Pages

बुधवार, २२ ऑगस्ट, २०१८

आधुनिक_आई....

➽#आधुनिक_आई....

जी मुळातच करिअरच्या धावपळी मुळे 25 नंतरच आई होणं स्विकारते...

जी नोकरी टिकवण्यासाठी नवव्या महिन्यापर्यंत ८.३४ च्या चर्चगेट फास्टच्या गर्दीत चेंगरत ड्युटिवर जाते...
जी एकाचवेळी घराचं कर्ज, नोकरी, सासर-माहेर आणि होणारं बाळ यातली तारेवरची कसरत लिलया करते...

जी पाळण्यातल्या बाळाला झोके घालता घालता मोबाईलवरुन ऑफिसच्या प्रेझेंटेशनची गाईडलाईन देते...
जी "ब्रेस्ट फिडींग"," डायट इन प्रेगनन्सी", "इम्पॉर्टन्स ऑफ ऑरगॅनिक फुड" वरची जाड जाड पुस्तकं वाचते पण, मेतकुट कसं बनवावं? हे रुचिरातुन वाचते...नाहीच जमलं तर मावससासुबाईंना फोनही करते....

"पिडिएट्रीशन"च्या सुचनांबरहुकुम बाळाला औषधे देता देता, आयुर्वेदीक दुकानात उभी राहुन बाळगुटीचे वाने खरेदी करते...

जिला "बाळाला मसाज करावा की करु नये?","बाळाच्या कानात तेल सोडावं की नको?" असले गंभीर प्रश्न पडतात...

बाळाबरोबर ती देखील कधीकधी बाळ होते...आणि बाबांसारख्या दुसऱ्या बाळालाही पहिल्या बाळासारखं सांभाळते....

जिला कधीतरी बाबांनी "डिनरला चलतेस का?" असं नुसतं म्हणलं तरी आवडतं...

जी "स्वारावोस्की क्रिस्टल"च्या शोरुमबाहेर नुसती घुटमळते....युरोप ट्रीपची ब्रोशर्स उगीच चाळते...
बाळ मोठं झाल्यावर आसपासच्या शाळांचे रिपोर्ट्स इंटरनेटवर पहाते...पण तरीही तिची गाडी फीपाशी नेहमीच अडते...

जी बाबांच्या नव्या शर्टचं, मोबाईलचं कौतुक नेहमीच करते...

जी सहा महिन्याच्या बाळाला "केअर टेकर" नाहीतर "बेबीसिटर"कडे सोपवुन दिवसभर टेन्शनमध्ये रहाते....
रात्री उशीर झाला तरी पेंगणाऱ्या डोळ्यांसह ऍल्जिब्रा, मॅथेमॅटिक्सची प्रमेये सोडवते...

जी जीन्स-टॉपमध्ये कम्फर्टेबल पण साडीत मात्र प्रचंड अवघडते...(तरीही किमान २० प्युअर सिल्कच्या साड्या बाळगते)

अशी ही आधुनिक आई....
बाळासोबत संसारालाही जपते...
पगाराची ऍडजस्टमेंट करत संसाराचा गाडा हाकते..
स्वत:ची डोकेदुखी बाजुला ठेऊन घरातल्यांची तब्येत मात्र जपते...

कितीही झालं तरी "कालची-आजची अन परवाची" आई मात्र "आई"च असते..

चिं त न

  🔹  चिं   त   न  🔹

      आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये. रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवाफुगवा ‌अबोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी. झोपताना रागात झोपू नये.
      देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडला तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळभ रहात नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची?  सतगुरू म्हणतात ज्याला सुखी व्हायचे आहे त्याने पहिली माघार घ्यायची.
      अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातली मजा ज्याला कळली तो spiritual progress ची आणखी एक पायरी चढला.



प्रेम

ही गोष्ट आहे एका अमेरिकन आई आणि तिच्या जुळ्या मुलींची ...ही आई स्वभावाने अत्यंत प्रेमळ, उदार, सतत इतरांचा विचार करणारी, देणारी.. तिला जुळ्या मुली झाल्या.. वेळेआधी प्रसूती झाल्यामुळे दोघीही अत्यंत अशक्त होत्या.. डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांची  जगण्याची शक्यता खूप कमी आहे.. पण हार मानेल ती आईच नाही.. या आईने पण आपल्या मुलींच्या जीवन रक्षणासाठी कंबर कसली आणि जणू साक्षात अमृत पाजून त्यांना मृत्यूच्या दाढेतून खेचून काढले.. दोघी मुली जगल्या,शिकून मोठ्या झाल्या आणि आपल्या आपल्या मार्गी लागल्या.. वडिलांच्या निधनानंतर आई एकटीच, स्वयंपूर्ण स्वावलंबी जीवन जगत होती.. परोपकारी असल्याने अनेक जणांना आपल्या मदतीने .. सल्ल्याने आपले करत होती.. जुळ्या मुलींपैकी एक मुलगी मोठी होऊन डॉक्टर, मनोविकार तज्ञ झाली.. डॉक्टर असल्यामुळे ती बरेचदा काळजीपोटी आईला म्हणायची की आता उतारवयात एकटी राहण्यापेक्षा तिने मुलीसोबत राहायला यावे.. पण आईला काही ते पटायचे नाही.. तिचे म्हणणे मला कोणावर ओझं नाही व्हायचं.. अशीच काही वर्ष सरली आणि वार्धक्यामुळे  आई आजारी पडली आणि नाईलाजाने का होईना या डॉक्टर मुलीकडे राहायला आली.. मुलीने अत्यंत प्रेमाने तिची सेवा, उपचार सुरु केले.. मात्र जवळ जवळ दोन वर्ष बिछान्यावर राहून खूप हाल होऊन शेवटी या आईचा मृत्यू झाला..

मुलीला साहजिकच खूप वाईट वाटले.. कालांतराने जरी ती रोजच्या व्यवहाराला लागली तरी राहून राहून तिच्या मनात एकाच प्रश्न येई की आपल्या आईने जन्मभर इतरांना काही ना काही दिले, इतकी सेवा केली .. तरीही तिच्या वाट्याला  असे अगतिक मरण का यावे?? खूप बेचैन होई ती या विचाराने आणि तिच्या देवावरील श्रद्धेलाही कुठेतरी तडा जाऊ लागला.. देवाला ती एकच प्रश्न विचारी की माझ्या आईसोबत तू असा अन्याय का केलास??असेच दिवस सरत होते. एकदा तिची बेचैनी बघून कोणीतरी तिला सुचवले की तुम्ही ध्यान करायला शिका.. ध्यानावस्थेत माणसाला त्याच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतात.. हे ऐकुन तिने ध्यान करायला शिकण्याचे ठरवले आणि तसे केले.. त्यानंतर ती नियमितपणे ध्यान करू लागली आणि काहीच दिवसांत बरीच शांत झाली.. तरीही तिच्या मनातील प्रश्न अजून अनुत्तरितच होता..

मात्र एके दिवशी ती ध्यान करायला बसली आणि खोल ध्यानावस्थेत तिला एक ज्ञान रुपी संदेश मिळाला..तिला जाणवले की जणू कोणीतरी तिच्या प्रश्नाचे उत्तरच देत आहे.. काय होते ते ज्ञान रुपी  उत्तर?? तिला समजले की तिच्या आईने आसपासच्या सर्वांना खूप प्रेम दिले ..प्रेम म्हणजे देणे... हा धडा तिने चांगलाच आत्मसात केला. पण प्रेमाचा तितकाच महत्वाचा धडा म्हणजे इतरांच्या प्रेमाचा कृतज्ञतापूर्वक  स्वीकार करणे,जो ही आई सतत नाकारत राहिली. अगदी स्वतःच्या  मुलीकडून सुद्धा.. आणि म्हणूनच या जन्मातील प्रेम घेण्याचा हा धडा तिने पूर्णपणे

शिकावा म्हणून आयुष्याची शेवटची वर्ष तिने इतरांचे प्रेम आणि सेवा घेत घालवली.

ही गोष्ट वाचल्यावर मलाही माझ्या आयुष्यातील अनेक असे प्रसंग आठवू लागले. जेव्हा मी माझ्या अज्ञानापोटी, अहंकारापोटी  इतरांचे प्रेम नाकारत होते, त्याचा अव्हेर करत होते, त्यांना दुखवत होते.. मला चांगलेच कळले होते की प्रेम करणे, प्रेम देणे जशी कला आहे तसेच प्रेमाचा सन्मानाने स्वीकार करणे ही पण त्याला पूरक कला आहे.. आणि विचारातला  हा बदल कृतीत जसा येऊ लागला, कुणाकडून मदत मागताना पूर्वी येणारे अवघडलेपण नाहीसे होऊ लागले, नाती जास्त खोल ,जास्त समृद्ध होऊ लागली आणि जीवन जास्त सोपं... जास्त आनंदी आणि सार्थक होऊ लागले.. मी भरभरून देईन पण घेणार मात्र नाही, हा माझा अहंकार आहे.. कोणी कितीही म्हटले की माझे कोणा वाचुन काही अडत नाही, मला कोणाची गरज नाही तरीही हे जग परस्पर अवलंबन याच तत्त्वावर  चालले आहे, म्हणूनच त्याला जीवनचक्र म्हटले जाते.. आणि चक्रातील प्रत्येक बिंदू केंद्राशी जोडलेला आहे.. तसेच या सृष्टीत सुद्धा प्रत्येक कण हा त्या वैश्विक चेतनेचा अंश आहे आणि त्याचे काही विशिष्ट प्रयोजन आहे.. मुळात या सृष्टीची निर्मिती ही त्या सर्वोच्च शक्ती च्या प्रेमाचा आविष्कार आहे.. त्याच्या आपल्यावरील प्रेमाचा आदराने स्वीकार करूया आणि हे प्रेम जास्तीत जास्त उधळूं या प्रत्येक कणावर....प्रत्येक क्षणी..

श्रद्धा

श्रद्धेमुळे मानसिक आधार मिळतो, हीसुद्धा मनाची करुन घेतलेली समजूत आहे. श्रद्धेलाही विवेकाचे अधिष्ठान हवे अन्यथा तिचे रुपांतर प्रारंभी अंधश्रद्धेत आणि नंतर अतिरेकवादात होऊ शकते. एखाद्याला त्याच्या आईबद्दल आदर, प्रेम, विश्वास वाटतो, ही श्रद्धा. पण तीच आई पत्नीचा जाच करत असल्यास तिला तिच्या चुकीची जाणीव करु न देणे अथवा आईच्या वर्तनाचे विश्लेषण न करणे,ही अंधश्रद्धा आणि जगात केवळ आईच सर्वश्रेष्ठ, असे मानणे हा अतिरेकवादच..

मानवी समूहाकडून तर्कनिष्ठता, विवेक याची अपेक्षा करायची नाही तर मग कुणाकडून ? कारण निसर्गाने मानवालाच कृतींमागील विश्लेषणाची विशेष बुद्धिमत्ता दिली आहे. इतर प्राणी 'आहार्, निद्रा,भय, मैथुन' यापलिकडे विचार करत नाहीत. प्राण्यांमधील बुद्धिमत्ता आणि कल्पकता किंवा वात्सल्य व प्रतिकारक्षमता (हल्ला करणे) या गोष्टी या मूलभूत गरजांशीच संबंधित आहेत.

मनुष्य प्राणी या सर्वांहून अधिक उत्क्रांत आहे. संवेदनांच्या रुपाने तो लहानपणापासून घेत गेलेला अनुभव त्याच्या मेंदूच्या स्मृतिकोषांत साठवला जातो आणि त्या संदर्भ चौकटीतच तो सध्याच्या अथवा भविष्यातील कृतींबाबत निर्णय घेतो.
प्रश्न असा आहे की अनुभवांतून सत्याची जाणीव झाल्यानंतरही त्याने चुकीच्या समजुतींना कवटाळून बसावे का ?

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास लहानपणी आपण परी, राक्षस, देव, भुते, जादू, चमत्कार या अद्भुत विश्वात रमतो. मोठे झाल्यावर यातील काही खरे नसते आणि आपल्या कृतीच परिणाम घडवतात. हे उमगूनही 'तेच जुने विश्व खरे' (कारण ते सुखद अनुभूती देते.) असे मानण्यात कसला आलाय शहाणपणा ?
हे तर विवेकावर जाणूनबुजून घातलेले पांघरुण आहे.
नैतिक तत्त्वांवर श्रद्धा असणे इतपत ठीक, पण जसे बायबलमध्ये म्हटले आहे, की पृथ्वी गोल नसून् चौकोनी आहे, म्हणून त्या समजुतीला कवटाळून बसणे, ही मात्र अंधश्रद्धाच.

एखाद्याच्या श्रद्धेचा इतरांना त्रास होईल न होईल पण अंधश्रद्धेचा आणि अतिरेकवादाचा कायम त्रासच होतो. असो.
कुणाही माणसाने विवेकी अन् तर्कनिष्ठ असलेच पाहिजे.
तरच विषमता, शोषण, हिंसाचार याला पायबंद बसतो.

what is poverty

काल एक धक्का बसला. अजुन सावरलो नाही.
एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा ( साधारण वय वर्ष  आठ) एका कोपर्‍यात बसून ईतरांचा पकडापकडीचा खेळ बघत होता.
कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता.पण खेळत नव्हता.
मी त्याला विचारले...

" बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?"

त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले .

" आय नको म्हनत्या ...."

" आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !"

त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला.
मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना....

" मला माहीती आहे, आई तूला खेळायला का नको म्हणते !!! अजिबात अभ्यास करत नसशील !!!"

माझा टोमणा त्याला बरोबर  बसला असावा. खेळातला खेळकरपणा त्याच्या चेहर्‍यावरून गायब झाला. त्याने थेट माझ्या नजरेला नजर भिडवली , जगातले विखारी सत्य त्याने मला सांगितले...

" आई म्हनत्या...खेळू नको....खेळून भुक लागल....मग खायला मागशील "

त्याच्या डोळ्यात किंचीत पाणी आले होते. तडातडा ऊठून तो कुठेतरी निघून गेला.

मी अजूनही बेचैन आहे. आणी गेल्या वर्षभरात भुक लागावी, अन्न पचावे म्हणून औषधांवर किती खर्च केला याचा हिशोब करत बसलो.

मेड फॉर इच अदर

कागदावर जुळलेली पत्रिका
आणि
काळजावर जुळलेली पत्रिका
यात अंतर राहतं.

लाखो मनांच्या
समुद्रातून योगायोगाने
२ मनं अगदी एकमेकांसारखी
समोर ठाकणं जवळ-जवळ
अशक्य आहे,
हे मानूनच हा डाव मांडायचा असतो.

वेगळ्या वातावरणात,
संपूर्ण निराळे संस्कार लाभलेले
२ जीव, एकमेकांसारखे
असतीलच कसे?

सुख-दुःख, प्रेम,
भांडणाचे काळे पांढरे चौकोन ओलांडण्याचा खेळ खेळवणं
हीच तर नियतीची जुनी हौस आहे.

सरळ सोपं आयुष्य नियतीने देवालाही दिलेले नाही.
या न देण्याचंच 'देणं'
स्वीकारून संसारात पाऊल टाकायचं असतं.

निसर्गात एक पान दुसऱ्या पानासारखं
नाही, तर
तुला मिळणारा 'जीवन साथीदार' अगदी तुला हवा तसा
असणार कसा?.
त्याचे - आपले, काही गुण
जुळणारे नसणारच..
त्या वेगळ्या आपल्याला न पटणाऱ्या गुणांतच,
त्याचं माणूस म्हणून
वेगळेपण आहे,
हे मान्य करणार असाल
तरच संसारात पाऊल टाकावं.

अशा आशयाचं समुपदेशन ही आज काळाची गरज आहे.

कागदावरच्या कितीही कुंडल्या बघा..
बघण्याच्या समारंभात
गच्चीवर गप्पा मारताना छंद, महत्त्वाकांक्षा,
श्रद्धा-अंधश्रद्धा असे
तेलकट प्रश्न विचारा..
या प्रश्नांची उत्तर ही सौंदर्य-स्पर्धेतील मेकअप केलेल्या
सुंदर मुलींच्या भंपक उत्तरांसारखीच.

लग्नानंतर मग खरं
काय ते एकमेकांना
कळत जातं.

तेव्हा म्हणाली होती,
'वाचनाचा छंद आहे'
पण नंतर साधं वर्तमानपत्र
एकदाही उघडलं नाही बयेनं...

जाब विचारू शकतो आपण?

किंवा
तो म्हणाला होता - 'प्रवासाची
आवड आहे;
जगप्रवास करावा,
हिमालयात ट्रेकिंग करावं -
असं स्वप्न आहे!'
पण
प्रत्यक्षात कळतं;
कामावरून आला की
जो सोफ्यावर लोळतो
की गव्हाचं पोतं जसं.
जेवायला वाढलंय..
हे ही चारदा सांगावं लागतं...

प्रवासाची आवड कसली?
कामावर दादरला जाऊन
घरी परत येतो ते नशीब...
वर्षभर सांगतेय,
माथेरानला जाऊ तर
उत्तर म्हणून फक्त
जांभया देतो...

कसले मेले ३२ गुण जुळले
देव जाणे.
उरलेले न जुळलेले ४ कुठले
ते कळले असते तर...

मनापासून सांगतो,
त्या न जुळलेल्या गुणांशीच
खरं तर लग्न होत असतं आपलं.

तिथं जमवून घेणं ज्या व्यक्तीला जमलं,
तीच व्यक्ती टिकली...
नाही जमलं की विस्कटली.

अन्याय -शोषण,
सहन न करणं, हा पहिला भाग झाला...
पण न जुळलेल्या
गुणांमध्ये एकमेकांच्या
वेगळ्या क्षमतांचा शोध
घेऊन नातं जुळतंय का हे पाहण्याची सहनशीलता
दोघांमध्ये हवी.

पण आज हे लग्नाळू
मुला-मुलींना
सांगितलंच जात नाहीये;

नाही जुळलं -मोडा; व्हा विभक्त.

आणि मग करा काय??

आपल्याला 'हवी तशी'
व्यक्ती मिळणं हे एक
परीकथेतील
स्वप्न असेल;
पण वेगळ्या रंगाच्या
धाग्याने टाके घालीत
आयुष्य जोडतं ठेवावं लागतं
हेच खरं वास्तव आहे.

धुमसत राहणाऱ्या राखेत
कसली फुलं फुलणार ?..

एकमेकांचे काही गुण
जुळणारच नाहीत,
ते मी स्वीकारणार आहे का?-
या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर
स्वत:शी
देऊन मगच संसार
मांडायला हवा.

आपल्यापेक्षा कोणत्याही
वेगळ्या
व्यक्तीचं वेगळेपण सहज
स्विकारणं हे या वाटेवरच
पाहिलं पाऊल...

ते पाऊल योग्य विश्वासाने
पडलं की इतर सहा पावलं
सहज पडत जातात..
आणि मग ती "सप्तपदी" - "तप्तपदी" होत नाही..
हेच संसाराचं खरं मर्म आहे.

"मेड फॉर इच अदर"
आपोआप होत नाहीत.
होत जातात.....!!

बुधवार, २९ नोव्हेंबर, २०१७

my konkan festival diwali

देव दिवाळी 

                खरे तर सण हे आनन्दासाठीच साजरे केले जातात. सध्या दिवाळी म्हणजे दिवाळ असच काहीस  लोक बोलत असतात. देव दिवाळी शहरात साजरी केली जात नाही. पण गावात साजरी केली जाते. 
माझे बालपण कोकणातील अत्यंत दुर्गम भागातील गावातले . त्याकाळी गावात घर घरात माणसे असायची, म्हणजे घरात माणसेच राहतात, पण सध्या अशा गावातून केवळ वयस्क, म्हातारे, निवृत्त लोकच पाहावयास मिळतात. तर सांगायचं असं कि, गावात बरीच माणसे असायचीय, पोरेटोरे, शेतकरी, बाया माणसे ई. करती माणसे बहुतांश मुंबईत असायची. त्यांची फेरी शिमगा, गणपती किंवा घरातील काही समारंभ अथवा दुःख याकरिता गावी यायची. 
             आम्हा मुलाना आदल्या दिवसापासून उत्साह असायचा. या दिवसात थंडी चांगलीच पडलेली असायची.  आदल्या संध्याकाळी आम्ही अंगणात गप्पा मारता मारता पैज लावायचो कि उद्या जो कोणी  लवकर उठून पूजा करेल त्याला ५ - ५ बोरे  इतरांनी द्यायची. हा, आता बोरे म्हणजे झाडाची बोरे नव्हेत, तर या दिवसात आमच्या कडे आजच्या सारखा फराळ वगैरे भानगड नसायची. तर शेतातील तांदळापासून घरीच तयार करण्यात आलेले पोहे आणि गहू अगर तांदळाच्या पिठात शेतातून काढलेले तीळ टाकून गोल आकाराची बोरे तयार केली जायची. रुचकर व आरोग्यदायी. तीही सकाळी उठून आजी करत असे. 
            रात्री हुरहुरत्या उत्साहाने झोपी जायचो. सकाळी पहिल्या कोंबड्याला आजी उठायची. पहिल्या कोंबड्याला म्हणजे, कोंबडा सकाळी ४ ते ४. ३० ला पहिल्यांदा बांग देतो, नंतर दुसरा म्हणजे ५. ते ५. ३० ला नंतर ६ते चांगले उजाडून बाहेर जाई पर्यंत, कोंबडा आरवण्यासाठी खास राखून ठेवला जायचा. पहिल्या कोंबड्याला  जाग यायची, तो पर्यंत आजीने  उठून चूल पेटवलेली असायची. शेकत शेकत पाणी गरम व्हायचे, आणि मग पटकन आंघोळ करून स्वारी तयार.. 
            घरच्या देवाला ओवाळून नमस्कार करायचा. नंतर कंदिलाच्या प्रकाशात गोठ्यात जायचे, गुरेही ओळखीचे माणूस बघून आळोखे पिळोखे देत उभे राहाची. थोडासा हू हू  करायची. गाई बैलांच्या शिंगाला तेल लावून आरती ओवाळायची, ज्यांच्या जीवावर आपण शेती करतो, पोट भरतो त्यांच्या पायी कृतज्ञता. ओवाळून झाल्या नंतर बाहेर येऊन तोंडाला दोन्ही हातांची कोण करून जोरात ओरडायचं इडा पीडा टळू दे, बळीच राज्य येऊ दे.
           आवाज ऐकून शेजारची मित्र मंडळी जागी व्हायची. काहींची आंघोळ सुरु असायची, माझा आवाज ऐकल्यावर त्यांची घाई व्हायची. करता करता सगळे जागे व्हायचे. आणि मग मी जिंकल्याने सर्वांकडच्या बोरे मला मिळायची. जिंकण्याची मजा वाटायची.
           कोकणात पैसे अडका कमीच असायचा पण कमी पैश्यातही जी मजा यायची ती आताच्या दिवाळ सणात येत नाही,  केवळ खर्च नसून आनंद असायचा. 

A.M. आणि P.M. म्हणजे काय? पूर्ण माहिती, इतिहास आणि वापर

  A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर A.M. आणि P.M. म्हणजे काय ? पूर्ण माहिती , इतिहास आणि वापर दैनंदिन ...

आणखी पहा