Pages

गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

“अति ई” म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!


 “अति ई म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!

गेल्या पाच-सहा वर्षांत ‘काॅपी-पेस्ट ही अभ्यासाची एक नवी पद्धत रूढ झाली आहे. शाळेपासूनच मुलांना विविध विषयांवरचे प्रोजेक्ट्स दिले जातात. विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष ज्ञान वाढावं, त्यांनी पाठ्यपुस्तकाबाहेर पडून माहिती मिळवावी, ती व्यवस्थित मांडणं, सादर करणं याकरिता खटपट करावी, त्यातून त्यांचं अवांतर वाचन वाढेल, नव्या गोष्टी समजतील, त्यांचं लेखनही सुधारेल आणि अर्थातच, यातून त्यांना आनंद मिळेल.. असा एक चांगला आणि शुद्ध हेतू समोर ठेवून प्रकल्पाधिष्ठीत शिक्षण सुरू झालं. पण, याची दुसरी बाजू गंभीरपणे विचारातच घेतली गेली नाही. म्हणूनच, या प्रकारामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच पदरी पडायला लागलंय.

अनेक घरांमधून या प्रकल्पांकरिता इंटरनेट वापरलं जायला लागलंय. शाळेतून प्रोजेक्ट चा टाॅपिक मिळाला की, इंटरनेटवरून माहिती डाऊनलोड करायची, ती आपल्या मेंदूला काहीही ताण न देता सरळ लिहून काढायची, तो प्रोजेक्ट आणखी आकर्षक व्हावा म्हणून इंटरनेटवरूनच फोटो किंवा चित्रं डाऊनलोड करायची आणि प्रिंट्स काढून चिकटवायची. जास्तीत जास्त एका तासाभरात आठ-दहा पानांचा प्रोजेक्ट तयार ! यात पालकांचीच ‘शिक्षकांनी उरावर बसवलेली ही नसती ब्याद उरकण्याचीच केविलवाणी धडपड मला दिसते. आता एखादी गोष्ट कशीही करून उरकायचीच असेल तर मग काय? - हपापा चा माल गपापा !

दहावीत गेलेल्या एका मुलाला त्याचं शुद्धलेखन चुकतंय म्हणून शिक्षकांनी संस्कृतमधली काही सुभाषितं प्रत्येकी दहावेळा लिहून आणायला सांगितली. तर, ती सुभाषितं त्याची आईच सकाळपासून लिहीत बसलीय ! त्या मुलाच्या इतिहास-भूगोलाच्या वह्यासुद्धा आईनंच पूर्ण करून दिल्या. धन्य ती माऊली...!

आपल्याला प्रत्येक गोष्ट इन्स्टंट मिळवण्याची सवय अंगवळणीच पडली आहे. मागच्या वर्षी कोजागिरीच्या निमित्तानं काही मित्रमंडळींना घरी बोलावलं होतं. बायकोनं स्वयंपाक घरीच केला होता आणि दूधही आटवलं होतं. घरी आलेल्या तिच्या मैत्रिणींनी तिला वेड्यातच काढलं. त्यांच्या मते, एवढा उपद्व्याप करत बसण्यापेक्षा जेवण आणि दूध सरळ बाहेरूनच मागवायला हवं होतं. तिच्या एका मैत्रिणीने तर कैरीच्या डाळीची सुद्धा बाहेर आॅर्डर दिली होती आणि पन्ह्याचा अर्क आणून त्यात पाणी मिसळून ‘रेडीमेड पन्हं दिलं होतं. जर पालकच इन्स्टंट गोष्टींच्या मागे लागलेले असतील तर मुलंही तशीच तयार होतील. त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?

पण यामुळंच, एकूणच पहायला गेलं तर आळशीपणा वाढून खऱ्या विकासाला खीळ बसतेय की काय, असं वाटायला लागलं आहे. एकीकडे विनाकष्ट, विनासायास, बसल्याजागी सगळं अगदी सहज मिळावं ही वृत्ती विद्यार्थीदशेपासून आपणच आपल्या मुला-मुलींमध्ये विकसित करायची आणि दुसरीकडे ‘सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे कष्टांना तरणोपाय नाही हे पालुपद आपणच आळवायचं, हे आता नित्याचंच झालं आहे. त्यामुळेच पालकांचीच ‘शिक्षण आणि त्यातून अपेक्षित असणारा विकास या विषयीची कल्पना पुरेशी स्पष्ट नाहीय, असं जाणवतं. पण एक मात्र नक्की आहे की, असं दोन्ही डगरींवर एकाच वेळी चालणारं पालकत्व १००% महागात पडतंच.

अगदी हौसेनं मुलांना महागड्या, पाॅश, ब्रॅन्डेड शाळा-काॅलेजांमध्ये घालायचं, पण घरातून मात्र मुलांना इंटरनेट वापरून रेडीमेड अभ्यास उरकण्याला प्रोत्साहन द्यायचं, असा पालकांचा कल दिसतो. शिक्षण पूर्वीसारखं राहीलेलं नाही, बराच बदल झाला आहे, पुढंही होईल. पण माझ्या दृष्टीनं खरा बदल झाला तो पालकवर्गात. ३०-४० वर्षांपूर्वीच्या पालकवर्गात उच्चशिक्षित पालकांचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. आता मात्र बहुतांश पालक शैक्षणिकदृष्ट्या स्वत: पदवीधर आहेत. आई आणि वडील हे दोघेही उच्चशिक्षित असण्याचंही प्रमाण आता बरंच वाढलंय. पण मग तरीही कुठंतरी पाणी मुरतंच आहे.

नुकताच मी पालकांचा व्हाॅट्सॲप ग्रुप पाहिला. वर्गशिक्षक शाळेतला गृहपाठ पालकांना व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठवतात. ही झाली सोय ! पण, या आई पालक फारच हुशार.. त्यांनी सर्व पालकांचा आणखी एक ग्रुप तयार केला, ज्यात वर्गशिक्षक नाहीत. या आया गृहपाठातले प्रश्न वाटून घेतात आणि त्याची उत्तरं स्वत: तयार करून ग्रुपवर शेअर करतात. बाकीच्या आया ती उत्तरं आपापल्या मुलांकडून झकासपैकी काॅपी करून घेतात. सगळ्या आया उच्चशिक्षित आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत, कुणाकुणाचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. पण, कळत-नकळत, जाणते-अजाणतेपणी यापैकी काहीही म्हणा, मुलांचं काॅपी-पेस्टींग चं शिक्षण मात्र घरातून जोरदारपणे सुरू आहे. टेक्नाॅलाॅजीचा असा उपयोग करून आपण आपल्या मुलांचं नुकसानच करतोय, हे या आयांच्या लक्षात येत नाहीय का?

इतकंच काय पण शाळेत जाणाऱ्या मुलांचेही व्हाॅट्सॲप ग्रुप्स आहेत.त्यावरूनही अशी आणि या व्यतिरिक्तही बरीचशी देवघेव चालते. मुलं अख्खं जर्नल सुद्धा स्मार्टफोन्समुळे काॅपी करून शेअर करायला लागली आहेत. आता यात काय गैर आहे? असं अनेकांना वाटेल. पण, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, या फोन्सच्या वापराचे भरपूर दुष्परिणाम आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये जाणवायला लागले आहेत. स्मार्टफोन्सचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये लिखाणाचा कंटाळा आणि आळस वाढायला लागला आहे. इतकंच काय, केवळ तर्जनीचाच अधिक वापर करत राहण्याच्या सवयीमुळे त्यांचं हस्ताक्षर बिघडायला लागलं आहे. आकृत्या काढण्यातला सफाईदारपणा कमी होत चालला आहे. पुष्कळशा मुलांना साधी-साधी सोपी वाक्यंसुद्धा नीट लिहीणं जमत नाहीय. हात थरथरायला लागतो, बोटं आखडतात, एका सरळ रेषेत लिहीणंच जमत नाही. तर्जनी अधिक कठीण झाली की, पेन किंवा पेन्सिल पकडण्यातच अडचणी यायला लागतात. साहजिकच, लेखन म्हणजे कंटाळवाणं, नीरस, रूक्ष, बिनकामी खर्डेघाशी इ. वाटायला लागतं. म्हणूनच, स्क्रिन्स सर्फिंगवर जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या लेखनात, हस्ताक्षरात समस्या असण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.

स्क्रिन्सच्या अतिवापराचा आणखी एक परिणाम म्हणजे एकाग्रतेच्या समस्या बळावणे. एकाग्रतेच्या प्रचंड समस्या असलेली मुलं-मुली तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिसरात विपुल संख्येने दिसतील. “स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, आयपॅड, लॅपटाॅप आणि टीव्ही यांचा वाढता वापर हा एक समान धागा यापैकी बहुतांश मुलांमध्ये दिसेल. स्क्रिन्सवर वेळ घालवताना डोळ्यांवरही विलक्षण ताण येतो. त्यातही स्क्रिन जितकी ब्राईट असेल तितका हा ताण वाढतोच. फटाफट स्क्रीन्स सरकवत राहण्याची सवय बोटांना जडली तरी स्कीनवर केवळ सेकंदभरासाठी लक्ष केंद्रीत करणं डोळ्यांना झेपलं तरी पाहिजे ना. पण, डोळ्यांवर प्रचंड ताण येत असतानाही मुलं अख्खी रात्र-रात्र सुद्धा या स्क्रीन्सच्या सहवासात घालवतात. मग, ताळतंत्र बिघडणं आणि अस्वस्थता येणं स्वाभाविकच आहे.  प्रचंड वेगाने सतत सर्फिंग करत राहिल्यामुळे वेळेचं भान तर राहत नाहीच, शिवाय मानसिक क्षमतांमधली चंचलता वाढते ती वेगळीच.

चा अतिवापर मुलांच्या वाचन-लेखन कौशल्यातला मोठा अडसर ठरतोय. उत्तम शब्दरचना करता येणं, यमक साधता येणं, भाषांमधला व्याकरणाचा पाया पक्का असणं, एखाद्या गोष्टीचा सारांश उत्तमरित्या मांडता येणं, एखाद्या कल्पनेचा विस्तार चांगला करता येणं, एखाद्या कवितेचं किंवा कलाकृतीचं रसग्रहण करता येणं, एका शब्दाकरिता अनेक शब्द योजणं किंवा अनेक शब्दांकरिता एक शब्द योजणं अशा अनेक क्षमतांमधली घसरण सुरू झाली आहे. लालित्य उतरणीला लागलंय. भाषिक कल्पनाशक्तीच्या विकासात अडथळे यायला लागलेत. हा निसर्गानं आपल्याला फुकटात बहाल केलेल्या सुंदर क्षमतांचा अपमानच आहे.

आता आपल्यालाच आपल्या क्षमतांची किंमत नसेल आणि आपलं नुकसान आपल्यालाच कळत नसेल तर, चक्रीवादळात भिरभिरणाऱ्या पानासारखी आपली गत होईल. त्यापेक्षा वेळीच सावध होऊन अतिरेक टाळलेला बरा.. नाही का?

©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

सहज थोडंसं....*



सहज थोडंसं....*

तिचं makeup करणं , ब्रँडेड कपडे घालणं  , सण समारंभात मुरडणं सारं सारं बंद होतं ...

 अन् अचानक ती सर्वांना "गबाळी भासू लागते. तरीही ती त्याकडे लक्ष देत नाही कारण तिचं मातृत्व तिला तसं करू देत नाही...  अजूनही तिला मुलांची जबाबदारी असते....!!!!

हळूहळू पुरुषवर्गाला अशी गबाळी बायको माहेरी जाण्यात सुख वाटू लागत....

  तिचं साधेपणही खुपायला लागतं...काही मंडळींना इतर बायका सुंदर वाटायला लागतात... अन कर्तव्य बजावणारी बायको आणि मुक्त फिरणाऱ्या बायका यात तुलना सुरू होते... 

  पण तरीही ती याकडे दुर्लक्ष करून मुलांच्या वाढीवर लक्ष केंद्रित करते... आतून ती मनाला काळजीने स्वतःच वाळवी बनुन पोखरत असते....     !!

आणि तिची पस्तिशी उलटते अन् अचानक ती अतिशय सुंदर भासू( ?)  लागते....

तिचे टॅलेंट नजरेत दिसू लागते.., तिचं आधुनिक राहणीमान , सुरेख hairstyle , नितळ त्वचा , मनमोकळं हसणं  ,

 वागणं ,घरातला सहज सुंदर वावर.., विविध स्पर्धा जिंकणं , रेसिपीत आवड निर्माण करणं,   सर्वात मिसळणं... सारं सारंच सुंदर वाटू लागतं..! 

पण खरंच ती चाळिशीतच सुंदर दिसते का???? 

खरं तर सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना होणारी तिची फजिती कमी होते,  बाळाच्या शी शु तुन ती मुक्त होते ... ,टोमण्यांना उत्तर देण्याची धमक तिच्यात येते , सारं गेलेलं आयुष्य नव्याने उभारण्याची इच्छा जागृत होते ... अन् मनापासून तिला स्वतः साठी जगावसं वाटतं...!!!

पुनः तरुण व्हावंसं वाटतं...ती गबाळी, गावंढळ कधीच नसते फक्त कर्तव्य पार पाडायला प्राधान्य दिलं होतं हे तिला कळून चुकतं अन् “ती कात टाकते... . इतकं सहज सोपं गणित आहे ते.... 

मला वाटतं ... नवं
स्त्री जातक बाळ ते वयस्कर आजी सर्वच सुंदर असतात ... होतो तो आजूबाजूच्या दृष्टीकोनात बदल ...!

कॉलेज ची अल्लड तरुणी सुंदर नसते का??

पतींची वाट बघत असणारी घायाळ हरिणी सुंदर नसते का???
चंदेरी बट * सावरीत अन तोल जाऊ नये म्हणून तुरुतुरु चालणारी आजीबाई सुंदर नसते का???  
 
झाडाला फुल येण्यासाठी सुद्दा काही काळ जाऊ द्यावा लागतो ..  मग इतक्या प्रचंड बदलातून जाणारी स्त्री एका रात्रीत कशी बरं बदलेल??? 

 आणि तिने स्वतः च्या दिसण्यावरच भर दिला तर बाळाचं संगोपन तितकं चांगलं होइल का??
म्हणूनच बायको गेली माहेरी वगैरे फालतू , रिकामटेकडे जोक्स तर तिच्या बाईपणाचाच अपमान आहेत....त्यातून शरीरातील कमी होणारे कॅलशियम, hermonal changes अन् बदलते moods सांभाळून ती बदलून घेते स्वतःला ...

चाळीशीत *
तिचा आत्मविश्वास वाढलेला असतो म्हणून ती या वयात छान दिसते .. पण दृष्टी स्वच्छ असेल तर ती all time smart दिसते ..

माझ्या सर्व smart*मैत्रिणींना व त्यांना समजून घेणाऱ्या मित्रांना सलाम

नावात काय आहे ?



नावात काय आहे ?

 लक्ष्मीपूजनाची वेळ आली . सर्व उत्सुकतेने वाट पाहत होते की नवीन नवरीचे काय नाव ठेवण्यात येते. खरं तर नुकतीच पंचविशी गाठलेल्या कुमारी निशा गोरेचे लग्न श्रीयुत  रवि काळेबरोबर होणे हे काही ' लव्ह मेरेज ' वगैरे नव्हते . नावात आणि आडनावात कितीही विरोधाभास असला तरी हे लग्न दोघांच्याही घरच्यांच्या संमतीने व पसंदीने ठरलेले , ' अरेंज्ड मेरेज ' होते . ठरल्याप्रमाणे सर्व सुरळीत चालले होते व आता शेवटचा  अंक रंगला होता.

सौ.कां. कुमारी निशा गोरे म्हणजे शिक्षणात खूप हुशार अशी आपल्या आई वडिलांची एकुलती एक लाडकी लेक होती . लहानशा खेड्यातली राहणारी सुंदर , देखणी , आणि नाजूक सौ .कां . कुमारी निशा गोरे , पुणे शहरात एका मल्टीनेशनल कंपनीत कामाला होती . आई वडील खेड्यातले असले तरी त्यांनी सौ.कां .कुमारी निशा गोरेची प्रत्येक हौस पुरविली होती , या मुळे सौ . कां . निशा गोरे थोडी जास्तच लाडावलेली होती . गांव खेड्यातून आली असली तरी पुण्याचं हवामान तिला बरंच मानवलेल होतं , आणि शहरातल्या रंगात रंगायलाहि तिला फारसा वेळ लागला नाही .  - तर अशा या सौ . कां . निशा गोरेची लग्नापूर्वी आपल्या होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे श्रीयुत रवि काळेशी जेमतेमच भेट झाली होती . सकाळी बघण्याचा कार्यक्रम झाला व संध्याकाळी साखरपुडा उरकला गेला , आणि मुलगा लगेच परदेशात जाणार म्हणून दहा दिवसातच लग्नाचा बेत ठरला . साखरपुड्याच्या दिवशी सतत तिला कोणी न कोणी घेरूनंच होतं म्हणून तिला  श्रीयुत रवि काळेशी धड बोलताहि आलं नव्हतं . त्या दिवशी तिला श्रीयुत रवि काळेला बरंच काहीं विचारायचं होतं . तिच्या बऱ्याच अटी तिला श्रीयुत रवि काळेला सांगायच्या होत्या . म्हणजे जसं  स्वयंपाक करणार नाहीं , धुणं धुणार नाहीं , केर वारा , जागा पुसणे , व कोणतेही घर काम करणार नाहीं . सासूसासऱ्यांची सेवा करणं जमणार नाहीं . वगैरे वगैरे . या शिवाय तिला एक दुसऱ्यांच्या आवडी निवडी , आणि एक दुसऱ्यांच्या स्वभावाबद्धल पण सविस्तर बोलायचं होतं . पण हे शक्य न झाल्याने ती थोडी फार नव्हे तर जास्तचं अस्वस्थ होती आणि  तिच्या मनात सारखी एक हुरहूर होती . बरं , लग्नसोहळा गावांत करण्याचे ठरले असल्यामुळे , तयारी करण्यासाठी ,लगेच पंधरा दिवसाची रजा काढून तिला आई वडिलांसोबतच  गावाला जावेच लागले . या सगळ्या बाबतीत विरस झाल्यामुळे,एकूण काय सौ . कां . निशा गोरेच्या चेहऱ्यावर , लग्नमंडपात एकाच वेळी अनेक भाव तरंगत होते .

आई वडिलांच्या लाडात वाढली असली तरी सौ कां निशा गोरे ही फार स्वाभिमानी मुलगी होती . वयाच्या इक्विसाव्या वर्षीच नोकरी करून आत्मनिर्भर झाली व आत्मविश्वास आणि स्वाभिमान जास्तच वाढला . पण इतकं असूनही अद्याप तरी  ती आईवडिलांच्या धाकात होती .म्हणून पटकन लग्नालाही तयार झाली . पण असं असलं तरी तिचं आपलं स्वतंत्र जग होतं , स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं , स्वतंत्र अस्तित्व तर होतचं . आणि विशेष म्हणजे ती आपल्या मतांवर ठाम असायची .  - मैत्रिणीशी कधी चर्चा होत असता मैत्रिणींना तिचे विचार कळायचे . एकदा शाळेत असताना  , ' स्त्री मुक्तीसाठी स्त्रियांनीच पुढाकार घ्यायला हवा ' या विषयावर स्पर्धेत निशा गोरेनी भाग काय घेतला , व तिला बक्षीस काय मिळाले , तिचा पुरुषांकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला .पुढे महाविद्यालयात देखील ती स्त्री मुक्तीचा झेंडा फडकावू लागली . स्त्रियांवर अत्याचार हा आता तिचा आवडताविषय होत चालला होता . पुढे ती स्त्री चळवळीच्या क्षेत्रात कार्यरत अनेक संगठनांबरोबर जुळली . - कु . निशा गोरेचे विचार मैत्रिणींमध्ये वेगवेगळ्या चर्चेचे विषय असायचे . मग वाद हि व्हायचे .  ' तुझ्या  इतक्या प्रयत्नानंतर देखील खऱ्या अर्थाने स्त्रियां अद्याप हि स्वतंत्र व विकसित नाही , मग तुझा काय उपयोग ? 'असे म्हणून तिच्या मैत्रिणी तिला सारख्या चिथवत असे . मग कु.निशा गोरे अगोदर चिडायची , मग भडकायची , पण शेवट मात्र सर्वाना समजविण्याने आणि गोडी गुलाबीने व्हायचा . मग चर्चा परत आणखीनच रंगायची , सर्व विषयांना वेगवेगळे फाटे फुटायचे, व कु. निशा गोरे आपले विचार ठामपणे मांडायची . ' स्त्रियांना पुरुषांच्या कचाट्यातून स्वत:च मोकळं व्हावं लागेल . स्वत:चे  स्वातंत्र्य बळकवावे लागेल . हे स्वातंत्र्य किती टक्के आणि कितपत  हवे आहे , जेणे करून प्रत्येक स्त्रीला समाजात सन्मानाने जगता येईल याचा सारासार विचार प्रत्येक स्त्री ने खुद्द  आपल्या पुरता करावा . ' ती सर्वाना सतत सांगायची-  एकदा एका मैत्रिणी बरोबर कु. निशा गोरेचा असाचखूप वाद झाला . त्या मैत्रिणीनी तिला चिडून विचारले , " काय ग निशा , सारख्या सारख्या स्त्री स्वातंत्र्याच्या गोष्टी काय करत असते तू ? प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते . तुझा आपला एकच पाढा . कंटाळा आला आहे तुझ्या एकाचएक गोष्टीचा . अग मला सांग , लग्नानंतर तू कुठं स्वतंत्र राहणार आहे ? तुझं अस्तित्वच बदलून टाकेल तो पुरुषांचा समाज , ती पुरुषांची  सत्ता आणि पुरुषी अहंकार . अग तुझ तर नाव सुद्धा बदलून टाकतील ते सर्व . ओळख हि बदलून टाकतील . तुझी स्वत:ची अशी वेगळी ओळखंच राहणार नाही . मग तेव्हा काय करणार आहेस तू ? "- बस झालं . त्या दिवशी पहिल्यांदाच कु. निशी गोरेला रात्रभर झोप लागली नव्हती . त्या रात्री पहिल्यांदाच तिच्या मनात लग्नाचाही विचार आला . पुरुषाचे महत्व जास्त कां  स्त्रीचे महत्व जास्त ? असलं  द्वंद रात्र भर सुरु होतं . मनातलॆ विचार मंथन काही केल्या थांबेच ना . अनेक प्रश्न मनात निर्माण होत होते , आणि उत्तर तिला सापडत नव्हते . लग्न झाल्यावर मुलीच सासरी कां जातात ? ईश्वराने स्त्रियांनाच मात्रत्वाच्या यातना कां दिल्या ? स्त्रीनेच चूल आणि मुल कां सांभाळावे ? पुरुषांच्या वाट्यात हे सगळे का नसावे ? समाज पुरुष सत्तात्मकचं का आहे ? सर्व महत्वपूर्ण निर्णय पुरुषचं कां घेतात ? मुलांना बापाचे नावंच का दिले जाते ? लग्न म्हणजे स्त्रीचं अस्तित्व व स्वातंत्र्य संपणं असतं का? लग्न म्हणजे स्त्रीची ओळख कायमची पुसली जाणं असतं कां ? माझ्याहि बरोबर हे सर्व असचं घडणार आहे कां ? जर पुरुषाची ओळख समाजात  तीच राहते , तर मग लग्न झाल्याने स्त्रीची ओळख का बदलली जाते ? तिचं तर नाव सुद्धा बदलतात . नाही नाही हा स्त्रीचा अपमान आहे . असं चालणार नाही . मी असं होऊ देणार नाही . कु. निशा गोरे चवताळली , ' लग्नानंतर मी माझं  नाव बदलू  देणार नाही .' कु .निशा गोरेनी सूर्योदयाच्या अगोदर जणू शपथचं घेतली , ' वेळ आलीतर नवऱ्याला त्याचे नाव बदलायला भाग पाडेन .' हा निर्धार झाल्यावरच कु. निशा गोरेला  पहाटे का होईना स्वस्थ झोप आली .  

श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी होती . चांदीच्या ताटात असलेल्या तांदुळात , त्यानं ठरविल्या प्रमाणे त्याचे आवडते नाव तो अंगठीने कोरणार होता . तेवढ्यात सौ . कां . निशा  गोरे ( भावी काळे ) त्याला म्हणाली , " थांब . "- श्रीयुत रवि काळेनं  एक क्षण सौ . कां . निशा  गोरेकडे बघितलं . - " माझं नाव बदलायचं नाही . "- श्रीयुत रवि काळे गोंधळला . - " चांगलं गोरे आहे . काळे करण्याची गरज नाही . " सौ . कां . निशा  गोरेने लग्न मंडपात जणू एकादा बॉम्बच फोडला .- श्रीयुत रवि काळे चपापला . त्यानं आपला हात मागे घेतला आणि आपल्या आईकडे बघितलं . - " काय म्हणते सुनबाई तू ? अगं, लग्नानंतर तर प्रत्येक मुलीला आपलं नाव बदलावचं लागतं . " सासूबाईना वाटलं हत्ती गेला अनं शेपूट राहिली . - " मला माझी ओळख बदलता येणार नाही . मला लोकांनी  निशा गोरे म्हणूनचं ओळखायला हवं . " सौ . कां . निशा गोरेला एका पहाटे सूर्योदयाच्या पूर्वी  घेतलेली आपली शपथ आठविली . - " म्हणजे ? " आता श्रीयुत रवि काळे थोडा गोंधळला  .- " म्हणजे , माझं नाव बदलायचं नाही . " न घाबरता  सौ . कां . निशा गोरे म्हणाली . - " आणि आडनावं ? " सासूबाईला आता राग आला होता . - " तेहि बदलायचं नाही . " तितक्याच ठामपणे शांत गंभीर स्वरात सौ . कां . निशा गोरे म्हणाली .- " हे कसं शक्य आहे ? " आता श्रीयुत रवि काळेच्या आईनी सौ.कां .निशा गोरेच्या आईकडे बघितलं . - " अगं पोरी तू हे काय म्हणते ? " आता सौ . कां . निशा गोरेचे वडील पुढे आले .  - " बरोबर आहे बाबा . मी माझं नाव आणि आडनाव बदलणार नाही . लग्न नावाचे नावाशी नाहीं , आणि आडनावाचे आडनावाशीहि नाहीं . लग्न एका मुलाचे एका मुलीशी होत आहे . " सौ .  निशा गोरेने वडिलांनाहि तेच उत्तर ठामपणे दिलं . - " हा काय नवीन प्रकार आहे ? " आता गुरुजी मध्ये पडले , " अगं पोरी लग्न म्हणजे दोन घराण्यांचे संबंध जुळतात . कुटुंबाचे कुटुंबाशीच नाती जुळतात ."- " ते सर्व जुनं . " सौ . कां . निशा गोरेहि माघार घ्यायला तयार नव्हती , " असं असेल तर मग मुलालाच नाव बदलायला सांगा . "- " आता अति होतंय बरं . " सौ . कां . निशा गोरेची आईआपल्या मुलीला रागे भरली . - " अगं आई , आता जग बदललं . काळहि बदलला . संसार दोघांना करायचा आहे . मग एकाचेच नाव का बरे बदलायचं ? दोघांच्याही नावाने आमची ओळख व्हायलाहवी. मुलीनेच आपली ओळख कायमची का पुसून टाकायची?तिनंच आपलं अस्तित्व का संपवून टाकायचं ? काही असो , मी वाहून जाणाऱ्यांपैकी नाही आणि प्रत्येक गोष्टीला होकार देणारी सुद्धा नाही .

श्रीयुत रवि काळे हे सर्व चुपचाप ऐकत होता . आता तोहि मध्ये पडला , " माझं नाव आणि आडनाव तुला बदलायचं आहे ? मग घे ही अंगठी आणि तुझ्या आवडीप्रमाणे ठेव माझे नाव . अगदी सहज  सरळ भाषेत श्रीयुत रवि काळे म्हणाला आणि त्याने सौ . कां . निशा गोरेच्या हातात अंगठी दिली . - आता दचकण्याची वेळ सौ . कां . निशा गोरेची होती .- " बरं मला सांग  ओळख म्हणजे नक्की काय ? " श्रीयुत रवि काळेने सौ . कां . निशा गोरेला  विचारले . - आता पाहुण्यांनाहि या प्रकरणात मौज वाटू लागलीहोती . प्रकरणाचा छडा काय लागतो याची सर्वाना उत्स्कुता होती .  - निशा गोरे अजूनही हातात अंगठी घेऊन होती . श्रीयुत रवि काळेकडून तिला ही अपेक्षा नव्हतीच. तिचा अंदाज होता की श्रीयुत रवि काळे तिचा विरोध करेल. मग वाद होतील . आणि ती पुन्हा एकदा सर्वांना पटवून देईल की स्त्रियांचे स्वातंत्र्य किती गरजेचे आहे. पण हे असं काही झालचं नाही , उलट श्रीयुत रवि काळे तिला शांतपणे प्रश्न विचारात होता , आणि या नव्या उद्भवलेल्या परिस्थिती मुळे ती गांगरली . - "अगं सांग ना ओळख म्हणजे काय ? " श्रीयुत रवि काळेने तिला पुन्हा विचारले . सर्व मंडळी या दोघांकडे आश्चर्याने बघत होती  . सर्वांना निकालाची उत्सुकताही होतीच . - सौ . कां . निशी गोरेला असं वाटलं की तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या मोहिमेला आणि  लढा देण्याच्या वृत्तीला पूर्ण समाजचं जणू आव्हान देत आहे . पण सर्वांच्या समोर दोनदा विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आता तिला देणे  भाग होते . नाही तर स्त्रियांच्या लढ्यात तिनं माघार घेतली असं तिच्या मनाने सतत तिला दोष दिला असता . - " ओळख म्हणजे , जशी मी ' निशा गोरे ' च्या नावाने ओळखली जाते . " तिनं प्रश्नांचे उत्तर दिले . -नवीन नवरी बोलली म्हणून सर्वांनी जोराने टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन केले . - " ते झालं तुझ्यासाठी संबोधन . याला एक प्रकारची आपण खूण म्हणू शकतो . पण या जगात निशा नावाच्या अनेक मुली असतील आणि निशा गोरे नावाच्याहि काही मुली सापडतील . मग तुझी ओळख नक्की काय ? "श्रीयुत रवि काळेने तिला विचारले ," तुझं नाव , तुझा चेहरा , तुझं शिक्षण , तुझी नोकरी , तुझी आवडनिवड , तुझा स्वभाव , तुझा व्यवहार , नक्की कशाने आम्ही तुला ओळखावं , अशी तुझी अपेक्षा आहे ?- आता सौ .कां .निशा गोरे चपापली .तिनं श्रीयुत रवि काळेकडे बघितलं, तो शांत होता . तिच्या मनात विचार आला , ' श्रीयुत रवि काळे  जाम भारी आहे . दिसतो तेव्हढा बावळट नक्कीच नाही .' पणआता काय करायचं ? माघार कशी घ्यायची ? हे प्रकरणवाढत चाललंय . तिच्या स्त्री स्वातंत्र्याच्या चळवळीचा असा अंत होणार का ? ' नाही नाही , हे होता कामा नये .' मनातल्या एका कोपऱ्यातून आवाज आली , ' तर्क करता येत नाही म्हणून लगेच हार मानण्याचे काहीच कारण नाही ' . - " आश्चर्य वाटतंय  ? " श्रीयुत रवि काळे तिला म्हणाला आणि तिची तन्द्रा भंग झाली .- " अगं , नाव म्हणजेच नुसती ओळख नसते . हे म्हणजे आधारकार्डसारखे आहे . आता येणाऱ्या दिवसांमध्ये सर्व लोक आधारकार्डनेच ओळखले जाणार आहे . यालाच तुझ्या म्हणण्याप्रमाणे ओळख म्हणता येईल कां  ?"-सौ . कां . निशा गोरे हळूहळू निरुत्तर होत चालली होती . काय बोलावे आणि काय करावे हे तिला समजत नव्हतं . - " अगं , ओळख म्हणजे माणसाचे संपूर्ण व्यक्तिमत्व . यात सर्व आलं , नाव, चेहरा , गुण , योग्यता , संस्कार , आवडनिवड , वागणूक , वगैरे वगैरे .हेच सर्व गुण माणसाची खरी ओळख .कोणताही अन्याय होणार आहे या कल्पनेने  व भीतीपोटी त्या गोष्टीचा विरोध करणे याला कोणाच्याही मुक्तीसाठी चळवळ म्हणता येत नाही . स्त्री आणि पुरुष ईश्वराची अमुल्य देणगी आहे . एक दुसऱ्याचे पूरक आहे . एक दुसऱ्याचे वैरी नाही .  खरं तर कोणीही कोणावर अन्याय करता कामा नये . उत्तम आणि योग्य व्यवस्थेच्या द्रष्टीने समाजानेच विवाहसंस्था बनविली . नंतर आयुष्य सुरळीत जावं , आणि येणाऱ्या घरात निष्ठा वाढावी  म्हणून  मुलीचं नाव बदलण्याची परंपरा पडली . पण नाव बदलणं  हा कोणताही मुद्दा होऊच शकत नाही .यात फक्त सोयीचाच विचार झाला असावा आणि नंतर हि प्रथा झाली असावी . "- श्रीयुत रवि काळे जणू न थांबता प्रबोधनच करत होता . आणि सौ .कां .निशा गोरेला   आश्चर्याचे धक्के देत होता . "- "  तुम्ही दोघं का स्पर्धेत भाग घ्यायला बसला आहात कां ? " आता गुरुजी भडकले , " अहो लवकर करा , लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त निघून जाईल . "- सौ . कां . निशा गोरेनी चुपचाप श्रीयुत रवि काळेच्या हातात अंगठी ठेवली .- श्रीयुत रवि काळेनी अंगठीने ताटातल्या तांदुळात नाव कोरले - ' निशा '  - आता मात्र निशा गोरेला आश्चर्याचा धक्का बसला .- सर्वांनी टाळ्या वाजविल्या . दोघांनी सर्वांनापेढे वाटले . मग ' उखाणा घ्या उखाणा घ्या ' असं एक स्वरात सर्व म्हणाले . श्रीयुत रवि काळेनी उखाणा घेतला . -- आम्हीं दोघे , आमचा विश्वास , आमचीच आशा सर्वे ऐका आज पासून आमचे आडनाव ' रविनिशा '- हा उखाणा घेतल्यानंतर श्रीयुत रवि काळेनी सौ . कां . निशा ' गोरेकाळे ' च्या तोंडात पेढा भरविला .- सर्व मंडळी टाळ्या वाजवीत होते . -- श्रीयुत रवि काळेचे आईवडील मात्र आपल्या मुलाच्या ,आडनाव बदलण्याच्या या अनपेक्षित निर्णयाला आश्चर्याने सामोरे जाण्याचा प्रयत्न करीत होते .     

( पुरूषप्रधान मानसिकतेला स्त्रीप्रधान मानसिकता हे उत्तर होऊ शकत नाही. परस्पर सामंजस्यानेच हा प्रश्न सुटू शकतो.

माझी निवड चुकली तर नाही ना ?


माझी निवड चुकली तर नाही ना ?

एका सेमिनारमध्ये एका महिलेने प्रश्न केला, "मी जीवनसाथी निवडण्यात चुकले तर नाही ना हे मला कसे काय कळेल?". वक्ते महाशयांनी तिच्याकडे पाहिले. त्यांच्या लक्षात आले की तिच्या शेजारी बसलेले गृहस्थ हे बरेच स्थूल दिसत होते. वक्ते महाशयांनी प्रश्न केला, "तुमच्या शेजारी बसलेले गृहस्थ हेच तुमचे जीवनसाथी आहेत काय?" अत्यंत गंभीरपणे तिने उत्तर दिले," तुम्ही कसे काय ओळखले?" वक्ते महाशय उत्तरले,"तुमच्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर मला आधी देऊ द्या. कारण त्या प्रश्नामुळे तुम्ही खरोखर खूप अस्वस्थ आहात असे दिसतेय. तुमच्या प्रश्नाचे उत्तर असे आहे.

प्रत्येक नात्याचे एक चक्र (सायकल) असते. सुरूवातीला तुम्ही तुमच्या साथीदाराच्या प्रेमात पडता. तुम्ही त्याच्या फोन्सची वाट पाहता, त्याच्या स्पर्शाची इच्छा धरता, त्याच्या आवडींवर सवयींवर प्रेम करता. प्रेमात पडणे मुळीच कठीण नसते. खरं तर तो एक पूर्णपणे नैसर्गिक आणि उत्स्फूर्त असा अनुभव असतो. प्रेमात पडण्यासाठी तुम्हाला वेगळे असे काही करायचेच नसते. म्हणून तर त्याला प्रेमात 'पडणे' असे म्हणतात. प्रेमात असणारी माणसं त्यांच्या अवस्थेचं वर्णन करताना कधी कधी म्हणतात, "I was swept off my feet" हे जे वर्णन आहे ते जरा दृश्य स्वरूपात बघण्याचा प्रयत्न करून बघा. त्याचा अर्थ असा लागतो की तुम्ही आपले तुमचे तुमचे उभे होता, काहीही न करता आणि अचानक तुमच्या बाबतीत काही तरी घडले.

प्रेमात पडणे हा एक उत्स्फूर्त आणि passive असा अनुभव आहे. पण परस्परांसोबत काही महिने अथवा वर्षे काढल्यानंतर प्रेमाची धुंदी ओसरू लागते. प्रत्येक नात्याचे हे असेच नैसर्गिक असे सायकल असते. हळूहळू फोन कॉल्स (अद्यापही येत असतील तर) कंटाळवाणे वाटू लागतात. स्पर्श हवाहवासा वाटेनासा होतो. तुमच्या साथीदाराच्या सवयी-आवडी, ज्या तुम्हाला सुद्धा आवडत असत, आता तुमचे डोके उठवू लागतात. नाते या अवस्थेला पोहोचल्याची लक्षणे प्रत्येक नात्यागणिक वेगवेगळी असतात. तुम्ही जेव्हा प्रेमात पडला त्या वेळेची अवस्था आणि नंतरची किंवा सध्याची ही कंटाळवाणी किंवा संतापजनक अवस्था - या दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक असल्याचे तुम्हास जाणवते. या ठिकाणी कदाचित तुमच्या किंवा तुमच्या साथीदाराच्या मनात हा प्रश्न उभा राहतो की माझी निवड चुकली तर नाही ना? तुम्ही अनुभवलेली प्रेमाची धुंदी तुम्हाला जेव्हा जेव्हा आठवते तेव्हा, अन्य कोणाबरोबर का होईना, पण आपल्याला ती नशा पुन्हा एकदा अनुभवायला मिळावी असे तुम्हास वाटू लागते. आणि ह्या वेळी नाती तुटायला लागतात.

नात्यात यशस्वी व्हायचं असेल किंवा ते शाबूत ठेवायचं असेल तर त्याची एकच गुरुकिल्ली आहे. नात्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करणे ही ती गुरुकिल्ली नव्हे. तर जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावर प्रेम करणे ही ती गुरूकिल्ली आहे.

The key to succeeding in a relationship is not finding the right person; it's learning to love the person you found.

आपण दु:खात आहोत याला जवाबदार आपला जीवनसाथी आहे असे लोक समजतात आणि वैवाहिक संबंधांच्या बाहेर आनंद शोधायला जातात. विवाहबाह्य संबंध हे सर्व रंगा रुपांत बघायला मिळतात. अनैतिक संबंध हे त्याचे एक सर्वात कॉमन रूप आहे. पण बरेचदा लोक अन्य मार्गांकडेही वळतात.

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.

कारण (हे लक्षपूर्वक ऐका) : एखाद्या नात्यामध्ये यशस्वी होण्याची गुरुकिल्ली - जीवनसाथी म्हणून योग्य व्यक्ती निवडणे ही नसून जी व्यक्ती तुम्ही निवडलीत तिच्यावरच प्रेम करायला शिकणे -
हीच आहे !!

प्रत्येक 'स्त्री' ने वेळ काढून वाचावा असा लेख


प्रत्येक 'स्त्री' ने वेळ काढून वाचावा असा लेख


पाऊस येतोय म्हणून तो थांबेपर्यंत शाळेत थांबण्याची वेळ माझ्यावर कधीच आली नाही.. कारण मी पाऊस येतोय म्हणून कधी थांबलेच नाही.. उलट पाऊस थांबायच्या  आत आपण घरी निघायला हवं अशाच प्रयत्नात मी असायचे.. कारण माहित होतं की असं पावसात भिजून घरी गेलं म्हणजे मस्त गरम गरम ओवा अन मोहरीच्या तेलाची गेल्या गेल्या मालिश मिळणार.... आणि ती ही न चुकता,प्रत्येक वेळी..मिळतच असे.... भिजु नको, असं सांगीतलेलं असताना जरी भिजले तरी.. बोलणे बसायचे ... अन त्या सोबत हे तेलही हजर असायचं..

नंतर जेव्हा घरापासून लांब राहू लागले तसतसं पावसात भिजणंही हळूहळू कमी होत होत बंदच झालं.असं नव्हतं की जीवनात, आजुबाजुला माणसं नव्हती...पण तेव्हा कोणाच्याच हे लक्षात हे कधीच नाही आलं की पावसात भिजलेल्या मुलीच्या तळपायांना छान कोमट कोमट मोहरीच्या तेलानं मालिश करावं..कधीच नाही....

अशा शेकडो -हजारो गोष्टी आहेत, की ज्या आई नेहमी करायची, पण आईपासून लांब गेल्यावर कोणीच नाही केल्या...

तःयानंतर कोणी कधी डोक्याला तेल लावून मालिश नाही करुन दिलं.आज एखादा दिवस जरी आईकडे गेलं तरी आई डोक्याला तेल लावून मालिश जरुर करुन देते....
लहानपणी स्वयंपाक आवडीचा नसेल तर आई दहा ऑप्शन द्यायची..गुळतूप पोळी खा,मेतकुट भात खा,थालीपीठ करुन देऊ का? दही साखर पोळी खातेस का,शिकरण पोळी देते...असे एक ना अनेक....आई असे शेकडो नखरे सहन करायची.....आणि तरी भांडण पण तिच्याशीच व्हायचं..

पण नंतर कोणी तिच्याइतके लाड नाही केले....मी पण मग हळूहळू सगळ्या भाज्या खायला लागले...

माझ्या आयुष्यात आई एकच आहे.... परत नंतर कोणीच आईसारखी नाही आली.... मी मात्र मोठी होऊन आई झाले.... मुली होतातच नं आई आपोआप.....

प्रियकर,नवरा --कधी कधी छोटं मुल होतात..कधीकधी त्याच्यावर आपण खुप खुप प्रेम करतो... आपल्या ते लक्षातही येत नाही.... त्यांच्या डोक्याला मस्त गरम तेलाने मालिश होते, त्यांच्या आवडीचे पदार्थ बनतात.... त्यांचे सगळे नखरे आपण नकळत सहन करायला.. पुरवायला लागतो.. स्वतःला विसरून...

मुलांच्या... पेक्षा पुरुषांच्या जीवनात अनेक रुपात आई येते.. बहिण पण आई होते, बायको तर आई असतेच... काही काळानंतर मुलीही बाबांची आई बनतात.. पण.... पण..... मुलींजवळ फक्त एकच आई असते... मोठं झाल्यावर त्यांना आई नाही मिळत.. ते प्रेम, ते नखरे,तो हट्टीपणा आईशिवाय कोणीच नाही सहन करत.. आई परत फिरुन कधीच येत नाही....

मुलींच्या जीवनात आई फक्त आणि फक्त एकदाच येते..




वेळ ?



वेळ ?

वेळ आली, वेळ झाली, वेळ गेला असं आपण म्हणतो. पण कधी विचार केलाय हा वेळ किंवा ज्याला आपण काळ म्हणतो, म्हणजे नेमकं काय ? घड्याळ थांबतं पण वेळ थांबत नाही. कधी वेळेला नियंत्रणात आणता आलं तर काय धमाल येईल नाही का ?
पण वेळ म्हणजे नक्की काय संकल्पना आहे?

वेळ हि अद्भुत संकल्पना आहे. आपण त्रिमितीय अस्तित्व (3D existence) किंवा अवकाश (space) लांबी, रुंदी आणि उंची ह्या परिमाणांचा वापर करून मोजतो. पण वेळ म्हणजे अस्तित्वाची हालचाल किंवा अस्तित्वातले बदल मोजण्याची मिती. याला आपण चौथी मिती पण म्हणू शकतो (Fourth dimension). लांबी असल्याशिवाय रुंदी असू शकत नाही. लांबी आणि रुंदी असल्याशिवाय उंची असू शकत नाही. आणि लांबी-रुंदी-उंची असल्याशिवाय वेळ असू शकत नाही. आता हे काय भलतंच ?
पण थोडा विचार करा.

तुमच्या समोर एक वस्तू आहे. तिचं अस्तित्व आहे. कारण त्याला काहीतरी लांबी आहे, रुंदी आहे आणि उंची आहे. आता पुढे कल्पना करा, ती वस्तू १० मिनिटांपासून तुमच्या समोर आहे. १० मिनिटांपासून आहे, म्हणजे तिचं अस्तित्व आहे, बरोबर? आता कल्पना करा, ती वस्तू १ मिनिटांपासून तिथे आहे. तरीपण तिचं अस्तित्व आहे. पण समजा ती वस्तू शून्य (०) मिनिटांपासून तिथे आहे. म्हणजे तिचं अस्तित्व शून्य आहे. याचा अर्थ तिचं अस्तित्वच नाही. वेळ आहे म्हणून तिचं अस्तित्व आहे. आता समजा, ती वस्तू ज्या जागेवर आहे, तिथून ५ इंच पुढे जाते. म्हणजे काहीतरी हालचाल होते. ती हालचाल जरी काही तरी एका सेकंदात झाली असेल, पण तरी काही वेळ लागला तेव्हा आपल्याला सांगता येतं की हालचाल झाली. जर ती हालचाल शून्य सेकंदात झाली तर, हालचाल झाली असे सांगता येईल काय ?

आईनस्टाईनच्या सिद्धांतानुसार वेळ आणि अवकाश या दोन्ही गोष्टी परस्परसलंग्न आहेत. वेळ आहे म्हणून सर्व आहे, आणि सर्व आहे (तीनही मिती आहेत) आणि त्यांची हालचाल आहे म्हणून वेळ आहे.

जर काहीच नाही, तर वेळ असेल का ? विश्वनिर्मितिच्या आधी वेळ ही संकल्पना होती का ? वरील तर्क विचारात घेतल्यास विश्व निर्माण व्हायच्या आधी वेळच नव्हती असा निष्कर्ष निघतो. विश्वनिर्मिति च्या वेळेस उर्जा, वेळ आणि अवकाश तयार झाले असं मानतात. पण विश्वनिर्मिती ही एक घटना आहे. आणि घटना घडली असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा वेळ ही संकल्पना आलीच..!

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

सुधा_मूर्ती

सुधा_मूर्ती

"इन्फोसिस फाउंडेशन'च्या प्रमुख आणि "गेट्‌स फाउंडेशन'च्या सार्वजनिक आरोग्यविषयक उपक्रमाच्या सदस्य या पदांवरून त्यांनी केलेले कार्य स्तिमित करणारे आहे. खरेतर, "इन्फोसिस' या आज जगविख्यात असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीची उभारणी सुधाताईंनी एक गृहिणी या नात्याने केलेल्या सुमारे दहा हजार रुपयांच्या बचतीतून झालेली आहे. नारायण मूर्ती हे आवर्जून अनेकदा या बाबीचा उल्लेखही करतात.

सुधा कुळकर्णी-मूर्तींचा जन्म १९ ऑगस्ट, इ.स. १९५० ; शिगगाव, कर्नाटक येथे झाला.त्या एम.टेक.आहेत. टेल्को या कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. कॅलटेक (अमेरिका) ह्या प्रसिद्ध कंपनीतील शास्त्रज्ञ श्रीनिवास कुळकर्णी यांच्या, तसेच जयश्री कुळकर्णी-देशपांडे (प्रसिद्ध अमेरिकन व्यावसायिक गुरु राज देशपांडे यांच्या पत्नी) ह्यांच्या भगिनी आहेत. त्यांना रोहन व अक्षता ही अपत्य आहेत.

सुधा मूर्ती यांनी नऊपेक्षा अधिक कादंबर्‍या लिहिलेल्या आहेत. त्यांच्या नावावर अनेक कथासंग्रह आहेत.त्यांच्या 'ऋण ' या कानडी कथेवरील पितृऋण हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

सामाजिक कार्य करताना सुधाताईंनी प्रपंचही नेटका केला आहे. त्यांची जीवनशैली कमालीची साधी आहे. मध्यंतरी त्या कोल्हापुरात आल्या, तेव्हा  सहकाऱ्याबरोबर महालक्ष्मीच्या दर्शनाला गेल्या होत्या. येताना त्यांनी देवळाबाहेर बसलेल्या बाईकडून आठ आण्याचे आवळे आणले! नारायण मूर्ती हे आवर्जून विचारले, "हे काय! एवढीच खरेदी?' त्या हसून उद्‌गारल्या, "मी शॉपिंग करतच नाही!' काही वर्षांपूर्वी हरिद्वारला गंगास्नानासाठी त्या गेल्या होत्या. प्रिय वस्तूचा त्याग करावा, असा संकेत तेथे असतो. सुधाताईंनी त्याक्षणी शॉपिंग बंद केले ते कायमचेच.
साधी पांढऱ्या रंगाची साडी त्या परिधान करतात.
रंगीत कपड्यांची त्यांना आवडच नाही.

सुधा मुर्ती ह्या प्रसिध्द अशा १०,००० कोटीचा व्याप असलेल्या इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा असुन दरवर्षी त्या २५० कोटी पेक्षा जास्त रक्कम देणगी म्हणून दान करतात. तरीही अतिशय साधी राहणी ठेवण्याकडे त्यांचा खास कटाक्ष असतो...
सुधा मुर्ती नेहमी ज्या साड्या घालतात.
त्या साड्या कमी किंमतीच्या असतात...
पर्स २०० ते ४०० रुपयाची असते..
मनगटी घड्याळ वेळ बघता अाली म्हणजे फार झाले म्हणून घड्याळही साधे सुधे ८००९०० रुपयाचे असते.
मोबाईल ७ ते ८ हजाराचा ..
फेसबुक, व्हाटसअॅप मध्ये १५१५ दिवस लक्ष घालत नाही.
पायातील चप्पल सुध्दा महागडी नसते.
कोणत्याही ब्रॅन्डेड वस्तु वापरत नाही.
घरातील सर्व कामे स्वत:च करतात.
नातेवाईक व मित्रपरिवार यांचे घरातील सर्व लग्न व
दु:खद प्रसंगी हजर राहतात.

सुधा मुर्तींचा जेथेही प्रवेश होतो.
तेथील अहंकारी नजरा क्षणार्धात लाजेने खाली झुकतात..
हजारो कोटीची सम्राज्ञी असलेल्या सुधा मुर्तींचा साध्या राहणीमानातला वावर सर्वांना अचंबित करुन सोडतो,
अापण कोण अाहे हे विसरुन इतरांना मोठेपणा देत ही बाई जेव्हा सर्वांची स्वत:हून पुढे जाऊन अास्थेने चौकशी करु लागते तेव्हा मी मी म्हणणार्‍यांचा अहंकार क्षणार्धात गळून पडतो..!

राष्ट्रीय चारित्र्य पुरस्कारासाठी प्रसिद्ध साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या सुधा मूर्ती यांची झालेली निवड अत्यंत उचित अशीच आहे. शिक्षण, विज्ञानप्रसार, साक्षरता प्रसार, आरोग्य अशा विविध क्षेत्रांत झोकून देऊन सातत्याने कृतिशील राहिलेल्या सुधाताई हे विलक्षण चैतन्याने भारलेले व्यक्तिमत्त्व आहे. मराठी-कन्नड-इंग्लिश भाषांतील असंख्य अप्रतिम पुस्तकांच्या वाचकप्रिय लेखक म्हणून त्या प्रसिद्ध आहेतच; पण त्याहून अधिक मोलाचे त्यांचे सामाजिक कार्य आहे. सुधा मूर्तींनी सामाजिक कार्याचे जे टोलेजंग डोंगर उभे केले आहेत, ते पाहिल्यावर "साहित्यिक सामाजिक कार्यात उतरत नाहीत' असे बोलण्याची हिंमत कुणाला होणार नाही.

कर्नाटकात त्यांच्या पुढाकाराने ग्रामीण भागांतील शाळांमध्ये तब्बल १०१५० ग्रंथालयांची निर्मिती झाली आहे. सर्व शाळांमध्ये कॉम्युटर उपलब्ध करण्याचे त्यांचे कार्य इतिहासाने नोंद घ्यावी असेच आहे. असंख्य अनाथालयांची उभारणी त्यांनी केली आहे. जलसंधारण योजना, माध्यान्ह भोजन योजना, हजारो स्वच्छतागृहांची उभारणी, महिलांसाठी वसतिगृहे, पूरग्रस्तांसाठी घरांचे बांधकाम, शाळा इमारतींचे बांधकाम, सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक आधार, झोपडपट्टी, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी आरोग्य सुविधा, अशी असंख्य समाजोपयोगी कामे त्यांनी कमालीचे कष्ट घेऊन साध्य करून दाखविली आहेत. मुख्य म्हणजे हे सारे करताना "माझ्यामुळे ते झाले, मी केले' असा सुधाताईंचा आविर्भाव कधीच नसतो. समाजातील सर्व थरांतील नागरिकांना जोडून घेऊन त्यांच्या माध्यमातून विविध कामे लीलया मार्गी लावणे, ही त्यांची खासीयत आहे

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा