Pages

गुरुवार, ४ जुलै, २०१९

तुला माझ्या बद्दल काय वाटतं ?



MARATHI ARTICLE

तुला माझ्या बद्दल काय वाटतं ?

लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्या बद्दल काय वाटतं ?"
 तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हतीनं ... ! प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदातरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडेही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...

पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्न पत्रिका सोडवता सोडवताही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...
त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !
 तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवा जुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं .. 
तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?
 मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..
 तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...
बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..
 सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवईवर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...
घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याचक्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...
 मुलगा जवळ जवळ उडीमारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."
 तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...
 बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...
 तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काहीसुचलं ... ? "
 त्यानं नकारार्थी मान हलवली ...
 तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "
 तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?
आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "
 सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं काय करावं कळेना ...
मला स्वतः विषयी शंका होती पण पंचवीस वर्षानंतरही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "
 असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...
शपथ सांगतो ...
त्याच्या पंचवीस वर्षाच्या संसारा मधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!
                  ~~अनामिक



गुरुवार, २५ एप्रिल, २०१९

"पॉश"



रिमाने आज किचनमधली सगळी जुनी भांडी काढली.
जुने डबे.. प्लास्टिकचे डबे...जुन्या वाट्या, पेले, ताट...
सगळं इतकं जुनं झालं होतं.
सगळं तिने एका कोपऱ्यात ठेवलं. आणि नवीन आणलेली भांडी तिने छान मांडली..
छान पॉश वाटत होतं आता किचन...
आता जुन सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम.

इतक्यात रिमाची कामवाली सखू आली.
पदर खोचून ती लादी पुसणार इतक्यात तिची नजर कोपऱ्यात गेली. 
"बापरे !!  आज घासायला इतकी भांडीकुंडी काढली का ताई ?"...
तिचा चेहरा जरा त्रासिक झाला.
रीमा म्हणाली "अग नाही. भंगारवाल्याला द्यायचीत."
सखूने हे ऐकलं आणि तिचे डोळे एका आशेने चमकले...
"ताई,...तुमची हरकत नसेल तर हे एक पातेलं मी घेऊ का?..(सखूच्या डोळ्यासमोर तिचं तळ पातळ झालेलं आणि काठाला तडा गेलेलं एकुलत एक पातेलं सारखं येऊ लागलं)
रीमा म्हणाली "अग एक का ?
काय आहे ते सगळं घेऊन जा.. तेवढाच माझा पसारा कमी होईल"
"सगळं!!".....सखूचे डोळे विस्फारले... तिला जणू अलिबाबाची गुहाच सापडली....
तिने तीच काम पटापट आटपल...
सगळी पातेली....डबे डूबे...पेले सगळं पिशवीत भरलं...
आणि उत्साहात घरी निघाली...आज जणू तिला चार पाय फुटले होते...
घरी येताच अगदी पाणीही न पिता तिने तिचं जुन तुटक पातेलं.. वाकडा चमचा... सगळं एका कोपऱ्यात जमा केलं .
आणि नुकताच आणलेला खजिना नीट मांडला....
आज तिचा एका खोलीतला किचनचा कोपरा पॉश दिसत होता....

इतक्यात तिची नजर तिच्या जुन्या भांड्यांवर पडली... आणि स्वतःशी पुटपुटली "आता जुन सामान भंगारवाल्याला दिलं की झालं काम"...
इतक्यात दारावर एक भिकारी पाणी मागत हाताची ओंजळ करून उभी राहिली...
"माय पाणी दे"
सखू तिच्या हातावर पाणी ओतणार इतक्यात सखूला तिचं पातळ झालेलं पातेलं दिसलं. तिने त्यात पाणी ओतून त्या गरीब बाईला दिलं...
पाणी पिऊन तृप्त होऊन ती भांडं परत करायला गेली...
सखू म्हणाली. ..."दे टाकून"
ती भिकारीण म्हणाली "तुले नको??? मग मला घेऊ?"
सखू म्हणाली" घे की...आणि हे बाकीच पण ने"
असं म्हणत तिने तिचा भंगार त्या बाईच्या झोळीत रिकामा केला...
ती भिकारीण सुखावून गेली...
पाणी प्यायला पातेलं... कोणी दिलं तर भात, भाजी, डाळ घ्यायला वेगवेगळी भांडी...आणि वाटलंच चमच्याने खावं तर एक वाकडा चमचा पण होता....
आज तिची फाटकी झोळी पॉश दिसत होती. .!!!!

"पॉश" या शब्दाची व्याख्या

सुख कशात मानायचे हे ज्याच्या त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असते.

लोक तूम्हाला बोलणारच!



लोक तूम्हाला बोलणारच!

तुम्ही लोकांपासून दूर रहाल तर लोक म्हणतील तुम्ही खुप गर्विष्ठ आहात. तुम्ही खुप खर्च कराल तर लोक म्हणतील, तुम्ही उधळ्या आहात. तुम्ही खर्च कमी कराल तर लोक म्हणतील , तुम्ही चेंगटच आहात.तुम्ही सतत खरे बोलाल तर लोक तुम्हाला फटकळ म्हणतील, तुम्ही इतराची स्तुती कराल तर लोक तुम्हाल. संधी साधू म्हणतील. तुम्ही विरोध करु इतरांच मताचे खंडण कराल तर लोक तुम्हा उर्मठ म्हणतील. तुम्ही इतरांच सहन कराल तर लोक भित्रा म्हणतील. लोकांना निरपेक्षपणे मदत कराल , तर लोक तुम्हाला बावळट म्हणतील. जर तुम्ही प्रमाणिक वागलात तर लोक तुमचा वापर करतील. पण तूम्ही खंबीर राहीलात तरच तुम्हाला लोक सलाम करतील. एक वेळ कलंदर बनून जगा। जग हे काही तरी म्हणणारच आहे.
पत्नी पतीला म्हणते,..
एखादी वस्तू स्वस्त आणल्यास...  तुम्हाला सगळे फसवतात... महाग आणल्यास...
 तुम्हाला कुणी आणायला सागितलं होत?
 जेवणाचं कौतुक केल्यास,  मी दररोजच करते.
  नावं ठेवल्यास...
 तुम्हाला मेलं माझं कौतुकच नाही कशाचं...
 एखाद काम केल्यास...
  एक काम कधी धड करत नाही...
  ते न केल्यास...
  तुमच्या भरवशावर राहिले तर एकही काम होणार नाही...
आणि शेवटच

मी आहे म्हणून टिकले नाहीतर दूसरी असती तर पळून गेली असती
   शांत रहाण्याचा प्रयत्न करा.

तुमच जीवन तुमच्यासाठीच जगा. जीवन खुप सुंदर आहे. पण ते तुम्हाला कळाले तर.
आनंदी जगा, लोक काय तरी म्हणणारच!
म्हणून लोकांचा विचार सोडा. मजेतच जगा!

सकारात्मक रहा.........................



सकारात्मक रहा.........................

आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते.

अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो.
एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो.त्यामुळे काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..
एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतफेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.

ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे आनंदोत्सव होईल

प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार:





प्रसिद्ध व्यक्तींचे सुविचार:
=====================

 नदी वाहून गेल्यावर पाय न भिजविता पलिकडे जाऊ या मूर्खपणाच्या आशेवर थांबून न बसता पाण्यात उडी घालून आणि प्रवाह तोडून पलीकडे चला.
स्वामी विवेकानंद

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर पुढे जाऊ नका पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.
लोकमान्य टिळक

सत्य असेल तर काळाच्या ओघात ते टिकेल, असत्य असेल तर ते अदृष्य होईल.
साने गुरुजी

दिवसभरात तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात, असे समजावे.
स्वामी विवेकानंद

सर्वच प्रश्न सोडून सुटणारे नसतात, काही प्रश्न सोडून दिले की सुटतात.
विनोबा भावे

आत्मविश्वास हे कर्तृत्ववृक्षाचे मूळ आहे, वृक्षांची मुळे जो जो भूमीत खोल जातात तो तो वादळाशी झुंजण्याचे त्याचे सामर्थ्य वाढते; आयुष्यातील नानाविध संकटाशी टक्कर देण्याला आत्मविश्वासही असाच उपयोगी पडतो.
वि.स.खांडेकर

घर ही गोष्ट दगडविटांनी बांधले जात नाही, जिव्हाळ्याच्या व प्रेमाच्या धाग्यांनी बांधले जाते तेच खरे घर.
वि.वा.शिरवाडकर

इतरांपेक्षा स्वतःला जास्त ओळखा, ईतरांपेक्षा जास्त काम करा आणि इतरांपेक्षा कमी अपेक्षा करा, या तीन गोष्टी यश मिळविण्यासाठी महत्वाच्या आहेत.
विल्यम शेक्सपिअर

यश मिळविण्यासाठी कोणत्या मार्गाने जावे हे मी सांगू शकणार नाही. पण स्वतःला ओळखून स्वतःला, स्वतःसाठी, स्वतःकडून नेमके काय हवे आहे; हे शोधणे म्हणजेच यशाच्या जवळ जाणे होय.
विश्वनाथन आनंद

मुलांना मनासारखं करु द्यायला हवं, त्यांची अभिरुची विकसित होत जाईल. आपण काही लादू नये, फक्त प्रोत्साहन द्यावं. मुलं निसर्गाच्या संवेदनांचा शोध घेतील.
विष्णु चिंचाळकर

सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड करणे.
सुभाषचंद्र बोस

मानवाचा दानव होणे ही त्याची हार; मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
सर्वपल्ली राधाकृष्णन

गरिबांची सेवा हीच ईश्वर सेवा होय.
सरदार वल्लभभाई पटेल

श्रद्धा हा असा पक्षी आहे जो पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागून तो गाऊ लागतो.
रवींद्रनाथ ठाकूर

निर्बुद्ध लोक दुसऱ्यावर हसतात आणि बुद्धीवान स्वतःवर.
ओशो

जवळचे पैसे कधीतरी संपणारच; पण ते संपण्याआधी कमावण्याचे मार्ग शोधून ठेवावेत.
एन.आर.नारायणमूर्ती

ज्या दिवशी आपली थोडी सुद्धा प्रगती झाली नसेल, तर आपला तो दिवस फुकट गेला असे समजावे.
नेपोलियन बोनापार्ट

समाजावर जर काही प्रभाव पाडायचा असेल तर आपण आपले लक्ष बालकांकडे वळविले पाहिजे. हे सत्य मान्य केले तर शिशुविहारांचे महत्त्व समजते. ही बालकेच आपल्या भविष्याला आकार देणार आहेत आणि आपण जे साहित्य, शिक्षण त्यांना देऊ त्यावरच त्या आकाराची घडण अवलंबून असणार आहे.
मारिया मॉंटेसरी

पूर्ण नम्रताभाव अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही.
महात्मा गांधी

प्रत्येकजण जग कसे बदलेल याचा विचार करत असतो मात्र कुणीही स्वतःला कसे बदलता येईल याचा विचार करत नाही.
ल्येव तल्स्तोय

पैसा हा खतासारखा आहे; तो साचवला की कुजत जातो आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.
जे.आर.डी.टाटा

माझ्याकडून काही महत्त्वाचे शोध लागले याचा अर्थ मी कुणी वेगळा, हुशार आहे असा होत नाही तर वाट पाहण्याची, प्रयत्न करण्याची तयारी माझ्यात इतरांपेक्षा जरा जास्त होती इतकेच.
आयझॅक न्यूटन

परिस्थिती मानसाला घडवत नसते तर ती त्याला प्रकट करते.
जेम्स अ‍ॅलन

रडू नकोस, रडायला वेळ तरी कुठे आहे? स्वतःच्या अंतरंगात दीप चेतव. त्या दीपाच्या प्रकाशात निर्वाणपद प्राप्त करण्याचा मार्ग शोध.
बुद्ध

चुका दाखवितांना त्या कमी कशा करायच्या हेही सांगितले तर त्याचा परिणाम चांगला होतो.
बिल गेट्स

जीवन केवळ दीर्घ नव्हे तर महान असावे.
डाॅ बाबासाहेब आंबेडकर

पहिले यश मिळाल्यानंतर स्वस्थ बसू नका कारण दुसर्‍या प्रयत्नात जर अपयश आले तर संपूर्ण जग म्हणेल की पहिलं यश केवळ नशीबाने मिळाले होते.
ए. पी. जे. अब्दुल कलाम

जेव्हा एखाद्याला वाटत असेल की त्याने आयुष्यात एकही चूक केली नाही तेव्हा त्याने एकही नवी गोष्ट करुन पाहिली नाही असे समजावे.
अॅल्बर्ट आइन्स्टाइन

प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आणि कुणावरही विश्वास न ठेवणे हे खूपच धोकादायक होय.
अब्राहम लिंकन

अपयशी झाल्यावर आपल्याला अपयशका आले? याचे स्पष्टीकरण द्यावे लागते, मात्र यशस्वी झाल्यावर एका शब्दाचेही स्पष्टीकरण द्यावे लागत नाही.
ॲडॉल्फ हिटलर

माणुसकीचा झरा


माणुसकीचा झरा

एकदा एक माणूस मॉर्नींग वॉकसाठी बाहेर पडला होता. परत येताना त्याला रस्त्यावरील एका खांबावर एक चिठ्ठी घडी करून अडकवून ठेवलेली दिसली. त्याने कुतुहलाने ती चिठ्ठी उलगडून वाचायला सुरवात केली. ती चिठ्ठी बर्‍याच वेडावाकड्या अक्षरांमध्ये लिहिली होती. त्या चिठ्ठीतील मजकूर असा होता.

माझी ५०रुपयांची नोट हरवली आहे. मी एक गरीब आणि वृद्ध महिला आहे. ही नोट इथेच कुठेतरी पडली असावी. मी ती नोट शोधायचा प्रयत्न केला पण मला काही ती नोट सापडली नाही. ज्या कुणाला ही नोट सापडेल त्याने ती नोट खालील पत्यावर पोचवण्याची कृपा करावी.’

त्या चिठ्ठीच्या शेवटी पत्ता दिला होता आणि ‘गणपतीच्या देवळाजवळ अशी खुण पण सांगीतली होती.

त्या माणसाला काय वाटले कोणास ठाऊक. तो पत्ता शोधत निघाला. हा पत्ता एका गरीब आणि दळिद्री झोपडपट्टीतला निघाला. त्याने त्या वस्तीतील गणपतीचे देऊळ शोधून काढले व त्या पत्यावरील घर पण शोधून काढले. ते घर म्हणजे एक चंद्रमौळी झोपडी होती. झोपडीचे दार बंद होते. त्याने दाराची कडी वाजवली. एका जख्ख म्हातारीने दार उघडले. त्या म्हातारीचे सर्वांग लटपटत होते. काठीचा आधार घेऊन ती कशीबशी उभी होती. शरीर खंगलेले, चेहेरा सुरकुतलेला, गालाची हाडे वर आलेली, अंगावर फाटके कपडे पण चेहेर्याावर स्वाभीमान असे तिचे रूप होते.

आजी मला तुमची ५० रुपयांची नोट सापडली! हे घ्या तुमचे पैसे!’ असे म्हणून त्याने खिशातील 50 रुपयांची नोट काढून आजींना दिली.

कमाल आहे! माझी हरवलेली ५० रुपयांची नोट देण्यासाठी आत्तापर्यंत ४०  माणसे येऊन गेली. तु ४१ वा आहेस!’ आजी म्हणाल्या.

तुला कोणी सांगीतले माझे पैसे हरवले आहेत म्हणून?’ आजींनी विचारले.

मी ते खांबावरच्या चिठ्टीमध्ये वाचले.’ त्या माणसाने उत्तर दिले.

एकतर माझे पैसे मुळीच हरवेले नाहीत! दुसरे म्हणजे ती खांबावरची चिठ्ठी मी लिहीलेली नाही. कारण एकतर मला नीट दिसत नाही त्यामूळे मी घरातून बाहेर पडत नाही. तसेच मला लिहीता वाचता पण येत नाही. कोणीतरी खोडसाळपणाने ती चिठ्टी लिहीली आहे. हे तुझे 50 रुपये परत घेऊन जा! आजी म्हणाल्या.

नको आजी! राहुदे हे पैसे तुमच्याजवळ! तुम्हालाच ते उपयोगी पडतील!’ तो माणूस म्हणाला.

कमाल आहे! आत्तापर्यंत जो जो माणूस माझे हरवलेले 50 रुपये परत द्यायला आला त्याला मी पैसे परत घे म्हणून सांगीतले तर प्रत्येकाने हेच उत्तर दिले!’ आजीबाई म्हणाल्या

माझे एक काम करशील?’ आजीबाईंनी विचारले.

हो सांगाना! तुमचे काम नक्की करीन!’ त्या माणसाने उत्तर दिले.

अरे बाबा! जाताना ती खांबावरची चिठ्ठी फाडून टाक. लोकांना उगीच त्रास होतो आणि भुर्दंड बसतो. मी सगळ्यांनाच ती चिठ्ठी फाडून टाकायला सांगीतली. पण अजून कोणी ते काम केलेले दिसत नाही. बहुतकरून विसरले असावेत. निदान तू तरी ते काम करून टाक असे म्हणून त्याला धन्यवाद देत त्या आजींनी त्यांच्या झोपडीचे दार बंद केले.

परत जाताना त्या माणसाला त्या खांबावरची चिठ्ठी दिसली. ती चिठ्ठी फाडण्यासाठी म्हणुन तो त्या खांबाजवळ आला आणि थबकला.

त्याच्या लक्षात आले की त्या एका चिठ्ठीमूळे माणुसकीचा झरा वाहू लागला आहे. त्या चिठ्ठीमूळे अनेक लोकांची मदत त्या गरीब आजीबाईंना मिळाली आहे. आपले ५० रुपये गेले पण एका गरजू माणसाला मदत केल्याचा आनंद व समाधान आपल्याला मिळाले. असेच समाधान त्या 40 लोकांना पण मिळाले असेल. ही चिठ्ठी जर आपण फाडून टाकली तर माणुसकीचा झरा आटून जाईल. त्याला ती चिठ्ठी लिहिणार्याच माणसाचे कौतूक वाटले आणि तो चिठ्ठी न फाडताच तेथुन निघुन गेला.

माणुसकी नाही! माणुसकी नाही!’ अशी हाकाटी आपण मारत असतो. ‘हल्ली माणुसकी शिल्लक राहीली नाही! माणसाला माणसाची पर्वा किंवा किंमत राहिली नाही अशी बोंब ठोकत आपण सगळीकडे फिरत असतो. पण समाजात माणुसकीचे असे ‘सुप्त झरे नेहमीच वाहत असतात. फक्त आपल्याला ते दीसत नसतात. माणुसकीचे हे झरेच समाजाला व माणसाला जिवंत ठेवत असतात. असे झरे हेच समाजाच्या जिवंतपणाचे लक्षण असते.

तुम्हाला सुद्धा माणुसकीच्या अशा एखाद्या झर्याेमध्ये सामील होण्याची संधी मिळाली तर ती जरूर घ्या. इतरांना मदत केल्यामूळे जो काही आनंद किंवा समाधान मिळते याचा जरूर अनुभव घ्या!

अर्थात हा अनुभव घ्यायचा की नाही हे तुम्हीच ठरवायचे..!!

“अति ई” म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!


 “अति ई म्हणजे ईऽऽऽऽऽऽऽऽ!

गेल्या पाच-सहा वर्षांत ‘काॅपी-पेस्ट ही अभ्यासाची एक नवी पद्धत रूढ झाली आहे. शाळेपासूनच मुलांना विविध विषयांवरचे प्रोजेक्ट्स दिले जातात. विद्यार्थ्यांचं प्रत्यक्ष ज्ञान वाढावं, त्यांनी पाठ्यपुस्तकाबाहेर पडून माहिती मिळवावी, ती व्यवस्थित मांडणं, सादर करणं याकरिता खटपट करावी, त्यातून त्यांचं अवांतर वाचन वाढेल, नव्या गोष्टी समजतील, त्यांचं लेखनही सुधारेल आणि अर्थातच, यातून त्यांना आनंद मिळेल.. असा एक चांगला आणि शुद्ध हेतू समोर ठेवून प्रकल्पाधिष्ठीत शिक्षण सुरू झालं. पण, याची दुसरी बाजू गंभीरपणे विचारातच घेतली गेली नाही. म्हणूनच, या प्रकारामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच पदरी पडायला लागलंय.

अनेक घरांमधून या प्रकल्पांकरिता इंटरनेट वापरलं जायला लागलंय. शाळेतून प्रोजेक्ट चा टाॅपिक मिळाला की, इंटरनेटवरून माहिती डाऊनलोड करायची, ती आपल्या मेंदूला काहीही ताण न देता सरळ लिहून काढायची, तो प्रोजेक्ट आणखी आकर्षक व्हावा म्हणून इंटरनेटवरूनच फोटो किंवा चित्रं डाऊनलोड करायची आणि प्रिंट्स काढून चिकटवायची. जास्तीत जास्त एका तासाभरात आठ-दहा पानांचा प्रोजेक्ट तयार ! यात पालकांचीच ‘शिक्षकांनी उरावर बसवलेली ही नसती ब्याद उरकण्याचीच केविलवाणी धडपड मला दिसते. आता एखादी गोष्ट कशीही करून उरकायचीच असेल तर मग काय? - हपापा चा माल गपापा !

दहावीत गेलेल्या एका मुलाला त्याचं शुद्धलेखन चुकतंय म्हणून शिक्षकांनी संस्कृतमधली काही सुभाषितं प्रत्येकी दहावेळा लिहून आणायला सांगितली. तर, ती सुभाषितं त्याची आईच सकाळपासून लिहीत बसलीय ! त्या मुलाच्या इतिहास-भूगोलाच्या वह्यासुद्धा आईनंच पूर्ण करून दिल्या. धन्य ती माऊली...!

आपल्याला प्रत्येक गोष्ट इन्स्टंट मिळवण्याची सवय अंगवळणीच पडली आहे. मागच्या वर्षी कोजागिरीच्या निमित्तानं काही मित्रमंडळींना घरी बोलावलं होतं. बायकोनं स्वयंपाक घरीच केला होता आणि दूधही आटवलं होतं. घरी आलेल्या तिच्या मैत्रिणींनी तिला वेड्यातच काढलं. त्यांच्या मते, एवढा उपद्व्याप करत बसण्यापेक्षा जेवण आणि दूध सरळ बाहेरूनच मागवायला हवं होतं. तिच्या एका मैत्रिणीने तर कैरीच्या डाळीची सुद्धा बाहेर आॅर्डर दिली होती आणि पन्ह्याचा अर्क आणून त्यात पाणी मिसळून ‘रेडीमेड पन्हं दिलं होतं. जर पालकच इन्स्टंट गोष्टींच्या मागे लागलेले असतील तर मुलंही तशीच तयार होतील. त्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे?

पण यामुळंच, एकूणच पहायला गेलं तर आळशीपणा वाढून खऱ्या विकासाला खीळ बसतेय की काय, असं वाटायला लागलं आहे. एकीकडे विनाकष्ट, विनासायास, बसल्याजागी सगळं अगदी सहज मिळावं ही वृत्ती विद्यार्थीदशेपासून आपणच आपल्या मुला-मुलींमध्ये विकसित करायची आणि दुसरीकडे ‘सध्याचं युग हे स्पर्धेचं युग आहे, त्यामुळे कष्टांना तरणोपाय नाही हे पालुपद आपणच आळवायचं, हे आता नित्याचंच झालं आहे. त्यामुळेच पालकांचीच ‘शिक्षण आणि त्यातून अपेक्षित असणारा विकास या विषयीची कल्पना पुरेशी स्पष्ट नाहीय, असं जाणवतं. पण एक मात्र नक्की आहे की, असं दोन्ही डगरींवर एकाच वेळी चालणारं पालकत्व १००% महागात पडतंच.

अगदी हौसेनं मुलांना महागड्या, पाॅश, ब्रॅन्डेड शाळा-काॅलेजांमध्ये घालायचं, पण घरातून मात्र मुलांना इंटरनेट वापरून रेडीमेड अभ्यास उरकण्याला प्रोत्साहन द्यायचं, असा पालकांचा कल दिसतो. शिक्षण पूर्वीसारखं राहीलेलं नाही, बराच बदल झाला आहे, पुढंही होईल. पण माझ्या दृष्टीनं खरा बदल झाला तो पालकवर्गात. ३०-४० वर्षांपूर्वीच्या पालकवर्गात उच्चशिक्षित पालकांचं प्रमाण अगदीच नगण्य होतं. आता मात्र बहुतांश पालक शैक्षणिकदृष्ट्या स्वत: पदवीधर आहेत. आई आणि वडील हे दोघेही उच्चशिक्षित असण्याचंही प्रमाण आता बरंच वाढलंय. पण मग तरीही कुठंतरी पाणी मुरतंच आहे.

नुकताच मी पालकांचा व्हाॅट्सॲप ग्रुप पाहिला. वर्गशिक्षक शाळेतला गृहपाठ पालकांना व्हाॅट्सॲप ग्रुपवर पाठवतात. ही झाली सोय ! पण, या आई पालक फारच हुशार.. त्यांनी सर्व पालकांचा आणखी एक ग्रुप तयार केला, ज्यात वर्गशिक्षक नाहीत. या आया गृहपाठातले प्रश्न वाटून घेतात आणि त्याची उत्तरं स्वत: तयार करून ग्रुपवर शेअर करतात. बाकीच्या आया ती उत्तरं आपापल्या मुलांकडून झकासपैकी काॅपी करून घेतात. सगळ्या आया उच्चशिक्षित आणि चांगल्या ठिकाणी नोकरीला आहेत, कुणाकुणाचे स्वतंत्र व्यवसाय आहेत. पण, कळत-नकळत, जाणते-अजाणतेपणी यापैकी काहीही म्हणा, मुलांचं काॅपी-पेस्टींग चं शिक्षण मात्र घरातून जोरदारपणे सुरू आहे. टेक्नाॅलाॅजीचा असा उपयोग करून आपण आपल्या मुलांचं नुकसानच करतोय, हे या आयांच्या लक्षात येत नाहीय का?

इतकंच काय पण शाळेत जाणाऱ्या मुलांचेही व्हाॅट्सॲप ग्रुप्स आहेत.त्यावरूनही अशी आणि या व्यतिरिक्तही बरीचशी देवघेव चालते. मुलं अख्खं जर्नल सुद्धा स्मार्टफोन्समुळे काॅपी करून शेअर करायला लागली आहेत. आता यात काय गैर आहे? असं अनेकांना वाटेल. पण, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की, या फोन्सच्या वापराचे भरपूर दुष्परिणाम आता विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये जाणवायला लागले आहेत. स्मार्टफोन्सचा वापर करणाऱ्या मुलांमध्ये लिखाणाचा कंटाळा आणि आळस वाढायला लागला आहे. इतकंच काय, केवळ तर्जनीचाच अधिक वापर करत राहण्याच्या सवयीमुळे त्यांचं हस्ताक्षर बिघडायला लागलं आहे. आकृत्या काढण्यातला सफाईदारपणा कमी होत चालला आहे. पुष्कळशा मुलांना साधी-साधी सोपी वाक्यंसुद्धा नीट लिहीणं जमत नाहीय. हात थरथरायला लागतो, बोटं आखडतात, एका सरळ रेषेत लिहीणंच जमत नाही. तर्जनी अधिक कठीण झाली की, पेन किंवा पेन्सिल पकडण्यातच अडचणी यायला लागतात. साहजिकच, लेखन म्हणजे कंटाळवाणं, नीरस, रूक्ष, बिनकामी खर्डेघाशी इ. वाटायला लागतं. म्हणूनच, स्क्रिन्स सर्फिंगवर जास्त वेळ घालवणाऱ्यांच्या लेखनात, हस्ताक्षरात समस्या असण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय.

स्क्रिन्सच्या अतिवापराचा आणखी एक परिणाम म्हणजे एकाग्रतेच्या समस्या बळावणे. एकाग्रतेच्या प्रचंड समस्या असलेली मुलं-मुली तुम्हाला तुमच्या आसपासच्या परिसरात विपुल संख्येने दिसतील. “स्मार्टफोन्स, टॅब्लेट्स, आयपॅड, लॅपटाॅप आणि टीव्ही यांचा वाढता वापर हा एक समान धागा यापैकी बहुतांश मुलांमध्ये दिसेल. स्क्रिन्सवर वेळ घालवताना डोळ्यांवरही विलक्षण ताण येतो. त्यातही स्क्रिन जितकी ब्राईट असेल तितका हा ताण वाढतोच. फटाफट स्क्रीन्स सरकवत राहण्याची सवय बोटांना जडली तरी स्कीनवर केवळ सेकंदभरासाठी लक्ष केंद्रीत करणं डोळ्यांना झेपलं तरी पाहिजे ना. पण, डोळ्यांवर प्रचंड ताण येत असतानाही मुलं अख्खी रात्र-रात्र सुद्धा या स्क्रीन्सच्या सहवासात घालवतात. मग, ताळतंत्र बिघडणं आणि अस्वस्थता येणं स्वाभाविकच आहे.  प्रचंड वेगाने सतत सर्फिंग करत राहिल्यामुळे वेळेचं भान तर राहत नाहीच, शिवाय मानसिक क्षमतांमधली चंचलता वाढते ती वेगळीच.

चा अतिवापर मुलांच्या वाचन-लेखन कौशल्यातला मोठा अडसर ठरतोय. उत्तम शब्दरचना करता येणं, यमक साधता येणं, भाषांमधला व्याकरणाचा पाया पक्का असणं, एखाद्या गोष्टीचा सारांश उत्तमरित्या मांडता येणं, एखाद्या कल्पनेचा विस्तार चांगला करता येणं, एखाद्या कवितेचं किंवा कलाकृतीचं रसग्रहण करता येणं, एका शब्दाकरिता अनेक शब्द योजणं किंवा अनेक शब्दांकरिता एक शब्द योजणं अशा अनेक क्षमतांमधली घसरण सुरू झाली आहे. लालित्य उतरणीला लागलंय. भाषिक कल्पनाशक्तीच्या विकासात अडथळे यायला लागलेत. हा निसर्गानं आपल्याला फुकटात बहाल केलेल्या सुंदर क्षमतांचा अपमानच आहे.

आता आपल्यालाच आपल्या क्षमतांची किंमत नसेल आणि आपलं नुकसान आपल्यालाच कळत नसेल तर, चक्रीवादळात भिरभिरणाऱ्या पानासारखी आपली गत होईल. त्यापेक्षा वेळीच सावध होऊन अतिरेक टाळलेला बरा.. नाही का?

©मयुरेश उमाकांत डंके
मानसतज्ञ, संचालक-प्रमुख,
आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा