“असेही पालक असतात
!”
चार दिवसांपूर्वी एका पालकांची भेट झाली. दोन्ही पालक सुशिक्षित
आणि शिक्षकीपेशात. मुलगी इयत्ता अकरावीत. ही मुलगी शिकते त्या काॅलेजचा अकरावीचा रिझल्ट
मागच्या आठवड्यात लागला आणि त्यात मुलगी सर्व विषयांमध्ये नापास झाल्याचं कळलं.
मुलगी एकदम डोकेबाज. घरी जाऊन बराच थयथयाट केला. रडून गोंधळ घातला.
मग मुलीचे पालक काॅलेजमध्ये ‘हिसका दाखवायला’ गेले आणि तोंडात मारल्यासारखे परत आले. कारण, वर्षभर मुलगी काॅलेजलाच
गेली नाही आणि कोणत्याच परीक्षेलाही बसलेली नाही, हे चारचौघात उघड झालं. “अकरावी म्हणजे
फार काही विशेष नसतं, थोडंफार इकडं-तिकडं चालतंच” असा सल्ला इतरांना देणारे हे पालक स्वत:च्याच
मुलीच्या नापास होण्यामुळं मात्र प्रचंड अस्वस्थ झाल्याचं जाणवत होतं.
ते दोघेही मुलीला घेऊन भेटायला आले. मुलगी भलतीच हुशार. ती म्हणाली,
“ मी रोज काॅलेजला जात होते, प्रत्येक लेक्चरला बसत होते. पण तरीही काॅलेजने माझी प्रेझेन्टीच
लावली नाही.” हे तिचं बोलणं सपशेल खोटं आहे, हे मला समजत होतं. मी तिला तिच्या शिक्षकांची
नावं विचारली तर तिला सांगताच येईनात. तिनं लगेच रडायला सुरूवात केली. थोडा वेळ गेल्यावर
मी तिला काॅलेजचं टाईमटेबल विचारलं. तेही तिला सांगता आलं नाही. तिनं पुन्हा रडायला
सुरूवात केली. तिला काॅलेजविषयी काहीच सांगता येईना, हेही उघड झालं. मी तिला इव्हीएस
आणि फिजिकल एज्युकेशन विषयी विचारलं, पण तिला हे विषयसुद्धा माहित नव्हते. आता काय
करायचं?
मी तिच्याशी बोलायला सुरूवात केल्यावर अनेक गोष्टी लक्षात आल्या.
मुलीनं घरी बिनधास्त ठोकून दिलं होतं की, काॅलेजमध्ये गेलं नाही तरी चालतं. ती कोचिंग
क्लासलाही जात नव्हती. पालकांना यातलं काहीच माहित नव्हतं. पुढं हेही लक्षात आलं की,
मुलीनं कोचिंग क्लासची फी भरण्याकरता घरून पैसे घेतले होते आणि ते पैसे तिने विविध
प्रकारच्या खरेदीवर उडवून टाकले. रक्कम पाच आकडी होती. पण या गोष्टीचा घरी पत्ताच नाही.
या मुलीला शंभर रूपये पाॅकेटमनी आणि शंभर रूपये पेट्रोलकरता असे
एकूण दोनशे रूपये दररोज मिळतात. या पैशांचं ती काय करत होती, याविषयी आईवडील काहीही
सांगू शकले नाहीत.
पुढं तर हेही लक्षात आलं की, या मुलीची तीन-चार फेसबुक अकाऊंट्स
होती. आईवडीलांना त्यातलं फक्त एकच अकाऊंट माहित होतं. तिच्या इतर अकाऊंट्स वरचे तिचे
फोटो पाहून तर मीच माझे डोळे मिटून घेतले. वर्षभरात ती कुठे-कुठे फिरली, रात्री कुठे-कुठे
फिरत होती, कोणाकोणाबरोबर फिरत होती, याचं समग्र दर्शन पालकांना घडलं. आपल्या मुलीकडे
वेगवेगळी ४-५ सिमकार्ड्स आहेत हेही पालकांना नव्यानेच समजलं. किती धक्कादायक आहे हे
सगळं?
पालक म्हणून आपलं आपल्या मुलांकडे किती लक्ष आहे आणि वास्तवात
ते किती असायला हवं, याची जाणीव पालकांना करून देण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलांच्या
‘ब्राईट’ करिअरच्या मागे लागलेले पालक केवळ मार्कलिस्टच पाहत राहतात,
पण एक माणूस म्हणून आपलं मूल कसं आहे आणि ते कसं असायला हवं, हे त्यांनी ठरवायला नको
का? आपली मुलं मोठी झाली, काॅलेजला गेली, म्हणजे आपली जबाबदारी संपली, असं पालकांना
वाटतंय का?
पालकांना काऊन्सेलिंगची नितांत आवश्यकता आहे..!
©मयुरेश डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.