Pages

सोमवार, २२ एप्रिल, २०१९

९०/१० तत्व



९०/१० तत्व

फक्त १०% जीवन हे आपल्या सोबत काय घडलंय यावर आहे, आणि ९०% जीवन हे त्यावर आपल्या प्रतिक्रियावर अवलंबून आहे.
जे घडतंय त्या १०% वर आपला काहीही ताबा नसतो.
उदा. गाडी बंद पडणे, ट्रेन, विमान, बसला उशीर होणे, मुलांना यायला उशीर होणे, अचानक काहीतरी घडणे, आधीच उशीर झालाय आणि आपण जाण्या आधीच लाल सिग्नल पडणे वगैरे वगैरे.
या १०% गोष्टींसाठी आपण काहीही करू शकत नाही. पण आपण त्यावर कसे वागतो यावर पुढचं ९०% अवलंबून आहे.
उदाहरण द्यायचे तर, तुम्ही कामावर जाण्यासाठी पेहराव करून बसलात आणि चहा देण्यासाठी कन्या आतून आली, तिला ठेच लागली आणि कपातला चहा तुमच्या शर्टावर सांडला.
हे फक्त १०% झालं.
यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल यावर पुढचं ९०% रामायण अवलंबून आहे.
तुम्ही चिडलात, तिला ओरडलात, ती दुःखी झाली, रडायला लागली. आता तुम्ही तुमचा मोर्चा पत्नीकडे वळवलात, "हे सगळं तुझ्या लाडामुळे झालंय, मुलांना अजिबात वळण लावलं नाहीस" असं म्हणून पत्नीलाही ओरडलात. तसंच घसरणारा ट्रे विकत आणतांना लक्ष दिलं नाही म्हणून तिला ऐकवलेत.
तुम्ही बेडरूम मध्ये जाऊन कपडे बदललेत. नंतर परत हॉल मध्ये आलात तर, मुलगी अजूनही रडतेच आहे. आत्तापर्यंत तिने न्याहारी करून शाळेला जाण्यासाठी तयार व्हायला हवे होते. उशीर झाल्यामुळे तिची स्कुलबस निघून गेली.
तुमच्या पत्नीलाही ताबडतोब कामावर जायला हवे.
तुम्ही कार बाहेर काढलीत आणि मुलीला शाळेत सोडायला गेलात. उशीर झाल्यामुळे तुम्ही गाडी वेगात चालवताय. नियम तोडल्यामुळे पोलिसांना दंड देऊन तुम्ही १५ मिनिटे उशिरा शाळेत पोहोचलात.
तुमची मुलगी तुम्हाला टाटा न करताच शाळेत पळत गेली.
२० मिनिटे उशिराने ऑफिसला पोहोचल्यावर बॅग घरीच विसरल्याचं तुमच्या लक्षात आलं.
तुमचा दिवस असा ताण तणावाने सुरू झाला.
दिवसभरात अशाच अजून काही घटना घडल्या आणि त्यामुळे  संध्याकाळ पर्यंत वातावरण अजून वाईट झाले.
आता तुम्ही घरी आलात. घरात आल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ती म्हणजे तुमच्या पत्नीशी आणि मुलीशी असलेल्या नात्यात थोडी दरी निर्माण झालीय.

का ?

कारण तुमचा सकाळचा प्रतिसाद.
तुमचा दिवस वाईट का गेला?
त्याला कारण कॉफी होती?
त्याला कारण मुलगी होती?
त्याला कारण पोलीस होते?
त्याला कारण तुम्ही स्वतः होता?

उत्तर

तुम्ही स्वतः

कॉफीचं काय झालं यावर तुमचं कसलंही नियंत्रण नव्हतं.
त्या ५ सेकंदात तुमचा जो प्रतिसाद होता त्यामुळे तुमचा दिवस खराब गेला.

काय करायला हवे होते ?

कॉफी तुमच्या शर्टावर सांडली, तुमची मुलगी घाबरून रडू लागली.
तुम्ही म्हणाला असतात "बेटा, आत्ता असुदेत. पुढच्या वेळी असं होऊनये यासाठी लक्ष दे"
आणि तुम्ही शर्ट बदलला असतात तर, तुमच्या मुलीला शाळेत जातांना हसतमुखाने तुम्हाला निरोप देता आला असता.
मुलीनेही नेहमीप्रमाणे हसतमुखाने निरोप घेतला असता.
तुम्हीही ५ मिनिटे आधी ऑफिसला पोहोचला असतात.

फरक पहा....

दोन वेगवेगळे प्रसंग. दोन्ही एकाच गोष्टी मुळे सुरू झाले. शेवट मात्र वेगवेगळा.

खरच, काय घडतंय त्या १०% प्रसंगांवर आपला काहीही ताबा नसतो.
उरलेलं ९०% मात्र आपण त्यावर काय प्रतिसाद देतो त्यावर अवलंबून असतं.

९०/१० तत्वज्ञान कसे वापरावे ?

जर कुणी तुमच्याबद्दल वाईट बोललं तर तुम्ही ते मनावर घेऊ नका,
पालथ्या पातेल्यावर पाणी पडले तर काय होते, त्याप्रमाणे वागा.
त्यांच्या वाईट बोलण्याचा तुमच्या मनावर परिणाम होऊ देऊ नका.
तुम्ही चांगला प्रतिसाद देऊन तुमचा दिवस चांगला जाऊ द्या.
चुकीचा प्रतिसाद दिल्यास शब्दाला शब्द वाढेल आणि त्यामुळे  मित्र किंवा जवळची व्यक्ती गमावू शकते.

रस्त्यात कुणी आपल्या गाडीच्या आडवी गाडी मारली किंवा कट मारला किंवा चालतांना तुमच्या पुढे कुणी गेले किंवा तुमच्या कुणी आडवे गेले तर तुम्ही काय करता?*
तुम्हाला राग येतो?
तुम्ही दात ओठ खाता?
स्टीअरिंग वर जोरजोरात हात आपटता?
मुठी आवळता?
भांडायला जाता?
तुमचा श्वासोश्वास वाढतो?

तुम्ही २-५ मिनिटे उशिरा पोहोचलात तर काय फरक पडणार आहे ?

९०/१० तत्वज्ञान आठवा आणि सोडून द्या. त्या प्रसंगा आधी जसे होतात तसेच आनंदी रहा.

तुम्ही उद्यापासून येऊ नका असे बॉसने तुम्हाला सांगितले, किंवा तुमची हक्काचे काम तुम्हाला न मिळता दुसऱ्याला दिले आहे असे तुम्हाला कळले तर ?

मन अशांत करून झोपमोड करून घेऊ नका
तुमची काळजी घेणारी शक्ती कामाला लावा आणि तिचा दुसरे काम शोधण्यासाठी वापर करा.

बस, कॅब, विमान, रेल्वे उशिराने येणार आहे असे तुम्हाला कळले तर ?

संबंधित कर्मचाऱ्यांना ओरडून काहीही होणार नाही कारण जे घडलंय त्यावर ते काहीही करू शकत नाहीत.
  पण तुमच्या दिवसाच्या नियोजनात त्यानुसार बदल करता येणार आहे
वाट पाहण्यातला वेळ वाचनात, महत्वाची कामं फोनवर करण्यात घालवा
आजूबाजूला असलेल्या माणसांच्या ओळखी करण्यात घालवा

मित्रांनो ९०/१० तत्वाचा वापर करून आपण आपले जीवन ताणतणाव मुक्त जगुयात

ताणाताण......... मनाची.



ताणाताण......... मनाची.

      बापरे.......... कधी काय बातमी समोर येईल काही सांगताच येत नाही.......आज आल्या आल्या टि. व्ही. लावला तर भय्युजी महाराजांच्या आत्महत्येची बातमी ऐकली.........
त्यांना प्रत्यक्ष कधी बघितल नव्हतं.... पण एकुन होते........ कितीतरी राजकारणी लोकांचे आणि अनुयायांचे अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेले, समाजकार्यात अग्रणी एक लोकप्रिय व्यक्तीमत्व........... बातमी बघितल्या बघितल्या पहिला प्रश्न मनात आला... तो म्हणजे असं का केलं असेल बरं.......???? कशाचा एवढा ताण असेल.....??? किंवा कोणता असा प्रश्न असेल ज्याचं उत्तर "जीवनाचा शेवट" हेच असावं......... का माणूस ईतकं टोकाचं पाऊल उचलत असेल....???? . आणि जेंव्हा हे पाऊल उचललं जातं त्या वेळची मनस्थिती किती भयानक असेल....................ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो...... मन खुप खिन्न झालं.. ते तर खुप लोकप्रिय व्यक्ती होते.... असो आपण यातुन धडा घेऊन आपल्या बद्दल बोलुया.......
        
              लोकहो सामान्य माणसाचं जगणं सध्या अ$$$$$तिशय कठिण झालेलं आहे.... असंख्य कधिही खरे न होणारे स्वप्न..... फॅमिली मेंबर्सच्या एकमेकांबद्दल च्या सत्य परिस्थीती लक्षात न घेता केलेल्या अपेक्षा... शिक्षणासाठी लागणारा लाखो रुपयांचा अवास्तव खर्च करतानाची कुतरओढ........... एक गोष्ट मिळाली की दुसर्‍या गोष्टींचा हव्यास........ कोणतेही संस्कार न करुन घेणाऱ्या तरुण पिढीला हाताळताना येणारा प्रचंड ताण...... डिलक्स लाईफच्या नावाखाली केली जाणारी चैन.. त्या साठी वाट्टेल त्या मार्गाने पैसे कमावणारे लोकं............ आणि आपलं या अशा जगात भविष्यात कसं होणार......??? या प्रचंड भितीचा ताण माणसाला आला कि मग तो असं काहीतरी टोकाचं करत असावा.......... न आपण रहाणार....... न समस्या.........

          किती टोक आहे हे.......... थोडं स्वतःचं जग छोटं करा बघा किती सुंदर आहे सगळं.... तिने हिरा घेतला...... नी त्यानी मर्सिडिझ    घेतली..... अरे घेऊ दे ना........... तिचं तीला नि त्याचं त्याला लखलाभ.......... तुझ्या बुद्धीमत्तेचाच अलंकार घाल की........काहीही इथुन नेता येणार नाहीये....... गेल्यावर लवकर स्मशानात पोचवण्याचीच पडते सगळ्यांना......
तु केलेलं कामच फक्त मागे रहाणार आहे...... तुझी ओळख म्हणून............ थोडं आपल्या अपेक्षांचं ओझं कमी करा मिञांनो......पैसा कमावण्यासाठी.........तुमच्या कुटुंबियांना पणाला लावु नका..... घट्ट मिठी मारा तुमच्या छोट्या मुलांना.... आई वडिलांना...तुमच्या साथीदाराला...... बघा कशी पॉझिटीव्ह एनर्जी मिळेल..... जगातला कोणताही ताण असुद्या.... तो घेऊन आईवडिलांन कडे जा......अरे काय घाबरतोस...... मी आहे तुझ्या पाठीशी........ईश्वरावर विश्वास ठेव..... एवढच ते म्हणतात पण त्यातुन दहा हत्तींच बळ देऊन जातात.........
          
         सकारात्मक विचार,जे मिळालं आहे त्यात समाधान आणि आनंद मानुन प्रगती कडे वाटचाल करत रहाणे.........अपेक्षांच ओझं कमी करुन साहित्य, कला, छंद जोपासुन....... वेगवेगळ्या महान व्यक्तीमत्वांचे आत्मचरित्र वाचुन.......... वखवखलेल्या आयुष्यात शांतता निर्माण करणे.............. तुम्ही पळताना तुमच्या मुलांचं बालपण, तुमच्या साथीदाराची स्वप्न...... हि देखणी स्टेशनं मागे सोडून पळु नका मिञांनो.. नाहीतर तुम्ही डेस्टिनेशनला तर पोचाल पण तिथे एकटेच असाल.......... असं होता कामा नये........ सगळ्यांना सोबत घेऊन चला..... मंजिल थोडी नजदीक भी हो तो कोई बात नही.... हाथ तो हाथ मे है....
         
          खालचे दोन्ही परीच्छेद आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी आहेत मिञांनो.......... श्री श्री रविशंकर म्हणतात तसं..... नफरत और तणाव को मुझे गुरुदक्षिणा मे दे दो...............
खरच देऊन टाकायचं आणि छान सुंदर, तणाव मुक्त जीवन जगायचं.........ताण आला कि रेडिओ लावुन छान मोठ्ठ्या आवाजात गाणे ऐकायचे.............. डोळे गच्च बंद करायचे आणि विहार करुन यायचा...... मस्त गुलाबांच्या बागेत..............
तिकडे देवानंद म्हणतच असतो....

मै जिंदगी का साथ निभावता चला गया...
हर फिक्र को धुवे मे उडाता चला गया.....

वृत्तपत्र वाचन का आवश्यक आहे !




वृत्तपत्र वाचन का आवश्यक आहे !

एखादे पुस्तक एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. एक पान एखाद्याचे आयुष्य बदलू शकतं आणि एक वाक्य एखाद्याच्या आयुष्याचं ध्येय ठरवू शकतं. एवढी ताकद वाचनात आहे. तेव्हा रोज एक तरी पान वाचत जा !

श्रीमंत माणसेच वाचन करतात असे नसुन वाचन करणारेच श्रीमंत होतात जसे शरीरासाठी दिवसातून दोन वेळा जेवण आवश्‍यक असते तसे उत्तम मेंदूसाठी दररोज दोन तास वाचन करणे आवश्यक असते. दररोज वाचनामुळे माणूस भानावर येतो.

जगाचा आतापर्यंत जो विकास झाला आहे तो वाचनामुळे आणि जगाचा आता र्‍हास होणार आहे तो टी.व्ही मोबाईलमुळे.

पुस्तक वाचनारा माणूस कधीही व्यसन करत नाही आणि टी.व्ही मोबाईल हेच मुळी व्यसन आहे.

वाचनामुळे ज्ञानात भर पडते, टि.व्ही मोबाईल मुळे माणूस Adicted होतो.

टी.व्ही साठी मोबाईल साठी नेटवर्क लागते, वाचनासाठी फक्त माणूस जागेवर लागतो.

वाचन करणारी माणसं मनाने विचाराने आणि कृतीनेही श्रीमंत होतात.

वाचन करणारा माणूस शांत असतो त्यामुळे त्याला रक्तदाब वाढणे, हृदय विकाराचा झटका येणे अशा गोष्टी संभवत नाहीत. या उलट जास्त टी.व्ही. मोबाईल वापरणारेच विविध रोगांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे.

टी.व्ही मोबाईलमुळे मन शांतीचा भंग होतो तर वाचनामुळे भंग झालेली मनस्थिती शांत होते.

वाचन करणारा माणूस लवकर झोपतो लवकर उठतो. टी.व्ही मोबाईल चक्कर मध्ये अडकणारे उशिरा झोपतात नी उशिराच उठतात. परिणामी शरीर संपदेसह श्रीमंतीही नष्ट होते. लवकर निजे लवकर उठे अशी एक म्हण प्रचलित आहे.

वाचन करणारा पुढे उद्योजक होतो तर वाचन न करणारा नोकरीवरच थांबतो.

वाचन करणारा चार तासच काम करून करोडपती होतो तर वाचन टाळणारा बारा तास काम करून गरिबीतच मरतो.

काही महाभाग तर नोकरी लागली की, जगातील मी एकटाच सिकंदर, आता मलाच सारे काही कळते, अशा  नंदनवनात वावरून वाचनच बंद करतात.

वाचनामुळे माणूस नम्र होतो तर टी.व्ही मुळे माणूस भांडखोर नी मोबाईलमुळे आत्मकेंद्री होतो.

जे तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते तेच खरे पुस्तक आणि जे कृती करायला लावते तेच खरे वाचन.

आपल्या आयुष्यात दोन गोष्टींचा प्रभाव पडतो एक मित्र आणि एक पुस्तक, पुस्तकालाच आपला मित्र बनवा.

टी.व्ही बघणारे प्रवास करतात, तर वाचन करणारे ध्येय गाठतात. टी.व्ही मोबाईलमुळे थकवा येतो तर वाचनामुळे तरतरी.

जिथे वाचन होते तेथे विचार होतात आणि जेथे विचारांचे स्वातंत्र्य नाही तेथे गुलामी येते. वाचनामुळे ध्येय ठरवीता येते आणि गाठताही येते.

तुमच्या ध्येयावरून तुमची लायकी पारखली जाते आणि तुम्ही किती मोठे ध्येय ठरविता ते तुम्ही कोणते पुस्तक वाचता यावर अवलंबून असते.

ज्यांना आयुष्यात कोणतेही ध्येय नसतं तेच लोक पुस्तक वाचत नाहीत आणि ध्येयाविना जगणे म्हणजे बिगर पत्त्याचे पत्र पोस्टात टाकणे होय. पुस्तक चाळणे वेगळे आणि वाचनं वेगळं.

जगात जेवढे  लोक उपास मारीने मेलेत त्यापेक्षा जास्त लोक पुस्तक वाचन न झाल्यामुळे मेलेत. पुस्तकातून ज्ञान आणि ज्ञानातुन संपत्ती निर्माण होत असते.

शनिवार, २० एप्रिल, २०१९

मुलं टिपकागदा सारखी असतात



मुलं  टिपकागदा सारखी  असतात 

लहान   मुल   अनुकरणशील  असतं  .  त्याच्या   आजूबाजूच्या  माणसांच्या   वागण्या  ..  बोलण्याच  ते  अनुकरण  करीत  असतं  .  आमचा   छोट्या   बोलायला   लागला  तेच  फर्ड  हिंदी  ; कारण  त्याला  सांभाळणारी   ताई  हिंदी  भाषिक  होती  . पुढे  ताई  लग्न  होऊन  गेली  आणि  छोट्या  हिंदी  पूर्णपणे  विसरला  . तो  "" मिनी  तुला  सांगितलं  , तुनी न्हाई  ऐकलं  "'  असं  काहीतर  निराळच   बोलायला  लागला  . त्याला  सांभाळायला  आता  एक  मावशी  येत  होत्या  !!!मुलं  टिपकागदा सारखी  असतात  ...  सर्वकाही   टिपत  जातात  . काय  टिपायचं  आणि  काय  नाही  त्यांना  समजत  नाही  .

         आमचा   सगळ्यात  छोटा बच्चू   जेव्हां  अमेरिकेतून   इकडे  आला  तेव्हां  जेमतेम  दीड  वर्षाचा   पण  झाला  नव्हता . . त्याला  धड  त्याची  भाषाही  बोलता  येत  नव्हती  तर  आमची  काय  येणार  .  पण  आम्ही  सर्वच  मराठी  बोलत  होतो ---- वातावरण  पण मराठी  ; परत  जाई  पर्यंत  तो  "  हो  , नाही  , बेटा  , शाब्बास , दे  , घे  " असे  बरेच  सोपे  सोपे  शब्द  बोलायला  शिकला  होता  .

         त्याच्या  देशात  परत   गेल्यावर , विमानतळावर   त्याच्या  बाबाने  ट्रोली वर  सर्व  ब्यागा  ठेवल्या  ...  आणि  ..  वरचीच  एक  ब्याग  निसटली  ..    सगळ्या  ब्यागा   अस्ताव्यस्त  पणे  खाली  कोसळल्या  .बच्चू  आधी  त्या  सावरायला  धावला   ...  हे  आपल्या  आवाक्यातल   नाही  हे  कळल्या  बरोबर  , कमरेवर  दोन्ही  हात  ठेऊन   उत्स्फूर्तपणे  ओरडला  ... "" आयचा  घो  ! ""

      अमेरिकेच्या   राजधानीची  भूमी  , त्याने  सणसणीत  मराठमोळ्या  वाक्याने  दणकाऊन  टाकली  .  आम्ही  अवाक  !!  आणि  आम्हाला  वाटत  होत  की  ह्याला  मराठी  येत  नाही  !  पण   चांगलंच   येत  होत  की  ...  नेमक्या   वेळेला   नेमकं  वाक्य   !

       तो  काहीतरी   वेगळ  बोलला  आहे  , हे  आम्ही  त्याला   चेहऱ्यावरून   पण  दर्शवलं  नाही  .  पुन्हा  तो  ते  वाक्य  कधीच  बोलला   नाही  . पण  मला  कळेना  हा  शिकला  कुठून ?    . तसे  आमच्या  घरचे  कोणी   अगदी   धुतल्या   तांदळा  सारखे  नाहीत !  पण  मुलां  समोर  काय  बोलायचं  काय  नाही  , येव्हढ  नक्कीच  त्यांना  कळत . सात  आठ  महिन्या  नंतर  कधीतरी  tv  बघत  असताना  माझ्या   डोक्यात  प्रकाश   पडला  .

        ही  मंडळी   आली  तेव्हां  , "  शिक्षणाच्या  आयचा  घो  "  हा  सिनेमा  लागला   होता  . त्याचं  निराळ  कथानक  जरा  घरात  चर्चिल  गेलं  होत ..  त्या  वेळेला  चालू  असणाऱ्या  एका  रियालिटी  शो  मध्ये  , त्यातलं  गाण  म्हटलं  गेलं  होत  ... tv  वर  आणखीन  पण  काही  त्यावर  कार्यक्रम   झाले  होते    ...  बस   इतकंच ! आम्ही  सतत  जे   त्याला   शिकवत  होतो  ; त्यातलं  चिमूटभर  त्याने   उचललं  होत  .... आणि   पंधरा   वीस   मिनिटं  ऐकलेल्या  चर्चेतले    मात्र  नेमके  शब्द  उचलून   , नेमक्या   वेळी  .. नेमक्या  परिस्थितीत   वापरून   पण  मोकळा  झाला  होता  !!

      मुलं   म्हणजे   ना  ... अगदी   टिपकागदा  सारखी   असतात  ... काय   टिपायचं  ...  आणि  ..  काय   नाही  ... त्यांना  ... कळतच   नाही ....... !!!!!!

माहेर . . .


माहेर . . .
झाली सांजवेळ आली माहेराची सय ,
दिवा दाखवी तुळशीला माझी साधीभोळी माय !
माझ्या माहेरचे अंगण सदा पाहे माझी वाट
जाता मी माहेरा काय सांगु माझा थाट !
आई काढी माझी द्रुष्ट बाबा कौतुके न्याहाळी
जरी सरली गं वर्षे अजुन वाटे ती नव्हाळी !
माझ्या माहेरचे घर आहे छोटेसे नेटके
जाता आई-बाबाकडे नित्य नवेसे ते वाटे !
विचारती मला भिंती का गो केलास उशीर
तुझ्या येण्यानेच येतो घरा-दाराला मोहोर !
माहेरी जाण्याचे काय सांगु कवतिक
आई-बाबांस वाटे मी सदा हवीय समीप !
घेई जरा विश्रांती तु आता नको करु काम
सदा दमतेस पोरी आईकडे घे आराम !
कसं सांगु गं मी माय स्त्रीला नसतो विसावा
सासरी-माहेरी सदा तिचाच गं धावा !
सासरची ती गं लक्ष्मी तर माहेरचे अंगण
धन्याची ती लाडकी तर घरादाराचे कुंपण !
आले विसाव्याला तुझ्या घेई गं कुशीत
पसर मायेचा पदर झोपेन खुशीत !
माहेरची माया देवा कधीही न आटो
सय येता पुन्हा पुन्हा जीव तुटका रे होतो !
कशी राहते रे लेक तिच्या आई-बापाविना
तिच्याविना तिचा पारिजात ही रे सुना !
राबते ती  फुलवाया तुळस अंगणी
माहेराच्या सयीने सदा भिजते पापणी.. सदा भिजते पापणी.. सदा भिजते पापणी !

भारतीयसॊरवर्ष_कालदर्शिका..!




भारतीयसॊरवर्ष_कालदर्शिका..!

1957 मध्ये भारत सरकारने तीन बदल केले.
एक चलन, दोन – वजन-मापे  अन् तीन – कालमापन

१) चलन
रुपये, आणे, पैसे, पै असे चलन प्रचलित होते. त्यात 12 पै 1 पैसा , 4 पैसे 1 आणा , 16 आणे 1 रुपया असा हिशोब असे. त्याऐवजी 100 पैसे 1 रुपया असा सुटसुटीतपणा आणला.

२) वजन-मापे :
शेर, मण, रत्तल, गुंज, मासा, तोळा, औंस, पौंड, अशी वजने प्रचलित होती. तर लांबी मोजण्यासाठी इंच, फूट,यार्ड, फर्लांग, मैल इत्यादी तर क्षेत्र मापन एकर, गुंठा, बिघा या मापात मोजायचे. त्याऐवजी वजनासाठी ग्रॅम-किलोग्रॅम, लांबीसाठी मीटर, क्षेत्रासाठी हेक्टर, आकारमानासाठी लिटर अशी मेट्रिक – दशमान पद्धत वापरणे कायद्याने बंधनकारक केले.

हे दोन्ही बदल लोकांमध्ये रुजवण्यासाठी भारत सरकारने बराच प्रचार – प्रसार केला. त्यामानाने तिसर्‍या बदलाकडे कमी लक्ष पुरवले. तो बदल तितकासा रुळला नाही.

३) कालमापन
1952 साली डॉ. मेघनाद साहा यांच्या अध्यक्षतेखाली ‘कॅलेंडर समायोजन समितीची स्थापना झाली. त्यांनी भारतात तसेच जगात प्रचलित असणार्‍या कालमापन पद्धतींचा अभ्यास करून एक कॅलेंडर सुचवले. त्याला “भारतीय सौर कालदर्शिकाम्हणतात. हे कॅलेंडर 1 एप्रिल 1957 पासून लागू झाल्याचे भारत सरकारने जाहीर केले. या कॅलेंडरमध्ये सूर्य – चंद्र यांची नक्षत्रसापेक्ष स्थाने, ऋतूमान आणि भौगोलिक स्थिती यांचा समन्वय साधलेला आहे.

भारतीय सौर कालगणनेनुसार एका वर्षात 12 महिने असून त्यात 365 दिवस असतात. वर्षाची सुरुवात -‘1 चैत्रउत्तरायणातल्या विषुवदिनापासून होते. या दिवशी पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. महिन्यांची नावे मराठी महिन्यांप्रमाणे चैत्र, वैशाख, जेष्ठ अशी आहेत. फक्त मार्गशिर्ष महिन्याचे नाव अग्रहायण असे वेगळे आहे. पहिल्या चैत्र महिन्यात 30 दिवस तर दुसर्‍या - वैशाख – महिन्यापासून सहाव्या – भाद्रपद – महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्यात 31 दिवस येतात. यावेळी दक्षिणायणातला विषुवदिन असतो. म्हणजे पुन्हा पृथ्वीवर सर्वत्र 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र असते. पुढचे सहा महिने अश्विन ते फाल्गुन प्रत्येकी 30 दिवसांचे असतात.

आज प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन कॅलेंडर प्रमाणे #22मार्च या दिवशी भारतीय सौर #1चैत्र येतो.२३ जूनला सूर्य कर्क वृत्तावर दिसत असताना तीन महिने पूर्ण होऊन भारतीय सौर 1 आषाढ येतो. दक्षिणायणातील विषुवदिनाला 23 सप्टेंबरला सहा महिने पूर्ण होऊन भारतीय सौर 1 अश्विन येतो. तर 22 डिसेंबरला सूर्य मकर वृत्तावर असताना नऊ महिने पूर्ण होऊन भारतीय सौर 1 पौष येतो.

सूर्य विषुववृत्ताच्या उत्तरेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती मंदावते म्हणून त्या काळातले वैशाख ते भाद्रपद हे महिने 31 दिवसांचे. सूर्य विषुववृत्ताच्या दक्षिणेकडे दिसत असताना सूर्याची पृथ्वीसापेक्ष गती अधिक असते म्हणून त्या काळातले अश्विन ते फाल्गुन हे महिने 30 दिवसांचे. वर्षात एकूण दिवस 365. तारीख बदलणार मध्यरात्री 12 वाजल्यानंतर.

या कालगणनेचे ‘साल कोणते घ्यावे याचा विचार करताना साधारणपणे मार्च मध्ये सुरू होणारे – शालिवाहन शक म्हणजेच भारतीय सौर वर्षाचे साल निश्चित करण्यात आले. सध्या इ. स. 2013 म्हणजेच भारतीय सौर 1935.

भारतीय सौर कालगणनेप्रमाणे भारतीय स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट म्हणजेच 24 श्रावण या दिवशी येतो तर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी म्हणजेच 6 माघ या दिवशी येतो.22 मार्च 1957 हा भारतीय सौर कालगणना अंमलात आणल्याचा पहिला दिवस भा. सौ. 1 चैत्र 1879.

आपण भारतीयांनी ही कालगणना अभिमानाने वापरली पाहिजे.रोजच्या वर्तमानपत्रात ही कालगणना दिलेली असते. आकाशवाणीचे केंद्र सुरू होताना भारतीय सौर दिनांक सांगितला जातो. शासकीय पत्रके, परिपत्रके यामध्येसुद्धा ही कालगणना नोंदलेली असते. भारतीय रिझर्व बँक, भारतीय स्टेट बँक यांच्या कॅलेंडरमध्ये या तारखा छापलेल्या असतात. भारतीय सौर दिनांक असलेला धनादेश विधिमान्य असल्याचे अध्यादेश भारतीय रिझर्व बँकेने पूर्वीपासूनच काढले. महाराष्ट्र शासनाने इ. स. 1983 मध्ये आदेश काढून शाळा, महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या सर्वसाधारण नोंदवहीत 1 एप्रिल 1957 नंतर जन्मलेल्या सर्वांचे जन्मदिनांक भारतीय सौर कालमापनाप्रमाणे नोंदलेले असावेत असे स्पष्ट आदेश दिलेले आहेत. आज महाराष्ट्रात औरंगाबाद आणि कल्याण-डोंबिवली नगरपालिकांनी भारतीय सौर दिनांकाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे.

प्रत्येक भारतीय नागरिकाने “भारतीय सौर कॅलेंडर रोजच्या व्यवहारात वापरले पाहीजे.जपान, चीन, नेपाळ इत्यादी अनेक देशांमध्ये स्वत:ची कॅलेडरे आहेत आणि ती ते देश मन:पूर्वक वापरतात.भारतीय शास्त्रज्ञांनी वैज्ञानिकपणे चोख ठरेल अशी भारतीय सौर कालगणना आपल्यासमोर ठेवली. भारतीय शासनाने तिचा अंगिकार केला. आता आपण सर्व भारतीयांनी ती आपल्या दैनंदिन व्यवहारात आणून आपली विज्ञाननिष्ठा आणि आपला देशाभिमान दाखवून द्यायला हवा.

( खुद्द शिवाजी महाराजांनी पंचांगात सुधारणा करण्यासाठी आणि  योग्य कालगणना करण्यासाठी तज्ज्ञांना पाचारण केलेले होते. त्यांनी देखिल सुधारित कालगणना सूर्य सिद्धांतानुसार केलेली आढळते. त्या तज्ञांनी ह्या निमित्ताने ‘करण कौस्तुभ ग्रंथ रचला. ह्यावरून छत्रपती शिवरायांनीसुद्धा कालगणनेसाठी सूर्यसिद्धांताचा पुरस्कार केला हे स्पष्ट आहे. संदर्भ: वेध महामानवाचा – श्रीनिवास सामंत)

सूर्यसिद्धान्तावरून बनवल्या जात असलेल्या
काही भारतीय कालदर्शिका -

सूर्यसिद्धान्तीय आदित्य पंचांग
ऋषिकेश पंचांग
गणेश आप्पा पंचांग
राजेश्वरशास्त्री यांचे धारवाड पंचांग
पारनेरकर महाराज पुरस्कृत पारनेर पंचांगवंटी कुप्पल पंचांग
काशी विश्वविद्यालय प्रकाशित पंडित मदनमोहन मालवीय पुरस्कृत विश्वपंचांग
दक्षिणेकडील शृंगेरी शंकराचार्यांच्या शारदा पीठावरून प्रसिद्ध होणारे पंचांग
महाराष्ट्रातील एकमेव धर्मशास्त्रसंमत सूर्यसिद्धान्ताधारित देशपांडे पंचांग
उत्तरादि मठाचे सूर्यसिद्धान्त पंचांग
हालाडी पंचांग.

#हिंदूचंद्रवर्ष_कालदर्शिका

भारतीय लोक पूर्वीपासून काल गणना करताना दिवस-महिने-वर्ष हे चंद्राच्या अवस्थे प्रमाणे म्हणजे कले प्रमाणे मोजत आलो आहोत. ह्यालाच चांद्र-वर्ष असे म्हणतात. साध्या माणसालाही रात्री आकाशात चंद्राकडे पाहून तिथी कळते. दिवसागणिक चंद्राच्या स्थिती आणि कलेत फरक पडतो. (एक सांगायची गोष्ट म्हणजे चंद्र जसा पृथ्वी भोवती फिरतो तसाच स्वत:भोवतीही फिरतो, पण पृथ्वीच्या प्रचंड गुरुत्वाकर्षणाने त्याची एक बाजू कायमची पृथ्वी कडे रोखलेली असते ह्यालाच gravitational lock  असे म्हणतात –अर्थात ह्याचा आत्ता आपल्या कालगणनेशी संबंध नाही)त्यामुळे तिथी कळणे सहज सोप्पे होते.

हे आता आता पर्यंत फार महत्वाचे होते ते अशा करता की, आज आपल्याकडे कालदर्शिका, अगदी सहज आणि विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत पण पूर्वी हे नव्हते. त्यामुळे चंद्राच्या कला पाहून काल निश्चिती करणे निरक्षर आणि गरीब माणसालाही अत्यंत सोपे होते. तर हा चंद्र पृथ्वी भोवती आपली फेरी साधारण २७.३२३ दिवसात पूर्ण करतो,  पण चंद्र स्वयंप्रकाशित नाही आपण चंद्राचा  सूर्याच्या प्रकाशात न्हाऊन निघालेला भाग फक्त बघू शकतो आणि तो रोज थोडा थोडा बदलत असतो (कला) त्या हिशेबाने पहिले तर २९.५५ दिवस चंद्राला आपल्या कलांचे आवर्तन पूर्ण करायला लागतात. हाच चंद्र महिना. आता असे का होते ? 
ते जरा समजावून घेऊ.

पृथ्वी आणि सूर्य ह्यांच्या केंद्राला जोडणारी एक काल्पनिक रेषा काढली आणि त्याच रेषेवर चंद्राचाही केंद्र आहे असे गृहीत धरले (हि अमावास्या किंवा पौर्णिमा असेल) तर त्याच ठिकाणी परत म्हणजे तिन्ही गोलाकांचे केंद्र बिंदू एकाच रेषेत यायला २७.३२३ दिवसांच्या पेक्षा जास्त कालावधी लागेळ. जरी चंद्र आपली पृथ्वी भोवतीची प्रदक्षिणा २७.३२३ दिवसात पूर्ण करत असला तरीही. ह्याचे कारण आपली पृथ्वी सूर्या भोवती फिरत थोडी पुढे गेलेली असते. त्यामुळे सुरुवातीला असणारी पृथ्वी-सूर्य केंद्र जोडणारी रेषा आपला कोन थोडा बदलून पुढे गेलेली असते. हे जास्त अंतर कापायला चंद्राला थोडा अधिक कालावधी लागतो आणि घोळ असा की हे अंतर प्रत्येक महिन्याला थोडे थोडे वेगळे येते, कारण पृथ्वी सूर्याभोवती गोल नाही तर लंब वर्तुळाकार कक्षेत फिरते. त्यामुळे सूर्यापासून लांब लंब वर्तुळाच्या जास्त वक्र ठिकाणी असताना तिचा वेग जास्त असतो, तर सूर्यापासून जवळ लंब वर्तुळाच्या कमी वक्र कक्षेत असताना तो कमी होते. म्हणून हा जो २९.५ दिवसांचा कालावधी सांगितला आहे तो सरासरी आहे. काही महिने ह्या पेक्षा जास्त कालावधीचे तर काही महिने कमी कालावधीचे असतात.

तर चंद्र आपल्या सर्व कलांचा (!) हिशेब जमेला धरून ३५४ दिवसात आपले १२ महिने पूर्ण करतो . हेच ते चंद्र वर्ष पण पृथ्वीला आपली सूर्याभोवतीची नियोजित फेरी पूर्ण करायला अजून ११ दिवस जास्त लागतात. (जास्त अचुक सांगायचे तर ११.२५ दिवस) तुम्ही म्हणाल अख्ख्या वर्षात ११.२५ दिवस मागे पुढे काय विशेष ? पण नाही ह्याचे फार मोठे परिणाम होऊ शकतात. दर वर्षी ११.२५ दिवस मागे पडत काही वर्षांनी श्रावण महिना उन्हाळ्यात आणि मग हिवाळ्यात जाईल, कारण पृथ्वीवरचे ऋतू सूर्याच्या आणि पृथ्वीच्या परस्पर स्थितीमुळे घडतात, चंद्राच्या नाही. म्हणून मग आपण अधिक मासाची निर्मिती करून हे त्रांगडे निस्तरून घेतले आहे. त्यामुळे आपले महिने आणि त्यांच्याशी निगडीत ऋतू आणि पर्यायाने येणारे सण स्थिर राहतात. मुसलमानी काल गणनेत ही सोय नसल्याने त्यांचा रमजानचा महिना( म्हणजे सगळेच महिने खरतर) सरकत सरकत हिवाळा ते कडक उन्हाळा असा प्रवास करतो.ऐन उन्हाळ्यात रोजे ठेवताना त्यांना किती त्रास होत असेल त्याची कल्पना करा म्हणजे हे compensation कसे आणि किती महत्वाचे हे समजेल.!

#इंग्रजीसॊरवर्ष_कालदर्शिका

सध्या सौर वर्षावर आधारलेल्या दोन कालदर्शिका प्रचलित आहेत.

१. ज्युलिअन कालदर्शिका आणि

२.ग्रेगरींयन कालदर्शिका

ह्या दोन्ही प्रकारच्या काल दर्शिका पाश्चात्य- ख्रिश्चन लोकांनी वापरत आणल्या. ग्रेगरींयन कालदर्शिका इंग्रजांनी १७५२ साली स्वीकारली त्या आधी ते जुलिअन कालादार्शिका वापरत होते . का? त्यांनी असे का केले? काय फरक आहे ह्या दोन प्रकारच्या कालदर्शिकांमध्ये? आता ह्यातला फरक काय आहे तो समजावून घेऊ .

पृथ्वी स्वत:भोवतीची प्रदक्षिणा २४ तासात पूर्ण करते. हा एक दिवस हे आपण जाणतो पण तिने एक प्रदक्षिणा पूर्ण केली हे आपण कसे ओळखणार ? सूर्याच्या स्थानावरून. म्हणजे उदा. सूर्य अगदी माथ्यावर असताना दिवस सुरु केला तर परत जेव्हा तो बरोबर माथ्यावर येईल तेव्हा एक दिवस पूर्ण होईल. बरोबर? नाहीचूक, कारण जेव्हा असे होईल तेव्हा पृथ्वी ने स्वत: भोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करून ती (३६० अंशाच्या ) थोडी पुढे गेली असते कारण स्वत: भोवती फिरताना ती सूर्याभोवती ही फिरत असते. त्यामुळे सूर्य बरोबर परत माथ्यावर यायला तिला थोडा अजून वेळ लागतो.

समजा १ मार्च ला दुपारी १२.०० वाजता आपण दिवस मोजायला चालू केले तर बरोबर ३६५.२५ दिवसांनी २८ फेब्रुवारीला  पृथ्वी त्याच ठिकाणी परत येईल. पण आपण वरचा ०.२५ दिवस न मोजता वर्ष ३६५ दिवसांनी पूर्ण झाले असे मानतो आणि हा जो पाव दिवसाचा जास्तीचा वेळ आहे तो आपण दर चार वर्षांनी फेब्रुवारीत एक दिवस जास्त वाढवून compensate करतो. त्याला लीप वर्ष म्हणतात. ही अगदी सर्वसाधारण माहिती आहे.



एखादे वर्ष लीप वर्ष आहे हे कसे ठरवायचे?

अगदी सोप्पे आहे. त्या वर्षाच्या संख्येला ४ ने पूर्ण भाग जायला हवा उदा २०१६, २०१२ वगैरे हे सगळ आपल्याला महिती असते, पण खरी गम्मत आता पुढे आहे. आपण आता वर म्हटले की पृथ्वी ३६५.२५ दिवसात एक फेरी पूर्ण करते, पण ते खरे नाही खरा कालावधी आहे ३६५.२४२१८१.दिवस म्हणजे ०.२५ ला अगदी थोडा कमी कालावधी.

आता ह्याचा फरक लगेच जाणवत नाही पण जुलिअन कालदर्शिका सुरु झाल्यानंतर जवळपास १५०० वर्षांनी ह्याचा फरक जाणवू लागला होता.  ख्रिश्चनान्चा इस्टर हा मोठा सण असतो . त्यादिवशी वसंत ऋतू चालू होतो म्हणजे आकाशात सूर्य विषुववृत्त ओलांडून उत्तरेकडे सरकू लागतो. जुलिअन कालदर्शिकेप्रमाणे ५ एप्रिलला हे होते, पण प्रत्यक्षात असे दिसले की सूर्याने विषुवृत्त आधीच ओलांडले आहे, ते पण २३ मार्च ला म्हणजे तब्बल ११ दिवस आधी. ह्याला धार्मिक महत्व त्या काळी असल्याने हा घोळ कसा होतो ह्याच्यावर खूप विचार केला गेला आणि खगोलशास्त्रज्ञांना हे जाणवले की गेल्या साधारण १५०० वर्षात आपले वर्ष मोजणे थोडे थोडे पुढे पुढे सरकत गेल्याने हे घडले आहे. म्हणून त्यांनी अफलातून युक्ती शोधली.

दर चार वर्षांनी लीप वर्ष येते आणि १०० ला ४ ने पूर्ण भाग जातो, म्हणून प्रत्येक १००वे वर्ष हे पूर्वी लीप वर्ष असायचे. पण आता नवीन नियमानुसार कोणतेही १०० वे वर्ष जर ४०० ने पूर्ण भाग जाणारी संख्या असेल तर आणि तरच ते लीप वर्ष असेल नाहीतर नाही, म्हणून १७००,१८००,१९०० ही लीप वर्षे नव्हती पण २००० हे लीप वर्ष होते २१०० लीप वर्ष असणार नाही. आता हा घोळ इथून पुढे निस्तरला गेला पण आधी जो ११ दिवसांची चूक आली होती त्याचे काय? म्हणून मग ख्रिश्चनांचा धर्म गुरु पोप ग्रेगरी ह्याने ४ ऑक्टोबर १५८२ ला ही चूक दुरुस्त करून घेतली आणि एक फर्मान काढून सांगितले की उद्या म्हणजे ५ ऑक्टोबरला ५ ऑक्टोबर न म्हणता १५ ऑक्टोबर म्हणण्यात यावे हो!.

आता जे देश पोपचे ऐकत म्हणजे स्पेन, पोर्तुगाल वगैरे त्यांनी ऐकले पण इंग्रज आधीच पोप पासून काडीमोड घेऊन लांब झाले होते (आठवा, आठव्या हेन्रीचे प्रताप) त्यांचे चर्च ऑफ इंग्लंड आणि आर्च बिशप ऑफ कॅनटरबरी काही ऐकायाल तयार नव्हते. पण अखेरीस त्यांना ह्याचे महत्व कळले आणि त्यांनी १७५२ च्या सप्टेंबर मध्ये ही सुधारणा केली आणि ग्रेगोरियन कालदार्शिका स्वीकारली.

ज्यामुळे जुलिअन आणि ग्रेगरियन कालदर्शिकेत हा ११ दिवसांचा फरक आढळून येतो त्याचे शास्त्रीय कारण आपण आता पर्यंत समजावून घेतले. आता अख्ख्या होल वर्ल्ड ने जरी ही ग्रेगरियन कालदर्शिका स्वीकारली असली तरी जुनी जुलिअन कालदर्शिकच ग्राह्य मानणारे लोकही आहेत. आडमुठे लोक सगळ्याच समाजातून असतात. जेरुसलेम, पोलंड, रशिया, सर्बिया मोन्तेनेग्रो इथली Orthodox church अजूनही जुनी जुलिअन कालदर्शिककाच वापरतात. त्यामुळे सगळे जग जेव्हा तारीख २२ मार्च २०१७ सांगत असते तेव्हा ह्यांची तारीख ९ मार्च २०१७ असते, (१७५२ पासून आजपर्यंत ११ दिवसांचा फरक आता १३ दिवसांचा झालाय आहे कि नाही ह्यांच्या कर्मठपणाची कमाल!)

आपण आज इंग्रजी कॅलेंडर अंगिकारले आहे आणि ते फक्त आपणच नाही तर बहुतेक सगळ्या जगाने अंगीकारलेले आहे.

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा