Pages

रविवार, ७ एप्रिल, २०१९

कागद


कागद

सगळे कागद लगद्याचे बनवलेले
पण नंतर मोल मात्र प्रत्येकाचे वेगवेगळे.
को-या कागदावर स्तोत्र, मंत्र छापले की केली जाते पुजा .
काही कागदांवर शैक्षणिक  माहिती छापली की होतात पुस्तके.
रोजच्या ताज्या बातम्या छापल्या की होत वर्तमानपत्र
तेच शिळ झाल की त्याला कुठल स्थान मिळेल ते नाही सांगता येत.
कधी कोणी प्रियकर प्रेयसी भावना व्यक्त करुन पाठवतात प्रेमपत्र
प्रेमभंग झाला की फाडून चोळामोळा केला जातात हिच प्रेमपत्र.
काही कागदावर रिझर्व्ह बॅंकेच्या नियमाने छापुन गव्हर्नरची सही झाली की होतात नोटा
नोटबंदित  पुजल्या जाणाऱ्या नोटा कच-यात पण टाकल्या गेल्या.
काही कागदावर विशिष्ट बैंकेन खाते नंबर छापुन चेकबुक केले की याच चेकवर करोडोंचे व्यवहार होतात.

बघितल तर फक्त कागद पण प्रत्येकाचे मोल मात्र वेगवेगळे.

ह्रदयांतर👌


👌 ह्रदयांतर👌 🤝👌

     तात्वीक  भांडण सर्वांशी होते ,पण  "शत्रुत्व" कुणाशीचं   ठेवू नये...
      खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावे, पण मनात कायम "भेद" ठेवू नये..
     एखाद्याशी वाद घालावा, पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
     "अहंकार" हाच  या सर्वाच मुळ आहे, तो विनाकारण  "बाळगुन जगू" नये..
       शेवटी "मृत्यू" हे "सुंदर,शाश्वत वास्तव" आहे, त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.
      आपण जन्माला आलोय ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर "उरलेल्या दिवसांचा "आनंद "  उपभोग घेण्यासाठी याचे "स्मरण" ठेवू या.
       आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.
    "एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे
    क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या.

नाँनस्टिक


नाँनस्टिक.
सध्याच्या युगाला 'अश्म युगाच्या' धर्तीवर 'नॉनस्टिक' युग म्हटलं पाहिजे असं मला प्रकर्षानं वाटतं ! स्वयंपाकघरात या नॉनस्टिकने क्रांती घडवली. बिडाच्या किंवा लोखंडी तव्यावर, चिकटू न देता धिरडी घालण्याचं कौशल्य गरजेचं राहिलंच नाही. बिना तेल - तुपाचे खाणाऱ्यांसाठी तर हे वरदानच!

नॉनस्टिकची भांडी घरात नसणारं घर आता शोधूनही सापडणार नाही. पूर्वी खेडेगावांमध्ये चुलीच असायच्या आणि ही भांडी चुलीवर वापरून चालत नाहीत म्हणून तरी गावांमध्ये बिडाची, लोखंडाची भांडी असत. पण आता गावागावांमध्ये सिलेंडर पोचले आणि त्यापाठोपाठ नॉनस्टिक भांडी ही.

कोणत्याही नव्या संशोधनाचे दुष्परिणाम उशीराच लक्षात येतात. आहारातील लोहाचा, लोखंडी भांड्यांमुळे आपसूकच मिळणारा स्त्रोत आपण हद्दपार केला आणि लोहाच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखान्यांना भरभराटीचे दिवस आले. भली मोठी फी मोजून मग 'लोखंडी कढई वापरायला सुरुवात करा' हा अमूल्य सल्ला आहारतज्ञाकडून घेतला. अजून त्याची अंमलबजावणी बाकी आहे. पण 'काहीही न चिकटून घेण्याचं' आकर्षण इतकं आहे की, अंमलबजावणी अंमळ जरा कठीणच दिसते आहे.

'चिकटू न देणं' हे फक्त अन्नपदार्थ आणि भांडी एवढंच मर्यादित नाही बर कां ! food processor मुळे हाताला कणिक चिकटून घेण्याची पण सवय राहिलेली नाही. पोळ्या बनवायचं मशीन असेल तर पोळी लाटताना पण कणकेला हात लावायची गरज नाही. पोळ्यांना तेल लावायला ब्रश मिळतो म्हणजे तेलाचा पण स्पर्श नको हातांना! भाजी पण निवडलेली मिळते, चिरलेली मिळते. भाजी विकत घेतांना हाताळावी लागते पण हल्ली घरपोच pack केलेल्या भाज्या मिळतात! जेवतांना मात्र हाताला पोळी भाजीचा स्पर्श होतो. डबा असेल तर त्याला पर्यायच नाही. बाहेर जेवतांना काटे – चमचे अनिवार्यच. भात आणि डाळ फ्राय सुद्धा चमच्याने खाणे सर्वमान्य आहे. हातांना आपण इतकं नॉनस्टिक केलंय की, भजी तळणीत हातांनी सोडता येतात हे विसरलो आहोत. हातांचा tan घालवायला विकतचे लेप लावून स्वस्थ बसणं मान्य आहे पण बेसनात हात घालणं मान्य नाही!

उरलेलं अन्न दुसऱ्या भांड्यात काढून ठेवतांना, बोटांनी नीट निपटून काढायचं असतं, दुधाचे पातेले घासायला टाकतांना कडेच्या सायीसकट टाकले तर ओरडा बसायचा. अन्न किंवा साय अशी वाया घालवणे हा अन्नाचा, दुधाचा अपमान समजला जायचा. आता हातांना असा स्पर्श होणे टाळले का जाते ? बेसिनच्या जाळीवरचे घासभर अन्न रोज कचरापेटीत जाते. चमचा अपरिहार्य का झालाय ? अन्नाचा आस्वाद घेतांना डोळे, नाक, जिव्हा ह्यांच्या सोबतीने बोटांना होणारा अन्नाचा स्पर्शपण सहभागी असतो. चमच्याचा अडसर का आवश्यक झालाय ?

पावलांना पण आता मातीचं वावडं आहे. माती आहेच कुठे शिल्लक शहरात ? पण मातीत पाय घालायची वेळ येते तेंव्हा सवयच नसल्याने पावले आक्रसलीच जातात. मग मातीची ओळख करून घेण्यासाठी 'मामाच्या गावाला' सुट्टीत बुकिंग करून जावं लागतं ! हल्ली तर पावलांना घरातल्या flooring चं पण वावडं आहे. स्लीपर्स असतात ना सतत पायात !

नॉनस्टिक हात, नॉनस्टिक पावलं एकवेळ चालतील; पण मन नॉनस्टिक होऊ देता कामा नये. त्याचीच भीती वाटायला लागली आहे हल्ली ! मनाचा हा निर्लेप - पणा बधीरतेकडे झुकणारा आहे. कोडगेपणाकडे जाणारा आहे. संवेदनशीलतेला बाधा आणणारा आहे. अंगाला काहीही लावून न घेण्याच्या वृत्तीला खतपाणी घालणारा आहे.

शेजारच्या घरात काय चाललंय हे समजत नाही, इथपासून माझ्या एकट्या राहणाऱ्या मावशीचं, आत्याचं, काका काकूंचं, आई वडिलांचं काय चाललंय, कसं चाललंय तेच मला माहिती नाही, इथपर्यंत परिस्थिती गंभीर झाली आहे.

मनाचा नॉनस्टिकपणा खरवडून काढायला हवाय. दुसऱ्याची वेदना, दुसऱ्याचं दुःख मनाला चिकटायला हवं ! असं अस्वस्थ असलेलं मन पाहिलं तर हायसं वाटतं. घरात मृत्यू पावलेल्या कोण्या एकाच्या मृत्यूची कल्पना शेजाऱ्यांना, दुर्गंधीमुळे कळावी ? ही बातमी वाचून जेंव्हा काहींच्या डोळ्यात का होईना अश्रू तरळले असतील आणि एखाद्याने जरी त्यातून शिकवण घेऊन एकाकी ज्येष्ठ नागरिकांसाठी काही कार्य करायचे ठरवले असेल तरी हे आश्वासक आहे. सर्वच मने नॉनस्टिक नाही झालीयेत ! शरीरासाठी लोहाच्या गोळ्या तरी आहेत, मनाला काय देणार ?

खिडकी


खिडकी
©राधिका कुलकर्णी.

खिडकी म्हणले की डोकवणे आलेच.
सहज स्वाभाविक गूण च आहे मानवी मनाचा काही उघडे दिसले की त्यात वाकून बघायचेच.
घराला खिडकीची योजना का?
तर, घरात हवा खेळती रहावी.घरातले वातावरण शुद्ध आणि प्रसन्न व्हावे.
पण खिडकीचे ईतकेच उपयोग नाहीएत.लोकांनी सोयी सवडी आणि गरजे नूसार ह्याचे अनेक फायदे शोधून काढलेत.
म्हणून तर गाणे पण फेमस झालेय जून्या काळात..
"शाम ढले खिडकी तले
तूम सिटी बजाना छोड दो।"
प्रेमी युगूलांनी तर ह्या खिडकीचा किती विविध रूपांनी फायदा घेतलाय ते तर आपण चित्रपटांमधून आणि कित्येकदा प्रत्यक्षदर्शी ही बघितलेच असेल.
खिडकीतून चिठ्ठ्या पोहोचवणे,दार उघडे असूनही गुपचूप तासनतास खिडकीतून गप्पा मारणे तर मैत्रीची पर्वणीच.
"घे ग ,तूझी दूधाची पिशवी बाहेरच टाकून गेला बघ दूधवाला" असे सांगत खिडकीतून जाता जाता शेजारधर्म पाळणारीआईची प्रेमळ मैत्रिणही ह्याच खिडकीचा वापर करते.
कधी चाळीतील घरांमधे पाहूणे अचानक आले आणि दूध,चहा पावडर किंवा साखर संपली तर त्यांना नकऴत रसद पूरवठ्याची हमखास सोय म्हणजे हिच खिडकी.

पण काय हो हीच खिडकी जर आपल्या शरीरावर असती तर!!
म्हणजे ,
उदा: जर एखाद्या जाड्याच्या ऋदयाला ही खिडकी असती तर,त्याला दिसले असते ना की त्याच्या अवास्तव पसरलेल्या देहाला रक्त पुरवठा करता करता बिचाऱ्या ऋदयाची किती त्रेधा उडतीय.ते शीव्या घालून धापा टाकत सांगेल 'अरे, जरा ह्या देहाला आवर घाल ...
किती उधळलाएस चौखूर गूरा सारखा.
आता तू जर वेळेवर थांबला नाहीस ना तर मीच थांबेन एक दिवशी'
जर हिच खिडकी एखाद्याच्या पोटावर असती तर!!
अरेरे..!!तीथली गटार बघून तर आपणच आपल्या नाकावर हात ठेवला असता. स्वत:च माजवलेल्या घाणीची किळस करून तोंड फिरवले असते.
मग कळले असते की बकबका अद्वा-तद्वा चरून आपणच आपल्या शरीराची काय दुर्दशा करून ठेवलीय ते.
कदाचीत ते पाहून तरी आरोग्याचे महत्त्व पटून लोक "नियमीत व्यायाम आणि संतूलीत आहार"
ह्या संकल्पनेला राबवते झाले असते.
वरून नूसते सुंदर दिसणारे शरीर आतूनही स्वच्छ आणि सूंदर राखण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले असते नाही का!!

तशीच एक खिडकी मनाला ही असती तर !!!
अंतरंगात प्रत्येका विषयी वर्षानूवर्ष जपून पाळून ठेवली आसूया,अढी,राग,संताप,लोभ, मोह,मत्सर,द्वेष इर्षा षऽरिपूं मूळे ते किती मलीन आणि काळे कभीन्न झालेय हे दिसले असते.
कदाचित ते अंतरंग रडताना दिसले असते.म्हणाले असते,"अरे ,चढाओढीच्या स्पर्धेत पळता पळता माझी काय वाईट अवस्था करून ठेवलीएस तू "
का? कशासाठी?
शेवटी काय नेणारेस सोबत?
मग का एवढी आसक्ती मोह अन् मायेची भूक तूला?
तूझ्या आसूरी भूकेला कोंबून कोंबून मी पार मरून गेलोय रे.!
गुदमरतोय माझा आत्मा.
माझी ह्यातून सोडवणूक कर.माझी ही अमानूष पिळवणूक थांबव रे मनुष्या थांबव. !!"
नाहीतर एक दिवस तो असेल की मी उरणार नाही.
मी नसेल तर तू ही नसशील.असून नसल्या सारखा भीक मागशील मन:शांती साठी, पण ती ही मिळणार नाही आणि तडफडून मरशील तूझ्या सहीत मीही..
म्हणून एकदा फक्त एकदा तरी ह्या खिडकीत वाकून बघ.ऽऽ

एकदाच बघ !!!?

©राधिका कुलकर्णी..
( थोडेसे मनातले )

दिलखुलास दाद



दिलखुलास दाद 🌷

संध्याकाळी पाच साडेपाचची वेळ. मुंबईहून नाशिकला येतांना जो टोलनाका आहे त्यावर गाड्यांची गर्दी होती.
या टोलनाक्यावर काही तृतीयपंथी येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांपाशी थांबून पैसे मागत असतात. गाडीच्या काचा बंदच असतात बहुतेकांच्या. ज्यांच्या उघड्या असतात त्यांच्याकडे ही मंडळी थांबतात. त्या दिवशी टोलनाक्यावर गर्दी आणि हे पैसे मागणारे तृतीयपंथी. मी बघत होते..शेजारीच असणाऱ्या गाडीच्या मागच्या सीटवर एक सुंदर तरुण मुलगी एकटीच बसली होती..काहीतरी वाचत असावी. तिचं लक्ष बाहेर नव्हतं म्हणून इतर लोकं ज्यावेळी त्यांना बघून पटापट आपल्या गाडीच्या काचा बंद करत होते पण ती मात्र या सगळ्यापासून आपल्याच विश्वात गुंग होती..
एक हिरवी साडी नेसलेला तृतीयपंथी त्या गाडीच्या जवळ गेला..तिथेच एक गजरेवाला होता..त्याच्यापाशी थांबून त्याने  टपोऱ्या  मोगऱ्याच्या फुलांचा भरगच्च गजरा घेतला..खरंतर गजरा घ्यावा असे मलाही वाटले होते पण ‘त्याच्या समोर पूर्ण काच खाली करायला नको म्हणून जराशी काच खाली करून निदान फुलांचा वास तरी आपल्यापर्यंत पोहोचतोय का ते बघत होते. 
गजरा घेऊन तो त्या मुलीच्या दिशेने वळला आणि तितक्यात त्या मुलीचे त्याच्याकडे लक्ष गेले..
तिचं देखणं रूप आणि अचानक झालेली नजरानजर..त्याने एकदम तिला विचारले..” हे अनारकली..., किधर चली..?”
एक सेकंदही वेळ न लावता ती मुलगी तितक्याच मिश्किलपणे पटकन त्याला म्हणाली..”डिस्को चली..!!!”
त्या दोघांच्याही चेहऱ्यावर एकदम हसू..अचानक आलेल्या या उत्तराने तो क्षणभर चपापला..त्याला अनपेक्षितच होते तिचे उत्तर..त्यालाच काय मलाही हसू आले ऐकून..खूप मनापासून..एकदम गंमत वाटली तिच्या या उत्तराची.
तो इतका इतका खुश झाला की त्याने सेकंदाचाही वेळ न लावता आपल्या हातातला मोगऱ्याच्या फुलांचा ओंजळभर गजरा तिला देण्यासाठी हात पुढे केला..
एक क्षणभर तिच्या चेहऱ्यावर तो घेऊ की नको असे भाव आले..पण क्षणभरच...
तिनेही तो गजरा दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतला..तिची गाडी पुढे सरकली..
त्याने दुरूनच तिला म्हटले “ऐसेही खुश रहो बेटा..!” आणि तो दुसऱ्या गाडीकडे वळला..
माझ्या समोर नुकत्याच आणि अचानक घडलेल्या त्या घटनेचा अनुभव माझ्यासाठी इतका सुंदर होता की मी नखशिखांत थरथरून गेले!
एका हजरजबाबी उत्तरला इतकी दिलखुलास दाद मनापासून देणारा ‘तो आणि त्याला एक ‘माणूस म्हणून समजून घेणारी ‘ती मला त्या वेळेला जगातली अत्यंत सुंदर माणसं वाटली..
आपले किती गैरसमज आणि पूर्वग्रह असतात तृतीयपंथीय लोकांसाठी..पण माणसाची वृत्ती काही लिंगभेदावर अवलंबून नसते. मन सुंदर हवं..जे त्या हिरव्या साडीतल्या व्यक्तीचं होतं..नुसतं सुंदरच नाही तर दिलदार आणि रसिक सुद्धा!
आणि त्या सुंदर मुलीचे मनदेखील अत्यंत सुंदर आणि पूर्वग्रह विरहित स्वच्छ होते..
छोट्याशा क्षणात घडलेले ते माणुसकीचे आणि कलात्म रसिकतेचे मनोज्ञ दर्शनाने माझ्या मनातली जळमटं कायमसाठी स्वच्छ पुसली गेली आणि आजही माझ्यासाठी ती आठवण एक सगळ्यात सुंदर आठवण आहे!

डॉ. अंजली औटी.
# कॅलिडोस्कोप

यशस्वीतेचे रहस्य



यशस्वीतेचे रहस्य  💪🏼💪🏼

एक दिवस नेहमीप्रमाणे ऑफीसमध्ये आलेला प्रत्येक कर्मचारी समोरचा सूचना फलक वाचून आश्चर्य चकित होत होता.

"तुमची या कंपनीमधील प्रगती रोखणाऱ्या व्यक्तीचा काल मृत्यु झाला आहे, त्याच्या अंत्ययात्रेत नक्की सामिल व्हा.  "

सुरवातीला प्रत्येकाला कुठल्या न कुठल्या सहकाऱ्या बद्दल वाईट वाटलं.

पण नंतर उत्सुकता वाढली, माझी प्रगती रोखणारा नक्की कोण????

यासाठी प्रत्येकजण शवागारात जाऊन तिथे  बांधून ठेवलेल्या तिरडी जवळ जाऊ लागला.
नीट डोकावून बघताच प्रत्येकाचे डोळे विस्फारले, शरीर स्तब्ध झाले, तोंडातून शब्द फुटेना.

कारण त्या शृंगारलेल्या तिरडीवर एक मोठा आरसा ठेवला होता. प्रत्येकजण त्यात स्वतःला बघत होता.

तिरडी च्याजवळच एक फलक ठेवला होता,

"या जगात तुम्हाला जर कोणी तुमच्या प्रगती पासून रोखु शकत असेल तर तो फक्त अन फक्त तुम्ही स्वतःच आहात"

कंटाळा, आळस, नाकर्तेपणा, कारणे सांगणे, प्रत्येक गोष्टीमधून पळवाट काढणे ,दुसऱ्याला नाहक विरोध, त्याची बदनामी हे फक्त तुम्ही फक्त स्वतः च्य अधःपतना साठी करत असता.

तुमचे आयुष्य कधीही मित्र, कंपनी, जॉब, बॉस बदलल्यामुळे बदलत नाही.

ते बदलते फक्त आणि फक्त तुम्ही स्वतःला बदलता तेव्हाच.

आयुष्याच्या शेवटापर्यंत दुसऱ्याला कितीही दोष दिला तरी तुमची परिस्थिती बदलणाार नाही.
दुसऱ्याच्या आड़ तुमचा नाकर्तेपणा किती दिवस झाकाल?

तुम्ही तेव्हाच मोठे होवू शकता; जेव्हा तुम्ही स्वतः मोठे व्हायचं ठरवाल. अन्यथा या जगात आणि जन्मात तुम्हाला मोठे अथवा लहान, यशस्वी किंवा अपयशी करणे कुणालाही शक्य नाही



पु.ल. देशपांड्यांच्या एका कथाकथनात त्यांनी एक गंमतीदार प्रसंग सांगितला आहे. “ भर दुपारची वेळ. मंडळी उन्हात ताटकळत बसली होती. पण पिंडाला कावळा काही शिवेना. म्हातारीची तशी काही अतृप्त इच्छा वगैरे काही म्हणावी तर तशीही नव्हती. कारण, मुलाबाळांची काळजी आहे म्हणावं तर, त्यांचा मुलगाच चांगली ३०-३५ वर्षं नोकरी करून दणदणीत पेन्शन घेऊन आणखी २०-२५ वर्षं जगण्याइतका टुणटुणीत.. सगळी आश्वासनं देऊन झाली पण कावळा काही शिवेना. शेवटी कुणीतरी म्हणालं, ‘एक मोठ्ठी लोणच्याची बरणी आणि चार कपबशा मिळाल्याशिवाय देणार नाही हो तुमचा शालू बोहारणीला.’ लगेच कावळा शिवला.” या प्रसंगातला विनोदाचा भाग सोडा, पण भावना लक्षात घ्या.

एखाद्याला जीव जसा लावता आला पाहिजे, तसाच एखाद्या गोष्टीत गुंतलेला जीव सहजतेने सोडवून देखील घेता आला पाहिजे. पण, अनेकांना तेच जमत नाही. वेळेवर रिटायरमेंट घेणं कधीही योग्य असतं. पण, काही लोकांना कायमच एक्सटेन्शन हवं असतं. “अतिपरिचयात् अवज्ञा असं जुन्याजाणत्या मंडळींनीच सांगून ठेवलं आहे.

धृतराष्ट्र आणि गांधारीनं जर वेळेवर संन्यास स्विकारला असता तर, कदाचित पुढचं महाभारत टळू शकलं असतं. पण, ‘हस्तिनापूर नरेश या पदावर आवश्यकतेहून अधिक काळ राहणं सगळ्यांनाच महागात पडलं.

माझ्या बाबांचे एक मित्र आहेत. त्यांना दोन मुलगे. दोघेही परदेशात असतात. यांना एके दिवशी अचानक हार्ट अॅटॅक आला. हॉस्पिटलमध्ये नेलं. दोन्ही मुलांना मी फोन केले. दोघांनीही ‘बिलाची रक्कम सांग, लगेच पाठवतो असं सांगितलं, पण दोघेही आले नाहीत. वडील मरणाच्या  दारात असूनही त्यांचं न येणं, यामागे तसंच काहीतरी मोठं कारण होतं. लहानपणापासून गृहपाठ न करणं, परीक्षेत पहिल्या पाचात न येणं, स्कॉलरशिप न मिळवणं, बोर्डातला नंबर थोडक्यात हुकणं या कारणांसाठी चार-चार दिवस उपाशी ठेवणं, पट्ट्याने मारणं, चटके देणं, भर पावसात रात्रभर घराबाहेर उभं करून ठेवणं अशा शिक्षा भोगलेल्या या दोघांनी त्यांची वेळ आली की आस्मान दाखवलं. त्या दोघांनाही अयोग्य म्हणणं जरासं अन्यायकारक होणार नाही का?

भगवद्गीता संस्कृत भाषेत होती, सर्वसामान्य माणसांना ती समजणं कठीण होतं. म्हणूनच, ज्ञानदेवांनी मराठीतून ज्ञानेश्वरी सांगितली. त्यातला कर्मयोग वाचायला हवा. स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला कर्मयोगसुद्धा सहज उपलब्ध आहे. तो वाचला तर अनेक गोष्टी स्पष्ट होतील.

माझ्या एका मित्राची आई बाथरूममध्ये पाय घसरून पडली. पायाचं हाड मोडलं. प्लास्टर घालावं लागलं. माझ्या मित्राला फोन आला. तेव्हा मी त्याच्या समोरच बसलो होतो.त्यानं हॉस्पिटलचा बँकेचा अकाऊंट नंबर घेतला आणि पन्नास हजार रुपये ट्रान्स्फर करून टाकले. एक मिनिटभर शांत होता. नंतर जणू काहीच घडलं नाही अशा आविर्भावात त्यानं त्याचं काम सुरु केलं. मला आश्चर्य वाटलं. मी त्याला विचारलं. तो म्हणाला, “ मी काहीही चुकलो तरी माझी आई ‘अशा दळभद्री मुलाला जन्म देण्यापेक्षा मी निपुत्रिक राहिले असते तर बरं झालं असतं असं चारचौघांत म्हणायची. ‘माझी संपत्ती मी धर्मादाय दान करीन पण या मुलाला एक छदाम देणार नाही, असं म्हणायची. आता तिच्या या दुर्दैवी आशिर्वादाची मला गरज नाही.” मी त्याच्या या उत्तरावर निरुत्तर झालो. त्याला मी या त्याच्या मतावर काहीही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला नाही.

शेवटी काय, स्वतःच्या हातानंच जाणूनबुजून, माहिती असतानाही, बाभळीचं झाड लावलं तर त्याला हापूस आंबा येणार कुठून? हा विचार ज्यानं त्यानं करावा, इतकंच.. अधिक काय लिहावे?

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा