Pages

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

माणूसकी



कसल  भारी होत  जीवन ।
नव्हती कसली भ्रांत..।

पैसा नसे बाबांकडे ।
तरी ते दिसत शांत..।

रिकामे डबे, आई कधी
आदळतही नसे..।
तेल नसे भाजीला, तरी
चव अविट असे..।

चपाती तर घरी!
पाहूणे आल्यास कधीतरी व्हायची ।
ती खायला मिळणार,
या आनंदातही तृप्ती असायची..।

सगळ्या मोसमातील रानमेवा कोणीतरी आणून द्यायचे..।
आई बसायची वाटायला
तरी रूसण्याच कौतुक असायचे..।

डोळे मिचकावत चिंचा खाताना, गप्पा किती रंगत..।
चटणी भाकरीची मग
बसे अंगत पंगत ।

धो धो पाऊस कोसळताना मुद्दामच भिजायच,
आजीच्या सुती लुगड्यान मग ओल डोक पुसायच.....।

कुडकुडणार्‍या थंडीत
चुलीचीच  शेकोटी असायची,
विश्वाच ग्यान देत मग
आई भाकरी थापायची......।

एकच स्वेटर दर वर्षी
जपून ठेवला जायचा..।
खुपच लहान झाला तर
लहान भावाला द्यायचा......।

उन्हाळ्याच्या सुट्टयात
सगळे आंबे खायला जमत..।
खोल्या भरून आंबे असतानाही पाडाच्या अंब्यासाठी भांडणे जुंपत......।

काहीच नव्हत जवळ तरी,
माणस खुप श्रीमंत होती..।
गरीबीत जगतानाही 
माणसात माणूसकी होती......।

आता पैसा आहे बाबांकडे,
डबेही भरलेले,
पण तरी आदळापट  आणि बाबा चिडलेले..।

चपाती रोज गॅसवर बनवली जाते,
रोज दोन तीन भाज्या..।
ताट भरलेले तीनही वेळा,
पण एकट्याला जेवणाची सजा.....।
सण येतात आणि जातात,
सजले धजलेले फोटो अपलोड करण्यासाठी..।
वेळ नसतो मुलाला आईस भेटण्यासाठी..।

सगळी फळे मिळतात बाजारात,
चव नसते कशाला..।
अॅसीडच्या मार्‍याने संपवलेले असते जीवनसत्वाला.....।

सगळ मिळवलं माणसाने,
पण समाधानच गमावले..।
खिसे भरले पण
"मन"च रिकामे झाले..।

खुप श्रीमंत झाला माणूस, पण....
माणूसकी हरवून बसला..।
भरल्या घरात राहूनही,
आनंद बाहेर शोधू लागला.....॥

माझ्या आईची पिढी



माझ्या आईची पिढी

माझ्या आईची पिढी... साधारण पन्नास ते साठ पासष्ठच्या दशकातली !!
माझी मावशी, आत्या, मामी, काकू, सासूबाई .. सगळ्या याच पिढीतल्या बायका.. !
आता आजीपण हौसेने मिरवणाऱ्या, नातवंडात रमणाऱ्या ...!!

बहुदा ह्यातल्या खूप जणींचं लग्न अगदी दाखवायचा कार्यक्रम होऊन वगैरे झालेलं .. मुलगा नीट शिकलेला असावा आणि घर खातंपितं असावं एवढ्याच माफक अपेक्षा ठेऊन झालेलं लग्न ! लग्नानंतर नवऱ्याला सहसा 'अहो ' म्हणण्याचा , एकत्र कुटुंबात फारशी प्रायव्हसी वगैरे न मिळण्याचा तो काळ .. प्रायव्हसी मिळावी असं त्यांनाही वाटलं असेलच कि!! पण समोर येणाऱ्या गोष्टींना सहज स्वीकारत पुढे गेलेली हि पिढी ! इच्छा आणि कर्तव्य ह्यात कर्तव्याला जास्त महत्व दिलं त्यांनी .. आणि इच्छा माराव्या लागल्या म्हणून त्याचा फारसा बाऊ सुद्धा केला नाही. कुणाचे फारसे घटस्फोटही झाले नाहीत म्हणून माझी पिढी खूप भाग्यवान !!

आईवडिलांच्या मायेला फारसं कुणाला मुकावं लागलं नाही.
माझ्या पिढीला आई बाबांमध्ये समजूतदारपणा कसा असावा , दोघांनी मिळून घर कसं चालवावं, थोडक्या उपलब्धतेत आनंदी कसं राहावं हे अगदी जवळून बघता आलं.

ह्या पिढीतल्या खूपशा गृहिणी होत्या. ज्या नोकरी करत त्यांना जरा आर्थिक स्वातंत्र्य होतं पण तेही माफकच !!
कोणत्याच बाबतीत त्यावेळी फार स्वातंत्र्य नसतानाही त्या समाधानी होत्या. माझ्या पिढीचं मात्र तुलनेने त्यांच्याही आधी सुखवस्तू आयुष्य लाभूनही समाधान हरवल्यासारखं झालंय. आज छोटे मोठे निर्णय माझी पिढी चुटकीसरशी घेते पण आपल्या घरातल्या आई, सासूबाई त्यांना काही विचारलं कि पटकन म्हणतात
"ह्यांना विचारून सांगते" किंवा "सुनेला / लेकीला विचारून सांगते"
ह्यातलं कुणीच तिला नाही म्हणणार नसतं तरीही छोट्या गोष्टींचे निर्णयही ती घरातल्याना सांगितल्याशिवाय घेत नाही. असं नाही कि ती मनाने कमकुवत असते पण तिच्या मनाला हि सवयच झालेली असते. आज अजूनही काही घरी ह्या पिढीची ऐशी नव्वदीतील सासू किंवा आई असते. तिला दोन पिढ्यांमधला दुवा व्हावं लागतं. सून, लेकाचं पटत असतं आणि त्याचवेळी सासू किंवा आईला समजून घ्यावं लागतं. माझी एक काकू गमतीने म्हणाली होती
"आम्ही आधी सासूला हो हो केलं आणि आता सुनांना करतोय.
आम्हालाही काही मन आहे हेच विसरायला होतं आताशा "!

ह्या पिढीने सामाजिक बदल पचवले आणि आनंदाने स्वीकारलेही!! सेकण्ड इंनिंग सुरु झाल्यावर हसतखेळत मजा करत आणि संसार करताना राहून गेलेय इच्छा पूर्ण करत जगायचं ठरवणारी पिढी भजनी मंडळाच्या ट्रीप काढून अगदी धम्माल करताना दिसते. नवीन स्मार्टफोन शिकून फेसबुक , व्हाट्सएप वर अगदी सक्रिय दिसते.
नातवंडांचे लाड करत, त्यांच्याबरोबर त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण करते, अभ्यास घेते. अजूनही कोणत्याही बंधूंचे लाडू चांगले मिळत असले तरी घरी लोणी कढवून साजूक तुपात केलेले लाडू आवर्जून लेकासुनांकडे पोचते करते. भरपूर प्रमाणात करायला जमलं नाही तरी नैवेद्यापुरत्या पुरणपोळ्या घरीच करते.
संक्रांतीला लांब राहणाऱ्या भाचे कंपनीसाठी तिळगुळा बरोबर आठवणीने
हळद-कुंकवाची पुडी ठेवते. घरात कामाला ठेवलेल्या कामवालीपेक्षा जास्त हीच कामं करत असते .
सोमवारी डाळतांदूळाची खिचडी करायची नाही , लोणी काढावयाचे नाही
ह्या आणि अशा अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत तरी सासूबाई किंवा आईने सांगितलंय आणि काही तोटा तर नाही ना त्यात असं म्हणत त्या गोष्टी पाळत असते.

अशी हि माझ्या आईची पिढी !!
खूप समाधानी आणि आयुष्याचा आनंद घेणारी !!
*ह्या पिढीला माझा मानाचा सलाम !!

बुधवार, ३ एप्रिल, २०१९

एका बायकोची दुसरी गोष्ट



एका बायकोची दुसरी गोष्ट (खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देवून वाचा)
काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली .ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करून मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.
पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं. एक्सेप्ट करायच्या आधी सवयी प्रमाने मी तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजूनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये. थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल? नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजून माझ्या सोबत मैत्री करण्यासाठी सज्जेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघून मी आंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणून मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणि कॉमेंटस मिळायला सुरूवात झाली. अापल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो. हा प्रकार पुढं पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली. अाता तर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली.
एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का? मी लगेच म्हणालो: हो तर. ती गप्प बसली. दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची मॅडम सुंदर असेल ना ? ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं: हो खूपच सुंदर आहे. त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ? ” खूपच रूचकर आणि जबरदस्त ” मी उत्तर दिलं “. मग काही दिवस ती गायब झाली. अचानक काल सकाळी तिनं मैसेज बॉक्स मध्ये लिहलं “मी तळेगावात आलेय . तुम्ही मला भेटणार का? मी म्हणालो : जरूर भेटेन की. “तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल. मी म्हणालो नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा. म्हणाली : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर नाही येणार तुम्हाला यायचं तर या. मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी. ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा. मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणि सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही. शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा. ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी मटन करी बनवून तयार होती. मी बायकोला विचारलं: आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला? बायको म्हणाली: प्रिया जोशी येतेय. काय? ती तिला कुठं भेटली? तू तिला कसं ओळखतेस? “जरा धीर धरा साहेब, ती मीच होते. तुम्ही माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात. यावं माझे खरे जोडीदार माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय. ताप्तर्य : चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव Men will be men

"क्षमा".......!!!



"क्षमा".......!!!

पुण्याच्या आसपासचं गाव....कुटुंब ठिकठाक ...एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन..... साहजीकच सुनेवर सर्व भार .... आधी किरकोळ कुरबुर.... मग बाचाबाची.... त्यानंतर कडाक्याची भांडणं.... सुनेचं म्हणणं.... घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका..... काम करुन हातभार लावा संसाराला ..... पण बाबा थकलेले..... शेवटी सुनेचे टोमणे खाण्यापेक्षा घर सोडायचं त्यांनी ठरवलं..... मुलानेही अडवलं नाही.....

आले पुण्यात....कुणी म्हातारा म्हणुन काम देईना  आणि भुक जगु देईना.... भिक  मागण्यावाचुन पर्याय उरला नाही....

बाहेरच मुलाला भेटुन, लाज टाकुन  बाबा विचारायचे, येवु का रे बाळा घरी रहायला ?

"बाळ" म्हणायचे, मला काही त्रास नाही बाबा, पण "हिला" विचारुन सांगतो.....

पण ....या बाबा घरी, असा निरोप बाळाकडुन कधी आलाच नाही.....!

आता बाबा अट्टल भिकारी झाले.....

झाले कि त्यांना केलं गेलं..... ?

अशीच भिक मागताना एके दिवशी माझी न् त्यांची भेट झाली....

बोलताना बाबा म्हणायचे, डाॕक्टर म्हातारपण म्हणजे नाजुक वेल हो.... वेलीवरच्या सुंदर फुलांकडे सगळ्यांचं लक्ष जातं, पण या फुलांना अंगाखांद्यावर खेळवणा-या वेलीकडे कुणाचंच लक्ष नसतं.... वेल बघा नेहमी झुकलेली आणि वाकलेलीच असते.... कुणाचाच आधार नसतो म्हणुन.... तसंच हे म्हातारपण ..... झुकलेलं आणि वाकलेलं.... निष्प्राण वेलीसारखं.... !

बाबांची वाक्य ऐकुन काटा यायचा अंगावर माझ्याही...!

नाव पत्ता पिनकोडसहीत टाकुन पत्र पत्त्यावर पोचत नाहीत डाॕक्टर, त्याला पोस्टाचं तिकिट लावलं तरच ते पत्त्यावर पोचतं....नाहितर वर्षानुवर्षे पडुन राहतं धुळ खात पोस्टातच.... तसंच आमचं आयुष्य..! नाव पत्ता सग्गळं बरोबर पण देव आमच्यावर तिकिट लावायला विसरला, म्हणुन आम्ही इथं पडलेले....

असं बोलुन ते हसायला लागतात....

त्यांचं ते कळवळणारं हसु आपल्यालाच  पिळ पाडुन जातं.....

मी म्हणायचो, बाबा हसताय तुम्ही... पण हे हसु खोटं आहे तुमचं... तर म्हणायचे... आयुष्यभर सुखी असल्याचं ढोंग केलं.... हसण्याचं नाटकच केलं ... आता या वयात तरी खरं हसु कुठुन उसनं आणु....???

मी निरुत्तर.... !

वाळलेल्या सुकलेल्या पालापाचोळ्यासारखं  आयुष्य झालंय... कुणीतरी येतं आणि आम्हाला गोळा करतं.... टोपलीत ठेवतं.... वाटतं चला, कुणाला तरी आपली दया आली.... नंतर कळतं कि सुकलेले आहोत म्हणुन जाळण्यासाठी,  शेकोटी पेटवण्यासाठी आपल्याला टोपलीत ठेवलंय... सुकलेल्या पालापाचोळ्याचा नाहीतरी दुसरा वापर काय होणार म्हणा....?

बाबांच बोलणं ऐकुन मीच आतुन तुटुन जायचो....

काहीतरी काम करा बाबा , असं सांगुन मी त्यांना विनवायचो, पण आता उमेद गेली होती.... बाबा कामाला तयार नव्हते !

म्हणायचे , आज आहे मातीवर, उद्या मातीखाली जायचं...किती दिवस राहिलेत आता ? आज कुणी विचारत नाही ; पण उद्या मेल्यावर हेच लोक अंत्यदर्शनाला येवुन पाया पडतील.... श्राद्धाला जेवताना चांगला होता हो बिचारा असं म्हणतील...

नाटक असतं हो सगळं आयुष्यच .... प्रत्येकजण आपापली भुमिका पार पाडत असतं इतकंच.... !

इतकं असुनही एके दिवशी मी बाबांना कामाला तयार केलंच.... बॕट-या विकण्यासाठी त्यांना मदत केली.... शे पाचशे रुपये रोज कमावतात बाबा आता... भिक  मागत नाहीत.

मागच्या महिन्यात मला मिळालेला पुरस्कार याच बाबांना मी समर्पित करुन स्टेजवर यांचा सत्कारही करायला लावला होता.... !

आज हे आठवायचं कारण म्हणजे, आज मला हे बॕट-या विकताना रस्त्यावर भेटले.... मला जरा बाजुला घेवुन गेले.... म्हणाले, एक गंमत सांगायचीय डाॕक्टर .....

सुनेला कळलंय माझ्या, मी दहा पंधरा हजार कमावतो.... तर मला शोधत माझा मुलगा आला होता पुण्यात आणि म्हणाला, "हिने" तुम्हाला घरी बोलवलंय, झालं गेलं जावु दे म्हणते.... पाया पडुन माफी मागायला तयार आहे... बाबा, मला पण तुमच्या धंद्यात घ्या, एकत्र मिळुन करु."

मी स्तिमित झालो, तीन वर्षं आपल्या बापाला / सास-याला  भिक मागायला लावली.... आता पैसा दिसायला लागल्यावर सगळी नाती जवळ यायला लागली....?

डाॕक्टर काय करु सल्ला द्या...

साहजीकच मी बोललो, ज्यांनी तुमच्यावर हि वेळ आणली त्यांना थारा देण्याचा प्रश्नच नाही, त्यांना तुम्ही नाही पैसा हवाय तुमचा, आता त्यांना जवळ नका करु..... !

बाबा म्हणाले, डाॕक्टर मला कळतंय हे सगळं, पण एक सांगु ? आज मी माझ्या पोराला हात दिला नाही तर उद्या माझ्या जागेवर माझा पोरगा दिसंल भिक मागताना.... चालेल तुम्हाला ?

मी माझ्या माघारी त्याला भिकारी बनवुन जाईन का ?अहो चुकतात तीच पोरं असतात..... माफ करतो तोच "बाप" असतो.....

अहो,  लहानपणापासुन प्रेम म्हणजे काय; माया म्हणजे काय , भक्ती म्हणजे काय, दया म्हणजे काय हे शिकवत आलो..... त्यातुन तो किती शिकला माहिती नाही.... बहुतेक नाहिच शिकला, नाहितर ही वेळ नसती आली माझ्यावर...असो !

पण आता आयुष्याच्या शेवटच्या  वळणावर तरी "क्षमा" म्हणजे काय हे मला त्याला शिकवु द्या डाॕक्टर ....

आता जर तो हे शिकला नाही तर तो कधीच शिकणार नाही आणि कधीच कोणाला "क्षमा" करणार नाही.....

काही नाही काही नाही तर जाता जाता एवढं तरी शिकवु द्या मला डाॕक्टर ...

असं म्हणाले ते, आणि हसत हसत चालायला लागले आणि मी बसलो मागे डोळ्यातलं पाणी आवरण्याची कसरत करत....

ध्येय




आयुष्यात एखाद्यावर खुपदा वाईट वेळ येते. अशी वेळ जी त्याला खुप छळते. चिडचिड-रडरड करायला लावते.

अपेक्षाभंग, दुःख, विश्वासघात, विरह अशा अनेक भावनिक त्रासांमुळे माणुस खचुन जातो.
एकटा पडतो. सगळीकडे नकारात्मक दृष्टिकोनातुन पाहु लागतो. चुकीचे निर्णय घेतो. तोंडावर पडतो. काहीजण आयुष्य संपवुन टाकतात आणि काहीजण जिवंतपणे मरून जगतात.

खरतरं हीच वेळ असते उठायची, आणि आयुष्यासोबत स्पर्धा करायची. एक वादळ होऊन थैमान घालायची. कष्ट करायची. हव्या असलेल्या एका ध्येयासाठी कित्तेक गोष्टींचा त्याग करायची..!
एक अशी वेळ,
ज्या ज्या लोकांकडुन तुम्हाला त्रास होत आला आणि होतोय त्या लोकांची परतभेड करण्यासाठी कधीच त्यांच्यासारखं न वागता "तुझा सुड घेण्याइतकी तुझी पात्रता (लायकी) नाही" अस म्हणुन त्यांना सोडुन द्यायची.

अशा वेळी ह्याच्या-त्याच्या सांगण्यावरून चुकीचे चार निर्णय घेण्यापेक्षा स्वतःच्या मर्जीने एकच योग्य निर्णय घ्यावा.

एक वाट धरावी, एक ध्येय धरावं आणि भावनांच्या बाजाराला लाथ मारून एकट चालावं.नव्या माणसांना भेटत राहावं. त्यांच्याकडुन जे चांगलं ते घ्यावं. भावनांमधे न अडकता पुढे जात राहावं. आपली कदर कोणाला आहे-नाही ह्याच्यापेक्षाही स्वतःची स्वतंत्र सिद्धता स्वतःलाच दाखवण्यात आयुष्याचं सार्थक करावं.

ज्यांना तुमचं रडणं ऐकु नाही गेलं त्यांचे कान तुमच्या चर्चेने बहिरे होतील. ज्यांना तुमच्या वेदना दिसल्या नाहीत त्यांचे डोळे तुमच्या तेजाने आंधळे होतील. आणि तेव्हा तुम्हाला त्यांची किंचितही फिकीर नसेलं.

त्यामुळे सुडबुद्धीने स्वतःच अस्तित्व खराब करण्यापेक्षा जिथे आपल्या अस्तित्वाला जाण नाही तिथे ते ठेऊच नका. आणि जिथे आपलं अस्तित्व नाही तिथे ते अस निर्माण करा की तुम्ही थांबाल तेव्हा लोकांची आयुष्य थांबतील..!

तुमच्या वेदनांमधे इतकी शांतता ठेवा की तुमच्या आनंदात सगळीकडे राडा होईल

आयुष्याचं दही



शुभ्र दही पाहिलंकी तोंडाला पाणी सुटतं,
खायचा मोह होतो. पण चमचा बुडवला, की दही मोडणार,
थोड्या वेळाने चोथापाणी होणार, हे ठरलेलं!

पण म्हणून मी ते मोडलंच नाही तर ?
At the end of the day,
ते आंबट होऊन जाईल.

अजून काही दिवस तसंच ठेवलं, तर खराब होऊन जाईल.
मग उपयोग काय त्या perfectly set झालेल्या दह्याचा ?

मनात विचार आला, आयुष्याचंही असंच असतं नाही का ?

दह्यासारखं ‘set’ झालेलं आयुष्य नक्कीच आवडेल !
पण ते आयुष्य तसंच set राहिलं तर त्यातली गोडी निघून जाईल.
सपक होईल.. वायाच जाणार ते.

त्यापेक्षा रोजच्या रोज, आयुष्याचं दही नव्यानं विरजायचं.
आयुष्याची गोडी चाखायला तर हवीच! आयुष्य जगायला तर हवंच!

दिवसभर ते दही वेगवेगळ्या form मध्ये अनुभवायचं!
कधी साखर घालून, तर कधी मीठ,
कधी कोशिंबिरीत, तर कधी बुंदीत,
तर कधी कोणत्या ग्रेव्हीत!
कधी जेवून तृप्त झाल्यावर ताक म्हणून!
मला ना, ह्या ताकाचा हवं तितकं पाणी सामावून घेण्याचा गुणधर्म फार आवडतो.

अर्थात, कुठचाही अतिरेक झाला तर आयुष्य पांचटच होतं!
हरेक दिवसाच्या recipe ची नजाकत वाढवता आली पाहिजे.

मात्र एक नियम कटाक्षाने पाळायचा पूर्ण दही संपवायच्या आधी,
रोज थोडं विरजण बाजूला काढून ठेवायचं!
उद्याचं दही लावायला!

मग रात्री झोपण्यापूर्वी, दिवसभरात जगलेल्या lukewarm क्षणांनी ,
परत नव्यानं दही विरजायचं.

मला ठाऊक आहे रोज ही भट्टी जमेलच असं नाही.
पण नासलंच समजा कधी, कडवट झालंच समजा कधी,
तर नाउमेद न होता, नव्यानं सुरुवात करायची.

मग त्याकरता दुसर्‍याकडून विरजण मागायची वेळ आली …
तरी त्यात कमीपणा नसतो.

पण ‘दही मात्र रोजच्या रोज ताजंच लावायचं!
आयुष्य कसं ‘चवीनं जगायचं!!!

धन्यवाद!

सडेतोड




सडेतोड
  त्याचा फोन आता जवळपास सहाव्यांदा वाजत होता म्हणून त्याच्या रूममध्ये जाऊन तिने उचलला, मिनिटभर बोलत होती, तेवढ्यात तो बाथरूममधून बाहेर आला, तेव्हा त्याच्याकडे फोन देत ती म्हणाली,

- इथल्या आर्ट गॅलरीमधून कॉल आहे.
 
त्याने फोन हातात घेतला, बोलायला-ऐकायला सुरुवात केली आणि क्षणाक्षणाला त्याचा चेहरा उजळत गेला. फोन ठेऊन त्याने तिच्याकडे बघितलं तसं खुलासा करत ती म्हणाली,

- परवा इथे खाली जाहिरात दिसली, मी सगळी चौकशी करून तुझं नाव नोंदवलं. फक्त जागा नेमकी कोणती मिळेल याची धाकधूक होती, पण त्यांचा फोन आला म्हणजे मी ठरवलेलीच देत आहेत. तुझं पेंटिंग झालंय ना पूर्ण आता, त्याच्यासाठी म्हणून बोलून आले आहे.

- तू बघितलं आहेस ते पेंटिंग?

- नाही, पण मला खात्री आहे की प्रदर्शनात मांडण्याइतकं खास, सुंदर नक्कीच आहे.

- हा माझ्याबद्दलचा विश्वास आहे की तुझा फाजील आत्मविश्वास? पण असो, मला एक संधी उपलब्ध करून दिलीस त्याबद्दल - थँक्स अ लॉट.

  म्हणत त्याने पटापट आवराआवरी केली आणि आवश्यक त्या गोष्टी घेत पेंटिंग आठवणीने सोबत घेतलं आणि लगबगीने निघून गेला. तो गेला त्या दिशेने ती मात्र अचंबित होऊन अचल उभी राहिली.
------------------------------------------------------------------------------

  आजची सकाळ तिच्यासाठी वेगळीच उगवली होती. आदल्या संध्याकाळपासूनच खरंतर गोष्टी स्वप्नवत घडत होत्या. कोणत्यातरी चॅनेलवर चालू असलेला रोमँटिक मूवी एक वेगळी, तरल आठवणी निर्माण करणारी वेळ घेऊन आली होती.
  मुव्ही बघताना अगदी नकळत, हळुवार वातावरण निर्मिती झाली. मनाचा संवाद झाला की नाही, ते तिच्या लक्षात आलं नाही. मात्र, डोळ्यांचा डोळ्यांशी खूपच भावुक संवाद झाला आणि मुव्ही संपल्यानंतर झालेला एकूण संवाद आणि देहबोलीतून त्यांचा वेगळ्याच जगात प्रवेश झाला आणि त्यातील सुखाचे क्षण दोघांनी सोबतीने जगले-वेचले.
  आजची सकाळ काही वेगळी आणि खासच उगवली!
~~~~~~~~~~~~

  डायरीचे शेवटचे पान वाचून त्याने पुन्हा ती बॅगेत ठेवून दिली. नकळत एक नापसंतीची आठी कपाळावर आणि स्पष्टपणाची एक लकेर त्याच्या मनात उठून गेली. मग मात्र त्याने संपूर्ण लक्ष प्रदर्शनात झोकून देऊन तिकडेच लावलं. इतर चित्रकारांच्या कलाकृतींचा रसपूर्ण आस्वाद घेण्यात तो मग्न झाला.
------------------------------------------------------------------------------

  'मला वाटलं होतं, त्याचं एवढं मोठं सुंदर स्वप्न साकारण्यात मी मदत केली आहे तर, पूर्ण आदरासहीत, माझे वेगळ्या पद्धतीने आभार मानत तो मला त्याच्यासोबत प्रदर्शनात घेऊन जाईल. आभार मानताना माझाही गौरवपूर्ण उल्लेख करेल.
  काल संध्याकाळपासून ते आता मगाशी तो जाईपर्यंत, मनाला गुदगुल्या होतील, भविष्य सुंदर-सुरक्षित असेल असं स्वप्नरंजन चालू होतं माझं. पण त्याच्या एकूण वागण्याचा काही आदमासच लावता येत नाहीये.
  आता मात्र कोणत्याही गंभीर प्रसंगाला सामोरं जावं लागू नये!' तिचा मनातल्या मनात चालणारा संवाद शेवटी नकारात्मक विचाराशी येऊन थांबला.
------------------------------------------------------------------------------

- काल आपल्या दोघांमध्ये जो काही संवाद आणि त्यापुढची जी काही घटना घडली ती सहसंमतीने घडली, असं माझं मत आहे. तुझं काय म्हणणं आहे यावर?

  परतल्या-परतल्या ती समोर दिसताच त्याने प्रश्न केला. प्रश्न स्पष्ट असल्याने आणि आठवणीही ताज्या असल्याने तिनेही लगेच उत्तर दिलं....

- होय, माझंही तेच मत आहे.

- मग सुंदर-सुरक्षित भविष्य आणि स्वप्नरंजन, या सगळ्या गोष्टी इथे निरर्थक आहेत.

- अं... म्हणजे..... हो..... खरंतर.... होय निरर्थकच आहे.

- अडखळत उत्तर का येतंय तुझं? तू ठाम नाहीस का? आणि तू ठाम नसशील तर सांगतो, काल जे काही घडलं ते तू पुढाकार घेऊन साकारलं, असं म्हणतो मी आता. याला नकार आहे??

  त्याने तीव्रपणे विचारलं आणि ती दचकली.

- होय, मी पुढाकार घेतला.

-  गुड, आपल्या विचार-विकार-कृतीबद्दल माणसाने सडेतोड असलंच पाहिजे. तर मग तुझ्या-माझ्यामध्ये कोणतंही भावनिक किंवा खरंतर कोणतंच नातं निर्माण होऊच शकत नाही, हा माहिती आहे ना तुला. सो, स्वप्नरंजन वगैरे नकोच!

  आपला सडेतोड निर्णय देत तो तिथून निघून गेला.

©दीपाली निरंजन

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा