणी दिल्याशिवाय काही न खाणारे..
रोज सकाळी सकाळी खड्या आवाजात स्तोत्र मंत्र म्हणत पूजा करणारे..
संध्याकाळी सगळे सोबत रामरक्षा, भीम रूपी, शुभंकरोती म्हणणारे..
रोज संध्याकाळी मंदिरात एखादी फेरी मारणारे...
राम जन्म, कृष्ण जन्म उत्साहात साजरे करणारे...
भिंतीवर, झाडावर चढून आंब्याची पाने आणून तोरण करणारे...
गौरी, गणपती, महालक्ष्मी दिवशी Colony मधून सकाळी सकाळी फुले वेचून आणणारे...
दिवसभर वेगवेगळ्या प्रकाराचे हार करणारे...
पिण्याचे पाणी नळावरुन भरून आणणारे...
पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे...
रस्त्यातून भेटणाऱ्याची आस्थेने चौकशी करणारे...
दोन्ही हात छातीशी नेऊन नमस्कार करणारे...
अन्न धान्य वाया जाऊ नये म्हणून बेतानेच स्वयंपाक करणारे आणि उरले तर गरीबाला देणारे किंवा दुसरे दिवशी त्याला नटवून मिटक्या मारत खाणारे...
बाहेर न खाणारे...
६० - ७५ जाणांचा पंच पक्वान्नाचा स्वयंपाक स्वतः एकटा घरी करणारे...
दिवाळीचा सर्व फराळ घरीच करणारे...
नरक चतुर्दशी ला सकाळी ४ वा उठून बॉम्ब लावून सगळ्याना उठवणारे...
पाहूणे-रावळ्यांची स्वतःची गैरसोय असूनही पाहूणाचार करणारे...
पर्यटनाबरोबरच तीर्थयात्रा करणेही न विसरणारे...
आपापले सण लक्षात ठेवून साधेपणे साजरे करणारे...
अमावस्या, एकादशी, अधिक महिना लक्षात ठेवणारे...
भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी त्याच्यावर सोडणारे (आणि त्यामुळे कठीण परिस्थितीतही मनःस्वास्थ्य टिकवणारे),
व्यसन करताना लाजणारे आणि समाजाच्या नजरेची भीड बाळगणारे...
जूना झालेला चष्मा, तुटला तर चिकटवून, जुनी चप्पल फाटली तर शिवून आणि जुना बनियन गलितगात्र होईपर्यंत वापरणारे...
उन्हाळ्यात पापड वाळवणारे, हात दुखेपर्यंत कुटून मसाला घरी बनवणारे...
४ - ५ कुटुंब एकत्र येऊन लोणची, मसाले करणारे...
फक्त ३ / ४ कपड्याचे जोड वापरणारे...
फक्त बाहेर घालायच्या कपड्यांनाच इस्त्री करणारे...
खिशातला पैसा जपून वापरणारे आणि गरजेपुरतेच अन्न खाणारे...
जुन्या कॅटेगरी मधील आमच्या सारखे लोक आता हळूहळू कमी होत जाणार आहेत. आपल्या आजूबाजूला किंवा घरात असे कोणी असतील तर त्याची चौकशी करा, काळजी घ्या. कारण ते जातील तेव्हा एक महत्वाची शिकवण त्यांचेबरोबर जाईल.
समाधानी, साधे, अर्थपूर्ण , दुसऱ्यांना प्रेरणा देणारं आणि समोरच्याची काळजी करणारं जीवन जगायचं असतं ही शिकवण जगातून नाहीशी होईल.
त्यानंतर फक्त राहील स्वार्थ, अविश्वास, चैन, असंवेदनशील मने, भकास कोडगेपणा आणि मोबाईलवरचे कृत्रीम अगत्य !!!!!
खूप लिहिण्यासारखं आहे.. साध्या पुरे
-- पुष्कर हेमंत जोशी / संकल्पना

स्वातंत्र्याची धारा




आपला प्राथमिक उद्देश काय जीवनाचा तर आनंदित राहण्याचा,,,, पण आपण आनंदित राहत नाही, हे केवळ आपल्यालाच वाटत कि आपला आनंद दुसऱ्यावर अवलंबून आहे आणि दुसरेच आपल्याला आनंदी राहू देत नाहीत (क्या कहेंगे लोग, क्या कह रहे है लोग)
स्वतःला आनंदित ठेवणं खूप सरळ आहे पण दूर हि तितकंच आहे, नाही का???? काय तर शेवटी आपल्याला आनंदित राहायचं आहे मग त्यासाठी रोकतय तरी कोण???? लोकांच्या complaints असतात की नाही नाही तो असं करतोय माझ्यासोबत, ती अशी करतेय माझ्यासोबत😒
पण fact तर ही असते कि,, आपल्याला वाटत त्यांनी  त्यांचं मनचाही काम नाही करावं पण आपल्याला मात्र आपलं मनचाह काम करायचं असतं,,, आता ही एक मोठी समस्या आहे,,, हे होणं शक्य नाही कारण स्वातंत्र्याची धारा दोन्ही बाजूने वाहत असते.
जर कुणी तुम्हाला शारीरिक त्रास देत असेल तर त्यासाठी अनेक मदतसंस्था आहेत,, पण इथे कुणीच तुम्हाला शारीरिक रुपात त्रास देत नाहीय,, समोरचे लोक त्यांच्या मनानुसार काम करतायेत, त्यांच्या मनानुसार बोलतायेत...... तर मग तुमच्यामध्ये त्रास कोण निर्माण करतंय? "तुम्ही स्वतः". 
आपला आनंद हा केवळ आपल्यावर, आपल्या मनस्थितीवर, आपला जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतो जो कि आपल्या स्वतःच्या मालकीचा आहे.

नवी नवरी नि 😜जुनी नवरी




नवी नवरी नि 😜जुनी नवरी
कालच ओळखीत एका ठिकाणी भेटायला गेले होते ,नुकतच लग्न झालं होतं  त्यांच्या मुलाचं .साधारण महिना झाला असेल,लग्नानंतरचे सगळे सोपस्कार होऊन रुटीन लाईफ सुरू झाले होते .सहजच विचारलं सून बाई  कुठायत?तेवढ्यात ती आलीच ,ऑफिस मधून.एक छानसं स्माईल देऊन आलेच सांगून आत पळाली, मनात म्हंटलं ,ही कशची येते आता ,दोन  गोष्टी करून निघुया आपणच, त्यांना म्हणत होते मी ,आता तुम्हीच या श्रम परिहाराला माझ्याकडे.सून कपडे बदलून  आली सुद्धा बाहेर ,थेट आमच्यात येऊन बसली,म्हणाली ,हो नक्की येतील,पण  तुम्ही बसा आता आल्याचं आहात तर मस्त पोहे खाऊन जा,आणि पुढल्या वेळी ठरवून जेवायलाच या.मला समोद😃 आश्चर्य वाटलं.मीही सुखावले,दिलखुलास दाद दिली , तिचं माझ्या स्टाईल नि कौतुकही केलं,तीही खुलली,म्हणाली तुम्ही बसा बोलत ,मी पोहे घेऊन येतेच.त्यांच्याकडे वळून म्हंटलं,वाह काय लकी आहात हो, काय गोड आहे सून  तुमची, त्या म्हणाल्या, अग हो तुझाच  पॅटर्न युज करतेय,प्रेम द्या नि प्रेम घ्या .अरे वाहहहह ,मस्त परिणाम साधलात की, नक्की काय केलंत, त्या म्हणाल्या ,विशेष काही नाही ग ,ती हनिमून आल्यावर तिला पूर्ण आराम दिला म्हंटलं तू 7 दिवस पूर्ण आराम कर ,सगळी कामाची पद्धत ,वेळा ,बारीक बारीक लक्ष देऊन फक्त बघ ,करू ही नको नि बोलुही नको,जे आवडेल ते आवडलं या कौलम मध्ये जे नाही आवडल ते नाही आवडलं या कौलम मध्ये मात्र कारणासाहित लिही,आणि एक ,7दिवस कमी  वाटले तर  सांग ,आपण जास्ती दिवस ठेवू,ती नको म्हणत होती पण मी ऐकलेच नाही.अगदी त्याच 7 दिवसात तिनी मला कोणत्या नि कशा प्रकारे मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे हे मीही लिहून ठेवलं.झालं 7 दिवस अगदी मजेत घालवले,मी काम करत असताना ती माझ्या अवती भवती राहिली आणि मला  कळाले,हिला माणसे आवडतात,मी काम करताना कधीच बेडरूम मध्ये जाऊन बसली नाही ,मग मीही तिच्याशी बोलत बोलता तिच्या सवयी  आवडी निवडी जाणून घेतल्या,आपल्या घरच्या पद्धती ,रीती रिवाज ,आला गेला, कामाच्या वेळा कशा संभाळायच्या हे ती बोर होणार नाही इतपत तिला समजेल असं ऐकवलं.तीही आवडीने ऐकत होती टिपण करत होती,घर आवरताना मध्ये मध्ये तिच्याही आवडी सांगत होती,एकंदर ती उत्साहात होती .मग मीही खुष होते.7 दिवस अगदी मजेत गेले .तिला माझं एकूण एक काम आवडलं ग,आमची गट्टी तिथेच जमली,आम्ही एकमेकींची  टिपणं वाचली नि  मुख्य म्हणजे तीच लक्षात ठेवून वागतोय.तिला स्वयंपाकात खूप इंटरेस्ट होता पण अजिबात सवय नव्हती ,तेव्हा  ती म्हणत होती ,तुम्ही शिकवलत तर मीही तयार होइन,तुम्ही सकाळी करा नि संध्याकाळी मला सगळं शिकवा ,पुन्हा दुसऱ्या दिवशीची तयारी माझ्याकडून करून घ्या म्हणजे तुम्हालाही बरे नि मी ही शिकीन.आणि हे असं सगळं 15 -20दिवस झाले चाललंय ,पण मस्त चाललंय आमचं😃👍ऐकूनही खूप छान वाटलं,इतक्यात गरमागरम पोहे आलेच तिच्या लाघवी, खेळकर हास्य विनोदाने पोहे आणखी रुचकर लागले.खूप बरं वाटलं,पाहून ऐकून.
          हल्ली होतंय  काय सासू सुना एकमेकींशी अशा दिलखुलास बोलताना दिसत नाहीत वाटलं,,दोघीनिही एकमेकींना समजून घ्या,एकमेकींची मतं जाणून ऐकून घ्या,एकमेकींना आधार वाटेल,अशा वागा,एकमेकींचे दोष पटकन दाखवून भांडत बसण्यापेक्षा,छोट्या छोट्या गुणांचीही दखल  घ्या ती ही मनापासून .आपापली मते एकमेकिंवर लादू नका , सकारात्मकतेने नीट प्रेमाने, आपलेपणानी सांगा ,एकमेकींच्या चूका नीट समज  देऊन पदरात घ्या, सर्वात महत्वचे म्हणजे एकमेकींचा आदर करा.घर कामाची वाटणी आपला वेळ आपल्या क्षमता बघून नीट समजून उमजून केलित तर खटके उडणारच नाहीत.सासुनेही येता जाता स्वपुराण न लावता टोमणे न मारता माझं  अच्छ नि मा झ तच्छ  हे सांगत बसण्यापेक्षा दोघी मिळून सुवर्ण मध्य  साधून सुनेशी जवळीक निर्माण होईल असेच पाहावे.सगळी कामं एकदम न लादता टप्या टप्यानी सांगावीत.नवीन घरात रुळताना तिलाही वेळ द्यावाच लागेल,संयम आणि प्रेम असेल तर अपेक्षित यश मिळलेच, पण थोडा काळ जाऊ द्यावाच लागेल.
सुनेने सुद्धा वागता-बोलताना नीट विचार करावा.सतत माहेरच्या कौतुकाचे  टूमणे लावण्यापेक्षा सासरीही आपुलकीने राहावे.अगदी एखादा पाहुणा आल्यावर जसे आपले त्याच्याकडे  सगळे लक्ष असते अगदी तसेच किंबहुना त्यापेक्षा जास्त लक्ष सुनेकडे सगळ्यांचेच म्हणजे  धुणी भांडी  केर लादी करणाऱ्यां बायकांपासून ते थेट शेजारीपाजारी नि आला गेला ही निरखून बघत असतात सुनेकडे. हीच तर  खरी कसोटीची  वेळ असते ,याच वेळी नीट जबाबदारी नि मर्यादा ओळखून वागावे ,एखादे काम जास्तीचे पडले तर कुरकुर न करता आनंदाने करावे.घरातले वातावरण आपल्यामुळे बिघडणार नाही किंवा आपल्या वागण्या बोलण्याने कुणी दुखावणार नाही आणि कुठला सिनही क्रिएट होणार नाही याची दक्षता घ्यावी.हसून खेळून सगळ्यांशी प्रेमळ संवाद साधण्याचा प्रयत्न करावा.मने जिंकून घ्यावी.
 कित्येक सास्वाना काही करावे लागत नाही तरी सुनेशी सूर जुळतच नाही  कधी त्या सुनेशी प्रेमाने वार्तालाप करीतच नाहीत,सून सगळं करत्येय तर चार शब्द  तिच्याशी प्रेमाने अपलेपणानी बोला ,जवळीक साधा,तिच्या आवडीनिवडीची कदर करून तिच्यासाठी एखादी अगदी क्षुल्लक गोष्ट केलीत तरी खूप सुखावेल ती नि दोघीमध्ये एक घट्ट वीण तयार होईल प्रेमाची.सासू सून  या एकमेव कारणाने वेगळी चूल मांडण्याचा साधा विचारही मनात येणार नाही .परिवार एकसंघ नि एकछती राहील,( अर्थात मनाने हं,नाहीतर लोक म्हणतात आम्ही एकत्र राहतो पण खरं म्हणजे  मनं कधीच दूर गेलेली असतात,) आणि या माय लेकी नाही,सासुसूना आहेत असं सांगावं लागेल लोकांना.सासू सून या नाजूक नात्याला रेशीम गाठी म्हणायचे असेल तर दोघींच्याही वागण्यात रेशीमता हवी.म्हणजे नवी नवरी  आली तर तिचे स्वागतच होइल आणि जुनी नवरी सुद्धा अज्जिबात दुखावणार नाही. रिशता वही सोच नई.शेवटी दोघीनीही एकच लक्षात ठेवायचं,नाती जोडण्यासाठी,जुळवण्यासाठी आपली या पदावर पोस्टिंग झाल्येय, तेव्हा नाती जोडत,जुळवत सासू सुनेच्या जोडगोळीत गोडी  ठेवायची.
© मृणाल कुलकर्णी

सोमवार, १५ एप्रिल, २०१९

"तृप्तपदी"

 "तृप्तपदी" 


वा! 32 गुण जुळलेले आहेत,
लवकर लग्न उरकून टाकु या."

ज्या घरात उपवर वधु वर आहेत तिथे हा संवाद नक्कीच ऐकायला येतो. कागदावरील पत्रिका जुळली म्हणजे मनातील पत्रिका खरचं जुळते का? नक्कीच नाही.

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं नसते तर  मिळणारा जीवन साथीदार' अगदी आपल्याला हवा तसा असणार कसा? त्याचे - आपले, काही गुण जुळणारे नसणारच.. त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच, त्याचं माणूस म्हणून वेगळेपण आहे. लाखो मनांच्या समुद्रातून योगायोगाने दोन मनं अगदी एकमेकां सारखी असणे जवळ-जवळ अशक्य आहे. वेगळ्या वातावरणात, संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले दोन जीव, एकमेकांसारखे असतीलच कसे?आपल्याला 'हवी तशी' व्यक्ती मिळणं हे एक परीकथेतील स्वप्न असेल.

 32 गुण जुळले म्हणजे आवडी निवडी जुळतील का ?
कधीच नाही.पण न जुळलेल्या चार गुणांमध्ये एकमेकांच्या वेगळ्या क्षमतांचा शोध घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता दोघांमध्ये हवी.पण आज हे लग्नाळू मुला-मुलींना सांगितलंच जात नाही. या न जुळलेल्या गुणांशीच खरं तर आपलं लग्न होत असतं.
तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं, तीच व्यक्ती टिकली...
नाही जमलं की विस्कटली.

बघण्याच्या समारंभात गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा, श्रद्धा-अंधश्रद्धा असे  प्रश्न विचारले जातात या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या सुंदर मुलींच्या उत्तरांसारखीच ठराविक साच्याची असतात.  खरंतर एकमेकांनावर इम्प्रेशन मारण्यासाठी खऱ्या पेक्षा खोटी माहिती सांगितली जाते. लग्नानंतर मग खरं काय ते एकमेकांना समजते व भ्रमनिरास होतो व इथुन संसारात ठिणगी पडायला सुरवात होते.... नाही जुळलं -मोडा, व्हा विभक्त... अशा वेळीच समुपदेशन व समुपदेशकांची गरज असते.

धुमसत राहणाऱ्या राखेत  फुलं कशी फुलणार ?
संसाराची बाग फुलवायची असेल तर ही सात पावले खंबीरपणे टाका....

आपल्यापेक्षा  वेगळ्या व्यक्तीचं वेगळेपण सहज स्विकारणं.
हे या वाटेवरच पाहिलं पाऊल..

एकमेकांचे काही गुण जुळणारच नाहीत,
ते स्वीकारणे हे दुसरे पाऊल..

एकमेकांच्या गुणांची कदर करणे हे तिसरे पाऊल...

चवथे व महत्त्वाचे पाऊल म्हणजे,
एकमेकांना गुणदोषासह स्विकारणे ...

पाचवे पाऊल सहनशीलता... 

सर्वात महत्वाचे म्हणजे तडजोड करणे..

अहंम पणाचा त्याग करणे..

ही पावलं योग्य विश्वासाने पडली की मग ती "सप्तपदी" ची  "तृप्तपदी" होते. ही तृप्तपदी होण्यासाठी हा सर्व ऊपद्व्याप.
हेच संसाराचं खरं मर्म आहे.

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही.
या न देण्याचंच 'देणं' स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.
हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.आयुष्य म्हणजे बुद्धीबळाचा पट आहे. सुख-दुःख, प्रेम, भांडणाचे काळे पांढरे चौकोन आहे. यात कधी कधी प्यादे सुद्धा राजाला शह देतात. म्हणुन आयुष्याच्या पटावर संधी बघुन चाल खेळावी लागते. तरच जीवन यशस्वी होते.

"मेड फॉर इच अदर" आपोआप होत नाही तर...
आपल्यालाच जमवाला लागते...!

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा