Pages

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

शिमगो



हे बारा गावच्या,बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा आसात ता दूर कर रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला आसात तर ता भायेरच्या भायर निघान जाऊं दे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

कोणाक पाॅर हायत नसात तर त्याका पोरा होऊ दे, काम धंद्यात सर्वांका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लगिन जुळत नसात तर ता तुझ्या कृपेन जमानदे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

हे देवा म्हाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

हे देवा म्हाराजा आणि जो काय आजकाल पोरीटोरींवर अत्याचार होतंत आणि जे करतत त्यांचो नाय नाट कर रे म्हाराजा....
होय म्हाराजा....🙏🏻

ह्या बगा देवाक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गाराणा घातलय.

चला आता सगळ्यांनी पाया पडा आणि शिमगो खेळाक येवा.

आपणा सर्वांना शिमग्याच्या मनःपुर्वक शुभेच्छा

हत्ती




एका राजाजवळ एक हत्ती होता. तो त्याला अत्यंत प्रिय होता. तो हत्ती स्वामीभक्त असण्याबरोबरच चांगला योद्धा होता. जेंव्हा केंव्हा राजाने त्याच्यावर बसून युद्ध केले तेंव्हा राजा त्यात विजयी झाला.

काही काळ लोटल्यानंतर हत्ती वृद्ध होत चालला त्यामुळे राजाने त्याला युद्धात घेवून जाणे बंद केले. मात्र राजाचे त्या हत्तीवरचे प्रेम काही कमी झाले नाही. एकेदिवशी तो हत्ती सरोवरामध्ये पाणी पीत होता. सरोवरामध्ये पाणी कमी होते त्यामुळे हत्ती पुढेपुढे गेला आणि दलदलीत फसला.

 वृद्धावस्थेमुळे हत्तीला दलदलीतून निघणे शक्य नव्हते, त्यामुळे तो जोरजोरात ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून माहूत त्याच्याकडे धावत आले, परंतु सरोवरातून त्याला बाहेर काढणे कुणालाही जमेना. तेंव्हा त्यांनी त्याच्या शरीराला भाले टोचायला सुरुवात केली.

कारण भाल्याच्या टोचण्याने तो सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेल आणि बाहेर येईल, पण हत्ती बाहेर येऊ शकला नाही.भाल्याच्या टोचण्याने हत्तीच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. राजापर्यंत हि वार्ता गेली. त्याने तत्काळ त्या हत्तीच्या जुन्या आणि अनुभवी माहुताला बोलावणे पाठविले. माहूत आला, राजा शेजारीच उभा होता.

 त्याने राजाला असा सल्ला दिला,"महाराज! तत्काळ युद्धाचे नगारे वाजवा, सैन्य या सरोवराभोवती गोळा करा, आक्रमणाच्या घोषणा सैनिकांना द्यायला सांगा." राजाने त्याचे म्हणणे ऐकले आणि युद्धाचे नगारे वाजविण्याचा हुकुम दिला. मग काय म्हणता, नगारे वाजू लागले,

सैनिकांच्या रांगा शिस्तबद्धपणे लागल्या, आक्रमणाच्या घोषणा ऐकू येवू लागल्या. त्याबरोबर हत्तीच्या अंगात वीरश्री संचारली आणि तो त्या दलदलीतून बाहेर पडला.

 त्याचे मनोबल हे युद्धासाठी तयार झाले होते. राजाने जुन्या माहुताचे आभार मानले आणि बक्षीस दिले.

ध्यानात ठेवा

निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते.

 जर नशीब काही 'चांगले' देणार असेल तर त्याची सुरुवात 'कठीण' गोष्टीने होते ..

आणि नशीब जर काही 'अप्रतिम' देणार असेल तर त्याची सुरुवात 'अशक्य' गोष्टीने होते....!

दुखावणारी माणसं !!

दुखावणारी माणसं !!
काल एका कार्यक्रमाला गेले होते.कार्यक्रम संपल्यावर बाहेर पडताना थोडा अंधार होता.प्रत्येकजण आपापलं जेवण आटपून बाहेर पडत होता. तेवढ्यात एका xyz व्यक्तीला एका प्रथितयश डॉक्टरांनी हाक मारून म्हटलं " अरे बाहेर अंधार आहे रे ,सांभाळून ! बाहेरच्या काळोखासारखा असलेला तुझा चेहरा कुणाला दिसला नाही तर आपटेल कुणीतरी तुझ्यावर ! " त्या व्यक्तीचा चेहरा एकदम पडला. चारचौघात त्याच्या रंगावरून बोलल्यामुळे मनातून खूप दुखावला गेला असावा ! काय मिळतं अशा कॉमेंट्स  करून लोकांना काय माहित!! एखाद्याच्या व्यंगावर हसणारे लोक पहिले कि कीव येते अगदी त्यांची ! बरं,हि माणसे स्वतः अगदी सर्वगुणसंपन्न असतात असंही नाही. पण ते ज्या पद्धतीने दुसऱ्याच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवतात ना ते पाहिलं कि चिडचिड होते अगदी !!
हि अश्या प्रकारची माणसं समोरच्याच्या मनाचा कधीही विचार करत नाहीत आणि बोलून झालं कि आपण काहीतरी फारच भारी काम केल्यासारखं स्वतःवर खुश होऊन हसत असतात आणि ज्याला ऐकावं लागतं तो मात्र बिचारा खजील होतोच आणि स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसतो.
लहान मुलांना पटकन त्यांच्यातला दोष दाखवण्यात  ह्या प्रकारची माणसं अगदी पटाईत असतात. एकदा मी आणि माझी लेक एका ठिकाणी गेलो होतो.एक ओळखीच्या बाई आपल्या नातीला घेऊन आलेल्या तिथे.... कुठे असतेस ,काय करतेस अशा जुजबी चौकश्या झाल्यावर माझ्या लेकीकडे बघून म्हणाल्या " अगंबाई, दातांची वेडीवाकडी ठेवण अगदी आईची घेतलेली दिसत्ये ! " त्या बाई सावळ्या होत्या तशीच त्यांची नातही सावळी  दिसत होती. म्हणून मी लगेच म्हटलं " होय ,खरंय तुमचं ,काही मुलं आईची वाकड्या दातांची ठेवण घेतात आणि काही मुलं थेट आजीचाच रंग घेतात हो ! " माझ्या बोलण्याचा रोख कळला त्या बाईंना ! राग येऊन निघून गेल्या तिथून!! बहुतेक परत कुणाला बोलणार नाहीत!!

ह्या वृत्तीची माणसं फक्त दुसऱ्याच्या व्यंगावरच बोट ठेवतात असं नाही तर त्याची एखादी दुखरी नस माहित असेल तर अगदी आठवणीने तो विषय काढून बोलणारच. माहित असतं बार का ह्या लोकांना कि समोरच्या माणसाचा मुलगा काहीही न करता घरी बसलेला आहे तरी विचारणार " असतो कुठे हल्ली ? दिसला नाही बरेच दिवसात ! म्हटलं मोट्ठी नोकरी लागलेली दिसत्ये ! " हे ऐकून आधीच काळजीत असलेली ती माउली अजूनच दुःखी होते.
लग्न लवकर न ठरलेल्या,मूल लवकर न होणाऱ्या , परीक्षेत,व्यवसायात सतत अपयश येणाऱ्यांना तर ह्या विशिष्ट प्रकारची माणसं अगदी नको करून सोडतात ! रस्त्यात ,समारंभात अगदी भाजी घेताना भेटलो आणि वेळ मिळाला तर तिथेसुद्धा तुम्हाला दुखावल्याशिवाय  हि माणसं सोडत नाहीत !!
आणि सगळ्यात जास्त वेळा टोमण्यांचा, चेष्टेचा सामना करावा लागतो तो माझ्यासारख्या जाडजूड माणसांना !! फिट असावं आणि दिसावं असं कुणाला वाटत नाही? कुणालाही आपण बेगडी ,कुरूप दिसावं असं वाटत नसतंच मुळी ! प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो. पण शेवटी सगळंच काही आपल्या हातात नसतं ना! माझ्यासारख्या जाड व्यक्तींना ऐकवले जाणारे कॉमन डायलॉग कोणते माहित्ये ? " हळू हळू,खुर्ची मोडेल " , " बापरे ,भूकंप झाला कि काय " " समोर बघून चाल , तुला काही नाही होणार ती गाडी मोडेल ", " घसरू नको,रस्त्यात खड्डा पडेल मोठा ",
" जरा कमी जेव " किंवा " खा एखादी पुरी, काही नाही होणार १०० ग्रॅम  वाढून सागराला काय फरक पडेल ?" इ.इ.
कुणी अति बारीक असेल तर " फु केलं तरी उडशील " " नुसती काठी असून काय उपयोग ! ताकद नको ?"इ इ
हे सगळं जे बोलत असतात त्यांच्या आरोग्याची खरं तर बोंब असते. फिगर छान असते पण गुढघे दुखत असतात, मणके दुखत असतात, जराशा कामाने दमायला होत असतं पण हे सगळं दिसत नसतं.दुसऱ्याला मूल होत नाही म्हणून त्यांना बोलणार्यांची मुले जे दिवे लावत असतात त्याचा प्रकाश त्यांना नंतर दिसणार असतो.परीक्षेत अपयश मिळणाऱ्या मुलांना बोलणाऱ्यांची स्वतः कधी शाळेत सुद्धा विशेष प्राविण्य मिळवलेलं नसतं.पण... बोलायचं ... टोचायचं काम हि माणसं मनापासून करत असतात आणि त्यात त्यांना आनंद मिळत असतो हे विशेष !!
माझी चिपळूणची आजी ( आईची आई ) नेहमी दासबोधातले दाखले द्यायची. तिचं वाचन आणि अभ्यास प्रचंड होता. ह्या विषयावरच आमच्या एकदा गप्पा चालू होत्या तेव्हा ती म्हणाली " समर्थानी सांगितलेलं आहे तसं वागावं म्हणजे काय तर 'नाठाळाचे माथी हाणू काठी 'स्वतःहून कुणाला व्यंग दाखवून दुखावू नये पण आपलं व्यंग काढून आपल्याला कुणी दुखावलं तर त्याचं व्यंग दाखवल्याशिवाय त्याला सोडू नये. ज्याचं त्याचं माप त्याच्या पदरात घालायचं. आपलं व्यंग दाखवलं म्हणून दुःखी व्हायचं नाही उलट समोरच्याची कीव करून त्याला देव सद्बुद्धी देवो म्हणायचं .!

---यशश्री भिडे

डिफॉल्ट मोड


डिफॉल्ट मोड

डॉ. यश वेलणकर

तुम्ही तुमच्या बोक्याला, कुत्र्याला किंवा बैलाला मधुमेह, हायपरटेन्शन किंवा थायरॉइडचा त्रास होतो आहे असे पाहिले आहे का..??🤔🤔

तशी शक्यता खूप कमी आहे. माणसात मात्र हे आजार खूप वेगाने वाढत आहेत. त्याचे एक कारण आहे. आपल्या मेंदूतील एक ठरावीक भाग सतत काम करीत असतो. माणूस शांत बसलेला असतानादेखील हा भाग शांत होत नाही. हे सतत मनात येणारे विचार आपल्याला युद्धस्थितीत ठेवीत असतात. त्यामुळेच मानसिक तणाव वाढतो आणि आपल्याला वरील सर्व आजार होतात...!!

आपण शांत बसलेले असताना देखील मेंदूतील जो भाग काम करीत असतो त्याला शास्त्रज्ञांनी ‘डिफॉल्ट मोड नेटवर्कअसे नाव दिले आहे..!!

कॉम्प्युटर सुरू केला की याच मोडमध्ये तो सुरू होतो. माणसाचा मेंदू हा सुपर कॉम्प्युटर आहे. त्यामध्येही ठराविक भाग असा असतो जो आपण गाढ झोपेतून जागे झाल्याक्षणी काम सुरू करतो..!!

डिफॉल्ट मोड नेटवर्क हा शब्द २००१ साली प्रथम वॉशिंग्टन विद्यापीठातील डॉ. मार्कस राय्चल यांनी वापरला. माणूस कोणतीही कृती करीत नसताना, विचारात मग्न असताना मेंदूतील हा भाग सक्रिय असतो; पण तो एखादी कृती लक्षपूर्वक करू लागला की, या भागातील सक्रियता कमी होते असे त्यांनीच दाखवून दिले..!!

आपण कोणतेही शारीरिक काम करीत नसतो किंवा एखादे काम यांत्रिकतेने करीत असतो त्यावेळी मेंदू विचारांच्या आवर्तात बुडालेला असतो. एका विचारातून दुसरा विचार अशी ही साखळी चालू राहते, शरीर स्थिर असले तरी मन इतस्तत: भटकत असते..!!

आपला मेंदू भूतकाळातील आठवणीत किंवा दिवास्वप्ने पाहण्यात गुंतलेला असतो. त्यासाठीच मेंदूत ऊर्जा वापरली जात असते. विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे महत्त्वाचे काम आहे; पण ते काम सतत होत राहिले तर मेंदू थकतो, कंटाळतो, नैराश्याचा शिकार होतो..!!

मेंदूतील या भागाला विश्रांती कधी मिळते, माहीत आहे..??🤔🤔

माणूस एखादी शरीर कृती लक्ष देऊन करू लागतो किंवा तो शरीराने काम करीत नसला तरी माइंडफुल असतो, सजग असतो त्यावेळी मात्र हा भाग शांत होतो आणि टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क (टीपीएन)सक्रिय होते. श्रमजीवी माणसात ज्यावेळी त्यांचे त्यांच्या कामावर पूर्ण लक्ष असते. त्यावेळी डिफॉल्ट मोड नेटवर्कला थोडी विश्रांती मिळते..!!

कुंभार त्याचे मडके तयार करीत असतो, त्यावेळी त्याच्या मेंदूतील हा मोड बदलला जात असतो. कारण मडके करण्याच्या कृतीवर त्याला एकाग्र व्हावे लागते..!!

बुद्धिजीवी माणसात मात्र असे होत नाही, शिकवताना, हिशेब करीत असताना किंवा कॉम्प्युटरवर काम करीत असताना मेंदूत विचार असतातच. किंवा तुम्ही मिक्सरमध्ये चटणी वाटत असता त्यावेळी मेंदूतील विचार चालूच राहतात आणि डिफॉल्ट मोड काम करीतच राहतो. मग त्याला विश्रांती कशी मिळेल..??

सजगतेने आपण ज्यावेळी श्वासामुळे होणारी छाती किंवा पोटाची हालचाल जाणतो किंवा त्याक्षणी येणाऱ्या बाह्य आवाजावर लक्ष केंद्रित करतो, त्यावेळी डिफॉल्ट मोड शांत होतो. माणूस श्वासाचा स्पर्श जाणू लागतो त्यावेळी त्याच्या मेंदूतील टास्क पॉझिटिव्ह नेटवर्क काम करू लागते...!!

आपल्या मेंदूच्या लँटरल प्री फ्रन्टल कॉरटेक्समध्ये लक्ष केंद्रित करणारे केंद्र असते, ते यामुळे सक्रिय होते. श्वासामुळे होणारी छातीची किंवा पोटाची हालचाल तुम्ही जाणत असता त्यावेळी मेंदूतील इन्सूला नावाचा भाग सक्रिय होतो आणि डिफॉल्ट मोड शांत होतो. मन काही क्षण वर्तमानात राहते त्यावेळी मेंदूतील विचार करणाऱ्या भागाला विश्रांती मिळते...!!

विचार करणे हेच माणसाच्या मेंदूचे वैशिष्ट्ये आहे; पण सतत येणारे विचार मेंदूला थकवतात, तो थकवा दूर करण्यासाठी काही काळ हा "डिफॉल्ट मोड" बदलणे आवश्यक आहे..!!

त्यासाठीचा एक साधा उपाय करून पहा..!!

शांत बसा, एक हात छातीवर, दुसरा पोटावर ठेवा. तुम्ही काहीही करीत नसलात तरी तुमचे शरीर श्वासोच्छ्वास करते आहे. त्यामुळे छाती किंवा पोट हलते आहे. तुमचे सर्व लक्ष तुमच्या हातांवर ठेवा आणि नैसर्गिक श्वासामुळे छाती अधिक हलते आहे की पोट हे जाणा..!!

ज्यावेळी ही हालचाल समजते त्यावेळी तुमच्या मेंदूतील डिफॉल्ट मोड शांत झालेला असतो, त्याला विश्रांती मिळत असते. जो श्वास तुम्हाला समजतो तो चांगला श्वास, गुड ब्रेथ..!!

असा
अर्धा मिनिट, एक मिनिट, पाच - दहा श्वास, त्यावर लक्ष केंद्रित केलेत की मेंदूतील डिफॉल्ट मोडला विश्रांती मिळून तुम्ही ताजेतवाने व्हाल. किती साधा आणि सोपा उपाय आहे.!!

फक्त त्याची आठवण होणे थोडेसे अवघड आहे. दर दोन तासांनी काही सजग श्वास घ्यायचे असा संकल्प करून त्यासाठी प्रयत्न करून पहा आणि कळवा मला...!
 गुड ब्रेथ मेंदूला ताजेतवाने करतो. दिवसभरात किमान तीन-चार वेळा श्वासाची हालचाल जाणायची असे ठरवता येईल??

पिकलेलं प्रेम


पिकलेलं प्रेम

कधीही सगळ्यांसमोर आजीचा हात हातात न घेतलेले आजोबा ,

 आजीच्या हातदुखीचं आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे ४ वाजल्या पासून वाटतात,

आणि आजी उठल्या-उठल्या  "यांना" चहा लागतो असं म्हणत दुखरया हातानेच चहा टाकते...

आबांनी जेवणात लोणचं मागितलं की डॉक्टर आजी B.P च्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबांच्या आवडीचं गोडलिंबाचंच लोणचं घालते...

एरव्ही दोनच पोळ्या खाणारे आबा "भाजी चांगली झाली आहे"
हे न सांगता
"आणि एक पोळी वाढ गं"
म्हणून पसंतीची पोचपावती देतात, अन फुगलेली पोळी वाढताना आजी  हळूच लाजते...

बाहेरून येताना पालकाच्या जुडीखाली एक मोगऱ्याची माळ लपलेली असते,
अन " केस कुठे उरलेत आता"
असं म्हणत त्या विरळ झालेल्या अंबाड्याचं वजन, आजी पांढरी माळ 'गुलाबी' होत मळून, वाढवत असते...

आजीने पहिल्यांदा दिलेल्या क्यासेट मधली गाणी आजोबा आजही चोरून ऐकतात,
अन आजोबांनी आजीला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालूतुन डोकावताना दिसतं...

आजही आजोबांचे मित्र आले की  आजी आत जाते आणि न सांगता भजीची बशी सगळ्यांसमोर येते...

भाजी आणायला जेंव्हा आजी-आजोबा बागेजवळच्या मंडईत जातात,
 येताना कधी कधी मातीचे छापे धोतरावर  घेऊन येतात...

भांडण झालं दोघांच्यात की घरी  दुधीची भाजी बनते,
पण आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरांब्याची बरणी आणायला पळवते...

कधीतरी आजोबा मुद्दामून मला मधुबालाच्या सौंदर्याच्या कथा सांगतात अन तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात, मग आजीपण खट्याळ हसते आणि कपाटातून राजेश खन्नाच्या फोटो वरची धूळ पुसते...

दिवाळीला ओवाळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकंच कौतुक असतं आणि त्या डोळ्यांकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत  आबा पण ताठ बसतात...

आजी आजारी पडली की मात्र आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबांकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजते...

आजारपण मात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही,
मग ती झोपली की आजोबा हळूच तिचे पाय चेपतात अन आजीच्या बंद डोळ्यातून अश्रू घरंगळत उशीला भेटतात...

पिकलेल्या लोणच्याला आता बरणीपासून दुरावा सहन होत नाही
अन बरणीला पण लोणच्याशिवाय आता करमत नाही...

नाती अशीही...


नाती अशीही...

गुंजन सोसायटीत पाचव्या मजल्यावर नवे कुटूंब आल्याची बातमी ज्येष्ठ नागरिक संघात पसरली आणि "हो का!" "कोणे कोणास ठाऊक" वगैरे संवाद रंगायला लागले..आधीच्या भाडेकरूंचे यथेच्छ गुणगान(?) करून झाले..पण नविन कोण आलय याचा मात्र उलगडा झाला नव्हता. दोन चार दिवसात एक मध्यम वयाची बाई-कम्-मुलगी, तीची दोन मुले, दोन म्हाता-या आणि दोन म्हातारे..असा कुटूंबविस्तार आहे असे कळले..पण नक्की नाव गाव कशाचा मागमूस न लागल्याने त्या उत्सुक संघात 'पराभवाचे बादल' घिरट्या घालू लागले..इतर वेळी सगळ्या बातम्या आधी फुटतात तिथे काहीच माहिती नव्हती.
पुढे तीन चार दिवसांनी ती मुलगी आणि तिची पिल्ले ही दिसेनाशी झाली.
ते दोन म्हातारे आजोबा एकमेकांची चेष्टा मस्करी करत जाता येता सोसायटीने पाहिले होते. त्या टापटीप आज्ज्या पण दुडकत दुडकत जाताना दिसल्या होत्याच..
"बहिणी वाटत नाहीत, नाई का हो देवस्थळी ?" पालव बाई म्हणाल्या.
"जावा जावा असतील..." चौधरींचा अंदाज.
"छे! ते दोघं बाप्ये भाऊ नाही हो वाटत" वगैरे निरीक्षण समोर आली.
शेवटी आपल्या बद्दलचे कुतूहल वाढतय हे त्या चौकडीच्या एव्हाना लक्षात आलं होतंच..
संध्याकाळी त्या दोन 'टापटीप बाया ' हळूहळू चालत सिनीयर लोकांच्या बाकाजवळ आल्या..

" नमस्ते, मी हेमा पटवर्धन! "
"आणि मी रंजना देशमुख!" दोघींनी एकदम आपापली ओळख करून दिली..म्हणजे जावा नाहीत..मग बहिणी असतील? पण साम्यही नाही अशी तर्कसंगती सभासदांची मनात मांडायला सुरवात झाली..ते ओळखून दोघी मनापासून हसल्या..." तुम्ही विचार करताय की आम्ही एकमेकींच्या कोण? हो ना? आम्ही विहीणी आहोत.."
सगळे एकदम गार..तमाम तर्क ,अंदाज यांना गुंगारा देऊन भलतच उत्तर आले..
"आम्ही बसू का इथे तुमच्याबरोबर? " हेमा ताई म्हणाल्यावर ओशाळून "अरे हो की.." "या ना बसा ना.." असे स्वागत झाले.
रंजना ताईंनी आता सूत्र आपल्या हातात घेतली.. " माझ्या एकुलत्या एक मुलीने यांच्या एकुलत्या एक मुलाशी लग्न केल बारा वर्षांपूर्वी.. दोघेही भरपूर शिकलेली...जसे पंखात बळ आले तशी परगावी भुर्र्कन उडून गेली. पहिली काही वर्षे छान कौतुकात गेली...पण आमच्या नोक-या संपल्यावर विचित्रच एकाकीपण आले.." आलेला हुंदका गिळायचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला..त्यांना थोपटत..
हेमा ताई म्हणाल्या " मुले गुणी आहेत हो..बोलवत असतात पण इथले सोडून जावे हे ही नाही जमत..
एकदा यांच्याकडे आम्हाला जेवायला बोलावले होते..निघताना माझा पायच मुरगळला..हलताच येईना..त्यांच्या आग्रहाखातर आम्ही तिथेच रात्री रहायचे ठरवलं.. "
त्या दोघींना जसे घडले तसे आठवू लागले..आज आजारी का होईना कोणीतरी रहाणार आहे याचा पटवर्धन दांपत्याला फारच आनंद झाला..दुसरी बेडरूम उघडली, नव्या चादरी-उशा काढल्या.. आपल्या बेडरूममधे सुद्धा नविनच बेडशीट घातली..'कोणीतरी आहे'चा आनंद होता..घरात जाग होती.

"एकाचे तीन दिवस राहिलो तिथे.." निघताना दोघी रडलो..त्या रडण्यामुळे आमचा इथवर प्रवास झाला. "आम्ही इथलेच गावात वाड्यात रहातो..म्हणजे आमचाच आहे वाडा... आणि यांचा फ्लॅट आहे पण तिस-या मजल्यावर... वाड्याची जागा तशी जुनीच...त्यातून वाढलेली वर्दळ..."
"आणि आमच्या घराचे जीने..ह्या दोन अडचणीमुळे आम्ही एका घरात राहू शकत नव्हतो म्हणून गावाबाहेर ऐसपैस जागा घेऊन एकत्रच रहावे असे आमच्या मनात आले"

"एकत्र राहिलो तर चार घास जास्त जातात, वेगवेगळे पदार्थ केले जातात, रात्री बेचैनीत जात नाहीत, असे लक्षात आले आणि आम्ही चौघांनी एकत्र च राहू असा विचार केला. नक्की कोणाच्या मनात आधी आले माहिती नाही..पण चौघांच्या मनात होतच.
आता वयाच्या या टप्प्यावर कोणते मतभेद आणि कोणती मानापमानाची नाटके? शिवाय आम्ही एकत्र असलो तर मुले ही निर्धास्त असा व्यावहारिक विचार करून मुलांना विश्वासात घेऊन ह्या निर्णयावर आलो..मुले तर खुशच झाली..सोबत मिळाली..
आता या ऐसपैस घरात आम्ही चौघे राहू, एकमेकांना सांभाळून."

हे ऐकून सगळ्या आज्यांच्या डोळ्यात पाणी आले..
"याला म्हणतात खरा सोयरा..जो सोय जाणतो तो.." शेवडे आजी बोलून गेल्या.. आणि टाळ्यांच्या गजरात दोन नव्या मैत्रिणींचे ग्रुप मध्ये स्वागत झाले!!💞


- सौ. अनघा किल्लेदार.

गुरुवार, २८ मार्च, २०१९

"सोबत"...



"सोबत"...

आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे.

ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं....!

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?
ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो.
त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
 "स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
 "आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते.

एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....

आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

'मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,' असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं.

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
"सोबत"...!

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं.

गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते.

असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते...

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.
आणि सोबत छंदांची जोड....

आयुष्य नक्कीच परिपूर्ण होईल...!

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा