पावसाचे पत्र
प्रिय माणसा,
कधी मी लवकर येतो तर कधी उशीरा.
गेल्यावर्षी लवकर आलो. तर तुम्ही मला शिव्यांची लाखोली वाहीलीत. लग्न कार्य कधी
करायचं म्हणून सोशल मिडीयावर मिम्सचे पीक आणलेत. नदया नाले ओसंडून वाहू लागले. पूर
आले. घरं, जनावरं, शेती वाहून गेली म्हणून मी दोषी ठरलो. रस्ते तुंबले, गटारे
तुंबली सगळा दोष मलाच. काय तर म्हणे ओला दुष्काळ आला. सारं काही माझ्यावर सोपवून
तुम्ही मोकळे झालात.
म्हटलं येवढा तुम्हाला त्रास
होतोय तर जरा जावं उशीरा. तुम्हाला नाही का येत कंटाळा. तेंव्हा जाता न कधीतरी
उशीरा कामावर. तुम्ही करता ते चालतं पण मी केलं तर ते पाप ठरतं. खरचं आता हया
सगळयाचा मला त्रास होतोय. नेमकं कुणाचं ऐकाव तेच कळत नाही. एकीकडे मी यावे म्हणून
देवाकडे साकडे घालता. बेडकाचे लग्न लावून देता. बोंबा मारता. बरं मी आलो की पुन्हा
तुम्हाला त्रास होतो. काही जणांना तर मी फक्त मस्त भिजायला हवा असतो. किंवा पिण्याच्या
पाण्यापुरता फक्त तलावात पाहीजे इतरत्र नको. काहींना चिखल हवा असतो तर काहींना नको
असतो. म्हणून म्हणतो आता तुमचाच कंटाळा आलाय. सारख आपलं ते लहरी लहरी आहे म्हणून
हिनवणं. अगदी वैतागून गेलो आहे.
मी
तेंव्हाही लहरी होतो, आता ही आहे आणि पूढेही राहणार आहे. हा माझा स्थायी भाव आहे.
तुमच्या तालावर नाचायला मी काय माणूस आहे होय. तुम्हाला मी फक्त गरजेनुसार आणि
सोयीनुसार हवा आहे. अगदी माणसांसारखा. पण मी तसा नाहीये. उगाच बोंबा मारण्यापेक्षा
एकदा माझा स्वभाव जाणून घ्या. एकीकडे तुम्हाला माझी लेकरं नकोशी झालेत. होय झाडे माझी
लेकरे आहेत. जिथे लेकरे जास्त तिथे मी जास्त रेंगाळतो, अडतो आणि बरसतोही. प्रेमाचा
वर्षाव लेकारांवर नाहीतर कुणावर तुमच्यावर करणार. नुसती सिमेंटची जंगले उभी केलीत
त्याच्यानं नाही मला पाझर फुटत. थांबावस वाटतच नाही. ती हवेच्या झोतावर झुलणारी
झाडे दिसली की त्यांना अगदी कवेत घ्यायला मी येतोच. तुम्हाला जमिनीवर आता झाड नको
आहे. फक्त कुंडयात हिरवळ हवी आहे. सगळं कसं तुम्हाला तुमच्या ईच्छेनुसार आणि
गरजेपुरत हव असतं. आप मतलबी कुठले.
पुर्वीही मी असाच होतो. पण
कुणीही कुरकुर केली नाही. स्वभाव समजून घेतला होता. नदी नाल्यांचा प्रवाह,
हवामानाचा अंदाज आणि निसर्गाच्या नियम समजून उमजून माणसे राहत होती. त्यांनी घरेही
तशीच बांधली. अगदी डोंगर कपारीत बांधली. पाण्याची सोय आणि नैसर्गिक उपलब्धता हयाच्या
अंदाजाने तुमच्या पुर्वजांनी घरेदारे बांधली. शेतीवाडी केली. गुण्या गोविंदाने
नांदली. पोटापरुते पिकवले. आनंदाने पिढी गेली.
पण आता
तुम्हाला नुसता भुकेचा डोंब उसळलाय. भस्मासुरासारखा जमिनी काबीज करुन त्यावर सिमेंटची
जंगले उभारलीत. चकचकीत राहायला आवडत ना, पण मला नाही आवडत. मला त्या धरणीशी पहिल्यांना
भेटताना जो मातीचा सुगंध उठतो ना तो हवाहवासा वाटतो. पण तुम्ही तर मातीच शिल्लक ठेवली नाहीत.
डोंगरच्या डोंगर पोखरुन वाटोळे करुन टाकलेत. आणि दोष मात्र मला म्हणजेच पावसाला
देता. पृथ्वीवर असा एकमात्र जीव तू आहेस तो गरजेपेक्षा जास्त साठा करतो. बघा
जंगलातला वाघही पोट भरले असेल तर शिकार करीत नाही. जमिनीखाली राहणारी मुंगीही केवळ
पावसाळयापुरती अन्न धान्याची तजवीज करते. पण माणुस नुसता बोकाळला आहे. आत भोग
कर्माची फळ.
बघुया भेटूया थोडयाच दिवसांत
आपलाच लहरी
पाऊस

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा