Pages

बुधवार, २७ मार्च, २०१९

" तेंव्हा गणित बिघडायला लागतं "



" तेंव्हा गणित बिघडायला लागतं "
----------------------------------------------

मी म्हणतो तसंच
सर्वांनी वागलं पाहिजे
असा आपला अट्टहास जेंव्हा सुरु होतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

आज पर्यंत माझा कोणताच अंदाज चुकला नाही
इतका मी भविष्याचा correct अंदाज घेऊ शकतो
तेंव्हा माझ्या निर्णयाला कुणी विरोधच करायचा नाही
असा अहंकार जेंव्हा खूप वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

एवढं " मी " सागळ्यांसाठी केलं
तरीही
कुणीच त्याची नोंद घेत नाही
चार माणसात कुणी
आमचं कौतुकही करत नाही
अशा अपेक्षांचं ओझं
जेंव्हा आपण इतरांवर टाकायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

या घरात/ऑफिसात फक्त " मीच " शहाणा आहे
या ऑफिस मध्ये फक्त " मीच " सिन्सीअरली काम करतो आणि बाकीचे सगळे कामचुकार आहेत
हा व्यवसाय जो भरभराटीस आला तो केवळ " माझ्यामुळे " !
इतरांना त्याचं काहीच देणं घेणं नाही असा भ्रम जेंव्हा वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

मी जसं वागतो
तसंच इतरांनी वागावं
हेच खावं , तेचं प्यावं
इतके वाजताच झोपावं
तितके वाजताच उठावं
अशी नाना तऱ्हेची
अनावश्यक बंधन घालून
जेंव्हा आपण इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणायला लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

म्हणून आपल्या अवती भवतीच्या माणसांना स्वातंत्र्य द्या
थोडा मोकळा श्वास घेऊ द्या
नातू झाल्यावरही पोराला
लहान समजू नका !

पदोपदी इतरांचा आपमान करू नका
आपलं मत जरूर नोंदवा
पण आग्रह करू नका
आपल्या मतापेक्षा इतरांच मत ग्राह्य धरल्या गेलं तर राग राग , चीड चीड करू नका
कधी तरी का होत नाही

त्याने तर सांगितले नाही, मला माहीती दिली नाही असा भ्रम जेंव्हा वाढीस लागतो
तेंव्हा गणित बिघडायला लागतं

दुसऱ्याचंही कौतुक करा
मग बघा जगणं किती छान , आनंदी , सोप्प वाटायला लागतं
आणि सगळी गणितं कशी जुळून यायला लागतात .....!!

शनिवार, १६ मार्च, २०१९

विश्वास


.सुंदर बोधकथा...

तो वाळवंटात हरवला होता. त्याच्या जवळच पाणी संपलं त्यालाही दोन दिवस झाले होते. आता पाणी नाही मिळालं तर आपलं मरण निश्चित आहे हेc त्याला दिसत होतं, जाणवत होतं. हताश होऊन तो सभोवताली दूर दूर पर्यंत जेवढी नजर जाईल तिथपर्यंत डोळे ताणून ताणून पहात होता. त्याची नजर अर्थातच पाणी शोधत होती.
तेवढ्यात त्याला काही अंतरावर एक झोपडं दिसलं. तो थबकला. हा भास तर नाही? नाहीतर मृगजळ असेल. पण काही असो, तिकडे जाऊया, काही असेल तर मिळेल असा विचार करत पाय ओढत स्वतःच थकलेलं शरीर घेऊन तो निघाला. काही वेळातच त्याच्या लक्षात आले की तो भास नव्हता, झोपडी खरोखरच होती. पण ती रिकामी होती, कोणीच नव्हतं तिथे आणि ती तशी बऱ्याच दिवसांपासून, कदाचित वर्षांपासून असावी असं वाटत होतं.
पाणी मिळेल या आशेने तो आत शिरला. आणि समोरच दृष्य पाहून तो थबकलाच. माणूस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन अशी त्याची स्थिती झाली.
तिथे एक हातपंप होता आणि त्याचा पाईप जमिनीत शिरला होता. त्याच्या लक्षात आलं जमिनीखाली पाणी आहे. हा पाईप तिथेच गेलाय. त्याच्या अंगात एकदम उत्साह संचारला. पुढे सरकत त्याने हातपंप जोराजोरात वरखाली करायला सुरवात केली. पण काहीच झालं नाही. पाणी आलंच नाही. नुसतात पंपाचा आवाज येत राहिला. अखेर हताश होऊन तो मटकन खाली बसला. आता आपलं मरण त्याला जास्त प्रकर्षाने जाणवले.
तेवढ्यात त्याचं लक्ष कोपऱ्यात ठेवलेल्या बाटलीकडेे गेलं. परत एक अत्यानंदाची लहर उठली. बाटली पाण्याने भरलेली होती आणि वाफ होऊन जाऊ नये म्हणून व्यवस्थित सिल केलेली होती. चटकन तो पुढे सरकला. त्याने पाणी पिण्यासाठी बाटली उघडली तेवढ्यात बाटलीवर लावलेल्या एका कागदाकडे त्याचे लक्ष गेले.
त्यावर लिहिले होते "हे पाणी पंप सुरू करण्यासाठी वापरा आणि तुमचं काम झाल्यावर ही बाटली परत भरून ठेवायला विसरू नका."
तो चक्रावलाच. त्याच्या मनात द्वंद्व सुरू झालं. काय करावं? या सुचनेकडे दुर्लक्ष करून सरळ पाणी पिऊन मोकळं व्हावं? की सुचनेप्रमाणे करावं?
समजा, सूचनेप्रमाणे पंपात पाणी ओतलं आणि पंप खराब असेल तर?, पंपाचा पाईप तुटला असेल तर?, खालचं पाणी आटून गेलं असेल तर? पाणी वायाच जाईल... सगळा खेळ खल्लास...
पण सुचना बरोबर असतील तर?... तर भरपूर पाणी...
पाणी पंपात ओतण्याचा धोका पत्करावा की नाही यावर त्याच मत ठरेना.
शेवटी मनाचा निर्धार करत थरथरत्या हातांनी त्याने ते पाणी पंपात ओतले. डोळे मिटून देवाचा धावा केला आणि पंप वरखाली करायला सुरवात केली. हळूहळू पाण्याचा आवाज सुरू झाला आणि काही क्षणातच पाणी यायला सुरवात झाली. भरपूर पाणी येतं होतं. त्याला काय करू नी काय नको असं झालं. ढसाढसा पाणी प्यायला तो. स्वतः जवळच्या बाटल्या पण काठोकाठ भरल्या त्याने. तो खुप खुश झाला होता.
शांत आणि पाण्याने तृप्त झाल्यावर त्याचे लक्ष आणखी एका कागदाकडे गेले. तो त्या परिसराचा नकाशा होता. त्यावरून सहज लक्षात येत होतं की तो मानवी वस्तीपासून अजून खुप दूर होता. पण आता निदान त्याला त्याच्या पुढच्या प्रवासाची दिशा तरी समजली होती.
त्याने निघायची तयारी केली. सुचनेप्रमाणे ती बाटली भरून सिलबंद करून ठेवली.
आणि त्या बाटलीवरच्या कागदावर एक ओळ स्वतः लिहीली.
"विश्वास ठेवून हे पाणी पंपात ओता, पाणी येतच" आणि तो पुढे निघाला.
----तात्पर्य--
*ही गोष्ट आहे देण्याचं महत्व सांगणारी.
काही मिळवण्यासाठी काही द्यावं लागतं हे अधोरेखित करणारी.
काही दिल्यानंतर मिळतं ते भरपूर असतं, आनंददायी असतं.
त्याही पेक्षा जास्त प्रकर्षाने ही गोष्ट विश्वासाबद्दल सांगते. विश्वासाने केलेले दान खुप आनंद देते.
आपल्या कृतीमुळे फायदा होईल याची खात्री नसतानाही त्याने विश्वास दाखवला.
काय होईल माहिती नसताना त्याने विश्वासाने अज्ञातात उडी मारली.
या गोष्टीतले पाणी म्हणजे आयुष्यात घडणाऱ्या चांगल्या गोष्टी.
त्यांच्याकरता वेळ द्या आणि त्याच्या बदल्यात कितीतरी जास्त पटीने आनंदाची झोळी भरून घ्या

ऑप्टिशियन्स प्राईज...


ऑप्टिशियन्स  प्राईज...... #संगीताशेंबेकर

तुम्ही कधीही  ऑप्टिशियन कडे जा...चष्मा   बनवायला...किंवा रिपेयर ला....सगळ्यात तुम्हाला काचेत डिस्प्ले करतील खूप साऱ्या डिझाइन्स....तुम्हाला एखादी छान आवडते मग तुम्ही त्याची किंमत विचारता....तो दुकानदार तुम्हाला एक अशी किंमत सांगतो जी कि तुम्हाला फारच कन्व्हीन्सिंग असते....मग तुम्ही  त्या  फ्रेमला नक्की करता....आणि  तुम्हाला कळतं कि ही फक्त "लेन्स" ची किंमत होती......बाजूची फ्रेम अधिक पैशात निवडायची ...मग तरी तुम्ही बार्गेन करता असुदे..फायनली चष्मा छान दिसेल....आणि असे करत करत अँटी ग्लेअर ..आणि असे काही काही निवडत अंदाजे पाचशे रुपयापासून सुरवात झालेली तुमची आवड अठराशे रुपयात जाऊन थांबते....तुम्हाला कळतही नाही तुम्ही किती  हो हो हो म्हणत पुढे गेलात ....एकाच वस्तूची किंमत पाच वेळा बदलली तरी तुम्ही निर्णय बदलत नाही.....
असेच काही नात्यांचेही असते आपल्या जीवनात ...सं
एखादी शेजारीण....खूप काही निरनिराळी वागते आपण तरीही बोलत नाही....कारण कंपनी हवी असते तिची...एखादी ऑफिसातील व्यक्ती खूप काही करते खटकण्यासारखं पण आपण बोलत नाही कारण तिथे वैर नको असते आपल्याला....एखादी नातेवाईक व्यक्ती तसंच करते   पण काही स्पेसिफिक कारणाने आपण दुर्लक्ष करतो.....आणि निमूट राहतो.....ही सगळी ऑप्टिशियन प्राईज नाती आपण नकळत सांभाळत असतो.......जगण्यासाठी ..... #संगीताशेंबेकर

शुक्रवार, १५ मार्च, २०१९

हजार सेल्फ्यांचे घडे (कथा)



हजार सेल्फ्यांचे घडे (कथा)

----
ती जेव्हा जन्माला आली तेव्हाच तिच्या आईवडलांना तिची काळजी वाटू लागली होती.
या काळजीमागचं कारण होतं, तिचं सौंदर्य. तिचे डोळे पाण्यासारखे नितळ आणि लकाकणारे होते. तिची त्वचा तुकतुकीत, मुलायम आणि तेजवान होती. नाक सरळसोट होतं. जिवणी पातळ, पण ओठ जरासे जाड होते. जणू मद्याच्या कुप्याच असाव्यात. रात्री ती गाढ झोपली की, तिच्या मंद श्वासोच्छ्वासातून गंध प्रसवायचा. म्हणूनच तिचं नाव निशिगंधा असं ठेवण्यात आलं.
निशिगंधा वयात येऊ लागल्यावर तर तिच्या सौंदर्याच्या बहराला उधाण आलं. तिच्या वक्षांना गोलाई आली, उभार आला. तिचे काळेभोर चमकते मोकळे केस सारखे वार्याचवर उडू लागले. मांड्यांना भरदारपणा येऊन त्या पुष्ट झाल्या. हिच्याशी संभोग केल्यावर निर्माण होणारा वंश किती सुंदर असेल, असा विचार त्यांच्याही नकळत तरुणांच्या मनात येऊ लागला.
निशिगंधाच्या आईवडलांना हे सगळं समजत होतं. तिने कुणाही ऐर्यासगैर्या्च्या प्रेमात पडून, पोट काढून आपल्याकडे येऊ नये असं त्यांना वाटत होतं आणि या काळजीने त्यांच्या मनांना हजार घरं पडत होती. निशिगंधा क्लासला, शाळेत जायला निघाली की, ते रोज देवाकडे प्रार्थना करायचे की आज तिला प्रेमात पडण्यापासून वाचव. ती सुखरूप घरी येऊ दे.
मी सेल्फी – 00999. आत्ताच मी फ्रंट कॅमेर्‍यातून आलेय. आणि तुम्हाला सांगते, मी एवढी सुंदर आलेय, एवढी सुंदर आलेय की फेसबुकवर मला २५६ लाइक्स त्यात ७६ लव्ह्ज आणि वॉव्ज मिळालेत. आणि आत्ताच हाफ सेंचुरी झालीय कमेंट्सची!
चेहरा जरा वळवलेला. केस मोकळे. काळ्या लिपस्टिकचा पाउट. नजर थेट कॅमेर्याआत. कॅमेर्याकचा कोन वरून आहे. डोळ्यांखाली आयलायनर. आकाशी निळा पुलओव्हर. छातीची किंचित घळ दिसतेय. सोनेरी चेन चमकतेय. पार्श्वभूमीवर खोल दरी आणि हिरवट रंग...
आणखी एक लव्ह – रियानचं. काही लाइक्स – अंकुश, फरहान, निमा आणि देवीचं. २६० पूर्ण! हुर्रे!
एकदा पहाटे निशिगंधाच्या आईवडलांना, एकाच वेळी, एकच स्वप्न पडलं. एक बिनचेहर्‍याचा दाढीवाला साधू त्यांना म्हणाला, ‘हे बघा, निशिगंधा नुसतीच सौंदर्यवती नाही, तर बुद्धिमानही आहे. त्यामुळे ती सहजासहजी कोणाच्याही प्रेमात पडणार नाही. निश्चिंत रहा. एक गोष्ट मात्र नक्कीच चिंता करण्यासारखी आहे.’
कोणती?’
तिचं स्वतःवर असलेलं प्रेम आणि त्याचा तिच्या बुद्धिमत्तेवर असलेला अंमल. ती स्वतःच्या प्रेमात एवढी गुरफटलेली असते की आजूबाजूचं काही पाहूच शकत नाही. त्यात त्या मोबाइल फोनमुळे आणखीन भरच पडली आहे. ती सारखी सेल्फ्या काढत बसते. त्या काढताना तिला स्थल-कालाचं भान राहत नाही. त्यामुळे तिच्या नशीब आहे ते असं – आजपासून ती जेव्हा कधी हजारावी सेल्फी काढेल, तेव्हा तिच्या स्वप्रेमाचा घडा भरेल. तत्क्षणी त्या हजाराव्या सेल्फीत ती जख्ख म्हातारी दिसेल.’
मी कॅमेराबंद झाल्यावर वाटलं की, चला आता या फोनच्या गॅलरीत आपण सुरक्षित राहणार, निदान काही काळ तरी. पण मग समजलं की, माझ्याआधी सोळा सेल्फ्या आल्या आहेत. मी सतरावी. सतरा म्हणजे खतरा. चांगला नसतो म्हणे हा नंबर. पण सेल्फ्यांना कसला आलाय चॉइस?
ही एक आली अजून,’ 00990 ओरडली. ‘या स्वागत आहे तुमचं मॅडम.’
मी गप्पच. मला नक्की काय वाटत होतं हे माझं मलाच समजत नव्हतं. आपण काय बोललं पाहिजे किंवा कसं वागलं पाहिजे हेही कळत नव्हतं. मी जेव्हा सगळ्या सेल्फ्यांकडे नीट पाहिलं, तेव्हा आश्चर्यचकित झाले. बर्‍याच जणी थोड्याफार प्रमाणात माझ्यासारख्याच दिसत होत्या. 00991मध्ये चेहरा नीट दिसत नव्हता, तो अस्पष्ट होता. हात हलला असणार. तर  00992मध्ये पाउट नव्हता. हसणं जरा जास्तच होतं. जवळपास सगळेच दात दिसत होते. से चीज! 00993 आणि 00995 अगदी माझ्यासारख्याच होत्या. तिळ्या बहिणी! तर 00989 आणि 00990मधले भाव एवढे गंभीर होते, की आधीचे फोटो कुणाचेतरी वेगळ्याचेच वाटावेत.
00993 माझ्या डोळ्यांत डोळे घालून म्हणाली, ‘तूच दिसत्येस ती भाग्यवान सेल्फी!’
म्हणजे?’ मी विचारलं.
अगं, बघ की, तुझ्यानंतर आणखीन कुठे सेल्फ्या आल्यायेत? याचा अर्थ तिचं समाधान झालेलं दिसतंय तुझ्यावर.’
ओह, येस.’ काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलले.
अभिनंदन!’ 00994 पुटपुटली. तिचा आवाज कापत होता. ती घाबरली होती. ‘आम्हाला किती मजा येत होती इथे. वाटलं ती तशीच येत राहील यानंतरही... पण आता...’
मी त्यांना आणखी काही विचारणार, तोच कशाच्यातरी आत ओढल्यागत 00994 खेचली गेली आणि विरून गेली. 00996चंही तसंच झालं. 00997चंही तसंच. आणि मग असंच होत गेलं. माझ्यासारख्याच दिसणार्‍या 00993 आणि 00995 यांनी निषेधाचा स्वर लावला. ‘आमच्यात काय वाईटे? आम्ही तर...’ आणि शेवटी, मी सेल्फी 00999 एकटीच उरले. आणि माझ्यासोबत होते, फोनच्या गॅलरीतले इतर काही फोटो.
त्या दिवसापासून निशिगंधाचे आईवडील तिच्या हातात कमीत कमी मोबाइल फोन कसा राहील हे पाहू लागले. ते मुद्दामहून तिच्यापासून फोन लपवून ठेवू लागले, किंवा फोन दिला तरी कॅमेर्‍याचं अॅप कुलूपबंद करून ठेवू लागले. शाळेत असेपर्यंत त्यांच्या या सगळ्या युक्त्या चालून गेल्या. पण कॉलेजात गेल्यावर मात्र निशिगंधाला आपले आईवडील मुद्दाम आपल्याला फोटो काढण्यापासून प्रतिबंध करत आहेत हे कळून चुकलं. तिने मित्राच्या मदतीने कॅमेर्‍याचं कुलूप उघडण्यासाठीचा पासवर्ड शोधून काढला. पण आपल्या आईवडलांचं मन दुखावलं जाऊ नये, म्हणून तिने त्यांना त्याबद्दल काहीच सांगितलं नाही. ती घराबाहेर पडली, की कुलूप उघडत असे.
माझ्याबरोबरच्या सेल्फ्यांचं जे झालं, ते पाहून मला वाईट वाटत होतं. मी थोडी उदास झाले होते. तेवढ्यात, मागच्या वर्षी कॉलेजच्या साडी डेला काढलेल्या फोटोने माझं लक्ष वेधलं, ‘शेवटी तू राहिलीस तर एकटीच. कॉन्ग्रॅट्स!’
मी आजूबाजूचे फोटो पाहत ते कसे असतील, कसे बोलतील याचा अंदाज बांधत होते. मला मघाशी त्या सेल्फ्यांचं काय झालं असावं, हा प्रश्न सारखा बोचत होता. मी नुसतंच थँक्स म्हणाले.
गावाला गेल्यावरचा झोपाळ्यावर बसलेला फोटो कुत्सितपणे म्हणाला, ‘अभिनंदन. पण तरी आनंदाने उड्या नको मारूस फार! इथे कधी कुणाचं काय होईल काहीही सांगता येत नाही, कळलं!’
मघाशी काय झालं असेल त्या सेल्फ्यांचं?’ मी मनातला प्रश्न विचारून टाकला.
साडी डे फोटो मला म्हणाला, ‘ते एक मोठं कोडंच आहे. काहींच्या मते त्या खूप मोठ्या पेनड्राइव्ह किंवा हार्डडिस्कमध्ये जातात. आणि मग तिथे पडून राहतात. मग कधीतरी कोणीतरी त्यांना पाहतं आणि मग तिथूनही त्यांना जावं लागतं. मग त्यांचं काय होतं हे कोणालाच माहीत नाही. काहींच्या मते एक फ्लॅश लाइट त्यांना खाऊन टाकतो. आणि मग त्या कायमच्या जातातच. काहींचं मत जरा वेगळंय, त्यांचं म्हणणंय की फ्लॅशच्या झोताने खाल्ल्यानंतर पुन्हा वेगळ्या रूपात त्या इथे येतात. पुन्हा जातात आणि पुन्हा येतात. आता या सगळ्यातलं खरं काय हे कोणालाच नाही ठाऊक.’ 
मी नुसतीच मान हलवली. तोच आईवडलांसोबतचा फोटो बोलू लागला, ‘पण तुला कदाचित थोडं अधिक काळ राहता येऊ शकतं इथे. तुझं नशीब चांगलं असेल तर...’
कसं काय?’
आता माझंच बघ. शक्यतो मला अजून काही काळ तरी डिलिट केलं जाणार नाही. किंवा आठवण म्हणून ठेवून दिलं जाईल कुठेतरी.’
हं... पण माझं नशीब तुझ्यासारखं असेल असं वाटत तरी नाहीये.’
तुझंही असू शकतं. समजा, तू सोशल मीडियावर गेलीस, तर निदान थोडा वेळ तरी तू अमर!’
फेसबुक अॅप उघडलं गेलं.
झोपाळ्यावरचा फोटो म्हणाला, ‘भारीये. मोठ्ठ्या जगात चाललीयेस तू! ऑल द बेस्ट!’
मस्त पावसाळा होता. पावसाच्या एकामागोमाग एक सरी येत होत्या. हवा ओलीगार झाली होती. निशिगंधाच्या कॉलेज ग्रुपपैकी सगळ्यांनाच क्लासमध्ये जायचा भयंकर कंटाळा आला होता. अचानक त्यांनी जवळच्याच गडावर जायचं ठरवलं. सगळ्यांनी आपापल्या स्कूटर काढल्या आणि वेगाने कूच केलं.
निशिगंधाने आपली स्कूटी कॉलेजमध्येच ठेवली आणि ती मित्राच्या बाइकवर बसून निघाली. पावसाने ओले झालेले केस, भिजून नितळ झालेला चेहरा, त्यामुळे अधिकच चमकणारे डोळे, अंगाला घट्ट बसलेले ओले कपडे... स्वतःचं हे वेगळंच, ‘फ्रेश रूपडं पाहून निशिगंधा स्वतःच्या अजूनच प्रेमात पडली आणि गडावर पोचायच्या आधीच तिने स्वतःचे फोटो काढणं सुरू केलं.
गडावर ढग उतरले होते. पाऊस भुरभुरत होता. सगळीकडे हिरवंगार झाल्याने डोळे सुखावत होते. त्याने उद्दीपित झालेल्या निशिगंधाचं सटासट फोटो काढणं सुरूच होतं. ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन फोटो काढत होती. कधी या झाडामागे, कधी त्या खडकावर, तर कधी आडवाटेला जाऊन. फोटो काढण्याच्या भरात तिच्याही नकळत ती आपल्या ग्रुपपासून अलग झाली आणि कोणत्यातरी वेगळ्याच वाटेला लागली.
मी खेचली गेले, तशी मी घाबरले. वाटलं, फ्लॅश लाइटच्या प्रकाशात आपणही विरून जाणार. पण तसं काहीच झालं नाही. मला एका चौकटीत बसवलं गेलं. मग क्रॉप करण्यात आलं. ब्राइटनेस, कॉन्ट्रॅस्ट, सॅच्युरेशन असं काय काय बदलण्यात आलं. ब्युटिफिकेशनने माझे डोळे थोडे मोठे झाले, तर गाल आणि चेहरा गुळगुळीत झाला. हनुवटी जरा वर उचलली गेली. पाउट आणखीन मोठा झाला. मग माझ्यावर वेगवेगळी फिल्टर्स चढवून बघितली गेली. कधी ब्लॅक अँड व्हाइट, कधी रेट्रो, कधी सेपिया. आणि मग शेवटी पिवळट-नारिंगी सेपियाचं फिल्टर चढवून पांढरी क्रूकेड फ्रेम माझ्यावर डकवण्यात आली. आणि सेव्ह केलं. आता माझं नाव थोडं बदललं. नवीन अवतार, नवीन नाव – 00999-EDX .
शेवटी निशिगंधाच्या ४३५६ फ्रेंड्समोर मला ठेवण्यात आलं. पहिले काही क्षण, मी गोंधळले, बावचळले. पण मला भारीही वाटत होतं. एक, दोन, तीन लाइक्स, मग लव्ह्ज, मग वॉव्ज. कमेंट्स.... काही मिनिटांत मी फेमस झाले. ढिगाने लाइक्स, कमेंट्स येऊ लागल्या.
ती वाट वेगळीच होती. तिथली झाडं देवदारांसारखी उंचच उंच होती. हवा दाट, अधिक ओली आणि गार होती. आणि हा गारवा सुखद नव्हता, तर बोचरा होता. उजेड अंधूक, करडा होता. पार्श्वभूमीवर सारखे घारींचे चीत्कार ऐकू येत होते.
काही क्षण निशिगंधाला आपण भरकटलो आहोत असं वाटलं खरं, पण तेवढ्यात एका आवाजाने तिचं लक्ष वेधलं. ‘किती सुंदर आहेस तू!’
निशिगंधाने इकडेतिकडे पाहिलं, तिला कोणीच दिसलं नाही.
अगं इकडे बघ, तुझ्या हातात, तुझा मोबाइल. तुझ्या सौंदर्याच्या जादूने मला वेड लागलंय. मी तुझ्या प्रेमात पडलोय. पार बुडालोय. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत घालवायचंय. प्लीज, हो म्हण.’
काय? तुझ्यासोबत? एका फाल्तू मोबाइलसोबत. आपली लायकी ओळखून तरी बोलायचंस! फोटो काढायचं काम कर... चल, फुट्...’ असं म्हणून तिने एक पाउट काढला आणि मोबाइल फोन आपल्यासमोर धरला.
००
इथले फोटो कॅमेर्‍यातल्या गॅलरीसारखे नाहीयेत. जरा आगाऊ आणि स्वतःला जास्तच शहाणे समजणारे आहेत. कोण जास्त चांगलं दिसतं याची सारखी तुलना करत राहतात.
शॉर्ट्स घातलेला फोटो मला म्हणाला, ‘मला तर पहिल्या तीस सेकंदात यापेक्षा दुप्पट लाइक्स मिळाले होते!’
हिमालयातल्या बर्फातला फोटो म्हणाला, ‘मला एक कळत नाही, हिच्यात आहे तरी काय एवढं? साधाच तर फोटो आहे. तरी लोक वेड्यासारखे करतायत. माझ्यात काहीतरी तरी आहे, पण हे असे तर लाख असतात हल्ली.’
तोच पंजाबी ड्रेसमधला फोटो म्हणाला, ‘अगं असं काय करतेस, पाउट किती मोठाय बघ! आवडणारच ना मग! आम्ही मात्र कायमच किरकोळीत लाइक्स मिळवणार!’
बरोब्बर,’ रियानबरोबरची सेल्फी, सूर्यास्ताचा फोटो, मित्रमैत्रिणींबरोबरचा ग्रुप फोटो, बहिणीच्या लग्नात काढलेल्या मेंदीचा फोटो, थर्टी फर्स्टच्या पार्टीचा फोटो अशा सगळ्यांनीच एका सुरात म्हटलं.
माझ्यासारखेच असलेले हे फोटो मला ज्या प्रकारे टोमणे मारत होते, माझ्याशी बोलत होते, त्याने वाईट वाटत होतं. तर दुसरीकडे, फ्रेंड्सनी मात्र माझ्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता. त्यामुळे मी हुरळून गेले. मी विचार करू लागले की, आता पर्मनंट प्रोफाइल फोटो म्हणून आपली निवड नक्की होणार! आपणच तर सर्वांत बेस्ट फोटो आहोत. येस! मग आपल्याला या सगळ्या फोटोंपुढे तोरा मिरवता येईल. मग आपण व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम, स्नॅपचॅटमध्येही जाऊ. आणि मग खरोखरच अमर होऊ! कदाचित आपण इतके आवडू की आपली प्रिंट काढली जाईल, त्याला फ्रेम लावली जाईल आणि बेडशेजारच्या टेबलावर ठेवलं जाईल... ‘वॉव!’ मी स्वतःलाच म्हणाले, ‘तू अशी नुसतीच येऊन निघून जायला जन्मली नाहीयेस. तू वेगळी आहेस सगळ्यांपेक्षा, म्हणून तर आज इथे आहेस. कमॉन!’
भटकता भटकता निशिगंधा उंचच उंच झाडांचा भाग मागे टाकून एका पठारावर आली. तिथे लहानसहान झुडपं होती आणि एका झुडपाच्या शेजारी एक मोठ्ठा काळा खडक होता. निशिगंधाला तो पाहताक्षणीच आवडला. ‘व्वा, ऑसम. त्या दगडावर उभं राहून सेल्फी हवाच.’
ती धावत त्या खडकाकडे गेली. त्यावर बसून तिने फोटो काढले. त्यांचा क्लिक-क्लिक असा आवाज होत होता आणि तो आवाज तिच्या कानांना सुखावत होता.
अचानक, इतका वेळ कुंद, पावसाळी असलेलं वातावरण बदललं. बोचरं ऊन पडलं. तापदायक ऊन. आणि त्याच्या धगीने खडकामागे असलेला धुक्याचा दाट पडदा हां-हां म्हणता विरून गेला. खाली खोल दरी दिसू लागली. तो खडक दरीच्या अगदी कडेवर होता. दरीत गच्च अरण्य परसलेलं होतं.
वॉव,’ असं म्हणून निशिगंधा खडकावर उभी राहिली. तिने एक सेल्फी घेतला, मात्र ती प्रतिमा पाहून तिचा चेहरा आक्रसला, डोळे विस्फारले आणि ती काही क्षण जागच्या जागी थिजून गेली. तिच्या तोंडून ऊं एवढाच एक हुंकार निघाला.
हाय...’ माझी तंद्री भंगली. पाहिलं, तर नवी सेल्फी आली होती – 01000. 
आणि मी त्या सेल्फीकडे पाहतच राहिले. मला जे दिसत होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. असं कसं घडलं असावं?
01000ने विचारलं, ‘काय झालं? पुढे काय?’
मी गप्पच.
ती निशिगंधाची हजारावी सेल्फी होती आणि त्यात ती जख्ख म्हातारी झाली होती. तिचे केस झडून गेले होते, टक्कल पडलं होतं. डोळे म्लान, पूने भरले होते. चेहर्‍यावर रबरट सुरकुत्यांचा चिकट जाड थर जमा झाला होता. नाकातून पिवळा शेंबूड गळत होता, आणि तो कोरड्या, फाटलेल्या ओठांतून येत असलेल्या रक्तात मिसळला होता.
हा धक्का महाप्रचंड होता. तिथल्या तिथे वीस वर्षांचा निशिगंधाला हृदविकाराचा तीव्र झटका आला आणि तिचा तोल जाऊन ती सरळ दरीत पडली.
मी कशीबशी तिला म्हणाले, ‘मला माहीत नाही... पण तू अशी... कशी...?  काहीतरी गडबड...’ मला  काय होत होतं हे समजत नव्हतं.
01000 माझ्याकडे एकटक पाहू लागली आणि मी तिच्याकडे. काही मिनिटांच्या फरकाने जन्मलेल्या आमच्यात जमीनअस्मानाचा फरक होता. त्या काही मिनिटांत शंभर वर्षं झरकन सरून गेली असावीत असं वाटत होतं. तोच फ्लॅश लाइट चमकला...
अंतःप्रेरणेने निशिगंधाच्या आईवडलांना जे घडलं होतं, ते समजून चुकलं. त्यांनी एकमेकांचे हात घट्ट धरले आणि डोळे मिटले. पुन्हा तो बिनचेहर्‍याचा दाढीवाला साधू त्यांना दिसू लागला. ते म्हणाले, ‘तुमची भविष्यवाणी खरी ठरली. आमची मुलगी तर गेली, पण तिच्या कहाणीचा शेवट असा व्हायला नको. नाहीतर, सगळ्या मनुष्यजातीवर विपरित परिणाम होईल. प्लीज, या कहाणीचा शेवट बदला. काहीतरी करा.’
त्यांच्या कळकळीच्या विनंतीमुळे साधूचं मन द्रवलं. तो म्हणाला, ‘ठीक आहे. मी उःशाप देतो.’
त्यानंतर निशिगंधा ज्या ठिकाणी मरून पडली होती, तिथे पांढर्‍या रंगाची, मंद सुगंध असणारी फुलं उगवून आली. लोक त्यालाही ‘निशिगंधा म्हणू लागले. ती फुलंही निशिगंधासारखीच सुंदर होती. पण त्या सौंदर्याखाली दबून राहिलेली खरी कहाणी मात्र लोक विसरून गेले,  सेल्फ्यांचे घडे भरत राहिले, आणि कड्यावरून खाली पडून, समुद्रात-धरणात बुडून लोक मरत राहिले मरत राहतील!
----
(पूर्वप्रकाशित - मुराळी नियतकालिक)
---
- प्रणव सखदेव

गुरुवार, १४ मार्च, २०१९

नदी सारखं जगावं

नदी सारखं जगावं 


आयुष्य कठीण अजिबात नसतं . .

कधी नळाला पाणी नसतं... कधी पाणी असून घोटभर देणारं कुणी नसतं...

कधी पगार झालेला नसतो . . कधी झालेला पगार उरलेला नसतो . .

कधी मिळवलेला पगार कोणावर खर्च करायचा ? प्रश्न सुटलेला नसतो . .

कधी जागा नसते . . कधी जागा असून स्पेस नसते . . कधी जागा आणि स्पेस दोन्ही असली तरी त्यात नात्याची उब नसते . .

कधी डब्यात आवडती भाजी नसते . . कधी भाजी आवडली तर पोळीच करपलेली असते . . दोन्हीही मनासारख्या असल्या तरी शेजारच्या डब्यातून येणाऱ्या खमंग वासात आपली इच्छा अडकलेली असते . .

कधी कोणी सोबत असून एकटेपणा असतो . . कधी कोणी सोबत नसतानाही उगाच भरल्या -भारावल्या सारखे वाटते . .

कधी काही शब्द कानावर पडतात . . कधी नको ते शब्द कानावर आदळतात . .

कधी हव्या असलेल्या माणसांकडून नको ते आणि नको असलेल्या माणसांकडून अनपेक्षित अनुभव येतात . .

कधी आपण कसे वागायचे समजत नाही . . कधी समोरचा असा का वागतोय याचे उत्तर मिळत नाही . .

कधी दोष कोणाला द्यायचा समजत नाही . . कधी आभार कोणाचे मानायचे उमजत नाही . .

कधी डोकं टेकायला जागा सापडत नाही . . कधी जागा सापडलीच तर नमस्कार करायची इच्छा होत नाही . .

कधी कोठे रिजिड आणि कोठे फ्लेक्सिबल वागायचे हेच क्लिक होत नाही . .

कधी समोरचा /ची आपल्याला अकारण हक्काचा /ची वाटू लागते . . कधी समोरच्याने आपल्यावर दाखवलेला हक्क आपल्याला नकोसा वाटू लागतो . .

कधी पैसा असला कि नात्यांच्या मोह होतो आणि नाती असली की त्यांच्या गरजा -मौज पूर्ण करता येत नाहीत म्हणून जीव हिरमुसतो

. . . यात अजून ४-५ गोष्टी वाढवल्या तर मला सांगा याहून वेगळे आपण काय जगतो ??

ताण घेतला तर तणाव . .
आजचे भागले म्हणून आनंद आणि
उद्याच काय म्हणून चिंता
आयुष्य कठीण करते .

आपण नदी सारखं जगावं . . सतत वहात राहाव्.......
या जन्मावर या जगण्यावर शत:दा प्रेम करावं

खरा भाऊ

खरा भाऊ

" अरे अभि पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय.अप्पांना कधी आणू तुझ्याकडे?की तू घेऊन जाशील त्यांना?"
"अरे दादा एक प्राँब्लेम झालाय.रचनाच्या भावाने आमचं काश्मीर टूरचं बुकींग केलंय.तेही पुढच्या आठवड्याचंच आहे.त्यामुळे साँरी मी अप्पांना नेऊ शकत नाही"
अभिजीतने असं म्हंटल्यावर संतापाची एक तिडीक सतिशच्या डोक्यातून गेली.
"अरे पण तुला विचारुनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना.त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत.आणि तू मला आता सांगतोय जमणार नाही म्हणून!तेही मी विचारल्यावर.आता मला सांग मी अप्पांना कुठ ठेवायच?"
"दादा तुला माहीतेय रचनाचा स्वभाव कसा आहे तो! तिने एकदा ठरवलं की ब्रम्हदेवसुध्दा तिच्या प्लँनमध्ये दखल देऊ शकत नाही.तेव्हा प्लिज माझ्या घरात भांडणं लावू नकोस. राहीला आता अप्पांचा प्रश्न तर तू रेणूला विचार.ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खुप मोठं आहे."
"अरे पण....." तेवढ्यात फोन कट झाला.
सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहीलं.अभिजीतचं हे नेहमीचंच होतं.लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही.खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका.पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही.दोन वर्षांपुर्वी आई कँन्सरने वारली.पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही.मागील वर्षी अप्पांना हार्ट अटँक आला.पण एखाद्या परक्या माणसासारखं हाँस्पिटलमध्ये अप्पांना भेटायला येण्याव्यतिरीक्त त्याने काही केलं नाही.
 अभिने अप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता.रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती.आई असतांना ती आईशी गोड गोड बोलून भारीभारी साड्या,गिफ्ट्स उकळायची.परिस्थिती उत्तम असतांनाही नवऱ्याला बिझीनेसला पाहीजेत असं सांगून तिने आईवडिलांकडून दहाबारा लाख नक्कीच घेतले होते.पण परत देण्याचं तर कधीही नाव काढलं नाही.संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही.पण त्याच्या बायकोला,भारतीला हे दिसत होतं.तिची कुरबुर चालू असायची.सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा.आई गेली तसा रेणूचा भाऊ,वडिल,वहीनीतला इंटरेस्ट संपला.

     त्याने साशंक मनानेच रेणूला फोन लावला.
"अगं रेणू आम्ही युरोप टूरला जातोय पंधरा दिवसांसाठी.अप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे?"
"अरे दादा माझी नणंद येतेय बाळंतपणासाठी माझ्याकडे.मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की अप्पांकडे?"
"अगं पण तुझं घर चांगलंद मोठं आहे.अप्पा कुठेही सामावून जातील"
"नको बाबा,त्यांना परत अटँक आला तर मी कुठे शोधत बसू डाँक्टर! त्या पेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरावीस दिवसांकरीता एखाद्या व्रुध्दाश्रमात ठेवून दे.सगळेच प्रश्न मिटतील"
"रेणू अगं आपण तिघं भाऊबहिण असतांना त्यांना व्रुध्दाश्रमात ठेवणं बरं दिसेल का...?"
"मग तू बघ बाबा काय करायचं ते.आय अँम हेल्पलेस" तिनेही फोन कट केला.
 घरी आल्यावर त्याला भारतीने अप्पांची काय सोय लागली ते विचारलं.सतीशने तिला सकाळी भावाबहिणीशी झालेला संवाद सांगितला.अपेक्षेप्रमाणे ती भडकली.
"आपण काय ठेका घेतलाय का अप्पांना सांभाळायचा?या दोघांची काहीच जबाबदारी नाही का?"
तिचंही म्हणणं योग्यच होतं.मोठा मुलगा या नात्याने सतीशने आईवडिलांची जबाबदारी स्वतःहून स्विकारली होती.अगोदर आईच्या नंतर अप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं.कोणीतरी एक घरी लागायचं.यावेळी अभिजीतने अप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचं बुकींग केलं होतं.हनिमून नंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते.सहलीचे सगळे पैसेही भरुन  झाले होते.आणि आज अचानक अभिने नकार दिला होता.ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला.सतीशने तिला समजावयाचा प्रयत्न केला पण तिने त्याला निक्षून सागितलं.'मला काही सांगू नका.काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचं'
अप्पांना नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले."अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय.राहीन मी एकटा.जा तुम्ही सगळे"
" असं कसं म्हणता अप्पा?तुम्हाला एक अटँक येऊन गेलाय.तुमचा बी.पी.आणि शुगर नेहमी कमी जास्त होतं असतात.कसं सोडायचं तुम्हाला एकटं?"
सतीश खरं बोलत होता त्यामुळे अप्पा चुप बसले.

    टूरला निघायला फक्त तीन दिवस उरले होते.पण मार्ग निघत नव्हता.सतीशचं टेन्शन वाढलं होतं.त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहीले.शेवटी स्वतःची टूर कँन्सल करुन भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला.भारती संतापणार होती शिवाय दोन लाखाचं नुकसानही होणार होतं.पण त्याला इलाज नव्हता.शेवटी त्याने निर्णय पक्का केला.भारतीला फोन करुन कल्पना दिली.ती तर रडायलाच लागली.पण त्याने समजावण्याच्या फंद्यात न पडता फोन कट केला.मग ड्रायव्हरला फोन करुन तयार यहायला सांगितलं आणि तो आँफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला.गाडी ट्रँव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली.
"खुप टेन्शनमध्ये दिसताय साहेब" त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं.सतीशने सर्व घटना त्याला सांगितली.ती ऐकल्यावर तो म्हणाला
" अहो मग टूर कशाला कँन्सल करताय साहेब?मी माझ्या घरी घेऊन जातो अप्पांना"
"नको नको कशाला तुझ्या फँमिलीला त्रास.अप्पांचं फार बघावं लागतं.त्यांच्या औषधाच्या,खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात"
"अहो त्यात काय एवढं! आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना?त्यांचीही बायपास झालीये हे तुम्हालाही माहीत आहे.शिवाय माझे वडिल अप्पांना चांगलं ओळखतात.दोघांची चांगली दोस्ती होईल बघा.ते काही नाही मी अप्पांना घेऊन जाणार"
एका ड्रायव्हरच्या घरी अप्पांना ठेवावं हे सतीशला रुचेना.पण त्याचा आग्रह पाहून त्याने अप्पांनाच विचारायचंं ठरवलं.
"ठीक आहे.चल गाडी फिरव.आपण अप्पांनाच विचारु.ते तयार झाले तर माझी काही हरकत नाही."
मोहन खुष झाला.घरी येऊन त्याने अप्पांना विचारलं.अप्पांचाही चेहरा खुलला.ते म्हणाले" मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे" मोहनने लगेच घरी फोन लावला.बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला."सगळे तयार आहेत.आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे"

    टूरच्या दिवशी मोहन अप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला.नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं.निरोप घेतांना सतीशला त्याने आश्वासन दिलं 'काळजी करु नका साहेब.अप्पा अगदी सुखरुप रहातील'
 टूरमध्ये असतांनाही सतीश अप्पांना फोन करुन विचारत होता.त्यांचं एकच उत्तर असायचं ' काळजी करु नको.मी मजेत आहे '

    सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमाननतळावर गेला.सतीशने अप्पांची चौकशी केली.
" अगदी मजेत आहेत अप्पा.खुप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी" मोहन सांगत होता "रोज सकाळी उठून माँर्निंग वाँकला जायचे.मग दिवसभर पत्ते आणि बुध्दीबळ खेळायचे.मग संध्याकाळी एखाद्या मंदिरात किर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरीकांसोबत चौकात बसून
गप्पा मारायचे.तीन दिवसांपुर्वी अप्पांना थोडा ताप आला होता.शुगरही थोडी वाढली होती.मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो.आता एकदम ओके आहेत"
" आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी"
"एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारामुळे त्यांचा पाहूणचार राहून गेलाय"
" अरे आता कशाला हवा तो पाहूणचार?इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे?"
"असं काय करता साहेब!आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहूणचाराशिवाय कसं सोडायचं?आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका.मी काहीही फारसं केलं नाही.अप्पाच व्यवस्थित राहिले"
"बरं बुवा नाही म्हणत" सतीशने माघार घेतली.
 दूसऱ्या दिवशी संध्याकाळी अप्पा घरी आले.ते आनंदी दिसत होते.त्यांच्या हातात एक पिशवी होती.त्यात पँट,शर्टचं कापड,टाँवेल,टोपी होतं.ते पाहून सतीश मोहनला म्हणाला.
"अरे याची काय गरज होती मोहन?"
"नाही कशी साहेब?अप्पांना काय तसं पाठवायचं होतं?"
तेवढ्यात भारतीने त्याला आत बोलावलं.म्हणाली
"अहो त्याचे उपकार ठेवू नका.पाच दहा हजार देऊन टाका त्याला" सतीशलाही ते पटलं.मोहनकडे जाऊन त्याने दहा हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या.मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहीलं मग त्या नोटा सतीशच्याच खिशात कोंबत  म्हणाला
" हे काय साहेब?अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का? आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला तर अप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं"
सतीशला गहिवरुन आलं त्याने मोहनला मिठी मारली.

तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला.टूर कँन्सल केला की अप्पांना व्रुध्दाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते.सतीश एकच वाक्य बोलला ' मला माझा खरा भाऊ भेटला.त्याने अप्पांना व्यवस्थित साभाळलं 

"ढ" मुलगा


"ढ" मुलगा





पत्रलेखक आपल्या अवतीभवती तर नाही ना.???
-------
(सर्व सुजाण पालक व संवेदनशील शिक्षकांसाठी समर्पित..!)
----------------------------------------
पत्रलेखन:
१२वी मध्ये शिकणाऱ्या एका "ढ"
विद्यार्थ्याचे आपल्या वडीलास पत्र.!
-----------------------------------------
प्रति,
तीर्थरूप पप्पास,
साष्टांग दंडवत..!

    पप्पा आज पत्र लिहायला घेतले, परंतू नेमकी कुठून सुरवात करावी.? तेच कळत नाही. हिंमत करतो आणि पत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो .
पप्पा.! माझा दहावीचा निकाल लागला, आणि मला ८२% टक्के मार्क्स मिळाले . खरं सांगतो मला खूप आनंद झाला होता, परंतू मला तो व्यक्त करता आला नाही.
कारण मला दहावीला ८२% मार्क्स पडले आणि तुमच्या दोघांच्याही नजरेत मी गुन्हेगार झालो... 'ढ' झालो..!
तुम्हीच काय पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आईही पण खूप नाराज झाली. कारण तुम्हा दोघांनाही माझ्याकडून ९०% च्यावर मार्क्स पाहिजे होते, ते मी मिळवू शकलो नाही .
मला एक प्रसंग चांगला आठवतो, मला दसऱ्याचा ड्रेस घेण्यासाठी आपण दुकानात गेलो होतो. मी मला आवडलेला एक ड्रेस बाजूला काढला आणि तुम्हाला दाखवला . तुम्ही एकदम माझ्यावर चिडलात आणि जोरात ओरडलात
"मूर्खां लाज नाही वाटत.!" ८२% मार्क घेतो आणि दोन हजार रुपायाचा ड्रेस घेतोस ?"
पप्पा.! अगदी खरं सांगतो, मला खूप वाईट वाटलं होतं ! मला तत्क्षणी ड्रेसची किंमतच माहीत नव्हती, खरे तर मी रंग आवडला म्हणून ड्रेस पसंद केला होता. पण असो , पुन्हा मला आवडीचे कपडे कधीच घ्यावेसे वाटले नाहीत.  त्यावेळेस पासून मी कधीही " आवड सांगत नाही", फक्त तुम्ही घेतलेले कपडे घालतो.
मी नको म्हणत असतांनाही तुम्ही मला Science side ला प्रवेश दिला. मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडत नाहीत, पण मी प्रयत्न करत राहतो. तरीही माझ्या सरांनी त्या दिवशी खूप छान समजून सांगितलं !
आमचे सर म्हणाले, सर्वच मुलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला कशी लागतील, परंतू तुम्ही ते समजून घेत नाहीत .
आमचे सर मला खूप खूप आवडतात, कारण ते त्यांचा विषय तर छान शिकवतातच पण अधून मधून खूप छान संस्कार करतात .
त्या दिवशी सर बोलता बोलता म्हणाले, जग फक्त जिंकलेल्याचं स्वागत करतं ! हार-तुरे, मान-सन्मान फक्त जिंकणाऱ्याच्या वाट्याला येतात. पराभव झाल्यावर, हरल्यावर, कुणीही जवळ घेत नाही.
म्हणून मित्र हो.! जीव तोडून अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा..!
आणि एवढ्यावरही तुमच्या वाट्याला अपयश आलं, तुम्ही जर हारलात तर खचून जाऊ नका. शांतपणे घरी जा.
सर्व जगाने जरी दरवाजे बंद केले, तरी तुमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतील ! सगळं जग जरी तुमचा धिक्कार करत असेल, तरीही आईवडील तुम्हाला नक्की जवळ घेतील, ते हृदयाला कवटाळतील आणि म्हणतील "बाळा तू काही काळजी करू नकोस!" "एक दिवस तू नक्की जिंकशील " !
आणि दुर्दैवाने तसं नाही झालं, तरीही काही काळजी करू नका , तुमच्या आई वडिलांनी जरी तुम्हाला दूर लोटलं, घराचे दरवाजे बंद केले, तरीही काळजी करू नका, या गरीब शिक्षकाच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा असेल !
कळत नकळत अनेक विद्यार्थ्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि कडकडून सर्वांनी टाळ्या वाजवल्या .....
आपल्याला बाप मिळाला म्हणून. 
खरं सांगतो पप्पा, तेंव्हा पासून मला माझे सर खूप जवळचे वाटतात. आणि मला आता अपयशाची भीती वाटत नाही !
पप्पा "ढ" मुलाला बाप आणि माय आता खरंच मिळणार नाही का हो ?

                               
                         आपला,
                     लाडका नसलेला
                       "ढ" मुलगा

जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते.मानवांचे प्रयत्न,आकांक्षा,वैर,मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले,आकांक्षा बाळगल्या,त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात, प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परीपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते कि, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते.त्या व्यक्तीच्या द्वारे  सबंध मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा