कशासाठी, कोणासाठी आणि किती?... विनीत वर्तक
परवाच एका मित्राशी बोलण झाल. कॉम्प्यूटर क्षेत्रात उच्च पदावर
काम करत असणारा हा मित्र अमेरिकेत जाऊन तिथलाच अमेरिकन बनला आहे. नेहमीच अमेरीकेच गुणगान
तोंडावर असलेला हा मित्र तिथल्या सिविक सेन्स, स्वच्छता, अनेक मुलभूत सोयीसुविधांन
बद्दल अगदी भरभरून बोलत असतो. आमचे ह्यावर शाब्दिक वाद हि होतात पण ते मैत्री पुरते.
अमेरिकेत नवरा बायको दोघेही कमावते. पैश्याची अडचण नाही. इकडे भारतात हि एका सुखवस्तू
कुटुंबातून एकुलता एक म्हणून आपल आयुष्य जगून अमेरिकन झालेल्या माझ्या मित्राच्या पायाशी
सगळीच सुख लोळण घेत होती. पण कुठे तरी काही तरी माशी शिंकते हे त्याला नेहमीच जाणवत
होत.
नक्की काय हे त्याला हि कळत नव्हत. असच फोनवर बोलताना विषय निघाला
सुखाची व्याख्या काय? मी म्हंटल आर यु ह्यापी? त्यावर तो म्हणाला एस ऑफ कोर्स अस का
विचारल? म्हंटल नाही पण ते जाणवत नाही. त्यावर त्याच म्हणन जाणवत नाही म्हणजे काय?
म्हंटल अरे सगळ जे तु सुख मोजतो आहेस त्याची परीमाण काय? म्हणजे समजल नाही. मी म्हंटल
तुझ्या मते सुख काय? पैसा, आरामाच आयुष्य, सगळी भौतिक सुख तुझ्या पायाशी लोळण घेत आहेत.
वर्षातून एकदा कुटुंबासोबत फिरण आणि मज्जा. त्या सोबत काम करून जमा होणारा पैसा म्हणजे
सुख. पण हे सगळ कशासाठी, कोणासाठी आणि किती?
ह्या माझ्या प्रश्नाने तो थोडा विचारात दिसला. अरे तुझ्या आई
बाबांचा एकुलता एक मुलगा. सुखवस्तू कुटुंबातून येताना तुझ्या सगळ्या इच्छा, हट्ट पूर्ण
करून आई- वडिलांनी चांगल शिक्षण दिल. तु हि त्यांच्या ह्या पाठिंब्याचा आधार घेत खूप
उंचावर गेलास. त्यांच्या विश्वासाला सार्थ करत उत्तुंग यश कमावलस. आपल्या जोरावर सातासमुद्रा
पार एका वेगळ्या देशात आपल्या कर्तुत्वाने आपल स्वतःच अस्तित्व निर्माण केलस. तिकडेच
तुझ्या आयुष्याची जोडीदार, सहचारिणी निवडलीस. आई – बाबांनी अगदी आनंदाने अक्षता टाकून
तुमच लग्न लाऊन दिल. पण ह्या नंतर परिस्थिती बदलली. तु अमेरिकन झालास. नव्या नवलाईत
रमलास म्हणून आई बाबांनी दुर्लक्ष केल. काही वर्षांनी एका नवीन पाहुण्याला तुझ्या आयुष्यात
आणलस. तेव्हा तुला आई- बाबांची आठवण झाली का तर दोघेही नोकरी करताना चिमुकल्या जिवाचा
सांभाळ करणार कोण?
मग बायकोने युक्ती लढवली. आई – बाबांना अमेरिका दाखवायच्या बहाण्याने
तु त्यांना अमेरिकेला नेलस. ते हि बिचारे चिमुकल्या जिवाला बघण्याच्या बहाण्याने पटकन
तयार झाले. पूर्ण आयुष्य भारतात एका छोट्या शहरात काढल्यावर त्यांना कोणती हौस होती
अमेरिका बघण्याची? पण एकुलता एक मुलगा नेतो आहे म्हंटल्यावर ते हि पटकन तिकड आले. दोन
तीन जागा दाखवून तु आणि तिने आपल त्यांना ८-९ महिने ठेवून घेतल ते आपला फायदा करण्यासाठी.
त्यांनी हि आपल्या नातवासाठी सगळ अगदी मनोभावे केल जस तुझ केल होत. त्यात कोणताही स्वार्थ
आणि अपेक्षा नव्हती.
वर्ष होत आल. गरज संपली. ते पुन्हा माघारी आले. पुढली वर्षे अशीच
जात राहिली. दिवसातून काय ते दोन फोन कॉल आणि ट्रान्सफर केलेले पैसे हे करून तुझ कर्तव्य
संपल अस मानून तु दिवस मोजत राहिलास. यायची इच्छा असूनही बायकोच्या अधिकारापुढे तुझ
काहीच चालल नाही. इकडे आई – बाबांची तब्येत दिवसेंदिवस खंगत जात होती. पण रोज काय सांगणार
आणि सांगून पण तुला त्रास देऊन तुझ्या सुखी आयुष्यात त्यांना मिठाचा खडा व्हायच नव्हत.
त्यामुळे ते हि न बोलता खेचत राहिले आयुष्य. आता २-३ वर्ष झाली न त्यांनी तुला बघितल
न त्यांच्या छोट्या जिवाला. तु मात्र कुटुंब घेऊन जग फिरत राहिलास. पण त्याचं जग मात्र
हिरावून घेतलस.
आज कुठे आहेत रे ते? काल मला काकू दिसल्या हॉस्पिटल मध्ये डॉक्टरांना
शोधत फिरत होत्या. हातात बरेचश्या फाईल होत्या. काका एका बेड वर निपचित पडून होते.
कुठे जायच, कोणाला भेटायच, काय सांगायच काहीच कळत नव्हत. मी बघितल्यावर त्यांची मदत
केली. साध लिफ्ट च बटन दाबायच ते हि कळत नव्हत. इकडून तिकडे फिरत होत्या. त्यांची हि
अवस्था बघून मला स्वतःचीच लाज वाटली रे. त्या मोठ्या घरात हे दोन म्हतारी माणस एकेमेकांना
आधार देऊन कस जगत असतील रे? एकेकाळी तुझ्या हसण्याची, रडण्याची, आवाजाची सवय असलेल
ते शांत घर आज त्यांना खायला उठत नसेल का रे? ह्या उतरत्या वयात तुझ्या आधाराची गरज
भासत नसेल का रे? सगळ सोडून मायेची गरज भासत नेल का रे? तु कुठे आहेस रे ह्या सगळ्यात?
कुठेच नाही.
आपण धावतो आहोत फक्त घाण्याला जोडलेल्या बैलासारखे. कोणासाठी,
कशासाठी आणि किती ह्याचा कुठलाच विचार न करता. काय मिळवतो आहोत? काय निसटते आहे? ह्याचा
कसलाच विचार न करता फक्त आपण पुढे जात आहोत. भौतिक सुखांच्या मागे. ते खरच सुख आहे
का? ह्याचा विचार तु कर? जमल्यास एकदा ये. भेट त्यांना. कदाचित ते जायच्या आधी तुला
सुखाचा अर्थ समजेल. माझा फोन कट झाला होता. मी त्या फोन कट झालेल्या टोन ला ऐकत रिसिव्हर
खाली ठेवला.
ता. क. :- ह्या गोष्टीचा अर्थ माझ्या कोणत्याही मित्राशी लावू
नये. ह्या गोष्टीतील पात्र काल्पनिक असून कोणाशी जुळल्यास निव्वळ योगायोग समजावा.