Pages

रविवार, ७ एप्रिल, २०१९

शाळा निवडायची कशी ?


शाळा निवडायची कशी ?

आपल्या मुलांचा शाळाप्रवेश ही पालकांसाठी महत्त्वाची बाब असते. मात्र कोणत्या शाळेत घालावे, कोणत्या माध्यमात, कोणत्या बोर्डात घालावे, असे अनेक प्रश्न पालकांसमोर असतात. या शाळाप्रवेशाच्या वेळी पालकच गोंधळतात, अशी स्थिती असते. याबाबत पालकांना केलेले मार्गदर्शन..

आपल्या मुलामुलींचा शाळेतील प्रवेश हा प्रत्येक पालकासमोरील गहन प्रश्न असतो. पालकांसाठी ही आयुष्यातली सर्वात मोठी कसोटी असते. पालक आपापल्या परीने तयारी सुरू करतात. शाळांची चौकशी सुरू होते. इथे पालक गोंधळतात. शाळेत प्रवेश घेण्याआधी पालकांनी आपापसात विचार विनिमय व उपलब्ध शाळांचा अभ्यास, विश्लेषण करणे आवश्यक आहे. त्यासाठी पालकांनी स्वत:चा निकष, कसोट्या लावण्याची गरज आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, केवळ शाळांच्या वेबसाइटला भेट देऊन आपले मत बनवू नये. हा विषय अधिक समजून घेण्यासाठी आपण शाळा निवडीचा १०० गुणांचा तक्ता तयार करू या. या तक्त्यामध्ये १० निकष असतील तसेच समजूतीकरता प्रत्येक निकषाला १० गुण देऊ या. व्यक्तीगत पातळीवर आपण हे गुणांचे मूल्यांकन, आपापल्या व्यक्तीगत विचाराप्रमाणे लावू शकता.

१. माध्यम : जगातील सर्व शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत, बालमानस तज्ज्ञ हे सर्व एकमताने मातृभाषेतील शिक्षण हे मुलांसाठी लाभदायक असते, हे वारंवार सांगत आले आहेत. तरीसुद्धा इंग्रजी माध्यमांच्या शाळेची मागणी वाढत आहे. या विषयाला अनेक कंगोरे आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या विचारानुसार माध्यम निवडणे हे चांगले.

२. परिसरातली शाळा : शहरातील वाहतूक आणि सुरक्षितता यांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यासाठी नेबरहूड स्कूल ही संकल्पना आता जगभर रूढ होत आहे. मुलांचा शाळेत जाण्या-येण्यास लागणारा वेळ आणि त्यामुळे होणारी त्यांची शारीरिक आणि मानसिक दमणूक, शाळेत काही कारणासाठी थांबावे लागल्यास निर्माण होणारा वाहतुकीचा प्रश्न या सर्वांचा विचार केल्यास मुलांची शाळा शक्यतो आपल्या परिसरातली असावी.

३. संग्लन अभ्यास मंडळ: शाळेत राबविला जाणारा अभ्यासक्रम, अध्यापन शास्त्र, अध्यापन पद्धत आणि हे सर्व ज्या शिक्षण मंडळाशी संग्लन असेल ते मंडळ [बोर्ड] हे पाल्याच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी अतिशय महत्त्वाचे असते.

आपल्याकडे १] एसएससी बोर्ड २] सीबीएससी , ३] आयसीएससी आणि ४] जीआयएसबी. [ इंटरनॅशनल स्कूलिंग] यांचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या गरजेप्रमाणे विचार करून, शैक्षणिक अभ्याक्रम निवडावा. यामध्ये सीबीएससीचा अभ्यासक्रम देशभर उपलब्ध असल्याने जास्त लोकप्रिय आहे.

४. भौतिक साधन सुविधा : यामध्ये प्राथमिक साधन सुविधा म्हणजे सुरक्षित इमारत व विद्यार्थ्यांच्या संख्येस पुरेसे असणारे क्रीडांगण व खेळ सुविधा, वर्गात पुरेसा उजेड, खेळती हवा व वर्गातील मुलांच्या संख्येने तुलनात्मक क्षेत्रफळ, पुरेशी स्वच्छ स्वच्छतागृहे. मुलांमुलींसाठी वेगवेगळी स्वच्छतागृहे यांचा समावेश होतो. तर शैक्षणिक साधन सुविधांमध्ये ग्रंथालय, प्रयोगशाळा व इतर शैक्षणिक साधनांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे आहेत त्या सुविधांचा विद्यार्थ्यांना कितपत उपयोग होतो, हे महत्त्वाचे आहे.

५. आर्थिक भार : अनेकदा एखाद्या शाळेत प्रवेश घेणे सोपे असते. परंतु दरवर्षी वाढणारे शुल्क व इतर खर्च याचे भान पालकांना प्रवेश घेताना नसते. नंतरच्या वर्षात ते जाणवू लागते. पण तोपर्यंत परतीची वाट बंद झालेली असते. अशा प्रसंगात व्यवस्थापनावर ताशेरे ओढून किंव्हा लढा देऊन काहीही उपयोग नसतो.

६. शिक्षक गुणवत्ता व मानसिकता: आजच्या आधुनिक काळातसुध्दा विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन हे शिक्षकच आहेत. शाळेतील शिक्षकाची सर्वसाधारण गुणवत्ता ही यशस्वी शाळेची खूणगाठ आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. आधुनिक शिक्षण शास्त्रात शिक्षक हा केवळ शिक्षक न राहता विद्यार्थ्यांचा मार्गदर्शक, [फिलोसॉफर आणि गाईड] असतो. शाळेतील शिक्षकांच्या शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच त्यांची मानसिकता हा पण महत्त्वाचा घटक आहे. शाळेतील शिक्षकांची प्रयोगशिलता, शिकण्याचा आणि शिकवण्यातील उत्साह हे सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचे असतात. या सर्व गोष्टींबरोबर शिक्षक या शाळेत समाधानी आहेत की नाहीत, ते त्यांना मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यावर ठरत असते.

७. संस्थेचा इतिहास आणि परंपरा : प्रवेश घेणारी शाळेची पालक संस्था किती जुनी आहे, तिचा इतिहास व कामगिरी कशी आहे, समाजात संस्थेचे नाव किती आहे, याचा पालकांनी विचार करणे आवश्यक आहे.

८. वर्तमान व्यवस्थापन : संस्थेचा इतिहास आणि परंपरा निश्चितच संस्थेबद्दल विशेष माहिती देत असतात. तरीही संस्थेची सध्याची परिस्थिती लक्षात घेणेही तेवढेच आवश्यक आहे. त्याचबरोबर वर्तमान व्यवस्थापनातील व्यक्तींचे समाजातले स्थान, त्यांचे एकंदरीत शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक धोरण हे सर्व निकषाचे मानदंड आहेत

९. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग : यामध्ये ई-लर्निंग सुविधा याचबरोबर प्रशासनात आणि संपर्कासाठी किती प्रमाणात आधुनिक संगणकीय पध्दतीचा वापर केला जातो, याची माहिती करून घेणे गरजेचे आहे.

१०. पालक, शिक्षक आणि व्यवस्थापन यांचे एकमेकातील स्नेहसंबंध आणि विश्वास : व्यवस्थापन पालक संबंध या संदर्भातली व्यवस्थापनाचे धोरण व वागणूक कितपत संवेदनशील आहे, हे सर्व घटक शाळेतील आनंददायी वातावरणाला मदत करत असतात.

११. कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास : बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणकौशल्याची वाढ व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातात. काही शाळा विशिष्ट गुणकौशल्य जोपासतात. काही शाळा शैक्षणिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा या क्षेत्रांना वेगवेगळे प्राधान्य देतात. आपल्या पाल्याची आवड आणि जीवन विकास कौशल्याबद्दल पालकांनी सजग असणे आवश्यक आहे.

१२. शाळेतील संस्कृती व शिस्त: आपण ज्या शाळेत आपल्या पाल्यास प्रवेश घेत आहोत, त्या शाळेची एकूणच संस्कृती आपल्या संस्कृतीशी मिळतीजुळती आहे की नाही, हे पालकांनी मोकळ्या मनाने जाणून घेतले पाहिजे. नाही तर यामध्ये पाल्याचा म्हणजे विद्यार्थ्यांचा मानसिक संघर्ष होऊ शकतो. शाळेतील आणि घरातील संस्कारात आणि संस्कृतीमध्ये विरोधाभास असेल, तर विद्यार्थ्यांची मानसिक कुचंबणा होऊ शकते.

"खाऊ"


"खाऊ"



आत्ताच टीवीवर एका सुपची जाहिरात बघितली. एकदम छान आणि प्रेमळ मम्मी अप्रन बांधुन मुलांना सुप देत होती आणि मुलांना म्हणत होती की "मै हूँ ना आपकी मास्टर शेफ"!!! आणि मग सूप पिउन खुश झालेली मुले मम्मीला म्हणतात "मम्मी तुम तो वर्ल्ड की बेस्ट शेफ हो। i love you मम्मी।.

खुप छान वाटले. पण मनात विचार आला की आपली मम्मी म्हणजे आई काही अशी अगदी नीटनेटकी आणि साडीला एकही साधी चुणी पडली नाहीये, अशी स्वयंपाकघरात कधीच दिसली नव्हती. ती तर बिचारी सतत कष्ट करत असल्यामुळे दमलेली दिसायची आणि मग आठवला तो खाद्यप्रवास!!.........

मला आठवतं! मी लहानपणी भूक लागली हे सांगताना आधीच सांगायचे "आई! काहीतरी नवीन खायला दे. ते शिरा पोहे नको बरे!! आणि हो! आज जेवणात नवीन काही भाजी कर बघू! आधी कधी खाल्ली नसेल अशी!" आई बिचारी 'हो' म्हणायची.

मला आठवतं एक ते खमंग आणि ताज्या भाजणीचे थालीपीठ खाऊ घालता यावे म्हणून आई दूर कुठल्या गिरणीवर दळण घेऊन जायची. का तर तिथे भाजणी चांगली दळुन मिळते.

भाजणी दळताना त्या खमंग वासात चेहऱ्यावरची रेषही बदलु न देता काम करणारा तो गिरणवाला म्हणजे खरा कर्मयोगी.

त्या छान भरपुर कोथिंबीर आणि कांदा घातलेल्या थालीपीठावर नुकता काढलेल्या लोण्याचा गोळा. बास...! केवळ स्वर्गसुख!!

मे महिन्याच्या आधी आईची लगबग असायची ती उन्हाळ्यातले साठवणीचे पदार्थ बनवायची. मग त्यात पापड, चिकोड्या, कोकमाचे सरबत असे बरेच काही असे. स्वच्छ घासुन-पुसुन ठेवलेल्या काचेच्या बरण्यांमध्ये अतिशय सुंदर रंगाचे कोकम-साखर-मीठ घालुन उन्हात ठेवले जात. मग हळुहळु त्यांचा रंग खुलत जाई.

हे सर्व का तर, उन्हाळ्यात सर्व भाज्या मिळत नाहीत म्हणून ही तोंडी लावन्यांची बेगमी.

रोज रात्री अंगतपंगत जेवण होई. कधी वालाची डाळ, कढी आणि फोडणीची मिरची तर कधी भाकरी आणि माठाची भाजी. प्रत्येक भाजी खाल्लीच पाहीजे असा वडीलांचा आग्रह असे.

आत्ता सारखे नूडल्स, सुप्स असे कुठे जास्त खायला मिळायचे तेव्हा? पण रोज नव्या पदार्थाचा हट्ट. मग कधी मैद्याची भजी, कोळाचे पोहे, कोथिम्बिरीच्या वड्या तर कधी चुरमुऱ्यांचा चिवडा असे काही ना काही चहाबरोबर खायला मिळे.

आई खुप सारे मसाले, चटण्या घरी करायची. खलबत्ता धूऊन-पुसून त्यात ते मसाले चटण्या वाटायची.

ती आईच्या हातची लसणीची तिखट आणि भरपूर तेल घातलेली चटणी आणि गोल शुभ्र भाकरी अजुनही आठवली की भूक खवळते.

आता आईचे वय झाले. आधीसारखे खुप कष्ट तिला जमत नाहीत. पण तरी घरी येताना आमच्यासाठी कसकसली पीठे,लाडू,वड्या आणणे चालूच असते तिचे.

त्यादिवशी तिने माझ्या मुलासाठी ताजे मेतकुट आणले. गरम गरम मऊ भात त्यावर लोणकढीे तूप आणि मेतकूट. किती जेवलो याचा अंदाजच आला नाही.

अचानक आठवले आपली खाद्य यात्रा एव्ह्ढी समृद्ध करणाऱ्या आईला आपण कधीच म्हणालो नाही,

 "मम्मी तुम तो वर्ल्ड कि बेस्ट मम्मी हो ! I love you मम्मी !!".

जगा, जगवा आणि जगू द्या !!!


एका वडिलांनी आपल्या मुलाला दिलेले अतिशय सुंदर,
समर्पक उत्तर....
दोन पिढ्यांमधला जगण्यातला फरक....
प्रत्येकाने वाचावं असं काही....

एका तरुणाने आपल्या वडिलांना विचारले:
"तुम्ही पूर्वीच्या काळी कसे काय हो रहात होतात ???

तंत्रज्ञान नाही...
विमाने नाहीत...
इंटरनेट नाही...
संगणक नाहीत...
फारसे नाटक/सिनेमे नाहीत...
टीव्ही तर नाहीच....
एअर कंडिशनर नाही...
कार नाहीत
मोबाईल फोन नाहीत...

त्यावर बाबांनी उत्तर दिले.....

"बाळा, तुमची पिढी खालीलपैकी गोष्टी नसताना आज जशी राहू शकते ना, तसेच तू सांगितलेल्या गोष्टींच्या अभावात आम्ही रहायचो".....

श्रद्धा-प्रार्थना नाही...
प्राणिमात्रांविषयी करुणा नाही...
कुणाशी सन्मानपूर्वक वागणं नाही...
वडिलधाऱ्यांविषयी आदर नाही...
सुशीलता, लाजलज्जा नाही...
विनम्रता तर नाहीच नाही...
खेळ नाहीत, व्यायाम नाही ...
योग-प्राणायामाचा तर पत्ताच नाही...
प्रत्येकाशी प्रत्येकक्षणी स्पर्धा, निकोप-निरपेक्ष 'मैत्र' नाही...
सखोल वाचन नाही...
अवघं जगणं उथळ, जगण्याच्या तत्त्वज्ञानाचा थांगपत्ता नाही...

1960 ते 1990  या काळात जन्मलेलो आम्ही खरचं भाग्यवान होतो. आम्ही परिपूर्ण असं जीवन जगलो!

खेळताना आणि सायकल चालवताना आम्ही कधीच हेल्मेट घातलं नव्हतं.

शाळेतून घरी आल्यावर आम्ही संध्याकाळपर्यंत मनसोक्त खेळलो. आम्ही टीव्ही नाही पहात बसलो.

आम्ही आमच्या जिवाभावाच्या मित्रांसोबत खेळलो, बनावट-बदमाष इंटरनेट मित्रांबरोबर नाही.

आम्हाला जर कधी तहान  लागली तर, आम्ही नळाचे, विहीरीचे पाणी प्यायलो, बाटलीबंद पाणी नाही प्यायलो.

हाती पैसे कमी म्हणून, आम्ही एकाच ग्लासात दोघं मित्र ऊसाचा रस, सरबत पीत असू... त्यामुळे, वाटण्यातला निर्भेळ आनंद गाठी बांधला, ती काही आमची उपासमार नव्हती

आम्ही दररोज भरपूर वरण-भात-भाजी खात होतो, पण चायनीज, फास्टफूड खाल्ल्यासारखे आम्ही वजन वाढून लठ्ठ नाही झालो.

सर्वत्र हिरवळ, साधे मातीचे रस्ते म्हणून साध्या स्लिपर घालून फिरतानाही कधि त्रास जाणवला नाही....

आमच्या आई आणि वडीलांना आम्हाला निरोगी व शरीरसंपन्न ठेवण्यासाठी कोणताही विशेष आहार (ब्रॅण्डेड फूड) आम्हाला द्यावा लागला नाही.

आम्ही स्वत:चे साधेसुधे खेळ स्वतः तयार करायचो आणि ते मनसोक्त खेळलो, त्या खेळांनी निसर्ग-पर्यावरणाचा कधि घात झाला नाही.

आमचे आईवडील श्रीमंत नव्हते. ते आम्हाला भौतिक सुख देऊ शकले नाहीत; पण प्रेम त्यांनी भरभरुन दिलं आणि आम्ही ते घेतलं.

आम्हाला कधीही सेलफोन, डीव्हीडी, प्ले स्टेशन, व्हिडिओ गेम, पर्सनल कॉम्प्युटर, इंटरनेट चॅटचा विचारही शिवला नाही... तरीही पाचपन्नास खरेखुरे मित्र आम्ही राखून होतो.

आम्ही आमच्या मित्रांच्या घरी कुठल्याही निमंत्रणाशिवाय कधिही जात होतो आणि एकत्र जेवायचो देखील.

अामच्यावेळी आमचं कुटुंब आणि इतर नातेवाईकांबरोबर असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे आम्ही खूप आनंदी होतो.

आमच्या त्यावेळी काढलेल्या काळ्या-पांढऱ्या
पुसट झालेल्या फोटोंमधूनच तुम्ही त्या 'रंगीतस्मृति' शोधू शकता.

आमची पिढी, एक अनोखी आणि अधिक समजूतदार पिढी आहे; कारण, आमची ही अशी शेवटची पिढी आहे की, ज्यांनी आपल्या वडीलधाऱ्यांच नेहमीेच एेकलं आहे आणि ज्यांना आज आपल्या मुलांचेही एेकावे लागत आहे!  आणि, आम्ही अजूनही एवढे हुशार नक्कीच आहाेत की, आमच्यावेळी अस्तित्वात नसलेल्या तंत्रज्ञानाचा योग्य वापर कसा करायचा, याचं मार्गदर्शन वेळप्रसंगी तुम्हाला करु शकतो !!!
जाता जाता बाळा, मला एक प्रश्न तुमच्या नवतरुण पिढीला विचारायचाय, "तुमची पिढी जर एवढी सुखसंपन्न, संसाधन-तंत्रज्ञानयुक्त व नशिबवान आहे; तर, मग ती थबकून कधि खराखुरा 'विश्राम', खरीखुरी विश्रांती का घेऊ शकत नाही... त्यासाठी, अनिवार्यपणे तब्येतीचा आणि कौटुंबिक स्वास्थ्याचा सत्यानाश करणाऱ्या मादक पदार्थांचाच आश्रय हरघडी का घ्यावा लागतो... सतत, वाघ पाठीशी लागल्यासारखी, तिला जीवनात प्रचंड धावपळ, दगदग का करावी लागत्येय ???"

आमच्याकडे आता वेळ मर्यादित आहे... त्यामुळे, तुम्ही आमच्यापाशी असलेल्या या निर्भळ आनंदी जगण्याच्या 'ठेव्या'चा शक्य असल्यास वा इच्छा झाल्यास लाभ घ्या, "ठेविले अनंते, तैसेचि रहावे", ही अतिशय निसर्ग-पर्यावरणपूरक जाज्वल्य मराठी संस्कृतीतली जीवनशैली, आमच्याकडून जाणून घ्या... स्वतः आनंदी व्हा आणि पुढच्या पिढ्यांचं अस्तित्व कायम राखा... त्यांना जगण्यासाठी सुयोग्य निसर्ग-पर्यावरण व नैसर्गिक संसाधनं शिल्लक ठेवा..... माणूस कितीही मोठा झाला, साधनसंपन्न झाला तरीही तो प्रथम 'दयाळू-मायाळू' असला पाहिजे आणि सरतेशेवटीही तो तसाच असला पाहिजे !!!

जगा, जगवा आणि जगू द्या  !!!

फ्रिज


फ्रिज

असे म्हणतात की एखाद्या देशाची परीक्षा तिथल्या सार्वजनिक शौचालयावरून होते. त्या धर्तीवर मी म्हणेन की एखाद्या घराची परीक्षा त्या घराच्या फ्रिजवरून होते...माझ्या मित्राची आजी फ्रिजला आळशी कपाट म्हणायची. तिला वाटायचे की ज्या वस्तू नीट ठेवायच्या नसतील त्या कोंबण्यासाठी असतो हा फ्रिज.
त्याच्या पुढे जाऊन मला असे वाटते की फ्रिज हा घरच्या घडामोडींचा आणि वातावरणाचा द्योतक असतो.
माझ्या निरीक्षणात आलेले विविध प्रकारचे फ्रिज:

आळशी फ्रिज:
या फ्रिजमध्ये काय सापडेल याचा नेम नसतो. या फ्रिजमधले पदार्थ तिहार जेलच्या कैद्यांसारखे बाहेर पडायची वाट बघत असतात...आणि एकमेकाना तू इथे कधीपासून आहेस हा प्रश्न विचारतात आढळतात.फाशीची शिक्षा मिळूनही प्रत्यक्षात ती मिळेपर्यंत वाट बघणाऱ्या कैद्यांप्रमाणे बसलेल्या एक्सपायरी डेट गेलेल्या बाटल्यांपासून कधीही घरचे लोक भेटायला न येणाऱ्या कैद्यांसारख्या दुर्लक्षित काही दिवसापूर्वीच्या उरलेल्या शिळ्या अन्नापर्यंत सर्व प्रकार असतात इथे ! काही जन्मठेप मिळालेल्या भाज्या निर्विकारपणे "सडत" पडलेल्या असतात.
हा फ्रिज जेलरच्या थंड डोक्याने या सर्व गोष्टींना सामावून घेत असतो!

टापटीप फ्रिज
या फ्रिजमध्ये सर्व वस्तुंना ध्रुवबाळासारखे स्वतःचे स्थान असते.प्रत्येक डब्याला स्वतःचे झाकण असते. भाज्यांच्या ट्रे मधल्या भाज्या फ्लॅट संस्कृती प्रमाणे बंद डब्यात बसलेल्या असतात. त्यांना शेजारच्या भाजीचा "गंध" देखील नसतो.

बॅचलर फ्रिज
हा फ्रिज सहसा रिकामाच असतो.भाड्याच्या घरात घरमालकांनी ठेवलेल्या या फ्रिजमध्ये हॉटेल रूमच्या फ्रिजसारख्या फक्त बाटल्या मात्र असतात. कधी काळी येऊन गेलेल्या आईने जाताना पुसून गेल्यावर त्या फ्रिजची कोणी विचारपूस अथवा घास पूस केलेली नसते.. जाताना आईने करून ठेवलेली लोणची मुरंबे सांभाळत आईची आठवण काढत हा फ्रिज बसलेला असतो.कधी काळी अचानक आलेल्या गर्लफ्रेंडला किचनमधील पसारा दिसू नये म्हणून वस्तू कोंबण्यासाठीही याचा उपयोग होतो.

नवविवाहित फ्रिज
हा फ्रिज उत्साहाने आणि तरुणाईने सळसळत असतो. घरच्या जुन्या वस्तूंच्या बरोबरीने सुपर मार्केटमध्ये मिळणारी एक्झॉटिक फळं आणि फ्रोझन पदार्थांची रेलचेल असते या फ्रिजमध्ये. सगळे नवे पदार्थ या फ्रिज मध्ये स्वतः चे स्थान शोधत असतात.काचेच्या नव्या कोऱ्या बाटल्यांमध्ये शेजारी शेजारी चिकटून बसलेली ऑलिव्ह ऑइलमध्ये केलेली लोणची पाहून जुनी मुरलेली लोणची नाक मुरडत असतात.

NRI फ्रिज
इतर कुठल्याही फ्रिजपेक्षा गच्च भरलेला हा फ्रिज कायम आपण कंफुज्ड असतो. माहेरून आणलेली पिठं मसाले पापड लोणची एकीकडे सांभाळताना दुसरीकडे मुलांच्या आवडीचे चीज पिझ्झा जेली प्रकारही तो लीलया सांभाळत असतो...मात्र जास्त जागा कुठल्या पदार्थांना द्यायची या संभ्रमात असतो.अगदी त्या घरच्या गृहिणीसारखा...तोच संभ्रम.. मुलांची आवड सांभाळताना आपली आवड मात्र फ्रीझरमध्ये गोठवणारा!

ज्येष्ठ नागरिक फ्रिज
 या सर्वात केविलवाणा असणारा...एकेकाळी मुले मोठी होत असताना भरलेल्या या फ्रिजला आता पुन्हा दोघेच राहत असताना आलेलं रिकामपण खायला उठत असते. एकेकाळी चॉकलेटनी भरलेल्या कप्प्यांची जागा आता इन्सुलिन इंजेक्शनच्या पेनांनी घेतलेली असते. आईस्क्रीम ऐवजी फ्रीझर मध्ये मुलांनी भारत भेटीत दिलेला सुकामेवा असतो..सणावारांना मुलांच्या आठवणीसारखीच हमखास बाहेर येतो तो. भाजीचा ट्रे रिकामा असतो करण विरंगुळा म्हणून रोजची भाजी रोज संपवली जाते. उमेदीच्या काळातली वेळेची तारांबळ आता नसल्याने त्या ट्रे ला काही कामच नसते.

कसाही असो मात्र फ्रिजला प्रत्येक घरात मानाचे स्थान असते. जुना असो व नवा हा जर बंद पडला तर साऱ्या घराचे चैतन्य थंड पडते....!!!

बरोब्बर आहे ना ???

परंपरा



#परंपरा

काळानुरूप जावईबापूंमध्ये बदल झाला असला, सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबांत जावई काही ठिकाणी मुलाची भूमिका बजावत असले; तरी त्यांचे इरसाल नखरे आजही कायम आहेत. महाराष्ट्रात तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, खान्देश, कोकण या प्रत्येक भागात जावयाचे लाड करण्याच्या, त्याचे नखरे सहन करण्याच्या अनेकविध पद्धती आजही कायम आहेत. कधीकधी तर या नखऱ्यांचे ओझे हेही आत्महत्येचे कारण ठरते. त्यामुळे मुलीच्या कुटुंबीयांची ससेहोलपट होते. ज्येष्ठ महिन्यातील षष्ठी ही बंगालच्या अनेक प्रांतांत जमाई षष्ठी म्हणून साजरी केली जाते. जावयाचे लाड पुरवले जातात,  ‘‘दिवाळीला तुझ्या घरी आलो होतो, तेव्हा काय केलं तर पिठलंभाकरी. दिवाळीत पिठलंभाकरी... हीच काय जावयाची किंमत. काही गोडधोड नाही की चमचमीत. यापुढे तुझ्या घरी कधी येईल तर शपथ...’’ नवरा आपल्या बायकोजवळ जावयाचा तुझ्या कुटुंबीयांनी कसा अपमान केला, हे सांगत होता. त्यानंतर, उन्हाळ्यात जावयाला पुरणाची पोळी, आमरस असं साग्रसंगीत जेवण अन् कपड्यांचा जोड दिल्यानंतर कुठं जावईबापू शांत झाले. जावई म्हणजे अशा प्रकारे अनेकांना संकट वाटणं साहजिक आहे.



आपल्या हिंदू धर्मात अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. आपल्या जावयाला पुरणाचे दिंड बनवून खावयास द्यावे म्हणूनच ह्या महिन्याला धोंड्याचा महिना असे म्हणतात.महाराष्ट्रात  जावयाच्या तऱ्हाच निराळ्या आहेत. पश्चिम महाराष्ट्रात लग्न म्हणजे सोहळाचा असतो. जावई, त्याचे कुटुंबीय, नणंद, भावजया यांची बडदास्त ठेवावी लागते. हुंडा, त्यासोबतच जावयाला अंगठी, लॉकेट शक्य असेल, तर इलेक्ट्रॉनिक वस्तू असा सगळा संसारच उभा करून द्यावा लागतो. सोबत व्याही, विहीणबाई, नणंद यांचाही मानपान सांभाळावा लागतो. थोडं कुठं कमीजास्त झालं, तर गोंधळच. या सगळ्या परंपरा सांभाळण्यात एखादा मध्यमवर्गीय बाप खचला नाही म्हणजे मिळवलं. आयुष्याची जमापुंजी मुलीच्या लग्नात लावावी लागते. त्यातही पुन्हा एखाद्या लॉनमध्ये लग्न झालं पाहिजे, असं काही जावयांना वाटतं. लॉनच्या खर्चावरून काही स्थळं वधुपित्यानं नाइलाजानं नाकारल्याचीही उदाहरणे आहेत. लग्नात पुन्हा घोडा हवा. नाशिक ढोलच पाहिजे. विशिष्टच बॅण्जोसाठी गळ घातली जाते. लग्नातच बरंचसं दिलं जातं. लग्नानंतर पाचव्या दिवशी मुलीला बोलावलं जातं. तिच्यासोबत जावईसुद्धा येतो. मग, त्याची बडदास्त ठेवावी लागते. हे झालं लग्नाचं. खरं नातं तर पुढं सुरू होतं. पहिली दिवाळी. मग, जावयाला कपडे. जमलंच तर एखादा सोन्याचा दागिना. दोनचार दिवस जावई राहणार, म्हणजे अख्ख घरं त्याच्या पुढंपुढं करायला सरसावलेलं असतं. दिवाळी झाली की, मग संक्रांत. हो, परंपरा सांभाळायला नको का ?

खान्देशातील तऱ्हाही अशीच न्यारी. लग्नातील सर्व प्रथापरंपरा पाळाव्या लागतात. रूखवतात कूलर, टीव्ही, संसारोपयोगी वस्तू दिल्या जातात. नवरदेवाकडच्या बायकांना साड्या द्याव्या लागतात. हलक्या साडीवरून रुसवेफुसवे होतात. लग्नानंतर हळद काढतात, तेव्हा जावयाला बोलावलं जातं. परत सगळा मानपान. नंतर, घरी लग्न निघालं, तर जावयाला प्रत्यक्ष जाऊन निमंत्रण दिलं जातं. एवढंच नाही, तर त्याला भाड्याचे पैसे द्यावे लागतात. नाहीतर, जावईबापू लग्नाला येतील, याची खात्री नसते. लग्नाच्या पंगतीत त्यांचा मानपान ठेवावा लागतो. घरचा नवरदेव राहिला बाजूला. जावयाला काही कमी पडत नाही ना, हे पाहिलं जातं. नाहीतर, जावई रुसला, तर काही खरं नाही. अक्षयतृतीया हा खान्देशातील मोठा सण. मुलगी महिनाभर माहेरी येते. साहजिकच, तिच्यासोबत जावयाला बोलवावं लागतं. जावई दोनचार दिवस राहतात. मग, त्यांना कपडेलत्ते करणं आलंच. एखादा सोन्याचा दागिना त्यांच्यासाठी केला, तर जावयाची तुमच्यावर माया राहते. दिवाळीतही जावयाचा मानपान सांभाळावा लागतो. दर तीन वर्षांनी अधिकाचा महिना येतो. त्यात अधिक वाण द्यावं लागतं. पुन्हा अंगठी आणि कपडे घेणे आलेच. मुलगी बाळंतपणाला आल्यानंतर बाळाच्या बारशाला जावईबापू येतात. त्यांना ऐपतीप्रमाणे टॉवेल टोपी अन् मानपान... असं हे जावयाचं स्तोम असतं.

मराठवाड्यातही काही कमी प्रथा-परंपरा नाहीत. फाटक्या बापालाही लग्न म्हटलं, तर अडीच तीन लाख रुपये खर्च येतो. बरं, पुढं धोंड्याचा महिना, दिवाळी, संक्रांत हे सणवार सुरूच असतात. शिवाय, जावई येईल तेव्हा त्याचा मानपान ठेवावा लागतो. काही समाजांत लग्नानंतर होळी, राखी पौर्णिमेला मुलगी माहेरी आल्यानंतर, तिला घ्यायला जावई आल्यानंतर सर्व प्रथेप्रमाणे करावं लागतं. किमती वस्तू कर्ज काढून दिल्या जातात. ऋण काढून सण साजरे करावे लागतात. विदर्भातही जावयाचा काही कमी बडेजाव नसतो. लग्नात सर्व देवाणघेवाण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मांडवपरतणी असते. नवरीचा भाऊ तिला माहेरी आणायला जातो. ती दोनतीन दिवस थांबल्यानंतर महोदय तिला आणायला जातात. मग, परत कपडे घ्या. जावईबापूचे पाय सासूसासरे धुतात. त्यांना काय हवे नको, ते विचारतात. मुलगी दरवर्षी माहेरी जाते. तिला आणायला जावई आले की, सगळे घर त्यांच्या दिमतीला. भेटवस्तू दिल्याशिवाय त्यांना सहसा जाऊ दिले जात नाही. आखाजीतही जावयाची ऐट पाहण्यासारखी असते. आता भेटवस्तूऐवजी काही जावई थेट पैसे मागतात, हे वेगळे सांगायला नको.

कोकणात या बाबतीत फारशा प्रथा नाहीत. ऐपतीप्रमाणे जावयाला मान दिला जातो. लग्नखर्च बऱ्याचदा दोन्हीकडची मंडळी वाटून घेतात. मुली शिकल्या अन नखरे संपले महाराष्ट्रात सर्वच समाजांत कमीअधिक प्रमाणात मानपानाची प्रथा आहे. त्यात कोणीही मागे नाही. एकाला झाकावं अन् दुसऱ्याला दाखवावं, अशी स्थिती आहे. मात्र, आता त्यात बदल होत आहेत. मुली शिकल्या, नोकरी करू लागल्या. त्यामुळे त्याच आपल्या नवऱ्याचे नखरे सहन करत नाहीत. माहेरी जाताना नवऱ्याला आधीच सर्व जाणीव करून देतात. रुसव्याफुसव्यांची कारणे लग्नात जावई, त्याच्या कुटुंबाचे रुसवेफुसवे सुरूच असतात. वऱ्हाडी मंडळींना सकाळी अंघोळीला गरम पाणी नव्हते.चहा काय गुळचट होता, दुधाचा तर त्यात पत्ताच नव्हता.नाश्त्याला काही चव होती का? हे काय जेवण होते का?पाहुण्यांचे पायच धुतले नाहीत.जावयाचे आईवडील एक संकट.. जावयाच्या आईवडिलांचेही काही कमी नखरे नसतात. त्यांना कुठं काही कमी पडलं, तर विघ्न आलंच समजायचं लग्नात. नवरदेवाएवढी त्यांचीही काळजी घ्यावी लागते. नंतरही वेळोवेळी त्यांचा मानपान ठेवावा लागतो.

विदर्भात जावयाला जेवणाचा आग्रह केला जातो. मग, तो लाजतो आणि पोट फुटेपर्यंत त्याला वाढले जाते. हा अन्याय असल्याचे जावई सांगतात. जावई नव्हे मुलगा! शहरात सुशिक्षित कुटुंबात एकुलती एक मुलगी असलेल्या ठिकाणी जावई आता सासूसासऱ्यांची आईवडिलांप्रमाणे काळजी घेतात. त्यांचं दुखलंखुपलं तर दवाखान्यात नेण्यापासून त्यांचं सर्व करतात. काही जावयांकडे अर्थात मुलीकडे आईवडील राहत असल्याचीही उदाहरणे आहेत. जावई हे सासूसासऱ्यांना मुलांप्रमाणे प्रेम देतात.

समस्त जावईबापूंना एक नम्र विनंती आहे की धोंड्याचा महिन्यात सासुरवाडीला जाताना आपल्या सासू सासर्‍यांसाठी एखादं सरप्राईज गिफ्ट नक्कीच घेवून जावे , त्यांनाही नक्कीच आवडेल , बायको तर तुमच्या अधिक प्रेमात पडेलच..!
अन् नात्यातील प्रेम असेच वाढेल..!!

धोंडयाचा_महिना


धोंडयाचा_महिना

आपण वापरत असलेली शालिवाहन शक ही चांद्र कालगणना असून एका शक वर्षात ३५४ सौर दिवस असतात. तर एक सौर वर्ष हे ढोबळमानाने ३६५ दिवसांचे असते।त्यामुळे चांद्र आणि सौर कालगणना यांत साधारणपणे ११ दिवसांचा पडणारा फरक अधिक मासाने पूर्ण केला जातो.

पंचांग म्हणजे तिथी ,वार,नक्षत्र ,योग आणि करण हि पाच अंगे.
या पैकी फक्त तिथी आणि नक्षत्र हे वैज्ञानिक आहे. वार हे व्यावहारिक आहेत आणि योग -करण हे अवैज्ञानिक आहेत. चंद्राचे परिवलन आणि परिभ्रमण यांना लागणारा कालवधी एकसमान असतो. तो साधारण पणे २८ ते २९ सौर दिवसांचा असतो. परिभ्रमण कक्षेचे एकसमान तीस भाग केले तर एक भाग म्हणजे एक तिथी . म्हणजेच चंद्राची पृथ्वीभोवती असणारी भ्रमणकक्षा एक वर्तुळ म्हणजेच ३६० अंश गृहीत धरले तर एक तिथी म्हणजे १२ अंश . याचा अर्थ असा कि , चंद्राला पृथ्वीभोवती भ्रमण करताना १२ अंश अंतर कापायला लागणारा वेळ म्हणजे एक तिथी ! परंतु प्रत्येक तिथी चे अंतर समान असले तरीही , तो कापायला लागणारा वेळ एकसमान नसतो कारण ही कक्षा वर्तुळाकार नसून लंबगोलाकार आहे. चंद्र जेंव्हा पृथ्वीपासून दूर असतो,तेंव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या कमी प्रभावामुळे हे अंतर लवकर कापले जाते. या उलट चंद्र जेंव्हा पृथ्वी च्या जवळ असतो ,तेंव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जास्त प्रभावामुळे अंतर कापण्यास वेळ लागतो. व्यवहारातील सोय म्हणून साधारणपणे सूर्योदयाच्या वेळेसची तिथी ही दिवसभराची तिथी असते. समजा असे गृहीत धरू कि ,सूर्योदयाच्या वेळी अष्टमी म्हणून त्या दिवसाची अष्टमी ही तिथी मान्य केली. परंतु सूर्योदयानंतर थोड्या वेळाने नवमी हि तिथी सुरु झाली आणि दुसऱ्या दिवशी चंद्राने १२ अंश अंतर लवकर कापल्यामुळे नवमी ही तिथी सूर्योदय होण्यापूर्वी संपून ,सूर्योदयाच्या वेळी दशमी ही तिथी असल्यामुळे , त्या दिवशी दशमी ही तिथी मान्य केली. तर या वेळी नवमी तिथीचा क्षय झालेला असतो. तिथी वृद्धी देखील अशीच सांगता येते. मागील दोन वर्षी मात्र तिथी वृद्धीमुळे दोन दिवस विजयादशमी अर्थात दसरा हा सन साजरा झाला होता आणि दोन दिवस दशमी ही तिथी असल्याचे अनुभवायला मिळाले होते. चंद्र कालगणना वैज्ञानिक असली तरीही ती तिथी क्षय आणि तिथी वृद्धी च्या या कारणामुळे व्यवहारात अडचणीची आहे.

अगदी अचूक पद्धतीने कालगणना अभ्यासली तर, एक चांद्र वर्ष हे ३५४ दिवसांचे असते तर सौर वर्ष हे एक सौर वर्ष हे ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंदाचे असते जगात कॅलेंडर एक तर सौर (solar ) आहेत किंवा चांद्र ( lunar ) आहेत ,मात्र भारतीय कॅलेंडर हे जगातील वैशिष्ट्य पूर्ण असे सौर -चांद्र ( Luni-solar ) कॅलेंडर आहे . हा ३५४ दिवस आणि ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंदाचा कालावधी भरून काढण्यासाठी दर तीन वर्षांनी अधिक महिन्याची संकल्पना केलीली आहे . ज्यामुळे चांद्र कॅलेंडर हे सौर कॅलेंडर बरोबर जुळविले जाते. मुस्लिम वापरत असलेले हिजरी आणि फसली हे कॅलेंडर पूर्णतः लुनार कॅलेंडर असल्यामुळे त्यांचे सण वर्षभर फिरत राहतात . या उलट चंद्र कालगणना स्वीकारूनही दर तीन वर्षांनी हिंदू सण आपोआप जुळून येतात त्यामुळे तिथी अशास्त्रीय नाही आणि फक्त ती पंचांगात आहे म्हणून तिथी चुकीची ठरत नाही.

काळ हि विज्ञान विश्वात देखील मान्य केलेली सर्वमान्य समजुत आहे, कारण त्यात नियमितता आणली जाते ,जुळवणी केली जाते .सूर्य सोडून पृथ्वीला सर्वात जवळचा तारा " अल्फा सेंटोरी" हा पृथ्वीपासून ४.२८ प्रकाशवर्ष दूर आहे तर त्यानंतरचा तारा " प्रोक्झीमा सेंटोरी" हा ४.३२ प्रकाशवर्ष दूर आहे . एक प्रकश वर्ष म्हणजे एक वर्षात प्रकाश किरणांनी ,दर सेकंदाला ३००००० किमी वेगाने कापलेले अंतर . याचा अर्थ असा कि, " अल्फा सेंटोरी" पासून निघणारे प्रकाश किरण आपल्यापर्यंत पोचायला ४.२८ वर्ष लागतात . समजा आज " अल्फा सेंटोरी" वर मोठा स्फोट झाला तर ,त्याची माहिती आपल्यापर्यंत पोचायला २०१८ मधील नोव्हेंबर महिना उजाडेल . त्या वेळेप्रमाणे ती घटना त्यांच्या आज दिवशी घडली असेल पण ती घटना आपल्या आज दिवशी घडली असणार. त्यामुळे आज सर्वमान्य असलेले ग्रेगरिअन कॅलेंडर देखील शास्त्रीय दृष्ट्या अचूक नव्हे ! ग्रेगरिअन कॅलेंडर मध्ये ,तर तीन वर्षांनी २९ फेब्रुवारी हा दिवस वाढवून वरील ५ तास ४८ मिनिटे ४५ सेकंद नियमित केले जातात आणि त्या वर्षाला लीप वर्ष म्हणून संबोधले जाते . ग्रेगरियन कॅलेंडर हे जुलिअन कॅलेंडर ची सुधारित आवृत्ती आहे . जुलिअन कॅलेंडर पूर्वी रोमन कॅलेंडर अस्त्वित्वात होते . पूर्वीच्या दहा महिने असणाऱ्या रोमन कॅलेंडर मध्ये सुधारणा करून जुलिअस सीझर ने इ .स. पु . ४६ मध्ये १२ महिन्याचे जुलिअन कॅलेंडर आणले ,ते फक्त युरोप आणि मध्य आशिया रशिया या देशात वापरले जात होते,त्यात १५८२ ला सुधारणा करून दर ४ शतकाला ३ दिवस वाढवून ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारले गेले. जेंव्हा रशियात १९१७ साली ऑक्टोबर क्रांती झाली त्यावेळी जगभर नोव्हेंबर महिना चालू होता ,कारण रशियन झारशाही त्यावेळी जुलिअन कॅलेंडर वापरत होती . आज जगभर वापरले जाणारे ग्रेगरियन कॅलेंडर सुद्धा , वैज्ञानिकांनी अशास्त्रीय ठरवले आहे. शास्त्रीय कालगणना ही कितीही अचूक असली तरी ती व्यवहारात अशक्य आहे.

पृथ्वीचे परिवलन , सूर्याभोवती असणारे परिभ्रमण आणि इतर तार्‍यांभोवती असणारे भ्रमण यांचा एकत्रित अभ्यास केला तर, पृथ्वीला स्वतःभोवती सूर्याच्या अनुषंगाने फिरण्यास २४ तास लागतात तर विश्वातील इतर ताऱ्यांच्या अनुषंगाने २३ तास ५६ मिनिटे ४ सेकंद एवढा कालावधी लागतो. पृथ्वीवर चंद्राच्या गुरुत्वाकार्षानामुळे पृथ्वी मंद होत असल्यामुळे हे घडते आहे . त्यामुळे शतकापूर्वी असणाऱ्या दिवसापेक्षा आधुनिक दिवस १.७ मिलीसेकंद मोठा असल्याचे निदर्शनास आले आहे. जगभरात अचूक आण्विक वेळेचे ज्ञान व्हावे म्हणून २०० आण्विक घड्याळे असून त्यातील वेळ ही अगदी अचूक मानली जाते. तर वैश्विक वेळ पृथ्वीच्या परीवलानाशी संबंधित असून ती अचूक नसते कारण पृथ्वी वरचेवर मंद गतीने परिवलन करते आहे. आण्विक वेळ या वैश्विक वेळेशी जुळवली असता जो फरक आढळून येतो,तो लीप सेकंद वाढवून नियमित केला जातो. या प्रकारे कालगणना केली असता १९७२ साली आढळून आले कि ,आण्विक वेळेपेक्षा वैश्विक वेळ मागे आहे , म्हणून त्यावर्षी पहिल्यांदा ८६४०० सेकंदाचा एक दिवस न मोजता ८६४०१ सेकंदाचा एक दिवस मान्य करून लीप सेकंद वाढविण्यात आला. मागील महिन्यात ३० जून ला असाच एक सेकंद वाढवून ,दिवस एक सेकंदाने मोठा मोजण्यात आला. असले तरीही अजूनही या दोन्ही वेळेत ३६ सेकंदाचा फरक आहे .
मानवाच्या संस्कृती करणाच्या प्रक्रियेत जगातील सर्व मानव जातींनी निसर्गातील विविध घटकांच्या निरीक्षणातून आपापली कालगणना पद्धती विकसित केलेली आहे. वैज्ञानिकांसाठी कालमापन हा संशोधनाचा विषय असला तरी दैनदिन कामकाजासाठी त्याची व्यावहारिक उपयुक्तता मानवासाठी महत्वाची आहे. विज्ञान आणि व्यावहारिक उपयुक्तता यांची सांगड म्हणजेच अधिक मास ,लीप सेकंद किंवा लीप वर्ष या संकल्पना निर्माण केल्या आहेत.

शालिवाहन शकाच्या वर्षाला १२ ने गुणून १९ ने भागल्यानंतर ९ किंवा त्यापेक्षा कमी संख्या येत असेल त्यावर्षी अधिक महिना येतो.
गुढीपाडवा १५ ते २४ मार्चच्या दरम्यान येत असेल त्यावर्षी एक अधिक मास असेल हे नक्की समजावे.अमावस्या तारीख १५ तारखेच्या आसपास येत असेल तर त्यावर्षी अधिक महिना येतो.
दर १९ वर्षांनी तोच महिना अधिक म्हणून येतो. पण काही अधिक महिने ११ किंवा ८ वर्षांनीही येऊ शकतात. १७६० ते २०४५ या काळात १४८ अधिक महिने असून त्यात सर्वाधिक २९ वेळा ज्येष्ठ मासाला मान मिळाला आहे. अधिक महिना किंवा धोंड्याचा महिना हा सूर्य, चंद्र व पृथ्वी यांच्या गतीवर अवलंबून आहे. त्यात काहीही शुभ लाभ नसते. खगोलीय घटना समजून या महिन्याकडे पाहावे.

सकारात्मकता



"काहीच कसं येत नाही गं तुला?" मिहिकाने तिसऱ्यांदा बेरीज चुकवली तेंव्हा मी जराशी चिडलेच. मीच ठरवलं होतं जास्तीतजास्त दोनदा समजावल्यावर तिला यायला हवं.  तिचं लक्षच नव्हतं. तिला बाहेरून येणारे  मांजरांचे आवाज जास्त आवडत होते. मांजरी एकमेकीशी काय बोलतायत ह्यांत तिला जास्त इंटरेस्ट होता. माझं काम सोडून मी बसलेय आणि हिचं लक्ष नाही. "तीन वेळेस सांगूनही कळत कसं नाही तुला? काहीच येत नाही." मी वैतागून बोलले. मी वैतागले कि तिला तिच्या बाबाची आठवण येते. ती बाबाकडे गेली. त्याला म्हणाली, "आईला काहीतरी सांग. खोटं बोलतेय. " मी कान देऊन ऐकू लागले. पुढे म्हणाली, " मला खूप गोष्टी करता येतात. चित्र काढता येतं,कागदाचं butterfly बनवता येतं, सायकल चालवता येते, कोशिंबीरसुद्धा करता येते आणि आई म्हणते कि मला काहीच येत नाही. "

मी खजील झाले. कित्येकदा, मुलांना काय येत नाही हे पाहण्यात आपण एवढे गुंतलेलो असतो, कि त्यांना काय येतं हे आपण पहातच नाही. सरळ judgment देऊन मोकळे होतो.   असं बरंच काही आपण बोलत असतो. तो त्यांच्या स्वत:बद्दलच्या विचारांचा एक भाग बनतो. आपण मुलांशी जे बोलत असतो तेच ती स्वत:शी बोलत असतात. तसाच विचार करत असतात. 

"तू प्रयत्न कर तुला जमेल", हे सांगणं फार महत्वाचं असतं.  "तुला काहीच येत नाही" असं म्हणणं घातक ठरू शकतं. मिहिका तिला काय येतं हे पोहोचवू शकली. बरेचदा, मुलं हे आपल्याशी बोलूच शकत नाहीत. त्यांना काय येतं हे तेही पाहू शकत नाहीत. आपण आपला दृष्टीकोण बदलायला हवा. मुलांना काय येतं हे पहायला हवं.  त्यांनी स्वत:वर विश्वास ठेवण्यासाठी, सकारात्मक होण्यासाठी हे फार फार आवश्यक आहे

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा