Pages

शुक्रवार, २९ मार्च, २०१९

पिकलेलं प्रेम


पिकलेलं प्रेम

कधीही सगळ्यांसमोर आजीचा हात हातात न घेतलेले आजोबा ,

 आजीच्या हातदुखीचं आयुर्वेदिक औषध मात्र पहाटे ४ वाजल्या पासून वाटतात,

आणि आजी उठल्या-उठल्या  "यांना" चहा लागतो असं म्हणत दुखरया हातानेच चहा टाकते...

आबांनी जेवणात लोणचं मागितलं की डॉक्टर आजी B.P च्या गोष्टी सांगते आणि उन्हाळ्यात मात्र आजोबांच्या आवडीचं गोडलिंबाचंच लोणचं घालते...

एरव्ही दोनच पोळ्या खाणारे आबा "भाजी चांगली झाली आहे"
हे न सांगता
"आणि एक पोळी वाढ गं"
म्हणून पसंतीची पोचपावती देतात, अन फुगलेली पोळी वाढताना आजी  हळूच लाजते...

बाहेरून येताना पालकाच्या जुडीखाली एक मोगऱ्याची माळ लपलेली असते,
अन " केस कुठे उरलेत आता"
असं म्हणत त्या विरळ झालेल्या अंबाड्याचं वजन, आजी पांढरी माळ 'गुलाबी' होत मळून, वाढवत असते...

आजीने पहिल्यांदा दिलेल्या क्यासेट मधली गाणी आजोबा आजही चोरून ऐकतात,
अन आजोबांनी आजीला लिहिलेलं पत्र कधीतरी तिच्या शालूतुन डोकावताना दिसतं...

आजही आजोबांचे मित्र आले की  आजी आत जाते आणि न सांगता भजीची बशी सगळ्यांसमोर येते...

भाजी आणायला जेंव्हा आजी-आजोबा बागेजवळच्या मंडईत जातात,
 येताना कधी कधी मातीचे छापे धोतरावर  घेऊन येतात...

भांडण झालं दोघांच्यात की घरी  दुधीची भाजी बनते,
पण आजोबांचा पडलेला चेहरा पाहून आजी मला मुरांब्याची बरणी आणायला पळवते...

कधीतरी आजोबा मुद्दामून मला मधुबालाच्या सौंदर्याच्या कथा सांगतात अन तिरप्या नजरेने आपल्या अनारकलीकडे पाहतात, मग आजीपण खट्याळ हसते आणि कपाटातून राजेश खन्नाच्या फोटो वरची धूळ पुसते...

दिवाळीला ओवाळताना आजीच्या नजरेत अजूनही तितकंच कौतुक असतं आणि त्या डोळ्यांकडे पाहत आपला वाकलेला कणा सावरत  आबा पण ताठ बसतात...

आजी आजारी पडली की मात्र आजोबांची चिडचिड वाढते आणि आजोबांकडून औषध घेताना आजी आजारपणातही लाजते...

आजारपण मात्र सोडत नाही आणि आजीचा त्रास आजोबांना बघवत नाही,
मग ती झोपली की आजोबा हळूच तिचे पाय चेपतात अन आजीच्या बंद डोळ्यातून अश्रू घरंगळत उशीला भेटतात...

पिकलेल्या लोणच्याला आता बरणीपासून दुरावा सहन होत नाही
अन बरणीला पण लोणच्याशिवाय आता करमत नाही...

नाती अशीही...


नाती अशीही...

गुंजन सोसायटीत पाचव्या मजल्यावर नवे कुटूंब आल्याची बातमी ज्येष्ठ नागरिक संघात पसरली आणि "हो का!" "कोणे कोणास ठाऊक" वगैरे संवाद रंगायला लागले..आधीच्या भाडेकरूंचे यथेच्छ गुणगान(?) करून झाले..पण नविन कोण आलय याचा मात्र उलगडा झाला नव्हता. दोन चार दिवसात एक मध्यम वयाची बाई-कम्-मुलगी, तीची दोन मुले, दोन म्हाता-या आणि दोन म्हातारे..असा कुटूंबविस्तार आहे असे कळले..पण नक्की नाव गाव कशाचा मागमूस न लागल्याने त्या उत्सुक संघात 'पराभवाचे बादल' घिरट्या घालू लागले..इतर वेळी सगळ्या बातम्या आधी फुटतात तिथे काहीच माहिती नव्हती.
पुढे तीन चार दिवसांनी ती मुलगी आणि तिची पिल्ले ही दिसेनाशी झाली.
ते दोन म्हातारे आजोबा एकमेकांची चेष्टा मस्करी करत जाता येता सोसायटीने पाहिले होते. त्या टापटीप आज्ज्या पण दुडकत दुडकत जाताना दिसल्या होत्याच..
"बहिणी वाटत नाहीत, नाई का हो देवस्थळी ?" पालव बाई म्हणाल्या.
"जावा जावा असतील..." चौधरींचा अंदाज.
"छे! ते दोघं बाप्ये भाऊ नाही हो वाटत" वगैरे निरीक्षण समोर आली.
शेवटी आपल्या बद्दलचे कुतूहल वाढतय हे त्या चौकडीच्या एव्हाना लक्षात आलं होतंच..
संध्याकाळी त्या दोन 'टापटीप बाया ' हळूहळू चालत सिनीयर लोकांच्या बाकाजवळ आल्या..

" नमस्ते, मी हेमा पटवर्धन! "
"आणि मी रंजना देशमुख!" दोघींनी एकदम आपापली ओळख करून दिली..म्हणजे जावा नाहीत..मग बहिणी असतील? पण साम्यही नाही अशी तर्कसंगती सभासदांची मनात मांडायला सुरवात झाली..ते ओळखून दोघी मनापासून हसल्या..." तुम्ही विचार करताय की आम्ही एकमेकींच्या कोण? हो ना? आम्ही विहीणी आहोत.."
सगळे एकदम गार..तमाम तर्क ,अंदाज यांना गुंगारा देऊन भलतच उत्तर आले..
"आम्ही बसू का इथे तुमच्याबरोबर? " हेमा ताई म्हणाल्यावर ओशाळून "अरे हो की.." "या ना बसा ना.." असे स्वागत झाले.
रंजना ताईंनी आता सूत्र आपल्या हातात घेतली.. " माझ्या एकुलत्या एक मुलीने यांच्या एकुलत्या एक मुलाशी लग्न केल बारा वर्षांपूर्वी.. दोघेही भरपूर शिकलेली...जसे पंखात बळ आले तशी परगावी भुर्र्कन उडून गेली. पहिली काही वर्षे छान कौतुकात गेली...पण आमच्या नोक-या संपल्यावर विचित्रच एकाकीपण आले.." आलेला हुंदका गिळायचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला पण तो अपयशी ठरला..त्यांना थोपटत..
हेमा ताई म्हणाल्या " मुले गुणी आहेत हो..बोलवत असतात पण इथले सोडून जावे हे ही नाही जमत..
एकदा यांच्याकडे आम्हाला जेवायला बोलावले होते..निघताना माझा पायच मुरगळला..हलताच येईना..त्यांच्या आग्रहाखातर आम्ही तिथेच रात्री रहायचे ठरवलं.. "
त्या दोघींना जसे घडले तसे आठवू लागले..आज आजारी का होईना कोणीतरी रहाणार आहे याचा पटवर्धन दांपत्याला फारच आनंद झाला..दुसरी बेडरूम उघडली, नव्या चादरी-उशा काढल्या.. आपल्या बेडरूममधे सुद्धा नविनच बेडशीट घातली..'कोणीतरी आहे'चा आनंद होता..घरात जाग होती.

"एकाचे तीन दिवस राहिलो तिथे.." निघताना दोघी रडलो..त्या रडण्यामुळे आमचा इथवर प्रवास झाला. "आम्ही इथलेच गावात वाड्यात रहातो..म्हणजे आमचाच आहे वाडा... आणि यांचा फ्लॅट आहे पण तिस-या मजल्यावर... वाड्याची जागा तशी जुनीच...त्यातून वाढलेली वर्दळ..."
"आणि आमच्या घराचे जीने..ह्या दोन अडचणीमुळे आम्ही एका घरात राहू शकत नव्हतो म्हणून गावाबाहेर ऐसपैस जागा घेऊन एकत्रच रहावे असे आमच्या मनात आले"

"एकत्र राहिलो तर चार घास जास्त जातात, वेगवेगळे पदार्थ केले जातात, रात्री बेचैनीत जात नाहीत, असे लक्षात आले आणि आम्ही चौघांनी एकत्र च राहू असा विचार केला. नक्की कोणाच्या मनात आधी आले माहिती नाही..पण चौघांच्या मनात होतच.
आता वयाच्या या टप्प्यावर कोणते मतभेद आणि कोणती मानापमानाची नाटके? शिवाय आम्ही एकत्र असलो तर मुले ही निर्धास्त असा व्यावहारिक विचार करून मुलांना विश्वासात घेऊन ह्या निर्णयावर आलो..मुले तर खुशच झाली..सोबत मिळाली..
आता या ऐसपैस घरात आम्ही चौघे राहू, एकमेकांना सांभाळून."

हे ऐकून सगळ्या आज्यांच्या डोळ्यात पाणी आले..
"याला म्हणतात खरा सोयरा..जो सोय जाणतो तो.." शेवडे आजी बोलून गेल्या.. आणि टाळ्यांच्या गजरात दोन नव्या मैत्रिणींचे ग्रुप मध्ये स्वागत झाले!!💞


- सौ. अनघा किल्लेदार.

गुरुवार, २८ मार्च, २०१९

"सोबत"...



"सोबत"...

आजकाल कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे.

ज्याची पाठ फिरेल त्याची निंदा करणारे. ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं....!

इतकं खोटं कसं काय ते वागू शकतात ?
ह्यात "आपले लोक" पण असतात हे विशेष!

ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'
ह्यांच्यापेक्षा पुस्तकांमध्ये आणि छंदांमध्ये रमावं, मन प्रसन्न रहातं आणि नकारात्मक गोष्टींपासून तुम्ही स्वाभाविकपणे दूर जाता...

कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो.
त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.

प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
 "स्वतःला काय हवं आहे?"

हा प्रश्न कधी मागे राहतो हे कळतच नाही. आणि इतकं सगळं करूनही आपल्याला प्रेमाचे दोन शब्द, नात्यात हवा असलेला आदर, विश्वास, आपुलकी मिळते असंही नाही.

मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
 "आपण एकटेपणाला घाबरतो."

सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते.

एकटे पडू ह्या भीतीमुळे अनेकदा आपण चुकीच्या गोष्टींना सपोर्ट करतो.

मनात नसूनही अनेक गोष्टी स्वीकारत जातो. मोठे होतो पण "सोबत", "मैत्री" ह्या गोष्टींचे आणि नात्यांचे खरे अर्थ विसरतो.

लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो....

आपणही तसेच खोटे वागत जातो, पण एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.

मोजकीच पण चांगली माणसं हवीत असं वाटू लागतं. ह्या मुखवट्या मागचे चेहरे भेसूर वाटू लागतात आणि आपण पुन्हा स्वतःकडे वळतो.

जाणीवेचा एकच क्षण असतो आणि तो आपल्या हातून कधीच निसटू द्यायचा नसतो.

'मी उत्तम तेच करीन आणि चांगल्या लोकांच्या सोबतीतच राहीन,' असा मनाशी निश्चय केला की आपली निवड बदलत जाते आणि पर्यायाने आयुष्यही बदलतं.

मोजकीच, पण प्रेमळ, आपल्याशी प्रामाणिक भावनेने जोडलेली, वेळ प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-
"सोबत"...!

माणसांच्या गर्दीत चालताना आपला दीपस्तंभ कुणाला मानायचं हे आपणच ठरवायचं असतं.

गोतावळ्यात राहूनही आपण एकटेच असतो त्यापेक्षा थोडसं ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते.

असा एक ब्रेक घेतला की आयुष्यातील सोबतीचं वर्तुळ नव्याने आखण्याची गरज आहे हे लक्षात येते...

थोडेच पण मनापासून आपले असलेले सोबती असावेत.
आणि सोबत छंदांची जोड....

आयुष्य नक्कीच परिपूर्ण होईल...!

पॉवर ऑफ चॉइस



पॉवर ऑफ चॉइस
सुप्रसिद्ध साहित्यिक चेतन भगत यानी  सांगितलेला हा किस्सा आहे.
-----------------------
मी एअरपोर्टच्या बाहेर टॅक्सीसाठी रांगेत उभा होतो. तेवढ्यात माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन उभी राहीली. पहिली गोष्ट माझ्या लक्षात आली की ती टॅक्सी बाहेरून नुसतीच स्वच्छ नव्हती तर चकचकीत पॉलीश केलेली होती. टॅक्सीचा ड्रायव्हर खाली उतरून व टॅक्सीला वळसा घालुन माझ्याकडे येत होता. त्यावेळी माझ्या लक्षात आले की त्याचा ड्रेस एकदम स्मार्ट आहे. त्याने स्वच्छ धुतलेला व इस्री केलेला पांढरा शर्ट घातला होता. तशीच इस्त्री केलेली काळी पँट होती. टाय लावलेला होता व पायात चकचकीत पॉलीश केलेले बुट होते. त्याने आदराने माझ्यासाठी टॅक्सीचे मागील दार उघडले व माझ्या हातात एक लॅमीनेट केलेले कार्ड देत म्हणाला, ‘ सर! माझे नाव वासु! मी तुमचा टॅक्सी ड्रायव्हर. मी तुमचे सामान मागे डिकीमध्ये ठेवेपर्यंत आपण हे माझे मिशन स्टेटमेन्ट कृपया वाचावे.’
मिशन स्टेटमेन्ट?’ मला गंमत वाटली व मी त्या कार्डावर नजर टाकली. त्यावर सुरेख व ठळक अक्षरात छापले होते. ‘ वासुचे मिशन स्टेटमेन्ट! माझ्या टॅक्सीमधील प्रवाशांना कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात, सुरक्षितपणे त्यांच्या इच्छीत स्थळी पोचवणे व ते सुद्धा मैत्रीपूर्ण वातावरणात!’

मला गंमत वाटली. मी टॅक्सीत बसलो व मला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण टॅक्सी आतुनसुद्धा बाहेरच्यासारखी चकचकीत स्वच्छ होती.

वासुने त्याच्या ड्रायव्हरच्या सिटवर बसता बसता विचारले, ‘सर! आपण कॉफी घेणार? माझ्याकडे थर्मासमध्ये रेग्युलर तसेच ‘डिकॅफ कॉफी आहे!’

मी सहज गंमत करावी म्हणून म्हणालो, ‘नको! मला कॉफी नको! काहीतरी थंड पेय हवे आहे!’

काही हरकत नाही!’ वासु म्हणाला, ‘माझ्याकडे पुढे कुलर आहे. त्यामध्ये रेग्युलर व डायट कोक, लस्सी, पाणी व ऑरेंज ज्युस आहे.’

मला लस्सी चालेल!’ मी म्हणालो पण माझ्या चेहेऱ्यावरचे आश्चर्य काही लपत नव्हते.

माझ्या हातात लस्सी देताना वासु म्हणाला, ‘आपल्याला जर वाचायला काही हवे असेल तर टॅक्सीमध्ये द हिन्दु, टाईम्स ऑफ इंडिया, इकॉनॉमिक टाईम्स व इंडिया टुडे आहे.’

माझ्या हातात अजुन एक लॅमिनेटेड कार्ड देत वासु म्हणाला, ‘ही रेडियो स्टेशन्स व त्यावर असलेल्या कार्यक्रमांची यादी, जर आपल्याला रेडीयो ऐकायचा असेल तर!’
मला वासुचे कौतुक वाटु लागले होते. टॅक्सी सुरु करताना वासु म्हणाला, ‘मी एअर कंडीशनींग चालु केले आहे. टेम्परेचर योग्य आहे ना व आपल्याला कंफर्टेबल वाटते ना? का यात ऍजेस्ट करू?’

वासुने मला त्यावेळी माझ्या इच्छीत स्थळी जाण्याचा सर्वात चांगला मार्ग कोणता हे सांगीतले. तसेच वाटेत कोणकोणती प्रेक्षणीय स्थळे लागतात याची पण माहिती दिली.

आपणास हरकत नसेल तर आपण माझ्याशी गप्पा मारू शकता. पण आपल्याला जर एकांत हवा असेल तर मी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही वासु म्हणाला.
मला एक सांग वासु!’ मला माझे आश्चर्य अजुनही लपवता येत नव्हते, ‘तु तुझ्या ग्राहकांना नेहमी अशीच सेवा देत असतोस?’

वासुच्या चेहेऱ्यावर हास्य पसरले. ‘नाही सर! गेल्या दोन वर्षांपासुनच मी हे सुरु केले. या आधीची पाच वर्षे मी इतर सर्वसामान्य टॅक्सी ड्रायव्हरसारखाच होतो. गबाळा, अनुत्साही, सतत कसल्या ना कसल्या तरी तक्रारी करत बसणारा! पण एक दिवशी मला ‘पॉवर ऑफ चॉइस बद्दल कळले!

पॉवर ऑफ चॉइस म्हणजे?’ मी उत्सुकतेने विचारले

पॉवर ऑफ चॉइस म्हणजे तुम्ही बगळा व्हायचे का गरुड व्हायचे याचा चॉइस!’ वासु म्हणाला, ‘तुम्ही सकाळी उठलात व म्हणालात की आजचा दिवस काही चांगला जाणार नाही तर तुमची कधीच निराशा होणार नाही. तक्रारी करण्याचे थांबवा! गरूड व्हा, बगळा होऊ नका! कारण बगळा सतत ‘क्वॅक क्वॅक करत असतो म्हणजे तक्रारी करत बसतो. तर गरुड येणाऱ्या सर्व अडचणी, अडथळे, संकटे यावर मात करत आकाशात उंच भरारी घेत असतो, ढगांच्या वर जात असतो. माझ्या डोक्यात हे वाक्य पक्के बसले वासु म्हणाला

आता मी माझीच गोष्ट सांगतो. मी आधी बगळा होतो. सतत तक्रारी करत बसायचो. पण मग मी माझ्या मनोवृत्तीत बदल करायचे ठरवले. बगळा न होता गरुड व्हायचे ठरवले. मी आजुबाजुला निरिक्षण करायला सुरवात केली. बहुतेक टॅक्सी ड्रायव्हर गबाळे व गलीच्छ असतात, ग्राहकांची काळजी न घेणारे असतात. ग्राहक नेहमी त्यांच्याबद्दल तक्रारी करत असतात. त्यांच्या गाड्या पण खराब व अस्वच्छ असतात. मी माझ्या बाबतीत काही बदल करायचे ठरवले. थोडे थोडे बदल करत गेलो!’ वासु सांगत होता.

मग याचा तुला चांगला फायदा झाला असेल नाही का?’ मी वासुला विचारले.
झाला तर!’ वासु उत्साहाने सांगू लागला. ‘मी गरुड व्हायचे ठरवल्यावर पहिल्या वर्षीच माझे उत्पन्न आधीच्या वर्षापेक्षा दुपटीने वाढले या वर्षी कदाचित माझे उत्पन्न चौपट वाढेल. माझ्या अनेक ग्राहकांनी माझा सेल फोन नंबर घेतला आहे. ते माझीच टॅक्सी हवी म्हणून फोन करत असतात. बहुतेक वेळा माझी टॅक्सी ऍडव्हान्समध्ये बुक होते.’

गरुड व्हा, बगळा होऊ नका !

वासुने वेगळा चॉइस केला. त्याने किरकिर करणारा बगळा न होता आकाशात उंच भरारी घेणारा गरूड व्हायचे ठरवले. त्याचे फळ त्याला मिळाले.
बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हा चॉइस देवाने प्रत्येकालाच दिलेला आहे, अगदी जन्मापासून ते मरेपर्यंत!

आता आपण बगळा व्हायचे का गरुड व्हायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही का ?
🙏🙏 B+tive...

आरसा


  आरसा
.        (एक बोध कथा)

.         एका गुरूंच्‍या घरी एक शिष्‍य मनोभावे गुरुंची सेवा करून शिक्षण घेत होता. त्‍याच्‍या या सेवेमुळे गुरु त्‍याच्‍यावर प्रसन्न होते. शिक्षण् पूर्ण झाल्‍यावर विद्यार्थी घरी जाण्‍यासाठी निघाला तेव्‍हा गुरुंकडे त्‍याने जाण्‍याची आज्ञा मागितली  तेव्‍हा गुरुंनी त्‍याला आशीर्वाद म्‍हणून एक आरसा भेट दिला व सांगितले की, हा दिव्‍य आरसा (दर्पण) असून यात मानवी मनात चालणारे विचार प्रगट होऊन दिसतात.

विद्यार्थी मोठा आनंदीत झाला. हा आरसा खरेच कार्य करतो की नाही याची शहानिशा करण्‍यासाठी त्‍याने लगेच आपल्‍या गुरुंसमोर हा आरसा धरला व गुरुंच्‍या मनात कोणते भाव आहेत, दुर्गुण आहेत हे पाहू लागला आणि गुरुंच्‍या समोर आरसा धरताच त्‍याच्‍या चेह-यावरचा रंग पार उडाला कारण तो आरसा गुरुंच्‍या अंतकरणात मोह, अहंकार, क्रोध आदि विकार दाखवित होता. त्‍याला याचे फारच दु:ख झाले की आपण ज्‍या गुरुची मनोभावे पूजा केली, ज्‍यांना पूर्ण ईश्र्वराचा दर्जा दिला त्‍यांच्‍या मनातही विकार आहेत, ते सुद्धा मानवी विकारापासून अजून सुटलेले नाहीत याचे त्‍याला वैषम्‍य वाटले. तो गुरुंना काहीच न बोलता तो आरसा घेवून गुरुकुलातून निघाला.

रस्‍त्‍यात भेटणा-या प्रत्‍येकाच्‍या मनातील भाव पाहणे हे त्‍याचे कामच झाले होते. गावी परत जाताच त्‍याने आपल्‍या प्रत्‍येक परिचिताबरोबर हा प्रयोग करून पाहिला.

त्‍याला प्रत्‍येकाच्‍या मनात कोणता ना कोणता दुर्गुण दिसून आला. शेवट त्‍याने आपल्‍या जन्‍मदात्‍या आई वडीलांच्‍या समोरही हा आरसा ठेवला. ते दोघेही पण त्‍यातून सुटले नाहीत. त्‍यांच्‍या हृदयात पण त्‍याला काही ना काही दुर्गुण दिसले.

शेवटी या गोष्‍टीचा त्‍याला मनोमन राग आला व तो गुरुकुलातील गुरुंकडे धावला.

गुरुंपाशी जाऊन तो म्‍हणाला,’’ गुरुदेव, मी आपण दिलेल्‍या या आरशातून प्रत्‍येकाच्‍या मनात, हृदयात, अंत:करणात डोकावून पाहिले आणि मला असे जाणवले की प्रत्‍येकाच्‍याच मनात काही ना काही विकार आहेच, काही ना काही दोष आहे. एखाद्याच्‍या मनात कमी तर कुणाच्‍या मनात जास्‍त असे विकार, दोष भरून राहिले आहेत. हे पाहून मी फार दु:खी झालो आहे, कृपया मला मार्गदर्शन करा.’’

गुरुंनी काहीच न बोलता तो आरसा फक्त त्‍याच्‍याकडे केला आणि काय आश्र्चर्य त्‍याला त्‍याच्‍या मनाच्‍या प्रत्‍येक कोप-यात राग, द्वेष, अहंकार, क्रोध, माया आदि दुर्गुण भरून राहिलेले दिसले.

गुरुजी म्‍हणाले,’’ वत्‍सा, हा आरसा मी तुला तुझे दुर्गुण पाहून ते कमी करण्‍यासाठी दिला होता पण तू दुस-यांचे दुर्गुण पाहत बसलास आणि नको तितका वेळ खर्च केलास,

अरे याच वेळेत जर तू स्‍वत:चे अवलोकन केले असते तर तुला तुझ्यातील दुर्गुण सुधारता आले असते. याच काळात तु एक असामान्‍य व्‍यक्ती झाला असता.

मानवाची ही कमतरता आहे, कमजोरी आहे की तो दुस-यातील दुर्गुण पाहत बसतो आणि स्‍वत:ला सुधारण्‍याचा प्रयत्‍नही करत नाही. हेच या आरशातून मला तुला शिकवायचे होते. जे तुला शिकता आले नाही.’’

तात्‍पर्य : आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका करतो पण आपल्‍यातील दुर्गुणांवर आपले कधीच लक्ष जात नाही. कधीतरी जर आपण आत्‍मनिरीक्षण केले तर आपल्‍यालाही आपले दुर्गुण सापडतीलच

श्रीमंत वृद्धाश्रम



श्रीमंत वृद्धाश्रम


पाटी वाचून मी आत शिरले.
वृद्धाश्रमाचे नाव श्रीमंत..

मला आश्चर्यच वाटले. कोणी व कसे असे नाव दिले असेल या वृद्धाश्रमाला ??
आत गेले तर समोर कोणीच दिसले नाही. पण खमंग वास मात्र कुठेतरी आतून येत होता. माझी पाऊले वासाच्या दिशेने जाऊ लागली. वृद्धाश्रमाच्या स्वैपाक खोलीतून हसण्या खिदळण्याचा आवाज खमंग वासाबरोबर येऊ लागला.आत मला जे दृश्य दिसले ते पाहून मी अचंबित झाले नाही तर नवलच.
दोन आज्या मोठ्या कढई मध्ये पोहे भाजत होत्या. दोघी जणी लाडू वळत होत्या तर दोन आज्या करंज्याना सुरेख आकार देत होत्या.

आजोबा पण काही मागे नव्हते बरं का,चकली च्या सोर्यातून सुरेख चकल्या
त्या थरथरत्या हातातून पडत होत्या
कोणा आजोबांचे चिवड्या साठी मिरची कढीपत्ता खोबऱ्याचे काप करणे चालले होते. वातावरण कसे प्रफुल्लीत होते.कुठे ही माझ्या मनात कल्पिलेली मरगळ उदासिनता नव्हती.

सगळे हसत खेळत एकोप्याने एकमेकांना कोपरखळ्या मारत कामाचा आनंद लुटत होते. अहो आजी.. जरा साखर कमी घाला पाकामध्ये तुमच्या हाताचा गोडवा आहे आधीच त्यात. तर आजी म्हणतात अहो भाऊ जरा तोंडात कमी आणि चिवड्यात काजू पडू
देत हो. अहो साठे काकू चिवडा तुमच्या सारखा झणझणीत होऊ दे बर का.
कोणी बाहेर आलेय याची जर सुद्धा शुद्ध त्या तरुणांना नव्हती.
मी अजून ही अवाक होते.

निवृत्त झाल्यावर थोडा फराळ आणि थोडी देणगी द्यावी अश्या उद्देशाने मी तिथे आलेली. एवढ्यात "श्रीमंत "चे व्यवस्थापक मागून आले.त्यानी माझी ओळख करून दिली. मी तिथेच त्यांच्या शेजारी फतकल मारून बसले व त्यांच्या गप्पात रममाण झाले.

इतक्या मोठ्या प्रमाणात चिवड्या लाडू  हा काय प्रकार असेल? माझ्या डोळ्यातील प्रश्नचिन्ह पाहून न विचारताच एका आजीनी सांगायला सुरुवात केली.

सगळा फराळ आम्ही इथे आपल्या हातानी बनवतो. आम्ही कधी ही फराळ कोणाच्या घरून येईल म्हणून वाट पाहत नाही.  की कोणी भेटायला आश्रम पाहायला येईल आणि घेऊन येतील अशी आशा ही ठेवत नाही. आमच्या इथल्या काही जणांकडे पेशन्स आहे.
काही जवळ थोडी माया ठेऊन आहेत.त्यातून आम्ही सगळे सामान आणून एकत्र फराळ करतो. केलेला फराळ आम्ही थोडा जवळच्या अनाथाश्रमात जाऊन तिथल्या चिमण्या पिल्लांना खाऊ घालतो.थोडा रस्त्या च्या कडेच्या गरिबांना वाटतो तर थोडा मागच्या गल्लीतल्या झोपडपट्टीत जाऊन देऊन येतो.

अग नुसती दिवाळी नाही तर नाताळ चा सण पण आम्ही जोरदार साजरा करतो.या नेने काकू आहेत ना त्या मस्त केक बनवतात. आणि हे अंतू काका मस्त सांता चा ड्रेस घालून छोटी छोटी गिफ्ट्स आणून वाटत सुटतात.

एखाद्या गरीब शाळेच्या बाहेर उभे राहून होतकरू विद्यार्थ्यांसाठी कितीतरी पेन पेंसिली कंपास आशा वस्तू त्यांच्या जादूच्या पोतडीतून बाहेर निघतात. संक्रांतीला आम्ही इतर वृद्धाश्रमात तिळगुळ घेऊन जातो. इथे नेहमी मुलांचे येणे जाणे असते. 

आश्रमातले एक आजोबा गायक होते. पण अर्धांग वायू मुळे ते इथे विश्रांती घेतायत.

न परवडणाऱ्या फीने उदयोन्मुख गायक त्यांचे मार्गदर्शन घ्यायला इथे येतात. नात्यांचे गणित चुकलेले काका मुलांची गणिताची भीती घालवतात.

इथल्या आज्या माहेर नसलेल्या मुलींचे बाळंतपण करतात.मी जरा भीत भीतच त्यांच्या घरच्यांचा विषय काढला.

इतका वेळ उत्साहाने बोलणारे जरा गप्प झाले काम करते हात थबकले.
तितक्यात बाहेरून नानु मामा वयाला न शोभेल असे धावत आले.

त्यांच्या हातात एक कंदील होता जो त्यांनी दोन दिवस बसून स्वतः तयार केला होता.सगळ्यांनी केलेल्या कौतुकाने फुलून जाऊन त्याच उत्साहाच्या भरात ते दारावर टांगायला  निघून पण गेले.व्यवस्थापक म्हणाले हे नानु मामा ..तरुण वयात दोन लहान बहिणींची जबाबदारी अंगावर टाकून आई वडील देवाघरी गेले. स्वतःच्या मुलींप्रमाणे नानु ने बहिणींना वाढवले. कधी आई च्या मायेने जाणत्या वयाची शिकवण दिली तर वडिलांच्या मायेने बाहेरच्या जगापासून संरक्षण केले.

शिकवून सावरून चांगल्या घरी त्यांची पाठवणी करण्याच्या नादात लग्नाचे वय कधी उलटून गेले कळलेच नाही.दोन्ही बहिणींनी गरज लागेल तेंव्हा भावाला आधारासाठी बोलावून घेतले. आता वय झाले नानु ला एकटे राहावे ना. पण दोन्ही ही बहिणींनी एकाकी भावाची जबाबदारी घ्यायला नकार दिला.एक म्हणे माझ्या हातात काही नाही . माझे घर सुनांच्या ईशाऱ्याने चालते

 तर दुसरी म्हणते माझेच मला होत नाही याचे कोण करणार.

 भरीतभर म्हणजे राहती जागा नूतनिकरणा साठी पाडायची ठरली तेंव्हा दोघींनी आपला हक्क मागितला.

निराश नानु मामाची पाऊले इकडे वळली ती कायमचीच. मागच्या वर्षी एका लग्नसमारंभात व्यवस्थापकांना नखशिकांत दागिन्यांनी मढलेल्या दोघी बहिणी दिसल्या.

आपापल्या सुनांची तक्रार करताना. अंगावरची श्रीमंती चेहऱ्यावर अजिबात दिसत नव्हती. मला नानुमामांचा आत्ताचा आनंदी चेहरा डोळ्यासमोर आला.प्रमिला ताईंचा भाऊ त्यांना इथे सोडून गेला. कोणाची मुले परदेशात तर कोणाच्या मुलांना अडगळ.
कोणाकडे जागेची अडचण. वेगवेगळ्या स्तरातून आलेले सगळे इथे मात्र एकोप्याने रहात होते.

वत्सला ताई म्हणाल्या हे गेले. पदरी मूळ बाळ नाही.  मी स्वतःच कोणावर भर नको म्हणून इथे आले. एकच भाऊ मला. खूप श्रीमंत आहे पण साधे भाऊबीजेला इतक्या वेळेला बोलावून पण येत नाही

नशिबी पाडवा नाही की भाऊबीज नाही काय उपयोग दिवाळी चा.

असे नैराश्य आले असतानाच नानु मामांनी मला भाऊबिजेला बहीण मानले ओवाळायला लावले.

आणि ओवाळणी म्हणून लोकर आणि सुया दिल्या आणि हक्काने सांगितले थंडी जवळ आलीय लवकर स्वेटर विणून ठेव. तेंव्हापासून मी स्वतःला त्या लोकारीच्या उबदार विणेत गुंतवून घेतलंय. आता एकच नाही अनेक श्रीमंत भावांची मी लाडकी बहीण आहे.

रखरखीत उन्हाला तिन्ही सांजेचे वेध लागले होते. बऱ्याचदा ही कातर वेळ जीवघेणी असते पण इथे तसे नव्हते. बाहेरचे अंगण पणत्यांनी उजळलेले होते. तुळशी वृंदावनात मंद दिवा तेवत होता. आकाशकंदीलाचेे तेज चंद्राला ही लाजवत होते.
सगळे जण  ठेवणीतले कपडे घालून तयार झाले होते. थोड्याच वेळात नव गायक समूहाचे आगमन होणार होते.

आपल्या गुरू ला गुरुदक्षिणा देण्यासाठी . सदाबहार  गाण्यांनी आश्रमाचा कानाकोपरा निनादणार होता.

आरोह *अवरोह आलापा ने कोपरा कोपरा शब्दसुगंधी होणार होता. मी हळूच तिथून बाहेर आले.

कुठे मी कवडीमोल मदत करायला मोठ्या गर्वाने तिथे गेले होते.

पिशवीतले एव्हढेसे वाटायला घेतलेले फराळाचे पुडके मला लाजिरवाणे करून गेले.

मोठ्या दिमाखात श्रीमंत वृद्धाश्रमाच्या
 पाटी कडे माझे लक्ष गेले. आणि कळले स्वर्ग म्हणजे काय.

त्या साठी "आभाळातच" जायला पाहिजे असे नाही

 थोडी नजर आपल्या पलीकडे टाकली तर हा स्वर्ग आपल्यापाशीच  आहे.

त्या श्रीमंत वृद्धाश्रमाला मानाचा सलाम ठोकून माझी पाऊले घराकडे वळली .

©मंजू काणे          

नात्याचे संगोपन



नात्याचे संगोपन
.........................................
आपलं माणूस कोण.?
आपली माणसं कशी निर्माण करायची.?
आणि
आपली माणसं कशी सांभाळायची.?

या प्रश्नाचं शोधलेलं उत्तर....

अडचणीत ज्या व्यक्तीची आठवण येते तो व्यक्ती आपला असतो, आपण त्यांना ICE(in case of emergency) ह्या नावाने मोबाईल मध्ये save करतो...
आपल्या घरातील काडीपेटीचे उदाहरण पाहू ....
आपल्या घरात कुठेतरी काडी पेटी असते. ती कुठे आहे हे आपणाला माहीत पण असतं, ती जागेवर आहे इतकच आपण पाहतो आणि परत आपल्या कामाला लागतो किंवा आपली कामं करतो. आपलं रुटीन सुरु आहे, काडीपेटी तिच्या जागी आहे. तुम्ही तुमच्या जागी आहात. तुमच्या रोजच्या जीवनात त्या काडीपेटीचं फक्त अस्तित्व आहे. काम कधी कधी पडते पण अस्तित्व मात्र आहे, हे तुम्हालाही माहित आहे. कधी कधी काही वस्तू साफसुफ करताना आपण काडीपेटीलाही साफ करतो आणि परत जागेवर ठेवतो.
आपल्या ध्यानी मनी नसताना कोणा एका रात्री अचानक लाईट जाते आणि डोळ्यासमोर गुडूप अंधार होतो. आपल्याकडे डोळे आहेत. ते उघडेही आहेत पण त्याचा काहीही उपयोग होत नाही म्हणून आपण पटकन डोळे बंद करतो आणि घरात आपण जिथे आहोत तिथून डोळे झाकून काडीपेटीच्या दिशेने पावलं टाकतो. हात पुढे करतो. आपल्या हातात काडीपेटी येते कारण ती कुठे आहे हे आपणास माहीत असते. आपण त्यातील एक काडी पेटवतो आणि घरात प्रकाश करतो आणि मेणबत्ती शोधतो आणि ती पेटवून चहुकडे कायम स्वरूपी प्रकाश करतो.
आता आपण घटनेचे विश्लेषण करू या.
1) काडीपेटीची आवश्यकता नव्हती त्या काळात सुध्दा तिची काळजी घेतली. आवश्यक तेथे सुरक्षित ठेवली तशीच आपल्या अवती भोवती असणारे आपले मित्र, आपले नातेवाईक, शेजारी यांची काळजी घ्या त्यांची विचारपुस करा. आणि परत रिलेशन अपडेट ठेवा. हीच माणसं संकट समयी आपल्याला मदत करतात.
2)अंधार पडला तेव्हा तुमच्याकडे डोळे होते पण तरीही त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. तसंच कधी कधी होतं, संकट किंवा समस्या आल्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या क्षमता चालत नाहीत किंवा कमी पडतात...तेव्हा हीच मंडळी मदतीचा हात पुढे करून अधार देतात.
3) अंधार पडल्यानंतर आणि आपल्या क्षमतांचा उपयोग होत नाही म्हटल्या नंतर आपण डोळे बंद करून काडीपेटी पर्यंत पोहोचलो. इतका पक्का विश्वास आपणाला असतो की आपण हात पुढे केला आहे आणि भरलेली काडीपेटी तुमच्या हातात येते आपण काडी पेटवतो आणि मग डोळे उघडतो. इतका विश्वास त्या काडीपेटीचा आपणाला असतो.
तसंच आपण जोडलेली माणसं जर मनापासून जपलेली असतील तर अजिबात धोका होत नाही कारण आपण ती काळजी आपण रोज घेतलेली असते त्यामुळे आपण कॉन्फिडंट असतो.
आता आपण पाहू या आपली माणसं कशी जपायची ....
अ) रोज चालताना नमस्कार करण्यात , greet करण्यात  कंजूषी करू नका.
ब) लोकांशी नेहमी संवाद ठेवा.
क)  लोकांना छोट्या मोठ्या कामात मदत करायला मागेपुढे पाहू नका.
ड) लोकांच्या आनंदात सहभागी व्हा ...दुखाःत तुमचा खांदा पुढे करा.
इ) आणि दिलेल्या शब्दाला पाळा किंवा जागा.
ई)काही अडचण आल्यास बिनधास्त फोन करा आणि त्यांच्या अडचणी मध्ये त्यांचा फोन घ्यायला मागेपुढे पाहू नका.
"Making Realation or Friends is easy but at most care is to be taken to maintain it "

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा