Pages

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

"प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये."



"प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये."

आपली मुलं आपली नसतात. एकनाथांचं वचन आहे, ‘पक्षी अंगणात आले, अपुला चारा चरून गेले.’ हा जगाचा नियम आहे. पैशाचं परावलंबित्व नको, तसं भावनांचं परावलंबित्व असता कामा नये..

 स्वातीताईंनी उमाकांतना जगण्याचं तत्त्वज्ञान सांगितलं आणि आयुष्य नव्याने जगायला ते बाहेर पडले..

कॅलेंडरचं पान उलटताना उमाकांत विशेष आनंदात होते, चंद्रनील जर्मनीहून येण्यासाठी आता फक्त पंधरा दिवस राहिले होते. लगबगीनं त्यांनी, संगणकावर त्याचा मेल आहे का पाहिलं आणि त्यांनी खूश होऊन स्वातीताईंना हाक मारली.
‘‘लौकर ये, आपला चंदा चार दिवसांतच येतो आहे. हा मेल पाहा! घरातले पडदे उद्याच बदलून टाक, घरासाठी कार्पेटची देखील ऑर्डर दिली आहे. आज चौकशी करायलाच पाहिजे आणि पुरणपोळीची ऑर्डर देणार आहेस ना?’’

आपल्या नवऱ्याचा उत्साह पाहून ताईंना गंमत वाटली. त्यांच्या मनात आलं, ‘‘परदेशातील समृद्धी, मोठी जागा, चैन सोडून चंदा कायम इथे येणं शक्य नाही. यांना मनोराज्य करू दे. आपलं काय जातं? परवा मालूताई सांगत होत्या, समृद्धी आली की मुलांना आई-वडिलांजवळ राहायला आवडत नाही. मुलींनादेखील माहेरची ओढ वाटत नाही.
मुलगा दोन दिवस येणार, त्यासाठी एवढा खर्च कशासाठी?’’
‘‘कार्पेट कशासाठी? उगीच नस्ता खर्च नको. दोन दिवस पाहुण्यासारखा तो बायको-मुलाला आणणार. माझी कामं वाढवू नका. तो परत गेल्यावर तुम्ही कार्पेट साफ करणार का?’’
‘‘अगं! तो आता इथेच राहील ना? त्यानं सांगितलं होतं की, हे तीन वर्षांचं कॉन्ट्रॅक्ट झालं की तो पुन्हा जाणार नाही. त्यानं पाठवलेले सर्व पैसे मी ठिकठिकाणी गुंतवले. व्याजासकट चांगली रक्कम हातात आली की तो त्याचा व्यवसाय सुरू करील. माझी खात्री आहे, तू नसत्या शंका काढू नको.’’

ताई हसून म्हणाल्या, ‘‘ती घरावरची कविता ठाऊक आहे ना?
घरातून उडून गेलेल्या पिलांना, घरच्या उंबरठय़ाची ओढ असावी,

 एवढंच माझं मागणं आहे. ठीक आहे, परदेशात असतानाही आई-वडिलांना पाहावं, एवढं तरी त्याला वाटत आहे, हे काय कमी आहे?’’
ताईंचं हे बोलणं उमाकांत यांना फारसं आवडलं नाही. ‘निळ्याभोर आकाशात जसा चंद्र, तसा आपल्या घरात हा बाळ. म्हणून त्याचं नाव चंद्रनील. मित्रांमध्ये मात्र त्यानं आपलं नाव नील सांगितलं. चंदा नाव काय वाईट आहे? मेलही नील नावानं करतो, जाऊ दे नावात काय आहे म्हणा.’ उमाकांत स्वत:शीच म्हणाले.

मुलगा येण्याचा दिवस जसा जवळ येऊ लागला, तशी मात्र स्वातीताईंची धांदल सुरू झाली. चकल्यांची भाजणी दळायला दिली होती. भडंग, चुरमुऱ्याचा चिवडा झाला होता, पण शंकरपाळे राहिले होते. ते आज झाले असते. चकल्या गरम चांगल्या लागतील. तेव्हा तो आल्यावर चकल्या करू. शिवाय पुरणपोळीची ऑर्डर देण्यापेक्षा घरीच कराव्यात. बाहेरच्या पोळीत वेलची-जायफळ फार कमी असतं. मैदा जास्त असतो, नकोच ते. काय करू न काय नको असं त्यांना झालं होतं.
ताईंनी चण्याची डाळ भिजत घातली, साजूक तूप कढवलं. आणखी काय करता येईल याचा विचार करू लागल्या. चार खोल्यांचं घर उत्साहानं भरून गेलं. घराच्या भिंतीदेखील सजीव झाल्यासारख्या वाटू लागल्या. भिंतीवर उमाकांत यांनी सुंदर निसर्गचित्रं लावली होती. हिरव्यागार झाडांच्या आडून इवली पांढरी फुलं मन प्रसन्न करीत होती. नुसती निसर्गचित्रंदेखील मनाला प्रसन्नता देतात.
 हा अनुभव ताईंना वेगळाच वाटत होता की चंद्या येणार म्हणून ती चित्रं अधिक सुंदर वाटत होती? त्यांचं त्यांना कळत नव्हतं. मन मात्र प्रफुल्लित झालं होतं.

चंद्रनील येण्याच्या आदल्या दिवशी उमाकांत शांत झोपूच शकले नाहीत. पहाटे चार वाजता, खासगी गाडी करून एअरपोर्टवर आले. चंदाला पाहून त्याला घट्ट मिठी मारली. आनंदात सून, मुलगा, नातू घरी आले. दोन दिवस धमाल चालली होती. तिसऱ्या दिवशी सकाळी निवांत चहा घेताना चंदानं आपलं प्रोजेक्ट अजून तीन र्वष चालू राहणार आहे हे जाहीर केलं. त्या वेळी उमाकांत आपल्या चेहऱ्यावरची निराशा लपवू शकले नाहीत. ताई मात्र हे असंच होणार हे जाणून होत्या. त्यामुळे त्यांना फारसं दु:खं झालं नाही.

आल्या आल्या सून आणि नातू सुनेच्या माहेरी गेले. त्यामुळे घरात आता हे तिघेच होते.

‘‘चंदा, आला आहेस तर इथेच चांगली नोकरी पाहा. स्वतंत्र राहायचे असेल तरी आमची हरकत नाही,’’ उमाकांत म्हणाले.
‘‘बाबा, आपली चार खोल्यांची जागा असताना स्वतंत्र राहण्याचा विचार तरी मनात येईल का? परंतु पुढील तीन वर्षांत तरी नोकरी सोडता येणार नाही, तुम्ही पैशांची चिंता करू नका. मी दर महिन्याला पुरेसे पैसे पाठवीन,’’ चंदा म्हणाला.
उमाकांत कपाटाजवळ गेले. बँकेचे पासबुक त्याच्या पुढय़ात ठेवून म्हणाले, ‘‘चंदा! तू आत्तापर्यंत पाठवलेले सर्व पैसे मी बँकेत जमा केले
आहेत. मला तुझे पैसे नकोत. मला तू भारतात यायला हवा आहेस.’’
‘‘बाबा! प्लीज, या ट्रिपमध्ये मला खरंच जास्त राहता येत नाही. आणखी तीन वर्षांनी मी नक्की भारतात येईन.’’ चंद्रनीलनं विषय संपवला आणि घाईघाईनं तो पत्नीच्या माहेरी गेला.

पाहता पाहता महिना कुठे निघून गेला ते समजलं नाही.

चंद्रनीलचा जाण्याचा दिवस उजाडला. या वेळी स्वातीताईंनी त्याला बरोबर देण्यासाठी कुठलेही जिन्नस तयार केले नाहीत. आपली बॅग भरताना काहीच तयारी नाही हे पाहून चंदाला राहवलं नाही.
‘‘आई! लसणीची, तिळाची चटणी, मेतकूट, भाजणी दे लौकर. सामानात कुठे ठेवायची ते पाहतो. फार जिन्नस देऊ नकोस.’’
लेकाची हाक ऐकून किचनमधून ताई बाहेर आल्या. ‘‘चंदा! या वेळी तुझ्यासाठी काहीही करता आलं नाही रे. वेळच झाला नाही. असं कर, नाक्यावर आपटे गृहोद्योग दुकान आहे. तिथून तुला काय हवं ते आण.

 चंद्रनीलला नवल वाटलं. आईला काय झालं? मागच्या ट्रिपला तिने केवढे पदार्थ दिले होते. आत्ता मी आल्या आल्यादेखील केवढे पदार्थ केले होते. हिला वेळ नसायला काय झालं? जास्त विचार न करता त्यानं बॅग बंद केली.

या वेळी निरोप देण्यासाठी रात्री झोपमोड करून एअरपोर्टवर जायचं नाही, असं ताईंनी आपल्या पतीला- उमाकांत यांना अगदी निक्षून सांगितलं. अगदी गोड बोलून दोघांनी मुलाला आणि सुनेला घरातूनच निरोप दिला.

दुसरा दिवस उजाडला त्या वेळी ताई वृत्तपत्रात काही तरी शोधत असल्याचं उमाकांत यांनी पाहिलं. ताई खुशीत कशा राहू शकतात, याचं उमाकांत यांना नवल वाटत होतं.

‘‘पुढच्या महिन्यात आपण युरोप टूरला जाणार आहोत. आधीच बुकिंगला उशीर झाला आहे. आजच पैसे भरून या. ही जाहिरात!’’ ताईंनी नवऱ्याला जाहिरात दाखवली. उमाकांत काही बोलले नाहीत. उदास चेहरा करून बसून राहिले आणि म्हणाले, ‘‘निदान एअरपोर्टवर तरी निरोप द्यायला गेलो असतो. घर अगदी रिकामं वाटत आहे.’’

आता मात्र ताई थोडय़ा वैतागल्या. ‘‘तुम्हाला यायचं नसेल तर मी एकटी जाईन. संसाराच्या खस्ता खात जबाबदारी पेलताना थकून गेले. चंदा पहिल्यांदा जर्मनीला गेला त्या वेळी रोज रात्री त्याच्या आठवणीनं डोळ्यातल्या पाण्यानं उशी भिजून जायची. हळूहळू समजलं, प्रेमाचीसुद्धा जबरदस्ती करू नये. आपली मुलं आपली नसतात.

 एकनाथांचं वचन आहे-
पक्षी अंगणात आले, अपुला चारा चरून गेले.
हा जगाचा नियम आहे. मुलं, त्यांना गरज आहे तोपर्यंत आपल्या जवळ राहणार. नंतर पक्ष्यांप्रमाणे दूर उडून जाणार. हे प्रत्येक व्यक्तीने समजून घेतलं पाहिजे.’’
उमाकांत ताईंचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होते. ताई बोलत होत्या, ‘‘पैशाचं परावलंबित्व नको म्हणून आपण काळजी घेतो. तसंच भावनांचं परावलंबित्व असता कामा नये. किती तरी दिवसांत मुक्त निसर्ग पाहिला नाही, तुम्ही कधी माझ्या कविता ऐकल्या नाहीत, संगीताचा आनंद घेतला नाही.

उमाकांत! प्रयत्नपूर्वक या
 ‘एम्टी नेस्ट सिन्ड्रोम
मधून बाहेर या.’’
‘‘कसं बाहेर येऊ ? तूच सांग ना..’’ उमाकांत म्हणाले. ‘‘उमाकांत, मागच्या वेळी चंदा राहिला नाही. त्या वेळी मी माझ्या मनाची कशी समजूत घातली, ते मी ‘एकटी या कवितेत लिहिलं आहे. ऐकाल?’’
शून्यात पाहत उमाकांत यांनी होकार दिला.

ताई कविता वाचू लागल्या,

कळून चुकलंय तिला,
वयाची येताना साठी
आहे ती एकटी,
अगदीच ती एकटी
मुलंबाळं, प्रेमळ नवरा,
संसारही तो कसा साजिरा
प्रेमळ होती सगळी नाती,
तरीही ती एकटी

कष्टातही त्यात , होती मजा,
खुशीत होते राणी राजा
लुटुपुटीचा खेळ पसारा,
कळले हो शेवटी, आहे ती एकटी

सुंदर तेव्हा होती सृष्टी,
सुंदर जग ते अवती भवती
काळ कुठे तो निघून गेला,
आता वाटते भीती, आहे ती एकटी

कुणीतरी मग साद घातली,
तुझ्या आवडी कशा विसरली?
आठव संगीत अक्षर वाङ्मय,
कोण म्हणे तू एकटी?
मंजूळ गाणी पक्षी गाती,
आकाशी बघ रंग किती
बहर मनाला तुझ्या येऊ दे,
निसर्ग राणी तुझ्या संगती
जगन्नियंता निसर्गातुनी साथ तुला देईल
हाक मारूनी पहा गडे तू,
हात तुला देईल
तोच तुझ्या गे अवती भवती,
कशी मग तू एकटी?

वेडे, नाहीस तू एकटी..

😊😊
कविता ऐकल्यावर उमाकांत आवेगाने उठले.

ताईंचा हात हातात घेऊन म्हणाले, ‘‘स्वाती,
युरोप टूरचं बुकिंग करायला तूही चल ना. येताना
नवीन कपडे घेऊ. बाहेरच जेवण करू, कालच
चंदा गेला, दमली असशील. खूप केलंस
महिनाभर त्यांच्यासाठी.’’
‘‘छे! मुळीच दमले नाही. माझं रिकामं घर मला किती ऊर्जा देऊन गेलं म्हणून सांगू? तुम्हाला आनंदात पाहून घराच्या भिंतीदेखील हसू लागल्या. बघा, आता चित्रातला नाही, तर खरा निसर्ग पाहायचा.’’ आणि उत्साहानं ताई बाहेर जाण्यासाठी तयारी करू लागल्या.

च्युईंगम



च्युईंगम

च्युई म्हणजे चावणे. गम म्हणजे डिंक. वेगवेगळ्या झाडांचे चीक गोळा करून च्युईंगम तयार केले जाते. हे तयार करताना सुरवातीला डिंकाला जवळपास ११५० अंश सेल्सिअस उष्णता दिली जाते. त्यामुळे डिंकाचा घट्ट पाक तयार होतो. तो गाळला जातो. नंतर या घट्ट पाकात पिठीसाखर, मक्याचा रस, ग्लूकोज, खाण्याचा रंग, अन्न टिकवणारे पदार्थ मिसळतात. हे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवले जाते. व त्याचवेळी त्या मिश्रणाला वेगवेगले आकार दिले जातात. पूर्वी चुईंगम रबरासरख्या चिकापासून बनवायचे. दुधासारख्या रंगाच्या या चिकाला चिकल असे म्हणत. मोक्सिको व मध्य अमेरिकेतील सॅपोडिल्ला नावाच्या झाडाच्या चीक त्यासाठी वापरत. पण आता चुईंगगम मेण, रबर व प्लॅस्टिक यापासून बनवलेल्या सिन्थेटिक गमपासून बनवण्यात येते. हा गम साखर व मक्याच्या द्रावात मिसळला जातो. मग तो कुकरमध्ये वितळवला जातो. हा द्राव रोलमध्ये घालून चपट्या वड्या करण्यात येतात. १९२८ मध्ये प्रथम याचे उत्पादन सुरु करण्यात आले.

एकदा का च्युईंगम चघळण्याची सवय लागली ती सुटणं कठीण असं म्हटलं जातं. त्यामुळं च्युईंगम चघळण्याचे फायदे तोटे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचे आहे. गळ्याला पडलेली कोरड दूर करण्यासाठी काही च्युईंगम चघळतात.चॉकेलेटसारखं च्युईंगम विरघळत नाही त्यामुळं तासनतास ते चघळणं आणि च्युईंगमचे फुगे करत त्याचा आनंद घेणं अनेकांना आवडतं. अनेकजण काम करताना च्युईंगम चघळतात. कुणाशी बोलतानासुद्धा ते च्युईंगम चघळणं सोडत नाही. याचाच अर्थ असा की च्युईंगम जणू काही त्यांच्या आयुष्याचा एक भाग बनलाय.च्युईंगम खाणा-यांमध्ये सर्वाधिक संख्या ही लहान मुलं,प्रोफेशनल, क्रीडापटू, कॉलेज तरुण-तरुणी यांची जास्त असते.या कारणांसाठीही चघळतात. काहीजण तहान रोखण्यासाठी, थकवा दूर करण्यासाठी च्युईंगम चघळतात. खेळाडूंमध्ये च्युईंगम चघळण्याचं प्रमाण सर्वाधिक आढळतं. च्युईंगम चघळल्याने एकाग्रता वाढते असंही म्हटलं जातं. याशिवाय खेळताना स्फूर्ती मिळावी यासाठीही अनेक खेळाडू च्युईंगमचाच आधार घेत असल्याचं चित्र पाहायला मिळतं. याशिवाय काही जण तणाव दूर करण्यासाठी तर काही तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठीही च्युईंगम चघळत असल्याचं आढळतं.

च्युईंगम चघळण्याचे वैज्ञानिकदृष्ट्या फायदे : एका संशोधनानुसार च्युईंगमचे फायदे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेत.च्युईंगम चघळल्याने बुद्धी तल्लख बनते आणि स्मरणशक्ती वाढत असल्याचंही समोर आलंय. च्युईंगम चघळताना कोणत्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची क्षमता दहा टक्क्यांनी वाढते असंही या संशोधनातून पुढे आलंय. इतकंच नाही तर च्युईंगम चघळण्याच्या प्रक्रिये दरम्यान मेंदूचे कमीत कमी आठ भाग कार्यान्वित होतात. मेंदूतील रक्ताभिसरण प्रक्रिया वेगाने वाढते ही बाबसुद्धा जपानी संशोधकांच्या अभ्यासातून उघड झालीय. याशिवाय ऍसिडिटीच्या समस्येतूनही च्युईंगमुळे सुटका होते. पचनक्रिया सुधारण्यातही च्युईंगमचा फायदा होतो.च्युईंगम चघळतानाचे आरोग्यदृष्टया फायदे च्युईंगम चघळणं ओरल हेल्थसाठीही उपयोगी असतं. दात आणि जबड्याच्या व्यायामासाठीही ते फायदेशीर ठरु शकते मात्र कोणत्या प्रकारचे च्युईंगम चघळता यावर ते अवलंबून असतं. शुगर फ्री च्युईंगम चघळत असाल तर तोंडात उत्तेजक स्वरुपाची लाळ तयार होते. यामुळं नवी स्फूर्ती मिळते. या लाळेत काही खनिजंही निर्माण होत असल्याने दातांच्या उत्तम आरोग्यासाठी ते फायदेशीर ठरतात.

च्युईंगम अतिसेवनाचे  तोटे : च्युईंगमचे जितके फायदे तितकेच त्याचे तोटेसुद्धा आहेत.त्यामुळं च्युईंगचे अतिसेवनसुद्धा आरोग्याला घातक ठरू शकतं. च्युईंगमच्या अतिसेवनानं दातांना धोका निर्माण होऊ शकतो. साखरयुक्त च्युईंगम चघळल्याने दात दुखण्यासारख्या समस्या वाढू लागतात. ऍसिड आणि फ्लेवरवाल्या च्युईंगममुळे दातांना धोका निर्माण होऊ शकतो. इतकंच नाही तर च्युईंगम चघळता चघळता ते चुकून पोटात जाण्याचीही भीती असते. यामुळं पाचन प्रक्रियेला धोका निर्माण होऊ शकतो. शिवाय यामुळं पोटाचे विकार जडण्याचीही शक्यता असते. त्यामुळं च्युईंगम चघळताना त्याचे फायदे तोटे याचा विचार करुनच त्याचे सेवन करा.

अनेकदा कपड्यांना च्युईंगम चिकटतो. एकवेळ कपड्यांवर पडलेले डाग जातील पण च्युईंगमचे डाग मात्र जाता जात नाही. तो काढण्याचा प्रयत्न आपण करतो पण फार काही यश येत नाही. हा च्युईंगम निघता निघत नाही. कपड्यांवर त्याचे काळे डाग राहतात. जीन्सवर च्युईंगमचे डाग जास्तच वाईट दिसतात.
तेव्हा तुमच्याही कपड्यांवर च्युईंगम चिकटला असेल तर तो कसा काढावा यासाठी काही खास टिप्स कपड्यांच्या ज्या भागावर च्युईंगम चिकटाला आहे तिथे बर्फ ठेवा. बर्फामुळे च्युईंगम कडक होतो आणि सहज निघतो. तो घासून काढण्याचीही गरज भासत नाही.– दुसरा उपाय म्हणजे ज्या भागाला च्युईंगम चिकटला आहे तो भाग गरम पाण्यात बुडवा. यानेच्युईंग थोडा मऊ होईल. त्यानंतर ब्रशने हळूवार घासून तुम्ही तो  काढू शकता.– घरात हेअर स्प्रे असेल तर त्यानेही काही सेकंदात तुम्ही च्युईंगम काढू शकता. च्युईंगमवर हेअर स्प्रे मारला तर तो कडक होतो आणि लगेच निघतो.

कहाणी आजी-आजोबांची


कालौघात आजी-आजोबा ही जिव्हाळ्याची संस्था नामशेष होत चालली आहे. जणू काही घरातून देवघराची उचलबांगडीच झाली आहे. सुरकुतलेल्या हातांनी मायेच्या माणसांसाठी केलेल्या  पुरणपोळीचे महत्व  कमी कमी होत चालले आहे. सायंकाळी तुळशी-वृंदावना समोर भक्तिभावाने जोडलेले हात, नातवंडे मांडीवर घेऊन म्हटलेले श्लोक , मायेने भरवला जाणारा गुरगुट्या भाताचा घास, डोळ्यांवर पेंग येत असताना ऐकू येणाऱ्या पंचतंत्रातील सुरम्य कथा,परीक्षेचा निकाल चांगला लागल्यानंतर पाठीवरून फिरणारा आजोबांचा कौतुकाचा हात आणि त्यानंतर आजीने हातावर दिलेली खोबऱ्याची वडी या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. 
आजकाल न्युक्लीयर कुटुंबाची कल्पना जिथेतिथे बोकाळली आहे. घराच्या चार भिंती इतक्या संकुचित झाल्या आहेत की त्यात आजी-आजोबांना सामावून घेण्यासाठी जागाच राहिलेली नाही. सोयी-सुविधांची तणे नको तेवढी माजली आहेत. पैसे कमावण्याच्या शर्यतीत प्रत्येकजण स्वत:ला मरेस्तोवर झोकून देतो आहे. अपरिहार्यतेच्या नावाखाली ज्याने त्याने नात्यांनाही कडी-कुलुपात बंदिस्त केले आहे. यंत्राच्या आधीन माणूस झाला आहे आणि त्याने स्वत:चेही यंत्र करून घेतले आहे. या यंत्रवत आयुष्यात भाव-भावनांची पाळेमुळेच गोठून गेली आहेत. म्हणूनच टोलेजंग इमारतीत खरेदी केलेल्या हजार चौरस फुटांच्या प्रशस्त ब्लॉकमध्ये  आजी-आजोबांसाठी एखादी खोलीही नाही. आधुनिक यंत्रे,खेळणी,फर्निचर यांच्या साम्राज्यात जुन्यापुराण्या आउट-डेटेड मॉडेल्सना जागाच नाही.  
आजकाल म्हणे लग्न करू इच्छिणारी मुलगी लग्नाआधी मुलाला विचारते की तुझ्या घरात किती गार्बेज आहे? या गार्बेज मध्ये मुलाचे आई-वडील,असले तर आजी-आजोबा,काका-काकी,आत्या इत्यादी कुणीही मोडू शकतात. किती गार्बेज आहे हे मुलाने सांगितले की मग ती ठरवणार की असल्या गार्बेजवाल्या गोडाऊनमध्ये राहायचं की नाही ते. मुलाला तिच्याशी लग्न तर करायचं असतं त्यामुळे तो मग नवीन ब्लॉक घेतो आणि अडगळीच्या वस्तू जुन्या जागेत सोडून येतो. तिला स्वतंत्र राज्य मिळतं आणि भंगार तिच्या घरात येत नाही. काही वर्षे गेल्यानंतर आपल्यालाही रद्दीचाच भाव येणार आहे या सत्याकडे तात्पुरती का होईना पण पाठ फिरवली जाते.  
मुलांनी शाळेतून घरी आल्यानंतर दाराला काय बघायचं तर मोठ्ठं कुलूप! ते स्वहस्ते उघडून आत शिरायचं, खायचं अन्न मायक्रोवेव्ह मध्ये गरम करायचं, संगणकाशी खेळत मन रमवायच, रिकामं घर न्याहाळत बसायचं आणि अभ्यास संपवून रात्री उशिरा येणाऱ्या आई-वडिलांची वाट पहायची. या दिनक्रमात पाहुणे म्हणून चार दिवस आलेल्या वडील-धारयांच्या येण्याने खंड पडला तर चरफडत राहायचं. ही नव्या युगातील कितीही कटू वाटली तरी वस्तुस्थिती आहे.       

ढळला रे ढळला दिन सखया

संद्याछाया भिवविती हृदया 

अता मधूचे नाव का सया

लागले नेत्र रे पैलतीरी 

अशा अवस्थेप्रत मार्गक्रमणा करणाऱ्या आजच्या आजी-आजोबांची ही हृद्य कहाणी आहे व त्यावर आस्थेची,मायेची फुंकर घालता न येऊ शकणाऱ्या तुम्हा-आम्हा सर्वांचाच हा दारूण पराभव आहे. 


शेवटी संस्काराने मात केली....


 शेवटी संस्काराने मात केली....

अगदी जड अंतःकरणाने अविनाशने कारच्या डिक्कीचा दरवाजा उघडला, आईची बॅग आत सरकवली, दरवाजा बंद केला, दरवाज्याच्या काचेवर ठळक "आईची पुण्याई" लिहलेल्या अक्षराकडे पाहून त्याचे डोळे पाणावले! कारचा दरवाजा उघडला, आई आत बसली अन गाडी निघाली.

दोघेही शांत होते !

        बाबा गेल्यावर सर्व घराची धुरा सांभाळत आईबाबा दोघांची जबाबदारी आपल्या सर्व आशा आकांक्षा बाजूला गुंडाळून आईने प्रचंड ताकतीने पेलवली होती!  बाबानंतर बाबांच्या पेन्शनच्या पैशातून त्यांच्या स्वप्नातील त्यांचे घर चालवत एकुलत्या एक अविचे उच्चशिक्षण, एका नामांकित कंपनीत मोठ्या पॅकेज ची नौकरी, उच्च विद्याविभूषित संस्कारी घरातील मुलीशी विवाह, एक गोंडस आजीच्या छत्रछायेत वाढलेली संस्कारी कन्यारत्न अन गेल्या गुढीपाडव्याच्या दिवशी अविच्या स्वप्नातली त्याला घेऊन दिलेली ही कार ! सर्व अविच्या जमेची बाजू होती !
             सातव्या महिन्यात जन्मलेली 'मनू' कदाचित वाचणार नाही असे डॉक्टरने सांगितल्यावर सर्व देव पाण्यात टाकून, बाबांचे वर्षश्राद्ध न करता सतत वीस दिवस आई दवाखान्यातून हलली सुद्धा नव्हती ! मनू आज दहा वर्षाची झाली तरी आईपेक्षा आजीच्या सानिध्यात राहूनच तिने 'उत्तम संस्कार' आत्मसात केले होते,  त्याचा परिणाम पण असा होता की शाळेच्या पालक सभेत जाणे अन मनूची प्रशंसा ऐकून घरी परत येणे! याशिवाय अवि अन उच्चविद्याविभूषित पत्नी 'जयंती' कडे पर्याय नव्हता !
सर्वकाही ठीकठाक चालले होते !

          आई आईचे सर्व काम स्वतःच करत होती ! आजपर्यंत आईने अविकडे एक रुपया देखील मागितला नव्हता !नियमित चालणे, धार्मिक ग्रंथाचे वाचन, न चुकणारा हरिपाठ यामुळे तिला दवाखाना माहीत नव्हता !
पण सर्वच सुखात चालले तर दुःखाने कोणाच्या खांद्यावर डोके टेकायचे .........????

      उच्चविद्याविभूषित संस्कारी घरातील सून आणण्याचा आईचा निर्णय कदाचित चुकला होता ! सुंदर, सालस, संस्कारी, गर्भश्रीमंत होती पण माणसाला माणूस अन प्राण्याला प्राणी समजण्याची कला तिला अवगत नव्हती !
छोट्या छोट्या गोष्टींमुळे, मैत्रिणींच्या सल्ल्यामुळे, माहेरच्या गुजगोष्टीमुळे तिने गेल्या तीन महिन्यापासून अविचे अक्षरशः डोके खाल्ले होते, अन गेल्या पंधरा दिवसापासून अविशी अबोला केला होता !

           विपन्नावस्थेत असलेला अवि प्रचंड मानसिक दबावाखाली जगत होता, त्याच्या मनात अस्तित्व निर्माण करणारी जननी विरुद्ध जन्मजन्मांतरी साथ देणारी(?) पत्नी यांचे पारंपरिक युद्ध तो प्रत्यक्षात अनुभवत होता !
याचा पूर्णविराम त्याला हवा होता.

       आईला कळू न देता त्याने एका वृद्धाश्रमाची माहिती तो काढून आला होता !अन आज आईने घेऊन दिलेल्या कारमध्ये तो आईला बसवून त्या वृद्धाश्रमात सोडण्यासाठी निघाला होता अन ते पण आईला याची पूर्वकल्पना न देता !! त्याच्यासाठी हा दैवदुर्विलास !!
            गाडी गल्लीतून मुख्य रस्त्याला लागली, ताकतीने पळण्याची क्षमता असूनही गाडी फारच कमकुवत मनाचा चालक बसल्यामुळे अगदी चालकाच्या सोयीप्रमाणे चालत होती ! आईने पॉकेट ज्ञानेश्वरी काढली अन वाचत बसली !
आईने अविला एका शब्दाने विचारले नव्हते की तो तिला कुठे घेऊन जात आहे ! कदाचित तिला कळले तर नसेल ?? त्याच्या मनात एक संघर्ष पेटला होता, आयुष्य घडवणारी आई का आयुष्याच्या शेवटपर्यंत साथ देणारी पत्नी ??
        पण आई माझ्या भावना समजावून घेईल अन माझ्या निर्णयाला नेहमीप्रमाणे समर्थन देईल या भावनेतून त्याने आईला न सांगता हे पाऊल उचलले होते ! पण आईला प्रत्यक्ष बोलण्याची हिम्मत त्याच्यात अजिबात नव्हती !!
काय सांगू ? कसे सांगू ? या विचारात गेल्या नव्वद दिवसापासून होता तो !!

       यएखाद्या मालिकेमध्ये एकाच भागात संपणारा विषय तीन महिने घोळावा अन त्यातून काहीतरी अनपेक्षित बाहेर यावे तसाच हा विषय होता !! समोरील चौकातून गाडी डावीकडे वळली, महिन्याच्या वारीसाठी एकादशीला नाथमहाराजांच्या दर्शनाला जाणाऱ्या आईचा अगदी पाठ झालेला रस्ता असल्याने आईने त्या रस्त्याचे दर्शन घेतले.
हळव्या मनाच्या अविच्या डोळ्यात अश्रू थांबत नव्हते, सतत गालावर ओघळत होते.

      गाडी वृद्धाश्रमच्या दिशेने चालत होती, अविच्या मनातला संघर्ष तीव्र होत होता ! जगण्याची कला ज्या गुरूंनी शिकवली होती त्याला, त्यांना तो अखेरचा श्वास कुठे घ्यावा हे शिकवायला निघाला होता !! त्याच्या माथी आज भयंकर संकट धर्मयुध्दाच्या रूपाने उभे होते ! कोणत्याही परिस्थितीत अपयश त्याच्याच पदरी पडणार होते !!
अत्यंत रहदारीचा रस्ता असल्याने त्याची नजर फक्त समोर होती, दुरवर एक रसवंती दिसली. रसवंतीवर थांबून मन मोकळे करावे असा विचार त्याच्या मनात आला. सर्व आईला सांगून मोकळे व्हावे, आई जे म्हणेल त्याला सामोरे जावे असा विचार त्याने केला ! गाडी थांबली !

           वेड्यावाकड्या लाकडावर उभ्या केलेल्या चार पत्राच्या शेडमध्ये एक चरक उभे केले होते. चरकाच्या वर विठ्ठलाचा फोटो अन त्याच्या शेजारी एका तरुणाचा हार घातलेला फोटो होता!  एक आजीबाई चरकातून ऊस ढकलण्यात अन चरकासमोर उभी राहून पिळून निघालेला ऊस आजीबाईंच्या हातात पुन्हा देण्यात एक तरुण स्त्री मग्न होती, उसाचा शेवटचा थेंब आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी त्यांची धडपड वाखाणण्याजोगी होती ! एका इंग्रजी शाळेच्या गणवेशातील नऊ दहा वर्षाची पोर टेबलवर पिण्याचे पाणी ठेवत हाफ का फुल ? गोड आवाजात विचारत होती.
अंगठा अन तर्जनी ताणून दाखवत अविने तिला फुल्ल रस पाहिजे असा इशारा केला, ती चरकाकडे वळाली. रस आणून ठेवला.
"नाव काय गं तुझं ?" कुतूहलाने आईने त्या मुलीला विचारले.
"माय नेम ईज 'भागीरथी' " सांगत ती आपल्या कामात व्यस्त झाली.
आईने रस पिऊन संपवला, अविने अजून ग्लासला हात लावला नव्हता.
अवि विचारात मग्न होता अन आई निरखून त्या तरुणाच्या फोटोकडे पहात होती ! चरक बंद झाला होता, आईचे निरीक्षण करणाऱ्या आजीबाई आईच्या बाजूला बसत बोलली, "ल्योक हाय माझा ! डायव्हर हुता ! आक्सिजंट मधी गेला ! आम्हास्नी रस्त्यावर टाकून !"
तिचे डोळे पाणावले होते ! आईने तिच्या खांद्यावर हात ठेवला, तिचे पण डोळे पाणावले !
गिऱ्हाईक आल्याने आजीबाई उठली, अवि सर्व पहात होता.
         अवि दहा वर्षाचा असतांना त्याचे बाबा गेले पण त्याच्या संगोपणात कसलीच कमतरता येऊ न देता त्याला आज समाजात ताठ मानेने फिरवणारी त्याची आई होती ! या कुटुंबावर आज जी वेळ आली तशी त्याच्या आईवर आली असती तर ?? किंवा भविष्यात जयंती अन मनू वर अशी वेळ आली तर ??? या विचाराने अवि अगदी कोमात गेल्यासारखा बसला होता !

"अवि रस घे ना रे बेटा !" आईच्या शब्दाने तो खडबडून जागा झाल्यासारखा "हो आई!" बोलून एका घोटात रस संपवत ग्लास खाली ठेवला.
बिल देत दोघेही गाडीत बसले ! गाडी निघाली !
.
.
.
जातांना म्हातारीने कसली कळकट पर्स ठेवली म्हणून उत्सुकतेने जयंतीचे ती उघडली, तिच्या नावे केलेली पंधरा लाखाची एफ.डी. अन मनूच्या नावे केलेली दहा लाखाची एफ. डी. व आईचे काही जुने दागिने होते त्यात ! जयंतीचे डोळे विस्फारले, त्यात आपोआप पाणी आले, ती ढसाढसा रडत होती, स्वतःच्या मुलाच्या नावे एक रुपयाही न टाकता सून अन नातीच्या नावे आपली सर्व पेन्शन समर्पित करणारी सासूच्या रुपात लाभलेल्या आईला तिने काही क्षणापूर्वी घरातून काढले होते ! स्वतःच्या नजरेत आज अपराधी झाली होती ती !!
.
.
.
तिने फोन उचलला..अविला लावला...
फोन वाजला, जयंतीचा होता, उचलला नाही, पुन्हा आला, उचलला नाही, पुन्हा वाजला, पुन्हा उचलला नाही !
काय झाले? किंवा काय केले ? यासाठीच फोन असणार याची त्याला कल्पना होती ...!!!!
त्याच्या डोळ्यासमोर चरकाची दोन चाके स्पष्ट दिसत होती, एक आई अन दुसरी जयंती, मध्ये पिळून निघणारा ऊस त्याला त्याचे अस्तित्व भासत होता, या सर्व प्रक्रियेत त्याचा पालापाचोळा होणे त्याला अटळ वाटत होते !
एका पारंपरिक प्रथेत त्याचा बळी जाणार हे शाश्वत होते !
समोर वृद्धाश्रमाची पाटी दिसली ! अविचे अंग थरारले ! आईच्या पदरातून बाहेर पडण्याची कला त्याला अवगत नव्हती, त्याने गाडीची गती वाढवली, अगदी पाटी आईला अस्पष्ट दिसेल एवढी !

वृद्धाश्रम मागे पडले ! पण पुढे जायचे कुठे ??
अगदी थोड्या अंतरावर मंदिराजवळ गर्दी दिली, समोर लावलेल्या बॅनर वरून नव्याने निर्माण झालेल्या साईबाबांच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होती असा संबोध होत होता, गाडी तिकडे आपोआप वळली !
आईच्या चेहऱ्यावर आंनद दिसला, तो पाहून अविच्या मनालाही आनंद झाला !

आई कार्यक्रमात व्यग्र झाली, आईला वृद्धाश्रमात न सोडण्याचा निर्णय त्याच्या संवेदनशील मनाने घेतला होता ! काहीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण शेवटच्या श्वासापर्यंत आई माझे अस्तित्व बनून राहील ! असा ठाम निर्णय त्याने घेतला होता !!

आपण आईला कोणत्या कारणाने आणले हे आईला कळले नाही याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.
कार्यक्रम संपला ! आतापर्यत जयंतीचे जवळपास तीस कॉल त्याने 'मिस' केले होते, 'आईला सोडा, लवकर या ! याशिवाय ती काय बोलणार ?' म्हणून त्याने तिचे कॉल रिसिव्ह केले नव्हते !
आई अगदी तृप्त मनाने अन आनंदी चेहऱ्याने देवळाच्या पायऱ्या उतरतांना दिसली, अवि लगबगीने तिच्या जवळ गेला, दर्शन घेतले, तिच्या हातातील प्रसादाची वाटी घेऊन गाडीपर्यंत येऊन आईला गाडीत बसवले.
एक नवी ऊर्जा नवा जोश संचारल्यागत तो वेगाने गाडी घराच्या दिशेने पळवत होता !
गाडी दारात येऊन थांबली ! जयंती पळत आली अन गाडीतून उतरण्याच्या तयारीत असलेल्या आईला अक्षरशः ओढत तिच्या गळा पडून रडत होती ! रडत रडत फोन का उचलत नाही म्हणून अविला भांडत होती !

अविसाठी हे चमत्कारापेक्षा तीळभर सुद्धा कमी नव्हते !!
सहा वाजले तरी मनू शाळेतून आली नाही म्हणून जयंती चिंतीत पण होती !अविने व्हॅनच्या चालकाला फोन लावला, त्याने सांगितले की मनू ला घरासमोर सोडले !!
आता अवीची अन जयंतीची चिंता खरोखरच वाढली !
आईने दोघांना मागे येण्याचा इशारा केला अन पुढे चालत जवळच असलेल्या गेल्या वीस वर्षांपासून दररोज न चुकता हरिपाठ साठी जाणाऱ्या मंदिरात घेऊन गेली ! अवि अन जयंती पहिल्यांदाच मंदिराच्या आवारात प्रवेश करीत होते !
हरिपाठ, आरती आटोपली होती, मनू सर्व आजींना आपल्या खाऊसाठी दिलेल्या पैशातून प्रसाद म्हणून 'खडीसाखर' वाटत होती !!
आजीला बाहेर पाहून ती पळत येत तिला बिलगली, "आजी आज आपला प्रसादाचा वर होता ना, तू नव्हती म्हणून मी आले ! माझं काही चुकलं का ?" मनू
"माझा वाघाचं काही चुकतं का ??" दप्तरासगट तिला उचलून घेत आई बोलली !
तिच्या बालमनावर झालेले पवित्र संस्कार! अन आपल्या मनावर राग,लोभ,मद, मत्सर,अहंकार अन पैशाच्या मस्तीने केलेले व्यभिचार याच्या तुलनेत अवि अन जयंतीची मने खजील झाली होती !!

 ---- शरदचंद्र ( सईसावलीतुन 

सहज गंमत म्हणून



सहज गंमत म्हणून
मराठी विलोमपद म्हणजे असे वाक्य जे उलटे वाचले तरी अगदी तसेच असते जसे सरळ वाचताना
👇👇👇👇👇👇
१. चि मा का य का मा ची
२. भा ऊ त ळ्या त ऊ भा
३. रा मा ला भा ला मा रा
४. का का, वा च वा, का का
५. का का, वा ह वा ! का का
६. ती हो डी जा डी हो ती
७. तो क वी डा ल डा वि क तो
८. तो क वी मो मो वि क तो
९. तो क वी सा मो सा वि क तो
१०. तो क वी को को वि क तो
११. तो क वी ई शा ला शा ई वि क तो
१२. तो क वी री मा ला मा री वि क तो
१३. तो क वी वा मा ला मा वा वि क तो
१४. तो क वी व्हि टी ला टि व्ही वि क तो
१५. तो क वी वि की ला कि वी वि क तो
१६. तो क वी च हा च वि क तो
१७. तो क वी का वि क तो?
१८. तो क वी लि ली वि क तो
१९. तो क वी ऊ मा ला मा ऊ वि क तो
२०. तो क वी ठ मा ला मा ठ वि क तो
२१. तो क वी क णि क वि क तो
२२. तो क वी बे ड व ड बे वि क तो
२३. तो क वी ठ मी ला मी ठ वि क तो
२४. म रा ठी रा म
२५. तो क वी च क्का च वि क तो
२६. तो क वी हा च च हा वि क तो
२७. तो क वी रा शी ला शि रा वि क तो
२८. तो क वी टो मॅ टो विकतो
२९. टे प आ णा आ पटे.
३०. शि वा जी ल ढेल जी वा शी.
३१. स र जा ता ना प्या ना ता जा र स.
३२. हा च तो च हा

आयुष्याची बॅलन्स शीट


आयुष्याची बॅलन्स शीट

    नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले . मार्च एंडिंगची धावपळ होती . सगळे हिशेब पूर्ण करायचे होते . अनेक खाती बंद केली, सुरु केली , काही पूर्ववत केली .सगळी धावपळ रात्रीच संपली .
        मग उशिरा अगदी शांतपणे बसून आणखी एक बॅलन्स शीट तयार करायची इच्छा झाली . ही बॅलन्स शीट होती, आयुष्याची . बराच वेळ हिशेब लावण्याचा प्रयत्न केला तर, असं लक्षात आलं की, प्रेम, स्नेह, माया, भावना आत्मियता, जिव्हाळा, कर्तव्य निष्ठा, बंधुभाव ही सगळी खातीच गायब आहेत. शिवाय जी शिल्लक आहेत, त्या खात्यांवर बरयाच दिवसांत काही व्यवहारच झालेला नाही .
           स्वतःलाच विचारून पाहिलं, इतक्या वर्षात या खात्यांकडे का बरं दुर्लक्ष झालं असेल ? कुठला भ्रम होता, कसला अहंकार ? आयुष्य धावपळीचं झालंय हे खरंच. पण निदान ही खाती सुरु ठेवण्या इतका तरी वेळ काढायला हवाच होता ना. बँकेत जसं एखादया अकाउंटवर काहीच व्यवहार झाले नाहीत, तर बंद करतात, तसं तर आपल्या आयुष्यात होणार नाही ना..!!
      मंडळी अजूनही वेळ गेलेली नाही, विसरून गेलेली, व्यवहार न झालेली ही प्रेमाची नात्यांची खातीही सुरु करुन पहा. अहो, पुढच्या वर्षापर्यंत तुमच्या आयुष्याची बॅलन्स शीट नाही सुंदर झाली तर पहा ..!

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


'अहंकाराच्या' धुंदीत 'जगण्याच्या' वाटेवरुन चालताना 'सुखदुःखाचे' घाट उतरून मी जेव्हां 'सन्मार्गावरुन' आलो

तेव्हा 'ग्रंथांच्या' झाड़ातुन वाळलेल्या रसांचे दोन ओघळ पाहिले मी,

शेवटी पाने म्हणाली 'शांतिरस' आणि 'भक्तिरसाचे' आहेत ते म्हणून 'स्वानुभवाच्या' चौकात उभ्या असलेल्या 'सिद्धाला' मी विचारलं हा 'शांतिरस' कुठे मिळतो हो?

तेव्हा ती म्हणाली
समोर 'संयमाच्या' मार्गावरुन जाताना तुला 'प्रलोभनांची' दुकाने लागतील...
पुढे 'मायेचे' सर्कल लागेल,
तिथेच 'मूर्खांचा' बाजार म्हणून एक मोठा मॉल आहे

त्याच्या आधी 'शहाणपणाची' एक गल्ली लागते
ती ओलांडून जा,
पुढे 'वैराग्याचा' आडवा रस्ता लागेल

तो ही क्रॉस कर...
डाव्या हाताला 'ज्ञानाचे मंदिर' लागेल

समोरच 'अध्यात्माचे कॉम्पलेक्स' आहे.
ठेकेदारांचे वॉचमन तुला अड़वतील...
"नामाचा पास" दाखवून आत जा,
समोरच तुला चार बिल्डिंग दिसतील.

'वैखरी', 'मध्यमा', 'पश्यन्ति', 'परा'
त्यातल्या 'परा' बिल्डिंग मध्ये 'तिस-या' मजल्यावर 'स्वानंदाचा' फ्लॅट आहे.

'शरणागतीची' बेल वाजव
'कृपेचे' दार उघडले जाईल समोर 'ध्यानाचा' कोच असेल त्यावर जरा निवांत बैस 'मुक्ती' उभी असेल 'समाधानाच्या'
 ट्रे मधे 'शांतिरसाचा' कुंभ घेऊन...!!

   दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

                               

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा