Pages

सोमवार, १ एप्रिल, २०१९

आत्मविश्वास



Working on Self realisation Group ह्या समुहावरील श्री. अनिल झा यांच्या मूळ हिंदी लेखाचा स्वैर मराठी अनुवाद.

सोऽहं शिवोहं !!
–––––––
एक भिकारी होता. एकदा रेल्वेच्या एका डब्यात भीक मागताना त्याला सुटाबुटातील एक इसम दिसला. त्याला पाहून भिकाऱ्याने  असा विचार केला की हा बराच श्रीमंत दिसतोय, याला भीक मागितली तर आपल्याला चांगली भीक मिळेल. भिकारी त्याच्यापाशी जाऊन भीक मागू लागला. भिकाऱ्याने त्याला भीक मागितली तेव्हा त्याच्याकडे बघून तो शेटजी म्हणाला, "तू तर नेहेमी इतरांना काहीना काही  मागतच फिरतोस, पण कधी कुणाला कांही देतोस तरी का?" तेव्हा तो भिकारी म्हणाला, "शेठजी, मी एक भिकारी आहे. मी नेहेमीच लोकांना भीक मागतच फिरतो. कुणाला कांही देण्याची माझी काय ऐपत असणार?"
"अरे, तू जर कुणाला कांहीच देऊच शकत नाही तर तुला भीक मागण्याचाही कांही अधिकार नाही. मी स्वतः व्यापारी आहे, आणि माझा व्यवसाय देण्या-घेण्याचा आहे. भिकेच्या बदल्यात तुझ्यापाशी मला देण्यासारखे कांही असेल तरच मी तुला भीक देईन." शेटजी उत्तरले.
इतक्यात स्टेशन आले आणि ते शेटजी स्टेशनवर उतरून निघून गेले. इकडे भिकारी शेठजीच्या बोलण्यावर विचार करू लागला. शेठजींनी दिलेले उत्तर त्याच्या मनात घोळू लागले. त्याच्या मनात आले की शेटजी म्हणाले ते बरोबर असावे. मी कुणाला भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकत नाही, म्हणूनच मला अधिक भीक मिळत नसावी. पण शेवटी मी तर पडलो भिकारी, मी लोकांना काय देऊ शकणार? पण मग मी तरी किती दिवस लोकांना कांही ना कांही दिल्याशिवाय केवळ भिकच मागत राहायची?

बराच वेळ विचार करून भिकाऱ्याने मनातल्या मनात विचार केला की यापुढे जी कुणी व्यक्ती आपल्याला भीक घालील त्याला कांही ना कांही मी जरूर देईन. पण काय द्यायचे? जी व्यक्ती स्वतःच भिकारी आहे, ती व्यक्ती इतरांना खरेच काय देऊ शकेल? दिवसभर हाच एक विचार त्याच्या मनात घोळत होता पण त्याला उत्तर सापडत नव्हतं.
विचारांच्या तंद्रीतच तो दुसऱ्या दिवशी स्टेशनपाशी बसला होता. तेव्हढ्यात त्याचे लक्ष स्टेशनजवळील फुलांच्या झाडांकडे गेले. ती फुलांनी फुललेली झाडी बघून त्याच्या मनात विचार आला की भीक देणाऱ्या लोकांना आपण त्या बदल्यात ही सुंदर फुलं द्यायला काय हरकत आहे? आपला हा विचार त्याला भलताच भावला आणि त्याने लगेच कांही फुले तोडून पिशवीत भरून घेतली. 
    तो गाडीत शिरला आणि नेहेमीप्रमाणे भीक मागू लागला. जो कुणी त्याला भीक घालीत असे त्याला तो आपल्या पिशवीतील कांही फुले काढून देत असे. ती सुगंधी, ताजी फुले बघून लोक खुश होऊ लागले. आता आपण सुद्धा लोकांना भिकेच्या बदल्यात कांही देऊ शकतो ही भावना त्याला सुखावू लागली. आपण फक्त भीक मागतो ही भावना दूर झाली.
       कांही दिवसांतच त्याच्या लक्षात आले की त्याला आता अधिक भीक मिळू लागली आहे. तो रोजच्या रोज स्टेशनजवळील फुलझाडांची फुले तोडत असे आणि जो पर्यंत त्याच्यापाशी फुले असतील तोपर्यंत लोक भीक घालीत असत आणि फुले संपली की लोकसुद्धा भीक देत नसत. आता हे रोजचेच झाले होते. असेच एक दिवस गाडीत भीक मागत असतांना त्याला तोच सुटाबुटातील मनुष्य पुन्हा दिसला. तो लगेच त्याच्यापाशी गेला आणि म्हणाला, "शेटजी, आज बघा मला तुम्हाला देण्यासाठी फुलं आहेत. तुम्ही मला आज भीक दिलीत तर बदल्यात मी तुम्हाला कांही फुले देईन." शेटजीने त्याला भिकेमध्ये कांही पैसे दिले आणि त्याने बदल्यात दिलेली सुंदर फुले ठेवून घेतली. भिकाऱ्यातील हा बदल बघून शेटजी खुश झाले होते. ते म्हणाले, "व्वा! क्या बात है? आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास." एव्हढं बोलून तो शेटजी गाडीतून स्टेशनवर उतरून चालता झाला. पण त्या शेटजीने बोललेले एक वाक्य, “आज तू ही माझ्यासारखा एक व्यापारी झालास, त्याच्या मनात घर करून गेलं. तो सतत याच गोष्टीचा विचार करू लागला आणि मनातल्या मनात तो खुश होऊ लागला. त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक दिसू लागली. आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याची एक गुरुकिल्लीच आपल्या हाती लागली आहे असे त्याला वाटू लागले.

विचार करीतच तो गाडीखाली उतरला आणि आकाशाकडे नजर टाकीत तो स्वतःशीच मोठ्याने उद्गारला, "नाही, मी भिकारी नाही व्यापारी आहे, व्यापारी. मी सुद्धा त्या शेटजीसारखा एक छान व्यापारी होऊ शकतो. मी सुद्धा श्रीमंत होऊ शकतो." आसपासचे लोक चमत्कारिक नजरेने त्याच्याकडे पाहू लागले. त्यानंतर तो भिकारी त्या स्टेशनवर पुन्हा कधी दिसला नाही.

साधारणपणे एक वर्षानंतर याच स्टेशनवर दोन सुटाबुटातील माणसे आली आणि सोबतच गाडीत चढली. दोघांची नजरानजर झाली. त्यांच्यापैकी एकाने दुसऱ्या माणसाला हात जोडून नमस्कार केला आणि स्मितहास्य करीत विचारले, "ओळखलंत मला?

आता त्याच्याकडे पाहत तो दुसरा माणूस उत्तराला, "नाही, मला कांही आठवत नाही. आपण बहुधा पहिल्यांदाच भेटत आहोत."

पहिला : "नाही, नाही! शेठजी. जरा आठवा. आज आपण तिसऱ्यांदा भेटतो आहोत."

दुसरा : "असं? मला तर कांही आठवत नाहीये. या आधी दोन वेळा आपण एकमेकांना कधी भेटलो होतो?"
पहिला माणूस हसून उत्तरला, "ह्या आधी दोन्ही वेळेला आपली भेट ह्याच स्टेशनवर आणि याच गाडीत झाली होती. पहिल्या भेटीत तुम्ही मला जीवनात कशाला महत्व आहे हे सांगितले आणि दुसऱ्या भेटीत मला मी कोण आहे हे सांगितले होते. आठवतंय?" आणि या दोन्ही गोष्टींचा परिणाम म्हणून मी आज फुलांचा एक व्यापारी झालोय आणि माझ्या व्यवसाच्याच संदर्भात मी आज दुसऱ्या गावी जातोय. पहिल्या भेटीत आपण मला निसर्गाचा नियम सांगितला होता की आपल्याला कांही मिळवायचं असेल  तर आपल्याजवळचं कांहीतरी द्यावं लागतं. हा देण्याघेण्याचा नियम खरोखरच फार उपयुक्त आहे आणि मला तो पूर्णपणे पटलेला आहे. मीच मला नेहेमी भिकारी समजत राहिलो. यापलीकडे मी कांही विचार केलाच नव्हता. दुसऱ्या भेटीत तुम्ही मला मी व्यापारी झाल्याचं मला जाणवून दिलं. आणि मग मात्र मला असं पक्केपणे वाटू लागलं मी भिकारी नाही, व्यापारी आहे. हा आत्मविश्वास तुम्ही माझ्यात जागवलात. आज मी खरंच एक चांगला व्यापारी झालोय."

भारतीय ऋषीमुनींनी बहुधा ह्यासाठीच माणसाला स्वतःची ओळख करवून देण्यावर नेहेमीच जोर दिलेला
शेवटी सगळं कांही मनाच्या समजुतीवर अवलंबून आहे. भिकारी जो पर्यंत स्वतःला भिकारी समजत होता तोपर्यन्त तो भिकारीच राहिला. जेव्हा आपण व्यापारी असल्याचे तो समजू लागला तेव्हा तो खरंच व्यापारी बनला. जेव्हा आपण आपल्याला, आपण सत्यस्वरूपात कोण आहोत  हे खऱ्या अर्थाने अनुभवायला लागू, तेव्हा मग आणखी समजण्यासारखं राहिलंच काय? होय ना? जे आपण जाणतो,ते आपण सर्व जगुयात.

माहेर



वहिनी अगदी पारंपारिक पद्धतीने आली आणि बोहल्यावर चढली निमूट सप्तपदी पूर्ण करून दादाचा हात धरून विना तक्रार दादाच्या साध्या घरात आली , सामावली...

पण तरी माहेर काही तिचं सुटलं नाही.
सासरी जे घडेल त्याच्या वरचढ तिच्या माहेरी घडलेलं असायचं.

                           त्यात कुणाला कधी खटकलं नाही, कारण एरवी तिचं वागणं अगदी सालस आणि समजूतदार होतं..

तिचं माहेरही होतच तसं तालेवार; त्यानी हसतमुखाने मुलगी या साध्या घरी दिली ती केवळ माणसं बघूनच.
त्यामुळे त्यांच्याकडूनही कधी आगाऊपणा झाला नाही की अवमान झाला नाही.

वर्षातून दोनदा वहिनी माहेरी जायची

त्यात एकदा दादा तिला आणायला जायचा...हे आता आमच्या लहानपणापासून माहीत झालं होतं.

    ती माहेराहून आली की पुढचे काही दिवस तिच्या बोलण्यातून सतत माहेरचे वारेजंग दाखले ऐकावे लागायचे..

     अर्थात ते ऐकण्यासारखेच असायचे. त्यांचा भलामोठा वाडा, त्यांची लांबचलांब पसरलेली बाग, फुलांचा ढीग, बागेशी येणारे मोर, वाट चुकून आलेली हरणं सगळंच स्वप्नवत वाटावं असं !
म्हणजे ही स्केटींग करण्यात मनमुराद वेगावर स्वार होणारी  मुलगी दादाच्या सोबत इथल्या घरात स्थिरावलीच कशी ?
याचं आश्चर्य वाटतं.   ???

मधे तिचे भाऊ लंडनला शिक्षण पूर्ण करून आले आणि माहेरच्या गप्पा आणीकच वाढल्या... आम्हालाही ते ऐकायला आवडायचंच कारण तो परिसर, ती माणसं आम्हाला काही परकी नव्हती..

मी दहावीत नापास झालो तेव्हा आईचं काही न ऐकता वहिनी मला तिच्या माहेरी घेऊन गेली होती.
म्हणाली,"आता चार दिवस माणसं येऊन उगीच भंडावून सोडतील..."

चित्रपटात कसं पाहुणे आले की ती घरची बाई नोकराला सांगते- "इन्हें इनका कमरा दिखाओ.." किंवा
जवळचा कोणी असेल तर "आओ, मैं तुम्हे तुम्हारा कमरा दिखाती हूँ" असं म्हणून दृश्यातून एक्झीट घेते..

पन्नाशी उलटली तरी मला या वाक्याचं अजूनही अप्रूप वाटतं..

वहिनीचं माहेरही तसंच चौसोपी होतं !
त्यात वहिनी माहेरची मोठी लेक ! त्यामुळे तिनेच त्या घराला एक शिस्त लावली होती..
मी वहिनीचा पाहुणा म्हणून माझीही त्या घरात खूप बडदास्त ठेवली गेली,मलाही माझी वेगळी खोली मिळाली होती. माझी "दहावी नापास होणं" एका अर्थी "सेलिब्रेट" केलं जात होतं..

म्हणजे एकूण काय अशी आमची मेघना वहिनी आणि तिचं माहेर हे आमच्या साठी एक अप्रूपच होतं..
मधल्या वर्षात दादाने पण खूप प्रगती केली. वहिनीच्या माहेराशी तुलनाच होऊ शकत नाही, पण तरी आमच्या परीने त्याने आसमान को हाथ छू लिये...

पण एक जाणवायला लागलं वहिनीचं माहेराविषयी बोलणं कमी झालं. कधी बोललीच तरी त्यात पहिल्या सारखा आग्रह राहिला नव्हता.

           मध्ये तिच्या माहेरचा जुना वाडा पाडून त्याहून आलिशान बंगला बांधला गेला. दोन्ही भावांची आॅफिसेस बंगल्याच्या आवारातच समाविष्ट केली होती...

वास्तुशांतीला मावशी सकट सगळेजण गेले होते. मलाही बोलावलं होतं पण जायला जमलं नाही.

पण तिथूनच वहिनी एकदम गप्प झाली...

शेवटी न राहवून मी वहिनीला विचारलंच,
"म्हंटलं, हल्ली तू माहेरच्या घराबद्दल भरभरून बोलत नाहीस?"

ती खिन्नपणे म्हणाली,"काय बोलू?"

"काय झालं?" मी विचारलं.

ती म्हणाली,"तसं पाहिलं तर काहीच झालं नाही..
सगळं रीतीला धरून झालं
पण ती रीत मला मान्य करायला त्रास होतोय."

क्षणभर गप्प राहून
ती म्हणाली,"आम्ही मुली सासरी येऊन माहेर मनात जपत असतो  आपण आता त्या घराला परके झालो हे आमच्या लक्षातच येत नाही...आणि माहेरचे लेक परकी झाली हे गृहीतच धरून चलतात...
खूप यातनामय आहे हे!"

"वहिनी, नीट सांग."
मी काकुळतीला येते म्हणालो..

तशी ती म्हणाली,
"काही नाही रेsssss
आधी वाडा होता त्यात माझी स्वत:ची खोली होती.. मला माझ्या खोलीचं कौतुक होतं. घरचेही त्या खोलीला ताईची खोलीच म्हणायचे."

"मग आता?"
मी नं राहवून विचारलं.

"आता इतका आलिशान बंगला बांधला. एक मजला वाढवला पण त्यात मला कुठेच जागा नाही....

म्हणजे शंतनू (धाकटा भाऊ) आता दहा बारा वर्ष लंडनला जायचाय तरी त्याची रूम आहे; ...आईबाबांची रूम असूनही आईची एक वेगळी रूम आहे, दादाच्या दोन्ही मुलांना वेगवेगळ्या रूम्स ..

पण ताईची जागा या घरात अबाधित आहे असं कोणालाच वाटलं नाही..
मी सहज विचारून गेले 'माझी रूम?'

तर शंतनू म्हणाला,'गेस्टरूम आहे ना... शिवाय स्टडीरूम आहेच.'

जागा होती पण सामाऊन घेणं जे म्हणतात ते
त्यांच्या लक्षातही आलं नाही...

मग मी मनापासून या घराकडे वळले या घरची होऊन गेले..

पण ही रीत मी मोडेन आपण जेव्हा बंगला बांधू.
मी छकुलीचं लग्न झालं तरी तिची रूम तिला हवी तशी राखून ठेवेन...

गेस्टरूम मधे पाहुणे उतरवायचे...
आपल्या लेकीबाळी नाही.
त्या दुसर्‍या घरी गेल्या तरी...
त्या आपल्याच असतात."

.....वहिनी भरभरून बोलत राहिली मी ऐकत राहिलो...

- चंद्रशेखर गोखले...👏💐
(Memory sharing)

" किचन मधला गॅलिलिओ "


तुम्हाला सांगतो समस्त नवरे मंडळींच्या कुंडलीत सर्वच्या सर्व बारा घरात ठाण मांडून बसलेला एक नंबरचा उधळपट्टी करणारा ग्रह म्हणजे....बायको.

आता परवाची गोष्ट... घरात पावभाजी केलेली...झकास झाली होती हो....होणारच, कारण सोबत खाण्याचा कांदा-लिंबू मी कापून दिला होता.. असो ...

तर जेवण झालं...बघतो तर काय ही एवढी भरमसाठ पाव भाजी उरलेली...इनमीन आम्ही घरात अडीच माणसं... या दोन फुल बायका आणि मी अर्धा एकमेव पुरुष.. आता अडीच माणसांना किती भाजी लागणार...या बाईने एक आख्खं गावं जेवलं एवढी भाजी केलेली.. या बाईच्या हाताला जरा सुद्धा  काटकसर नाहीच....एवढी भाजी केली होती जणू त्या पावभाजीने मला अभ्यंगस्नान घालणार आहे...का माझं फेशल करायचं होतं कुणास ठाऊक??....

पोरीला म्हंटल चुपचाप उद्या डब्यात न्यायची...म्हाळशीला म्हंटल तू ही उद्या हीच खा...अजिबात नाटक नकोय..

तरीही बरीच उरली..

बरं आता एवढ्या भाजीचं करायचं काय हा प्रश्नच....या बाबतीत माझं डोकं जरा जास्तच चालतं बरं का...तसा या बाबतीत मी खूप हुशार ...जरा विचार केला आणि डोक्यात ट्यूब पेटली.. म्हंटल या भाजीची एक गंमत करूयात....

मला सुट्टी होती, कामाला लागलो...ही भाजी मिक्सर मधून जरा बारीक पातळ करून घेतली.. अगदी रवाळ अशी..

मग एक परातीत थोडं मक्याचं पिठ, थोडं अंदाजाने मैदा आणि कणिकेचे पिठ घेतलं... त्यात या भाजीचं मिक्सर मधून काढलेले द्रावण ओतलं, त्याला जरा मीठ,मिरची, मसाला लावून जरा ग्लॅमर आणलं आणि मस्त कणिक मळल्यासारखं मळून घेतलं...

थोडं तेल लावून ते पाच दहा मिनिटं एकजीव होऊ दिलं... मग त्याला गोल पोळ्यासारख्या लाटून त्याचे शंकरपाळे किंवा त्या नाचोज सारखे तुकडे केले...मग गॅसवर कढईत तेल तापवून छान खमंग तळुन घेतले..

चांगले डबा भर तयार झाले....पोरीला नाहीतरी संध्याकाळी काहीतरी चटक मटक खायला लागतंच....ती क्लासवरून आली आणि तिला खायला दिलं पण काय आहे हे सांगितलच नाही...कुरकुरीत, चटकदार, एकदम टेस्टी खाऊन पोरगी खुश झाली..

असलं भन्नाट झालं म्ह्णून सांगू की विचारू नका.. अगदी व्यसन लागल्यासारखं एक खाल्लं की आपोआप दुसरं खायची इच्छा व्हायची...

संध्याकाळी उशिरा माझे मित्र खंड्या आणि बडी गप्पा मारायला आले....त्यांना तर एवढं भारी लागलं की विचारू नका.. या क्रिस्पी चटपटीत चवी बरोबर खंड्या-बडी बरोबरच्या गप्पा चांगल्याच रंगल्या...रात्रीचे बारा कधी वाजले कळलंच नाही...

बारा वाचले तसा या म्हाळसाचा दिवस बदलला अन मेंदूचा काटा सटकला...आली ओरडतं.. 'काय वेळ काळ आहे का नाही?' ..बिचारे खंड्या आणि बडी घाबरून पळत आपापल्या घरी गेले....असो.

करून पहा भन्नाट लागतातं...पोरांना मात्र सांगायचं नाही बरं का...कार्टीला अजून माहीत नाही...जाता येता चरतेय मजेत....

कुलकर्ण्यांचा " किचन मधला गॅलिलिओ " प्रशांत

तळटीप - हा सगळा पावभाजी क्रिस्पी बनवायचा घाट म्हाळसाबाईचा, मी आपला आपल्या नावावर खपवला इतकंच....(कोणाला सांगू नका)...हे असं बायकोचं क्रेडिट ढापायला मला खूप आवडतं...

माणूस आणि लेबल


माणूस आणि लेबल
          ----------------------------------------
          मानव हा सदैव अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकलेला प्राणी आहे. त्याच्या बद्दल ठोस असे काहीच सांगता येत नाही. किंबहुना बदलणाऱ्या परिस्थिती नुसार तो ही सतत बदलत असतो, नव्हे तर त्याला  सुद्धा बदलावेच लागते. ते झालेले नवे बदल म्हणजे जगण्याची नवी उमेद किंवा आयुष्यातली वेगवेगळी स्थित्यंतरे असू शकतात. या मायाजालात कायम राहिल अशी एक ही गोष्ट नाही. प्रत्येक दिवसानंतर भेसूर रात्रआरंभ आहे आणि प्रत्येक रात्री नंतर पुन्हा दिवसाचा लख्ख प्रकाश आहे. निसर्गाची ही अगाध किमया अशीच शतकानुशतके चालत आलेली आहे आणि पुढे ही असेच असणार आहे. असे असताना माणूस तरी एकसंध कसा काय राहू शकेल. जगण्याच्या धडपडीत आणि जगणे सुसह्य करण्यासाठी त्याला सुद्धा वेळोवेळी असेच बदल करणे क्रमप्राप्त आहे. उद्या तो काय करेल हे त्याचे भाकित त्याला सुद्धा करता येणार नाही. किंबहुना तसे सांगून त्या विरूद्ध वागणे सुद्धा गैरच ठरेल.
          आयुष्याचा पट हा असाच अनिश्चिततेच्या वारूळात अडकलेला आहे. प्रत्येकाच्या जगण्याच्या विभिन्न परिभाषा असतात आणि आयुष्य व्यतीत करताना कसे जगायचे हे ज्याचे त्यानेच ठरवायला हवे. आणि या  सगळ्या बाबींचा विचार केला गेल्यास त्याने ही एखाद्या व्यक्तीला  ठराविक शिक्का मारायची किंवा लेबल लावायची घाई करू नये. त्याच्या त्या बदलामागे विशिष्ट प्रकारची परिस्थिती कारणीभूत असू शकते याचा विचार होणे आवश्यक आहे. प्रत्येक परिस्थिती मागे काही तरी कारण असल्या शिवाय तसे घडून येत नाही आणि याकडेच डोळेझाक होते. बदलणे हा निसर्गाचा स्थायीभाव आहे आणि यावर विजय मिळवणे अतिशय कठीण आहे. जगण्याची धडपड करत असताना आपण फक्त चांगले वागून त्या कठीण असलेल्या गोष्टींचा प्रभाव कमी करायचा आणि आयुष्य आनंदात व्यतीत करायचे एवढेच आपल्या हातात आहे.

हाही क्षण निघून जाईल

हाही क्षण निघून जाईल


एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते.त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू, संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल.मला कायम आनंदी ठेवेल.
अखेर एका फकिराने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे,पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल.बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले.राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले.पहाटेला फाशी द्यायचे ठरले.विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला.मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला.कळाल्यावर दुष्ट  प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली.राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला.पुढे दरी होती.घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खडकाआड लपला. त्याला वाटले आता थोडया वेळात सैनिक गाठणार व आपण मरणार.  त्या क्षणी त्याला फकिराच्या अंगठीची आठवण आली.ती त्याने उघडली.त्यात एकच वाक्य लिहिले होते,

"This too shall pass "
 म्हणजे
"हाही क्षण निघून जाईल"

केवळ ते वाक्य वाचून राजाचे मन शांत झाले.आश्चर्य घडले.सैनिक तेथपर्यंत पोहचले.त्यांना वाटले फक्त घोडा दिसतोय म्हणजे राजा दरीत पडून मेला. ते परतले.राजाने शेजारच्या राज्याची मदत घेऊन काही दिवसांत आपले राज्य परत मिळवले. विश्वासघातकी प्रधानाचा शिरच्छेद केला.  विजयाचा जंगी समारंभ चालू असताना, नवीन प्रधानाने पाहिले की महाराज कुठेही अति-उत्साहित न होता प्रशांत मुद्रेने सिंहासनावर विराजमान आहेत.त्याने अदबीने विचारले,
" महाराज, आपल्या आयुष्यात एवढ्या भयानक घडामोडी घडल्या व त्यातून आपण सहीसलामत बाहेर पडला, तेव्हा आपण आज आनंदाने ओसंडून जायला हवे." राजा म्हणाला, " नाही, आता मला माझ्या मंत्राचा अर्थ व सामर्थ्य कळले आहे. जगात कुठलीही गोष्ट कायमची टिकून राहत नाही.परिवर्तन जगाचा शाश्वत नियम आहे.या जगात सुख ही राहात नाही, दुःखही राहात नाही.हे मला आता समजलेले आहे.म्हणून दुःखात खचू नये, सुखात नाचू नये."

This too shall pass !
हे क्षणही निघून जातील.
ही बोधकथा आपल्याला जगायला शिकवेल.नुसतेच जगायला नव्हे तर प्रत्येक प्रसंगात मनाची शांती अबाधित ठेवण्याची, मन स्थिर ठेवण्याची गुरुकिल्लीच इथे दिलेली आहे.

ही कथा पासवर्ड आहे आनंदी आयुष्याचा.

शनिवार, ३० मार्च, २०१९

उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!


उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!

उष्ण व थंड पदार्थ

कलिंगड             - थंड
सफरचंद             - थंड
चिकू                     - थंड
संत्री                     - उष्ण
आंबा                    - उष्ण           
लिंबू                    - थंड
कांदा                    - थंड
आलं/लसूण          - उष्ण
काकडी                 - थंड
बटाटा                   - उष्ण
पालक                   - थंड
टॉमेटो कच्चा         -  थंड
कारले                   - उष्ण
कोबी                    - थंड
गाजर                   - थंड
मुळा                     - थंड
मिरची                   - उष्ण
मका                     - उष्ण
मेथी                     - उष्ण
कोथिंबीर/पुदिना    - थंड
वांगे                      - उष्ण
गवार                  - उष्ण
भेंडी साधी भाजी    -  थंड
बीट                     - थंड
बडीशेप                 - थंड
वेलची                   - थंड
पपई                     - उष्ण
अननस                 - उष्ण
डाळींब                 - थंड
ऊसाचा रस बर्फ न घालता               - थंड
नारळ(शहाळ) पाणी - थंड
मध                  - उष्ण
पंचामृत (दही, दूध, तूप, मध, साखर)             - थंड
मीठ                     - थंड
मूग डाळ               - थंड
तूर डाळ               - उष्ण
चणा डाळ             - उष्ण
गुळ                     - उष्ण
तिळ                    - उष्ण
शेंगदाणे,बदाम,काजू,अक्रोड,खजूर - उष्ण
हळद                 - उष्ण
चहा                  - उष्ण
कॉफी                - थंड
पनीर                - उष्ण
शेवगा उकडलेला - थंड
ज्वारी                - थंड
बाजरी/नाचणी      -उष्ण
आईस्क्रीम          - उष्ण
श्रीखंड/आम्रखंड  - उष्ण
दूध,दहही,तूप,ताक (फ्रिज मधले नाही)  - थंड
फ्रिज मधले सगळे पदार्थ -उष्ण
फ्रिज मधिल पाणी - उष्ण
माठातील पाणी   -   थंड
एरंडेल तेल      - अती थंड
तुळस         - थंड
तुळशीचे बी - उत्तम थंड
सब्जा बी  -  उत्तम थंड
नीरा           - थंड
मनुका      - थंड
पाव/खारी/ बिस्कीट -उष्ण
हॉट ड्रिंक सर्व    - उष्ण
कोल्डरिंग सर्व    - उष्ण
मास/चिकन/मटण- उष्ण
अंडी (फक्त उकडलेल पांढरे) - थंड
उन्हाळ्यात नैसर्गिक रित्या थंड पदार्थ जास्त खाल्ल्यास गरमीपासून शरीरास होणारा त्रास कमी होतो .

वपुर्झा..

वपुर्झा..

माणूस जन्मभर सुखामागं, ऐश्वर्या मागं धाव धाव धावतो. पण ह्या धडपडीत तो सुखी नसतो, आणि धडपड यशस्वी ठरून, हवी ती वस्तु मिळाल्यावरही तो सुखी नसतो. ह्याचं कारण तो निर्भयता शिकत नाही. नेहमी माणसाला कशाची ना कशाची सातत्याने धास्ती वाटत राहते. तो जर निर्भय व्हायला शिकला तर जीवनातली गोष्ट नव्याने समजेल. माणसं, नद्या, डोंगर, समुद्र, सगळ्यांचा अर्थ बदलेल. आकाशाकडे सगळेच बघतात. पण त्रयस्थासारखं! म्हणूनच ते जरा भरून आलं किंवा विजेचा लोळ कोसळतांना दिसला की माणसं पळत सुटतात. आकाशाकडे पाहायचं ते आकाश होऊन पाहावं म्हणजे ते जवळचं वाटतं. ‘विराट ह्या शब्दाला अर्थ तेव्हा समजतो. ‘अमर्याद शब्द पारखायचा असेल तर समुद्र पहावा. ‘विवधता शब्द समजून घ्यायचा असेल तर ‘माणूस पहावा. पण तोही कसा, तर आतुन आतुन पहावा. मग माणसांची भीती उरत नाही. अगदी हलकटातला हलकट माणूस देखील हलकट म्हणून आवडतो. जीवनावर, जगावर, जगण्यावर असं प्रेम केलं म्हणजे सगळं निर्भय होतं. उपमा द्यायची झाली तर मी विजेचीच उपमा देईन. पॄथ्वीची ओढ निर्माण झाली रे झाली की ती आकाशाचा त्याग करते. पॄथ्वीवर दगड होऊन पदते. पण पडण्यापासून स्वत:ला सावरत नाही आणि तेजाचाही त्याग करीत नाही. प्रेम करताना माणसानं ही असं तुटून प्रेम करावं. डोळे गेले तरी चालतील पण नजर शाबूत हवी. स्वर नाही सापडला तर नाही, पण नाद विसरणार नाही, पाय थकले तरी बेहत्तर पण ‘गतीची ओढ टिकवून धरीन, ही भूक कायम असली की झालं! आयुष्यात ही भूक जिवंत ठेवावी आणि निर्भयतेने पुरी करीत राहावं.
~ वपु काळे | वपुर्झा..


A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा