Pages

गुरुवार, १४ मार्च, २०१९

खरा भाऊ

खरा भाऊ

" अरे अभि पुढच्या आठवड्यात आम्ही युरोप टूरला निघतोय.अप्पांना कधी आणू तुझ्याकडे?की तू घेऊन जाशील त्यांना?"
"अरे दादा एक प्राँब्लेम झालाय.रचनाच्या भावाने आमचं काश्मीर टूरचं बुकींग केलंय.तेही पुढच्या आठवड्याचंच आहे.त्यामुळे साँरी मी अप्पांना नेऊ शकत नाही"
अभिजीतने असं म्हंटल्यावर संतापाची एक तिडीक सतिशच्या डोक्यातून गेली.
"अरे पण तुला विचारुनच मी युरोप टूरचं बुकिंग केलं होतं ना.त्यालाही आता तीन महिने होऊन गेलेत.आणि तू मला आता सांगतोय जमणार नाही म्हणून!तेही मी विचारल्यावर.आता मला सांग मी अप्पांना कुठ ठेवायच?"
"दादा तुला माहीतेय रचनाचा स्वभाव कसा आहे तो! तिने एकदा ठरवलं की ब्रम्हदेवसुध्दा तिच्या प्लँनमध्ये दखल देऊ शकत नाही.तेव्हा प्लिज माझ्या घरात भांडणं लावू नकोस. राहीला आता अप्पांचा प्रश्न तर तू रेणूला विचार.ती इथंच असणार आहे आणि तिचं घरही खुप मोठं आहे."
"अरे पण....." तेवढ्यात फोन कट झाला.
सतीशने संतापाने मोबाईलकडे पाहीलं.अभिजीतचं हे नेहमीचंच होतं.लग्न झाल्यापासून कधीही त्याने आईवडिलांकडे लक्ष दिलं नाही.खरं तर लहान असल्यामुळे तो आईवडिलांचा सगळ्यात लाडका.पण आईवडिलांना त्याने कधीही आपली जबाबदारी मानलं नाही.दोन वर्षांपुर्वी आई कँन्सरने वारली.पण तिच्या आजारपणात एक पैशाचीही मदत त्याने सतीशला केली नाही.मागील वर्षी अप्पांना हार्ट अटँक आला.पण एखाद्या परक्या माणसासारखं हाँस्पिटलमध्ये अप्पांना भेटायला येण्याव्यतिरीक्त त्याने काही केलं नाही.
 अभिने अप्पांना रेणूकडे ठेवायला सांगितलं होतं पण रेणूबद्दलही सतीश साशंकच होता.रेणू एक नंबरची लोभी आणि स्वार्थी बाई होती.आई असतांना ती आईशी गोड गोड बोलून भारीभारी साड्या,गिफ्ट्स उकळायची.परिस्थिती उत्तम असतांनाही नवऱ्याला बिझीनेसला पाहीजेत असं सांगून तिने आईवडिलांकडून दहाबारा लाख नक्कीच घेतले होते.पण परत देण्याचं तर कधीही नाव काढलं नाही.संबंध बिघडू नयेत म्हणून सतीशही कधी बोलला नाही.पण त्याच्या बायकोला,भारतीला हे दिसत होतं.तिची कुरबुर चालू असायची.सतीश त्याकडे दुर्लक्ष करायचा.आई गेली तसा रेणूचा भाऊ,वडिल,वहीनीतला इंटरेस्ट संपला.

     त्याने साशंक मनानेच रेणूला फोन लावला.
"अगं रेणू आम्ही युरोप टूरला जातोय पंधरा दिवसांसाठी.अप्पांना घेऊन येऊ का तुझ्याकडे?"
"अरे दादा माझी नणंद येतेय बाळंतपणासाठी माझ्याकडे.मला सांग मी तिच्याकडे लक्ष देऊ की अप्पांकडे?"
"अगं पण तुझं घर चांगलंद मोठं आहे.अप्पा कुठेही सामावून जातील"
"नको बाबा,त्यांना परत अटँक आला तर मी कुठे शोधत बसू डाँक्टर! त्या पेक्षा तू एक काम कर ना त्यांना पंधरावीस दिवसांकरीता एखाद्या व्रुध्दाश्रमात ठेवून दे.सगळेच प्रश्न मिटतील"
"रेणू अगं आपण तिघं भाऊबहिण असतांना त्यांना व्रुध्दाश्रमात ठेवणं बरं दिसेल का...?"
"मग तू बघ बाबा काय करायचं ते.आय अँम हेल्पलेस" तिनेही फोन कट केला.
 घरी आल्यावर त्याला भारतीने अप्पांची काय सोय लागली ते विचारलं.सतीशने तिला सकाळी भावाबहिणीशी झालेला संवाद सांगितला.अपेक्षेप्रमाणे ती भडकली.
"आपण काय ठेका घेतलाय का अप्पांना सांभाळायचा?या दोघांची काहीच जबाबदारी नाही का?"
तिचंही म्हणणं योग्यच होतं.मोठा मुलगा या नात्याने सतीशने आईवडिलांची जबाबदारी स्वतःहून स्विकारली होती.अगोदर आईच्या नंतर अप्पांच्या आजारपणामुळे त्या दोघांना एकत्र कधीच बाहेर जाता येत नव्हतं.कोणीतरी एक घरी लागायचं.यावेळी अभिजीतने अप्पांना सांभाळायला होकार दिल्यानेच त्यांनी युरोप टूरचं बुकींग केलं होतं.हनिमून नंतर पहिल्यांदाच दोघं आणि मुलं एकत्र सहलीला जाणार होते.सहलीचे सगळे पैसेही भरुन  झाले होते.आणि आज अचानक अभिने नकार दिला होता.ते ऐकून भारती रडायला लागली आणि तिच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला.सतीशने तिला समजावयाचा प्रयत्न केला पण तिने त्याला निक्षून सागितलं.'मला काही सांगू नका.काहीही झालं तरी यावेळी आपण जायचं म्हणजे जायचं'
अप्पांना नातवांकडून सगळ्या घडामोडी कळल्या. ते सतीशला म्हणाले."अरे कशाला एवढं टेन्शन घेतोय.राहीन मी एकटा.जा तुम्ही सगळे"
" असं कसं म्हणता अप्पा?तुम्हाला एक अटँक येऊन गेलाय.तुमचा बी.पी.आणि शुगर नेहमी कमी जास्त होतं असतात.कसं सोडायचं तुम्हाला एकटं?"
सतीश खरं बोलत होता त्यामुळे अप्पा चुप बसले.

    टूरला निघायला फक्त तीन दिवस उरले होते.पण मार्ग निघत नव्हता.सतीशचं टेन्शन वाढलं होतं.त्याने सर्व पर्याय समोर ठेवून पाहीले.शेवटी स्वतःची टूर कँन्सल करुन भारती आणि मुलांना टूरला पाठवून द्यायचं हाच पर्याय त्याला योग्य वाटला.भारती संतापणार होती शिवाय दोन लाखाचं नुकसानही होणार होतं.पण त्याला इलाज नव्हता.शेवटी त्याने निर्णय पक्का केला.भारतीला फोन करुन कल्पना दिली.ती तर रडायलाच लागली.पण त्याने समजावण्याच्या फंद्यात न पडता फोन कट केला.मग ड्रायव्हरला फोन करुन तयार यहायला सांगितलं आणि तो आँफिसच्या बाहेर येऊन गाडीत बसला.गाडी ट्रँव्हल एजन्सीकडे घ्यायला सांगितली.
"खुप टेन्शनमध्ये दिसताय साहेब" त्याचा ड्रायव्हर मोहनने विचारलं.सतीशने सर्व घटना त्याला सांगितली.ती ऐकल्यावर तो म्हणाला
" अहो मग टूर कशाला कँन्सल करताय साहेब?मी माझ्या घरी घेऊन जातो अप्पांना"
"नको नको कशाला तुझ्या फँमिलीला त्रास.अप्पांचं फार बघावं लागतं.त्यांच्या औषधाच्या,खाण्यापिण्याच्या वेळा बघाव्या लागतात"
"अहो त्यात काय एवढं! आम्ही आमच्या वडिलांचं करतोच ना?त्यांचीही बायपास झालीये हे तुम्हालाही माहीत आहे.शिवाय माझे वडिल अप्पांना चांगलं ओळखतात.दोघांची चांगली दोस्ती होईल बघा.ते काही नाही मी अप्पांना घेऊन जाणार"
एका ड्रायव्हरच्या घरी अप्पांना ठेवावं हे सतीशला रुचेना.पण त्याचा आग्रह पाहून त्याने अप्पांनाच विचारायचंं ठरवलं.
"ठीक आहे.चल गाडी फिरव.आपण अप्पांनाच विचारु.ते तयार झाले तर माझी काही हरकत नाही."
मोहन खुष झाला.घरी येऊन त्याने अप्पांना विचारलं.अप्पांचाही चेहरा खुलला.ते म्हणाले" मोहनच्या कुटुंबाला काही हरकत नसेल तर मी जायला तयार आहे" मोहनने लगेच घरी फोन लावला.बोलणं संपल्यावर तो आनंदाने म्हणाला."सगळे तयार आहेत.आमच्या वडिलांना तर फारच आनंद झाला आहे"

    टूरच्या दिवशी मोहन अप्पांना घेऊन त्याच्या घरी गेला.नंतर त्याने सतीश आणि कुटुंबाला विमानतळावर सोडलं.निरोप घेतांना सतीशला त्याने आश्वासन दिलं 'काळजी करु नका साहेब.अप्पा अगदी सुखरुप रहातील'
 टूरमध्ये असतांनाही सतीश अप्पांना फोन करुन विचारत होता.त्यांचं एकच उत्तर असायचं ' काळजी करु नको.मी मजेत आहे '

    सोळाव्या दिवशी मोहन त्यांना घ्यायला विमाननतळावर गेला.सतीशने अप्पांची चौकशी केली.
" अगदी मजेत आहेत अप्पा.खुप धमाल केली त्या दोघा म्हाताऱ्यांनी" मोहन सांगत होता "रोज सकाळी उठून माँर्निंग वाँकला जायचे.मग दिवसभर पत्ते आणि बुध्दीबळ खेळायचे.मग संध्याकाळी एखाद्या मंदिरात किर्तनाला किंवा त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नागरीकांसोबत चौकात बसून
गप्पा मारायचे.तीन दिवसांपुर्वी अप्पांना थोडा ताप आला होता.शुगरही थोडी वाढली होती.मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो होतो.आता एकदम ओके आहेत"
" आम्हाला सोडल्यावर घेऊन ये त्यांना घरी"
"एक दिवस राहू द्या ना साहेब त्यांना. आजारामुळे त्यांचा पाहूणचार राहून गेलाय"
" अरे आता कशाला हवा तो पाहूणचार?इतके दिवस तू त्यांना सांभाळलं ते काय कमी आहे?"
"असं काय करता साहेब!आपल्या घरी आलेल्या पाहुण्याला पाहूणचाराशिवाय कसं सोडायचं?आणि हे मी सांभाळलं असं म्हणूच नका.मी काहीही फारसं केलं नाही.अप्पाच व्यवस्थित राहिले"
"बरं बुवा नाही म्हणत" सतीशने माघार घेतली.
 दूसऱ्या दिवशी संध्याकाळी अप्पा घरी आले.ते आनंदी दिसत होते.त्यांच्या हातात एक पिशवी होती.त्यात पँट,शर्टचं कापड,टाँवेल,टोपी होतं.ते पाहून सतीश मोहनला म्हणाला.
"अरे याची काय गरज होती मोहन?"
"नाही कशी साहेब?अप्पांना काय तसं पाठवायचं होतं?"
तेवढ्यात भारतीने त्याला आत बोलावलं.म्हणाली
"अहो त्याचे उपकार ठेवू नका.पाच दहा हजार देऊन टाका त्याला" सतीशलाही ते पटलं.मोहनकडे जाऊन त्याने दहा हजाराच्या नोटा त्याच्या हातात ठेवल्या.मोहनने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहीलं मग त्या नोटा सतीशच्याच खिशात कोंबत  म्हणाला
" हे काय साहेब?अहो वडिलांना सांभाळायचे कोणी पैसे घेतं का? आणि हो पुढे कधीही असा प्रसंग आला तर अप्पांना बिनधास्त माझ्याकडे पाठवायचं"
सतीशला गहिवरुन आलं त्याने मोहनला मिठी मारली.

तीन चार दिवसांनी अभि आणि रेणूचा फोन आला.टूर कँन्सल केला की अप्पांना व्रुध्दाश्रमात ठेवलं होतं असं विचारत होते.सतीश एकच वाक्य बोलला ' मला माझा खरा भाऊ भेटला.त्याने अप्पांना व्यवस्थित साभाळलं 

"ढ" मुलगा


"ढ" मुलगा





पत्रलेखक आपल्या अवतीभवती तर नाही ना.???
-------
(सर्व सुजाण पालक व संवेदनशील शिक्षकांसाठी समर्पित..!)
----------------------------------------
पत्रलेखन:
१२वी मध्ये शिकणाऱ्या एका "ढ"
विद्यार्थ्याचे आपल्या वडीलास पत्र.!
-----------------------------------------
प्रति,
तीर्थरूप पप्पास,
साष्टांग दंडवत..!

    पप्पा आज पत्र लिहायला घेतले, परंतू नेमकी कुठून सुरवात करावी.? तेच कळत नाही. हिंमत करतो आणि पत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो .
पप्पा.! माझा दहावीचा निकाल लागला, आणि मला ८२% टक्के मार्क्स मिळाले . खरं सांगतो मला खूप आनंद झाला होता, परंतू मला तो व्यक्त करता आला नाही.
कारण मला दहावीला ८२% मार्क्स पडले आणि तुमच्या दोघांच्याही नजरेत मी गुन्हेगार झालो... 'ढ' झालो..!
तुम्हीच काय पण माझ्यावर जीवापाड प्रेम करणारी माझी आईही पण खूप नाराज झाली. कारण तुम्हा दोघांनाही माझ्याकडून ९०% च्यावर मार्क्स पाहिजे होते, ते मी मिळवू शकलो नाही .
मला एक प्रसंग चांगला आठवतो, मला दसऱ्याचा ड्रेस घेण्यासाठी आपण दुकानात गेलो होतो. मी मला आवडलेला एक ड्रेस बाजूला काढला आणि तुम्हाला दाखवला . तुम्ही एकदम माझ्यावर चिडलात आणि जोरात ओरडलात
"मूर्खां लाज नाही वाटत.!" ८२% मार्क घेतो आणि दोन हजार रुपायाचा ड्रेस घेतोस ?"
पप्पा.! अगदी खरं सांगतो, मला खूप वाईट वाटलं होतं ! मला तत्क्षणी ड्रेसची किंमतच माहीत नव्हती, खरे तर मी रंग आवडला म्हणून ड्रेस पसंद केला होता. पण असो , पुन्हा मला आवडीचे कपडे कधीच घ्यावेसे वाटले नाहीत.  त्यावेळेस पासून मी कधीही " आवड सांगत नाही", फक्त तुम्ही घेतलेले कपडे घालतो.
मी नको म्हणत असतांनाही तुम्ही मला Science side ला प्रवेश दिला. मला तुमच्या अपेक्षेप्रमाणे मार्क्स पडत नाहीत, पण मी प्रयत्न करत राहतो. तरीही माझ्या सरांनी त्या दिवशी खूप छान समजून सांगितलं !
आमचे सर म्हणाले, सर्वच मुलं मेडिकल किंवा इंजिनिअरिंगला कशी लागतील, परंतू तुम्ही ते समजून घेत नाहीत .
आमचे सर मला खूप खूप आवडतात, कारण ते त्यांचा विषय तर छान शिकवतातच पण अधून मधून खूप छान संस्कार करतात .
त्या दिवशी सर बोलता बोलता म्हणाले, जग फक्त जिंकलेल्याचं स्वागत करतं ! हार-तुरे, मान-सन्मान फक्त जिंकणाऱ्याच्या वाट्याला येतात. पराभव झाल्यावर, हरल्यावर, कुणीही जवळ घेत नाही.
म्हणून मित्र हो.! जीव तोडून अभ्यास करा, प्रचंड मेहनत करा आणि यशस्वी होण्याचा प्रयत्न करा..!
आणि एवढ्यावरही तुमच्या वाट्याला अपयश आलं, तुम्ही जर हारलात तर खचून जाऊ नका. शांतपणे घरी जा.
सर्व जगाने जरी दरवाजे बंद केले, तरी तुमच्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे असतील ! सगळं जग जरी तुमचा धिक्कार करत असेल, तरीही आईवडील तुम्हाला नक्की जवळ घेतील, ते हृदयाला कवटाळतील आणि म्हणतील "बाळा तू काही काळजी करू नकोस!" "एक दिवस तू नक्की जिंकशील " !
आणि दुर्दैवाने तसं नाही झालं, तरीही काही काळजी करू नका , तुमच्या आई वडिलांनी जरी तुम्हाला दूर लोटलं, घराचे दरवाजे बंद केले, तरीही काळजी करू नका, या गरीब शिक्षकाच्या घराचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा असेल !
कळत नकळत अनेक विद्यार्थ्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि कडकडून सर्वांनी टाळ्या वाजवल्या .....
आपल्याला बाप मिळाला म्हणून. 
खरं सांगतो पप्पा, तेंव्हा पासून मला माझे सर खूप जवळचे वाटतात. आणि मला आता अपयशाची भीती वाटत नाही !
पप्पा "ढ" मुलाला बाप आणि माय आता खरंच मिळणार नाही का हो ?

                               
                         आपला,
                     लाडका नसलेला
                       "ढ" मुलगा

जीवन हे विफलच असायचे, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना, असे सारा वेळ वाटते.मानवांचे प्रयत्न,आकांक्षा,वैर,मैत्री-सगळीच कशी उन्हाळ्याच्या वावटळीने उडविलेल्या पाचोळ्यासारखी क्षुद्र, पोरकट भासतात; पण त्याचबरोबर ज्या व्यक्तींनी ते प्रयत्न केले,आकांक्षा बाळगल्या,त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात, प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परीपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रयस्थ वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो. त्या व्यक्तीलाही तो जाणवला असला पाहिजे, हे महाभारत वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवते कि, त्या व्यक्तीची व्यथा आपली स्वतःची व्यथा होते.त्या व्यक्तीच्या द्वारे  सबंध मानवतेचे दु:ख आपल्याला खुपत राहते.

ययाति" मधील भावलेले विचार


ययाति" मधील भावलेले विचार
*
या जगात जन्माला येण्याचा एकाच मार्ग आहे, तसं मरणाच नाही...
मृत्यु अनेक वाटांनी येतो! कुठून ही येतो तो!
*
आत्मप्रेम
या जगात जो तो आपापल्याकारिता जगतो हेच खरे. 
वृक्षवेलीची मूळे जशी जवळच्या ओलाव्याकडे वळतात तशी माणसेही सुखासाठी निकटच्या लोकांचा आधार शोधतात.....
याला जग कधी प्रेम म्हणते, कधी प्रिती म्हणते, तर कधी मैत्री........पण खरोखरच हे "आत्मप्रेम" असते....
*
आयुष्याच्या आरंभी ज्यात काही अर्थ नाही असे वाटते त्यातच खोल अर्थ भरलेला आहे, 
असे आयुष्याच्या शेवटी आढळून येते.........
*
अपहार
ते फूल पाहून माझ्या डोळयांना जे सुख होईल ते सुख प्रत्येक दिवशी मी घेणार आहे. 
ते फार चांगलं उमललं म्हणजे वेलीजवळ जाउन त्याचा वासही घेणार आहे मी. 
पण ते तोडणार मात्र नाही. आज वासासाठी एक फूल खुडलं तर उद्या तेवढ्याच सुखासाठी फूलामागून फूलं खुडाविशी वाटतील मला. 
मग दूस-यांच्या फूलांचा अपहार करण्याची इच्छा माझ्या मनात प्रबळ होईल........
अपहारासारखा अधर्म नाही..........
*
सत्य
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही. सत्य हे नग्न असते. 
नुकत्याच जन्मलेल्या बालाकाप्रमाने असते ते ! ते तसे असावेच लागते..........
*
सुख
या जगात सुख लूटण्याचा काळ एकच असतो-----ते मिळत असते तेव्हा.......!
*
प्रिती
प्रिती ही कधी उमलणा-या फूलासारखी हसते तर कधी उफाळणा-या ज्व़ाळेसारखी दिसते. 
ती कधी चांदणी होते, तर कधी वीज होते. ती कधी हरिणीचे रूप घेते, तर कधी नागीणीचे... ती कधी जीव देते, तर कधी जीव घेते.........!!
*
जीवन
जीवन नेहमीच अपूर्ण असतं. नी असं ते असण्यातच त्याची गोडी साठवलेली आहे...
*
प्रेम
प्रेम माणसाला स्वत:च्या पलीकडे पाहायची शक्ती देतं. ते प्रेम कुणावरही असो, 
ते कशावरही जड़लेलं असो. मात्र ते खरंखुरं प्रेम असायला हवं! ते स्वार्थी, लोभी, किंवा फसवं असता कामा नये. 
खरं प्रेम नेहमीच नि:स्वार्थी असतं, निरपेक्ष असतं... मग ते फूलावरलं असो, प्राण्यावरलं असो, सृष्टिसौंदर्यावरलं असो, आई-बापावरलं असो, 
प्रियकर-प्रेयसी यांच्यावरलं असो, कुल, शांति, राष्ट्र यांच्यापैकी कुणावरलंही असो. नि:स्वार्थी, निरपेक्ष, 
निरहंकारी प्रेम हीच माणसाच्या आत्म्याच्या विकासाची पहिली पायरी असते...........
असलं प्रेम केवळ मनुष्य करू शकतो! 
*
जग माणसाच्या दयेवर चालत नाही.
ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. 
माणुस केवळ प्रेमावर जगुच शकत नाही.तो इतरांचा परभव करुन जगतो.
मनुष्य या जगात जी धडपड करतो ती भोगासाठी ! ! 
त्यागाची पुराणं देवळातच ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही,ते रणांगन आहे.
*

मुद्र शिंपल्यात घालून कधी कुणाला दाखविता येईल का ? 
फुलाचे चित्र काढून कधी त्याचा सुगंध घेता येईल का ? 
प्रीतीची अनुभूती सुद्धा अशीच आहे.
*
दैव हे मोठ क्रूर मांजर आहे माणसाला मारण्यापूर्वी त्याला उंदरासारखे खेळविण्यात त्याला विलक्षण आनंद होत असतो
*


लज्जा सौंदर्याचा अलंकार आहे. सत्याचा नाही, सत्य हे नग्न असतं.


माणसांन उपभोग घेऊ नये अशी जर देवाची इच्छा असती,
तर त्यानं शरीर दिलच नसतं, पण केवळ उपभोग म्हणजे जीवन नव्हे. 
देवान माणसाला शरीराप्रमाणे आत्माही दिला आहे. 
शरीराच्या प्रत्येक वासनेला या आत्म्याच बंधन हवं


त्यागाची पुराण देवळात ठीक असतात पण जीवन हे देवालय नाही , 
ते रणांगण आहे.

एकुलती एक नोकरी करणारी..

एकुलती एक नोकरी करणारी...

त्याने आजवर आठ मुलींना नकार दिला होता. आज त्याला पहिला नकार मिळाला. अभिनव मध्ये खरं तर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. रुबाबदार व्यक्तीमत्व, इंजिनियर आणि एमबीए करून लठ्ठ पगाराची नोकरी. आईवडिलांचा एकुलता एक. तीन बेडरूमचे घर. पण रुहीने त्याला नकार कळवला. अभिनव चे आईवडील टेन्शन मध्ये आले. त्याने ह्यापुढील स्थळ न नाकारता सरळ होकार देऊन मोकळं व्हावं असं सांगू लागले. वरून त्याची अट होती सुंदर, मनमिळाऊ, शिकलेली ह्या बरोबर "नोकरी करणारी एकुलती एक!" अश्या कॉम्बिनेशनच्या मुली मुळात कमी मिळत. त्याही हा रिजेक्ट करत असे आणि त्याला मिळालेलं आता हे पाहिलं रिजेक्शन! आईवडील टेन्शन मध्ये होते पण अभिनव मात्र एका वेगळ्याच विचारात होता!

दुसऱ्या दिवशी अभिनव ऑफिसात रुहीचा बायोडेटा वाचत होता. त्यात तिच्या ऑफिसचे नाव होते. त्याने गुगल करून पत्ता शोधला आणि लंच मध्ये तो तिच्या ऑफिसात धडकला! त्याला बघून रुहीला आश्चर्य वाटलं. अभिनव म्हणाला-

अभिनव- हाय.
रुही- हाय. तुम्ही....इथे?
अभिनव- हो जरा बोलायचं आहे.
रुही- काल माझ्या बाबांनी फोन केला ना?
अभिनव- हो. म्हणूनच बोलायचं आहे. आज हाफ डे घेऊ शकशील का? तू म्हणशील तिथे जाऊ आणि बोलू.
रुही- पण...
अभिनव- विश्वास ठेव ही आपली शेवटची भेट असेल. ह्यानंतर मी तुला कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही.

रुहीने क्षणभर विचार केला आणि ऑफिसात कळवून दोघे निघाले. तिच्या ऑफिसच्या इमारतीतच असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये दोघे पोहोचले. एक स्टॅंडर्ड ऑर्डर देऊन दोघे शांत बसून होते. आपल्यासमोर आपण नकार दिलेला मुलगा बसला आहे ह्या जाणीवेने रुहीला खूप ऑकवर्ड वाटत होतं.

अभिनव- तू इथे किती वर्षे नोकरी करतेस?
रुही- पाच वर्षे होतील पुढल्या महिन्यात. माझी सीए केल्यावरची पहिलीच नोकरी.
अभिनव- कन्सल्टीग एमएनसी म्हणजे पगार उत्तम असेल.

रुही ह्या अनपेक्षित प्रश्नाने चकित झाली.

अभिनव- मला माहित आहे पगार छानच असेल. असो. लग्नानंतर पण नोकरी करणार?
रुही- हो.
अभिनव- नवऱ्याने नको करू सांगितलं तर?
रुही- तर मी नवऱ्याला सोडीन.
अभिनव- इंटरेस्टिंग. बरं एका प्रश्नच खरं उत्तर देशील?
रुही- काय?
अभिनव- मला रिजेक्ट का केलंस? आय मीन माझा ईगो हर्ट झाला.
रुही- कारण बघण्याच्या कार्यक्रमात तुम्ही इनसिस्ट केलेली अपेक्षा.
अभिनव- कोणती?
रुही- तुम्हाला मुलगी नोकरी करणारीच हवी आणि लग्नानंतर नोकरी सोडावी असे तुम्ही म्हणालात.
अभिनव- हो. कारण गरजच नाहीये आम्हाला तुझ्या नोकरीची.
रुही- माझ्या नोकरीची गरज आहे. माझ्या आईबाबांना! अभिनव माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. माझ्या बाबांकडे खरच पैसे नव्हते आणि नाहीयेत. जे काही होते ते त्यांनी माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत. ते देखील इतके कमी आहेत की त्याच्या व्याजात त्या दोघांचा महिन्याचा खर्चही निघणार नाही. बाबांनी मला दोन गोष्टी मात्र आवर्जून दिल्या. एक म्हणजे चांगले संस्कार आणि दुसरी म्हणजे शिक्षण!
अभिनव- ओके. मग?
रुही- मी आईबाबांची एकुलती एक मुलगी. आज चांगली नोकरी करते आहे. चांगला पगार आहे. आता कुठे आम्हाला पैसा दिसू लागलाय. माझ्या बाबांना परदेशाबद्दल कुतूहल आहे. ते पेपरात आणि पुस्तकात विविध देशांची माहिती वाचत असतात. त्यांना वाचनाचा छंद आहे. पुढे त्यांचं वयानुसार येऊ शकणार आजारपण, औषध असू शकेल.
अभिनव- बरं मग? Come to the point. मला नकार का? ह्याच्याशी माझा काय संबंध?
रुही- तुमच्या ह्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुमचा माझ्या आईवडिलांशी संबंध नाही, ते तुमची जबाबदारी नाही. आपलं लग्न झालं की मी तुमची. मग माझाही काहीच संबंध नसेल त्यांच्या जबाबदारीशी असा अर्थ आहे.
अभिनव- अर्थात.
रुही- मला तेच मान्य नाहीये. मला आई बाबांना परदेशात टूरला पाठवायचं आहे, चांगल्या हॉटेल्स मध्ये जेवायला घालायचं आहे, घरात सर्व सुखसुविधा द्यायच्या आहेत, त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी घ्यायची आहे. नोकरी करणारी एकुलती एक ही एक महत्वाची अट असणाऱ्या माणसाशी लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही हे माहीत असल्याने मी नकार दिला इतकंच! तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. प्रॉब्लेम माझा आहे तुमचा नाही!
अभिनव- सीमा म्हणजे शिवराम आणि आनंदी बाई जोश्यांची एकुलती एक मुलगी. बीए शिकलेली आणि सरकारी नोकरीत. शिवराम जोशी भिक्षुक. परिस्थिती यथातथा! सीमाच लग्न झालं. ती संसारात रमली. लाडक्या मुलीबरोबर तिच्या पगाराचा घराला असलेला आधार एका दिवसात परका झाला! वर्ष सरत गेली. शिवराम भाऊ आणि आनंदीबाई आयुष्यातील मूलभूत सुखांनी वंचित असे आयुष्य जगत लेकीचा सुखी संसार बघून आनंद मानत होते! सीमाने पंचेचाळीस वर्षांची असताना व्हीआरएस घेतली. भरपूर पैसे हाती आले.त्या पैशात थोडी भर टाकून त्यांनी त्यांच्याच इमारतीत अजून एक मोठी जागा घेतली. शिवरामभाऊ आणि आनंदीबाई मात्र दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य कंठत होते! तिथेच यथावकाश वर्षभराच्या अंतराने दोघे संपले!
रुही- बघा हे असंच होत. माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला नकार दिला!
अभिनव- रुही माझ्या आईच नाव सीमा आहे आणि मी सांगितलेली गोष्ट माझ्या सख्या आजी आजोबांची आहे! मला मोठा झाल्यावर त्यांची अगतिकता लक्षात आली पण खूप उशीर झाला होता. चूक माझ्या आईची देखील नाही. तेव्हा बाबांची परिस्थिती पण अशी होती की काही वर्षे आईच्या पगारावर घर चालू होतं. मग बिझनेस जोरात सुरू झाला आणि दिवस बदलले. पण आजीआजोबांची हालाखी तोवर सवय होऊन गेली होती. कोणालाच त्याच वाईट वाटत नसे. आणि कोणालाही ती खटकत नसे!
रुही- हम्म
अभिनव- आजीआजोबा गेल्यावर मी ठरवलं की एका अश्या मुलीशी लग्न करायचं जी एकुलती एक असेल आणि नोकरी करणारी असेल. तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि कमावलेले सगळे पैसे लग्नाआधी जसे वापरायची किंवा खर्च करायची तिथेच त्याच पद्धतीने खर्च करेल! माझ्या आजीआजोबांसारख्या हजारो एकुलत्या एका मुलीच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझे आजी आजोबा होण्यापासून थांबवायचा प्रयत्न करेन. रुही होत काय माहित्येय का? लग्न केल्यावर एकतर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम करियर असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत राहून सासरला हातभार लावायला सुरुवात करतात. पण दोन्ही बाबतीत एकुलत्या एका मुलीचे आईवडील ज्यांना उतारवयात त्या मुलीची नोकरी हा म्हातारपणाचा आर्थिक आधार असू शकतो त्यांचा कोणीच विचार करत नाही. म्हणून माझी ती अट होती. तू मला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला. आणि आज तुझ्याकडून मला अपेक्षित असलेले कारण ऐकून खूपच आनंद झाला. आजवर देखणा, श्रीमंत, वेल सेटल्ड अभिनव दिसल्यावर, आपलं उज्वल भविष्य दिसल्यावर माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आईवडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या! सो माझी ऑफर अशी आहे की माझ्याशी लग्न केल्यावर तू नोकरी करत राहाशील! तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे बँकेत जॉईंट अकाउंट असेल. तू तुझे जे प्लान आहेत ते  पूर्ण करशील. तुझ्या आईवडिलांचा आर्थिक भार तू पेलशील! मी म्हणालो तसा माझा त्याच्याशी संबंध नसेल! फक्त कधी तुला भार सोसला नाही तर पाठीशी माझा हात कायम असेल! आता सांग मी रिजेक्ट की सिलेक्ट?

डोळ्यातून अश्रू वाहात असलेली रुही त्या प्रश्नाने लाजली! शिवरामभाऊ आणि आनंदीबाई पूर्वेला क्षितिजावर उगवलेल्या दोन ताऱ्यांच्या मागून डोळ्यातले अश्रू पुसत दोघांना मनापासून आशीर्वाद देत होते. आकाशात आजचा सुपर मून खूपच लोभस दिसत होता...

मंगळवार, ५ मार्च, २०१९

कृष्ण

द्रौपदी कृष्णाकडे गेली.. तेव्हा त्याच्या सगळ्या गवळणी, बायका, राधा,मीरा
सगळे मिळून प्रेमाचा वार्तालाप करत होते.. द्रौपदीला वाटलं.. आता कसं जायचं आपण??
पण ती आलेली कृष्णानं बघितलं.. आणि सहज स्वागत केलं.." ये सखी"
त्याबरोबर बाकीच्या सगळ्याजणी जायला निघाल्या..
द्रौपदीला ते कसंतरीच वाटलं... ती रूक्मिणीला म्हणाली.."अगं थांब गं.." तशी ती म्हणाली.."नको गं.. मला स्वामींची बरीच कामं करायचीयत.."
ती राधेला म्हणाली, " तू तरी थांब.."
ती म्हणाली.." मी थांबले काय आणि नाही काय??.. दोन्हीही माझ्यासाठी समानच आहे."
आणि सर्व निघून गेल्या...
कृष्णानं छद्मी हसत विचारलं..
" हं बोल.. आज तुझी काय शंका आहे??"
तशी ती म्हणाली..." हे जे घडलं.. तीच माझी शंका आहे.."
कृष्णानं विचारलं..." यात शंका घेण्याचं काय आहे??.. तुला आणि मला बोलायला वेळ मिळावा... म्हणूनच त्या गेल्या ना??"

त्यावर द्रौपदी म्हणाली,
" हीच माझी खरी शंका आहे माधवा... की मी असं काय केलयं.. की ह्या सगळ्यांपेक्षाही तुला मी जवळची वाटते...ह्या सगळ्यांनी जसं तुझ्यावर आयुष्य ओवाळून टाकलं.. तसं मी काहीच केलं नाही..
उलट ह्या सगळ्यांना तू त्यांच्या आयुष्यातला एक अखंड हिस्सा म्हणून हवा होतास.त्यांनी त्यासाठी शक्ती, भक्ती, प्रेम, हक्क, लग्न असे सगळे मार्ग अवलंबले..तरी तसा तू त्यांना कधीच मिळाला नाहीस.. तू पूर्णतः कुणाचाच झाला नाहीस..
आणि त्या उलट मी मात्र माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगत होते.. तरी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मला गरज होती तिथे तिथे तू धावून आलास??... असं मी काय केलयं तुझ्यासाठी??"
त्यावर कृष्ण म्हणाला,
" ऐक... एखादया व्यक्तीचं स्वीकारणं.. म्हणजे त्याचं परिपूर्णत्व स्वीकारण्यासारखं असतं... कदाचित तू मला स्विकारलं नाहीस.. पण मी तुला स्विकारलयं... हा फरक आहे बाकीच्यांच्यात आणि तुझ्यात...

अगं त्या सगळं त्यांचं स्वत्वच माझ्यात विसरून गेल्या आहेत.. त्यामुळे त्यांचा आनंद फक्त मीच झालोय.. जे मला प्रिय ते त्यांना प्रिय...

पण मी तुला स्वीकारलयं... ते तुझ्या या स्वाभिमानी
  #स्वत्वासाठी
ते आहे म्हणून तुझं तेज टिकून आहे..... तुला माहितीय स्वतःला की तू काय करतीयस... आणि त्यावर तू ठाम आहेस... तुला फक्त हवा असतो; एक सल्लागार, एक मार्गदर्शक, आणि एक खंदा पाठिंबा.. आणि तेच करतो मी...
त्यामुळे निःशंक हो पांचाली.."

त्यावर ती म्हणाली...
"अच्छा.. मग ह्यांनीही असंच स्वत्व टिकवून ठेवलं तर त्यातल्या कुणाचा तरी तू एकीचाच होशील ना??... मग बाकीच्यांवर अन्याय नाही का??"
ह्यावर कृष्ण गडगडाटी हसत म्हणाला,
" हे तुझं प्रश्न विचारणंच खूप आवडतं... आणि जेव्हा असे प्रश्न पडतात.. तेव्हाच ते व्यक्तित्व अधोरेखित करतात...
आता ऐक...
खरं तर त्यातल्या कुणीच हे असं करणार नाहीत.. कारण तो त्यांचा स्वभाव नाही...
आणि असं आहे... की मी म्हणजे नेमका कोण आहे??
तर मी तुमचंच प्रतिबिंब आहे... तुम्ही ज्या नजरेने बघता त्यातच मी मिसळून जातो.....
त्यांनी माझ्याकडे फक्त प्रेम या भावनेनं बघितलं.. म्हणून मी तसाच बनून गेलो...
पण तू मात्र प्रत्येकवेळी मला वेगवेगळ्या नजरेनं बघत आलीस... म्हणून मी तुला तसाच मिळत राहिलो...

हाच फरक आहे.. तुझ्यात आणि बाकीच्यांच्यात...
म्हणूनच म्हणलं.. मी ....
की "मी" तुझा स्वीकार केलाय....

संसारामधला खमंगपणा

संसारामधला खमंगपणा

लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...

पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...

त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !

तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..

तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?

मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..

तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...

बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...

घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...

मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."

तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...

बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...

तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काही सुचलं ... ? "

त्यानं नकारार्थी मान हलवली ...

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "

तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?

आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "

सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...
मला स्वतःविषयी शंका होती पण पंचवीस वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "

असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...
शपथ सांगतो ...
त्याच्या पंचवीस वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!
                  ~~अनामिक

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा