Pages

गुरुवार, १४ मार्च, २०१९

एकुलती एक नोकरी करणारी..

एकुलती एक नोकरी करणारी...

त्याने आजवर आठ मुलींना नकार दिला होता. आज त्याला पहिला नकार मिळाला. अभिनव मध्ये खरं तर नकार देण्यासारखं काहीच नव्हतं. रुबाबदार व्यक्तीमत्व, इंजिनियर आणि एमबीए करून लठ्ठ पगाराची नोकरी. आईवडिलांचा एकुलता एक. तीन बेडरूमचे घर. पण रुहीने त्याला नकार कळवला. अभिनव चे आईवडील टेन्शन मध्ये आले. त्याने ह्यापुढील स्थळ न नाकारता सरळ होकार देऊन मोकळं व्हावं असं सांगू लागले. वरून त्याची अट होती सुंदर, मनमिळाऊ, शिकलेली ह्या बरोबर "नोकरी करणारी एकुलती एक!" अश्या कॉम्बिनेशनच्या मुली मुळात कमी मिळत. त्याही हा रिजेक्ट करत असे आणि त्याला मिळालेलं आता हे पाहिलं रिजेक्शन! आईवडील टेन्शन मध्ये होते पण अभिनव मात्र एका वेगळ्याच विचारात होता!

दुसऱ्या दिवशी अभिनव ऑफिसात रुहीचा बायोडेटा वाचत होता. त्यात तिच्या ऑफिसचे नाव होते. त्याने गुगल करून पत्ता शोधला आणि लंच मध्ये तो तिच्या ऑफिसात धडकला! त्याला बघून रुहीला आश्चर्य वाटलं. अभिनव म्हणाला-

अभिनव- हाय.
रुही- हाय. तुम्ही....इथे?
अभिनव- हो जरा बोलायचं आहे.
रुही- काल माझ्या बाबांनी फोन केला ना?
अभिनव- हो. म्हणूनच बोलायचं आहे. आज हाफ डे घेऊ शकशील का? तू म्हणशील तिथे जाऊ आणि बोलू.
रुही- पण...
अभिनव- विश्वास ठेव ही आपली शेवटची भेट असेल. ह्यानंतर मी तुला कधीही कॉन्टॅक्ट करणार नाही.

रुहीने क्षणभर विचार केला आणि ऑफिसात कळवून दोघे निघाले. तिच्या ऑफिसच्या इमारतीतच असलेल्या एका कॉफी शॉप मध्ये दोघे पोहोचले. एक स्टॅंडर्ड ऑर्डर देऊन दोघे शांत बसून होते. आपल्यासमोर आपण नकार दिलेला मुलगा बसला आहे ह्या जाणीवेने रुहीला खूप ऑकवर्ड वाटत होतं.

अभिनव- तू इथे किती वर्षे नोकरी करतेस?
रुही- पाच वर्षे होतील पुढल्या महिन्यात. माझी सीए केल्यावरची पहिलीच नोकरी.
अभिनव- कन्सल्टीग एमएनसी म्हणजे पगार उत्तम असेल.

रुही ह्या अनपेक्षित प्रश्नाने चकित झाली.

अभिनव- मला माहित आहे पगार छानच असेल. असो. लग्नानंतर पण नोकरी करणार?
रुही- हो.
अभिनव- नवऱ्याने नको करू सांगितलं तर?
रुही- तर मी नवऱ्याला सोडीन.
अभिनव- इंटरेस्टिंग. बरं एका प्रश्नच खरं उत्तर देशील?
रुही- काय?
अभिनव- मला रिजेक्ट का केलंस? आय मीन माझा ईगो हर्ट झाला.
रुही- कारण बघण्याच्या कार्यक्रमात तुम्ही इनसिस्ट केलेली अपेक्षा.
अभिनव- कोणती?
रुही- तुम्हाला मुलगी नोकरी करणारीच हवी आणि लग्नानंतर नोकरी सोडावी असे तुम्ही म्हणालात.
अभिनव- हो. कारण गरजच नाहीये आम्हाला तुझ्या नोकरीची.
रुही- माझ्या नोकरीची गरज आहे. माझ्या आईबाबांना! अभिनव माझ्या घरची परिस्थिती तुम्हाला माहीत आहे. माझ्या बाबांकडे खरच पैसे नव्हते आणि नाहीयेत. जे काही होते ते त्यांनी माझ्या लग्नासाठी साठवून ठेवले आहेत. ते देखील इतके कमी आहेत की त्याच्या व्याजात त्या दोघांचा महिन्याचा खर्चही निघणार नाही. बाबांनी मला दोन गोष्टी मात्र आवर्जून दिल्या. एक म्हणजे चांगले संस्कार आणि दुसरी म्हणजे शिक्षण!
अभिनव- ओके. मग?
रुही- मी आईबाबांची एकुलती एक मुलगी. आज चांगली नोकरी करते आहे. चांगला पगार आहे. आता कुठे आम्हाला पैसा दिसू लागलाय. माझ्या बाबांना परदेशाबद्दल कुतूहल आहे. ते पेपरात आणि पुस्तकात विविध देशांची माहिती वाचत असतात. त्यांना वाचनाचा छंद आहे. पुढे त्यांचं वयानुसार येऊ शकणार आजारपण, औषध असू शकेल.
अभिनव- बरं मग? Come to the point. मला नकार का? ह्याच्याशी माझा काय संबंध?
रुही- तुमच्या ह्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. तुमचा माझ्या आईवडिलांशी संबंध नाही, ते तुमची जबाबदारी नाही. आपलं लग्न झालं की मी तुमची. मग माझाही काहीच संबंध नसेल त्यांच्या जबाबदारीशी असा अर्थ आहे.
अभिनव- अर्थात.
रुही- मला तेच मान्य नाहीये. मला आई बाबांना परदेशात टूरला पाठवायचं आहे, चांगल्या हॉटेल्स मध्ये जेवायला घालायचं आहे, घरात सर्व सुखसुविधा द्यायच्या आहेत, त्यांच्या म्हातारपणाची आर्थिक जबाबदारी घ्यायची आहे. नोकरी करणारी एकुलती एक ही एक महत्वाची अट असणाऱ्या माणसाशी लग्न करून मी हे सर्व करू शकणार नाही हे माहीत असल्याने मी नकार दिला इतकंच! तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. प्रॉब्लेम माझा आहे तुमचा नाही!
अभिनव- सीमा म्हणजे शिवराम आणि आनंदी बाई जोश्यांची एकुलती एक मुलगी. बीए शिकलेली आणि सरकारी नोकरीत. शिवराम जोशी भिक्षुक. परिस्थिती यथातथा! सीमाच लग्न झालं. ती संसारात रमली. लाडक्या मुलीबरोबर तिच्या पगाराचा घराला असलेला आधार एका दिवसात परका झाला! वर्ष सरत गेली. शिवराम भाऊ आणि आनंदीबाई आयुष्यातील मूलभूत सुखांनी वंचित असे आयुष्य जगत लेकीचा सुखी संसार बघून आनंद मानत होते! सीमाने पंचेचाळीस वर्षांची असताना व्हीआरएस घेतली. भरपूर पैसे हाती आले.त्या पैशात थोडी भर टाकून त्यांनी त्यांच्याच इमारतीत अजून एक मोठी जागा घेतली. शिवरामभाऊ आणि आनंदीबाई मात्र दहा बाय दहाच्या खोलीत आयुष्य कंठत होते! तिथेच यथावकाश वर्षभराच्या अंतराने दोघे संपले!
रुही- बघा हे असंच होत. माझ्या आईबाबांच्या बाबतीत हे होऊ नये म्हणून मी तुम्हाला नकार दिला!
अभिनव- रुही माझ्या आईच नाव सीमा आहे आणि मी सांगितलेली गोष्ट माझ्या सख्या आजी आजोबांची आहे! मला मोठा झाल्यावर त्यांची अगतिकता लक्षात आली पण खूप उशीर झाला होता. चूक माझ्या आईची देखील नाही. तेव्हा बाबांची परिस्थिती पण अशी होती की काही वर्षे आईच्या पगारावर घर चालू होतं. मग बिझनेस जोरात सुरू झाला आणि दिवस बदलले. पण आजीआजोबांची हालाखी तोवर सवय होऊन गेली होती. कोणालाच त्याच वाईट वाटत नसे. आणि कोणालाही ती खटकत नसे!
रुही- हम्म
अभिनव- आजीआजोबा गेल्यावर मी ठरवलं की एका अश्या मुलीशी लग्न करायचं जी एकुलती एक असेल आणि नोकरी करणारी असेल. तिने लग्नानंतर नोकरी केलीच पाहिजे आणि कमावलेले सगळे पैसे लग्नाआधी जसे वापरायची किंवा खर्च करायची तिथेच त्याच पद्धतीने खर्च करेल! माझ्या आजीआजोबांसारख्या हजारो एकुलत्या एका मुलीच्या आईवडिलांपैकी एका आईवडिलांना तरी मी माझे आजी आजोबा होण्यापासून थांबवायचा प्रयत्न करेन. रुही होत काय माहित्येय का? लग्न केल्यावर एकतर सासरी गरज नाही म्हणून अनेक मुली उत्तम करियर असलेली नोकरी सोडून देतात किंवा नोकरी करत राहून सासरला हातभार लावायला सुरुवात करतात. पण दोन्ही बाबतीत एकुलत्या एका मुलीचे आईवडील ज्यांना उतारवयात त्या मुलीची नोकरी हा म्हातारपणाचा आर्थिक आधार असू शकतो त्यांचा कोणीच विचार करत नाही. म्हणून माझी ती अट होती. तू मला रिजेक्ट केल्यावर मला खूप आनंद झाला. आणि आज तुझ्याकडून मला अपेक्षित असलेले कारण ऐकून खूपच आनंद झाला. आजवर देखणा, श्रीमंत, वेल सेटल्ड अभिनव दिसल्यावर, आपलं उज्वल भविष्य दिसल्यावर माझ्या सर्व अटी मान्य करून आपल्या आईवडिलांचा फार विचार न करणाऱ्या मुली मी नाकारल्या! सो माझी ऑफर अशी आहे की माझ्याशी लग्न केल्यावर तू नोकरी करत राहाशील! तुझे आणि तुझ्या आईवडिलांचे बँकेत जॉईंट अकाउंट असेल. तू तुझे जे प्लान आहेत ते  पूर्ण करशील. तुझ्या आईवडिलांचा आर्थिक भार तू पेलशील! मी म्हणालो तसा माझा त्याच्याशी संबंध नसेल! फक्त कधी तुला भार सोसला नाही तर पाठीशी माझा हात कायम असेल! आता सांग मी रिजेक्ट की सिलेक्ट?

डोळ्यातून अश्रू वाहात असलेली रुही त्या प्रश्नाने लाजली! शिवरामभाऊ आणि आनंदीबाई पूर्वेला क्षितिजावर उगवलेल्या दोन ताऱ्यांच्या मागून डोळ्यातले अश्रू पुसत दोघांना मनापासून आशीर्वाद देत होते. आकाशात आजचा सुपर मून खूपच लोभस दिसत होता...

मंगळवार, ५ मार्च, २०१९

कृष्ण

द्रौपदी कृष्णाकडे गेली.. तेव्हा त्याच्या सगळ्या गवळणी, बायका, राधा,मीरा
सगळे मिळून प्रेमाचा वार्तालाप करत होते.. द्रौपदीला वाटलं.. आता कसं जायचं आपण??
पण ती आलेली कृष्णानं बघितलं.. आणि सहज स्वागत केलं.." ये सखी"
त्याबरोबर बाकीच्या सगळ्याजणी जायला निघाल्या..
द्रौपदीला ते कसंतरीच वाटलं... ती रूक्मिणीला म्हणाली.."अगं थांब गं.." तशी ती म्हणाली.."नको गं.. मला स्वामींची बरीच कामं करायचीयत.."
ती राधेला म्हणाली, " तू तरी थांब.."
ती म्हणाली.." मी थांबले काय आणि नाही काय??.. दोन्हीही माझ्यासाठी समानच आहे."
आणि सर्व निघून गेल्या...
कृष्णानं छद्मी हसत विचारलं..
" हं बोल.. आज तुझी काय शंका आहे??"
तशी ती म्हणाली..." हे जे घडलं.. तीच माझी शंका आहे.."
कृष्णानं विचारलं..." यात शंका घेण्याचं काय आहे??.. तुला आणि मला बोलायला वेळ मिळावा... म्हणूनच त्या गेल्या ना??"

त्यावर द्रौपदी म्हणाली,
" हीच माझी खरी शंका आहे माधवा... की मी असं काय केलयं.. की ह्या सगळ्यांपेक्षाही तुला मी जवळची वाटते...ह्या सगळ्यांनी जसं तुझ्यावर आयुष्य ओवाळून टाकलं.. तसं मी काहीच केलं नाही..
उलट ह्या सगळ्यांना तू त्यांच्या आयुष्यातला एक अखंड हिस्सा म्हणून हवा होतास.त्यांनी त्यासाठी शक्ती, भक्ती, प्रेम, हक्क, लग्न असे सगळे मार्ग अवलंबले..तरी तसा तू त्यांना कधीच मिळाला नाहीस.. तू पूर्णतः कुणाचाच झाला नाहीस..
आणि त्या उलट मी मात्र माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगत होते.. तरी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे मला गरज होती तिथे तिथे तू धावून आलास??... असं मी काय केलयं तुझ्यासाठी??"
त्यावर कृष्ण म्हणाला,
" ऐक... एखादया व्यक्तीचं स्वीकारणं.. म्हणजे त्याचं परिपूर्णत्व स्वीकारण्यासारखं असतं... कदाचित तू मला स्विकारलं नाहीस.. पण मी तुला स्विकारलयं... हा फरक आहे बाकीच्यांच्यात आणि तुझ्यात...

अगं त्या सगळं त्यांचं स्वत्वच माझ्यात विसरून गेल्या आहेत.. त्यामुळे त्यांचा आनंद फक्त मीच झालोय.. जे मला प्रिय ते त्यांना प्रिय...

पण मी तुला स्वीकारलयं... ते तुझ्या या स्वाभिमानी
  #स्वत्वासाठी
ते आहे म्हणून तुझं तेज टिकून आहे..... तुला माहितीय स्वतःला की तू काय करतीयस... आणि त्यावर तू ठाम आहेस... तुला फक्त हवा असतो; एक सल्लागार, एक मार्गदर्शक, आणि एक खंदा पाठिंबा.. आणि तेच करतो मी...
त्यामुळे निःशंक हो पांचाली.."

त्यावर ती म्हणाली...
"अच्छा.. मग ह्यांनीही असंच स्वत्व टिकवून ठेवलं तर त्यातल्या कुणाचा तरी तू एकीचाच होशील ना??... मग बाकीच्यांवर अन्याय नाही का??"
ह्यावर कृष्ण गडगडाटी हसत म्हणाला,
" हे तुझं प्रश्न विचारणंच खूप आवडतं... आणि जेव्हा असे प्रश्न पडतात.. तेव्हाच ते व्यक्तित्व अधोरेखित करतात...
आता ऐक...
खरं तर त्यातल्या कुणीच हे असं करणार नाहीत.. कारण तो त्यांचा स्वभाव नाही...
आणि असं आहे... की मी म्हणजे नेमका कोण आहे??
तर मी तुमचंच प्रतिबिंब आहे... तुम्ही ज्या नजरेने बघता त्यातच मी मिसळून जातो.....
त्यांनी माझ्याकडे फक्त प्रेम या भावनेनं बघितलं.. म्हणून मी तसाच बनून गेलो...
पण तू मात्र प्रत्येकवेळी मला वेगवेगळ्या नजरेनं बघत आलीस... म्हणून मी तुला तसाच मिळत राहिलो...

हाच फरक आहे.. तुझ्यात आणि बाकीच्यांच्यात...
म्हणूनच म्हणलं.. मी ....
की "मी" तुझा स्वीकार केलाय....

संसारामधला खमंगपणा

संसारामधला खमंगपणा

लग्नाला पंचवीस वर्ष झाल्यावर अचानक एक दिवस तिनं त्याला विचारलं ...
"तुला माझ्याबद्दल काय वाटतं ?"

तो बावचळला ... गोंधळला ... आता अशा प्रश्नांची सवय उरली नव्हती नं ... !
प्रेम नवं नवं होतं तेव्हा ठीक होतं हो ... तिच्याकडून दिवसातनं एकदा तरी हा प्रश्न यायचा आणि त्याच्याकडे ही एकदम भारी भारी उत्तरं तयार असायची ...

पण मग लग्न झालं ...
संसार नावाची प्रश्नपत्रिका सोडवता सोडवता ही असली तोंडी परीक्षा पार विस्मरणात गेली ...
आणि काल परवा अचानक हा गुगली पडला ...

त्यातून तिनं प्रश्न विचारला तेव्हा ती पोळ्या करत होती ..
हातात लाटणं ...
समोर तापलेला तवा ...
त्यानं संभाव्य धोका ओळखला ..
आणि 'सांगण्यासारखं प्रचंड आहे ..
संध्याकाळी सावकाशीनं सांगतो ...'
असं म्हणून तो कामावर सटकला ... !

तो घरातून बाहेर पडला खरा ...
पण घर काही डोक्यातून बाहेर पडलं नव्हतं .. !
अख्खा दिवस शब्दांची जुळवाजुळव करण्यात गेला ...
कठीण असतं हो ...
नात्याचं गणित एकदा भावनेत अडकलं की ते शब्दांतून सोडवणं कठीण असतं ..

तो विचार करत होता ..
काय सांगावं .. ?

मी राजा .. तू माझी राणी वगैरे काही म्हणावं का ...
नको .. फार फिल्मी वाटतं ..

तू खूप छान आहेस ...
असं म्हणावं ... नको ...
तिला ते फारच रुक्ष वाटण्याची शक्यता आहे ..
समजूतदार सहनशील वगैरे म्हणावं ...
तर ती नक्की म्हणेल ...
राजकारण्यांसारखी उत्तरं देऊ नकोस ...
त्याला काहीच सुचेना ...

बायकोला आवडेल असं वागणं आणि तिला पटेल असं बोलणं ... हे दोन्ही शिकवणारे क्लासेस असायला हवे ...
लाईन लागेल नवऱ्यांची ...
त्याच्या मनात असले भलभलते विचार येत होते ..

सूर्य मावळला ...
घरी जायची वेळ झाली ..
आपल्याला पाहिल्या पाहिल्या तिच्या उजव्या डोळ्याची भुवई वर जाणार ...
याची त्याला खात्री होती ...

घरचा अभ्यास न करता शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यासारखा त्याचा चेहरा झाला होता ...
त्यानं बेल वाजवली ..
अपेक्षेप्रमाणे तिनं दार उघडलंच नाही ..
त्याच्या मुलानं दार उघडलं ... आणि पुढच्याच क्षणी कांद्याच्या भजीचा घमघमाट नाकात शिरला ...

मुलगा जवळ जवळ उडी मारत म्हणाला ... "भजी केलीत आईनं ... पटकन हातपाय धुवून या ..."

तो मान डोलावून आत गेला ... आणि पुढच्याच क्षणी टेबलवर हजर झाला ...

बायकोनं भज्यांची प्लेट समोर मांडली ...
त्यानं विलक्षण अपराधी चेहऱ्यानं तिच्याकडे पाहिलं ...

तिनं तोंडभर हसून विचारलं .. "काही सुचलं ... ? "

त्यानं नकारार्थी मान हलवली ...

तशी ती पटकन टाळी वाजवून आनंदानं म्हणाली ... "मलाही नाही सुचलं ... ! "

तो पुन्हा गोंधळला ...
इतकी अनपेक्षित प्रतिक्रिया ... ?

आणि ती बोलतच होती ...
"काही दिवसांपूर्वी माझ्या एका मैत्रिणीनं मला विचारलं ...
तुला तुझ्या नवऱ्याबद्दल काय वाटतं ... ? "

सात दिवस विचार केला ..
पण मला काही सांगताच येईना ...
मग भीति वाटली ...
माझं तुझ्यावरचं प्रेम आटलं की काय .. ?
अपराधी वाटायला लागलं - काय करावं कळेना ...
मला स्वतःविषयी शंका होती पण पंचवीस वर्षानंतर ही तुझं प्रेम कणभर ही आटलेलं नाही याची खात्री होती.
म्हणून मग हा प्रश्न तुला विचारला ...
वाटलं .. तुला उत्तर देता आलं तर आपण 'Fault' मध्ये आहोत ..
पण नाही ... तुलाही उत्तर देता आलं नाही ...
म्हणजे आपण आता अशा वळणावर आहोत ...
जिथे फक्त 'वाटणं' संपून 'वाटून घेणं' सुरु झालंय ...
आता शब्द सापडत नाहीत ... आणि त्याची गरजही वाटत नाही ...
कारण आता एकमेकांसमोर स्वतःला सिध्द करण्याची धडपड संपलीय ... "

असं म्हणून तिनं एक कांदा भजी त्याला भरवली ...
शपथ सांगतो ...
त्याच्या पंचवीस वर्षाच्या संसारामधला सगळा खमंगपणा त्या भजीत उतरला होता !!!
                  ~~अनामिक

अमृतवेल


अमृतवेल
लेखक: वि.स.खांडेकर

किती विचित्र आहे हे जग! घरच्या माणसांची किंमत कळायलाही घराबाहेर पडाव लागत इथ!
 जीवनचक्राच्या या अखंड भ्रमंतीत माणसाला एकच गोष्ट करता येण्यासारखी आहे — दुसर्‍या माणसाशी जडलेले आपले नाते न विसरणे. त्याचे जीवन फुलावे म्हणुन त्याच्यासाठी जे जे करता येईल ते ते करणे.
 नीट विचार कर बाळ. विश्वाच्या या विराट चक्रात तू आणि मी कोण आहे? या चक्राच्या कुठल्यातरी अरुंद पट्टीवर क्षणभर आसरा मिळालेले दोन जीव! दोन दवांचे थेंब, दोन धुळीचे कण! स्वत:च्या तंद्रीत अखंड भ्रमण करणारे हे अनादी, अनंत चक्र तुझ्यामाझ्या सुखदु:खाची कशी कदर करू शकेल???
 मानवाचं मन केवळ भूतकाळाच्या साखळदंडांनी करकचून बांधून ठेवता येत नाही! त्याला भविष्याच्या गरूडपंखाच वरदानही लाभलं आहे.
 आपलं घरटं सोडुन बाहेर गेल्याशिवाय पाखराला आकाशाचा अर्थ कळत नाही!

रविवार, ३ मार्च, २०१९

गावपण हरवायला नको होतं


गावपण हरवायला नको होतं

तंत्रज्ञानाने ज्या पिढीला गुदगुल्या केल्या ती आमची पहिली पिढी.

त्या अगोदर आमच्या आईबापांनी चिमणी कंदिलात दिवस काढले.
चार आण्याच्या पोस्ट कार्डवर उभ्या जिंदगीची ख्यालीखुशाली पाठवून उत्तरादाखल कित्येक अस्वस्थ रात्री काढल्या.
 चालून चपला झीझवणारी हि शेवटची पिढी.
लग्नातलं लुगडं लेकीच्या पोरीच्या बाळतपणासाठी वापरणारी हि पिढी.
लसून कांद्याच्या जुड्या आड्याला लटकावून वर्षभर पुरवून खाणारी हि पिढी.
रानात दाना दाना वेचूनहि चार कणसाची बोंडे खुशाल दाराबाहेर चिमणी पाखरासाठी राखून ठेवणारी हि माझ्या आई बापाची पिढी.
ठिगळ लावून जगणारीही हि शेवटची पिढी.
कपडे फक्त अंग झाकण्यासाठी असतात  हे तत्वज्ञान जगणारी हि शेवटची पिढी.
कदाचित म्हणूनच माझ्या पिढीला जसा तंत्रज्ञानाचा विटाळ नव्हता तसाच माजहि नव्हता.
माझ्या पिढीने बंद पडलेले टीवी कधीच भंगारात विकले नाहीत.
बापाचं घड्याळ घालून आम्ही बोर्डाच्या परीक्षा दिल्या.
संपलेले सेल फोडून आम्ही खेळगाड्या बनवल्या.
ग्याटर आलेले टायर गल्लीबोळातून पळवत तरुण झालो.
तुटलेल्या क्यासेट शिवारात गुंडाळून आणि सायकलच्या रिमची कोळपी बनवून  आमच्यातले काही इंजिनियर झाले.
आमच्या पिढीत मोठ्या भावाकडून वारसा हक्काने वापरून जुन्या झालेल्या वस्तू लहान भावांकडे आल्या.
 तंत्रज्ञानाने आम्हाला पांगळे केले नाही.
नाती नात्याला आणि माणस माणसांना या नं त्या कारणाने जोडलेली होती.
 पण आता मात्र....
गाव पार पार हरवलं.
घरोघरी तंत्रज्ञान घुसलं.
रिचार्ज वाढले talktime संपला.
पिक्सल वाढले जगण्याचा एक्सल कमी झाला.
बघता बघता पिढी फोरजी झाली.
प्रत्येकाचं आयुष्य हि ज्याची त्याची मर्जी झाली.
जगणे मल्टीप्लेक्स झाले.
चौका चौकात पुढार्यांच्या पराक्रमाचे फ्लेक्स आले.
 आता तर तो हरवलाय म्हणून पेपरात जाहिरातही देता येत नाही.
कारण हल्ली कळून चुकलंय, गेलेली गोष्ट परत येत नाही,मग ते बालपण असो किंवा गावपण.
या गावाला चूड लावली म्हणून आपण कुणाच्या नावाने खडे फोडायचे ?
या तंत्रज्ञानाच्या ? कारण तो बदलताना आपल्याला गुदगुल्या झाल्या.
तो हरवतानाही आपण होतोच आसपास.
 दुःख गाव हरवल्याचं आपल्याला कधीच नव्हतं. गाव हरवला हरकत नाही.
गावपण हरवायला नको होतं.


परिस


परिस


मी शाळेत असताना शिक्षकांनी 'परिस 'या शब्दाचा अर्थ सांगितला होता.जर का परिस नावाचा दगड लोखंडाला
लावला तर लोखंडाचे सोने होते.....
मला जाम मजा वाटली.....खरच,परिस मिळायलाच पाहिजे.आपल्याकडे किती सोने होईल???? आपण किती श्रीमंत होऊ????
या कल्पनेने मी जाम खूष झाले. घरी येऊन मातोश्रींना विचारले" आई परिस कसा असतो गं????""
" आज हे काय नवीन????आई हसली.
मी ठरवले आपण परिस शोधायचा.....रस्त्यावर कुठेही वेगवेगळ्या आकाराचे,रंगाचे दगड मी शोधू लागले.माझ्याकडे बरेच दगड जमा झाले. मी ते लोखंडाला लावून पाहिले.लोखंडाचे सोने झाले नाही. मातोश्री घर आवरताना हे सगळे दगड फेकून देत असत.
हळूहळू मोठी झाले शिकले.नोकरी लागली.तरीही मनात
परिस होताच.जसे वय वाढत जाते तसे आपण अनुभवाने
शहाणे होतो..
आता समजून चुकले की परिस........म्हणजेच तुंम्ही चांगले शिका कष्ट करा.....गरजूंना मदत करा.चांगल्या
मार्गाने जा.याची फळे चांगलीच मिळतात.
थोडक्यात काय तर चांगले कर्म करणे हाच परिस
आणि त्याचे चांगले फळ मिळणे म्हणजेच सोने होणे
हा परिस आपल्या प्रत्येक जणांकडे आहे.



हेअर स्टाईल


हेअर स्टाईल 


सुट्टीचा दिवस होता..सोफ्यावर बसून छानसं कुठचंसं मॅगझीन वाचत होतो..इतक्यात सौंचं आगमन झालं...माझ्यासमोर येऊन उभी राहत विचारलं, " कशी दिसत्ये ? "...मी तिला वर पासून खालपर्यंत बघितलं..मला तसा काही फरक जाणवला नाही..पण तसं बोलायची सोय नसते..कारण बायको ज्याअर्थी असं विचारते, त्याअर्थी ती नक्की काहीतरी करामत करून आलेली असते..हां आता ती करामत कुठली आहे ते ओळखण्यासाठी मात्र, ईश्वरी देणगीच लागते..मी आपलं उगीच काहीतरी बोलायचं म्हणून म्हटलं, "वा..मस्तच दिसत्येस..फेशियल करून आल्येस का ?" ..." नाही रे...हेअर-कट करून आल्ये..बघ.."..म्हणत मागे वळली..आता मला अगदी खरं सांगायचं तर त्यातलं (घंटा) काही कळत नाही..मी आपलं उगीच 'वा..मस्तच "म्हणायचं काम मात्र इमानदारीत करतो.. मला वाटलं मी 'वा ' म्हंटलं म्हणजे संपला विषय..पण नाही...बायकोचा लगेच पुढला प्रश्न, " हा 'कट' मला चांगला दिसतो का रे ?..हा ना V कट आहे..." आता ही V कट म्हणजे काय भानगड असते बुवा ? (अर्थात मनात म्हटलं ).."हो हो ..एकदम मस्तच दिसतो हा कट तुला."- मी. "मला वाटतं, मला तो मागच्या वेळेस केला होता ना,तसा U कट च चांगला दिसतो..आज उगीच हा V कट केला.." -बायको..नियती माझ्या विरुद्ध हा कुठला 'कट' रचत होती हेच मला कळेना..आता तो 'कट' V होता कि U  होता हे मला कसं कळणार ?माझी उभी हयात, सलून मध्ये जाऊन फक्त " मिडीयम काप" सांगण्यात गेली...मला ते V किंवा U समजावं अशी अपेक्षा तरी का करावी म्हणतो मी..पण 'नवरा' हा एक असा प्राणी असतो, ज्याला पूर्ण प्रामाणिक राहून चालतच नाही..त्याला काहीही ढिम्म कळलं नाही तरी सगळं काही कळल्याचा आव आणावाच लागतो.."आज फार छान दिसत्येस हा " असं २-४ दिवशी म्हणावंच लागतं..तरच संसार सुखाचा होतो..असो.. पुढे अजून काही दिवसांनी मी केस कापून आलो..बायकोची फिरकी घ्यावी म्हणून तिच्यासमोर जाऊन उभा राहिलो..तिच्याच स्टाईल मध्ये तिला विचारलं "कसा दिसतोय ?"....आता बायको सुद्धा थोडं खोटं बोलली तर नाही का चालणार ? पण नाही..आमची बायको भयंकरच प्रामाणिक..माझ्या तोंडावर हसत मला म्हणते, "एक नंबरचा चम्या दिसतोयस ".. एक अक्षरही न बोलता मी अंघोळीला निघून गेलो..आतमध्ये सुद्धा बायको बाहेर हसत असल्याचा आवाज येतच होता..
 
व.पु.काळे

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा